अध्याय १३ वा - श्लोक ५७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


इतीरेशेऽतर्क्ये निजमहिमनि स्वप्रतितिके परत्राजातोऽ‍तन्निरसनमुखब्रह्मकमितौ ।
अनीशेऽपि द्रष्टुं किमिदमिति वा मुह्यति सति चछादाजो ज्ञात्वा सपदि परमोऽजावनिकाम् ॥५७॥

इरा म्हणिजे भारतीस । ब्रह्मा जो कां तिचा ईश । मोहावर्ती बुडणें त्यास । जालें असतां ये रीती ॥७॥
कोणेविषीं मोह झाला । ऐसें पुससी जरी नृपाळा । हरीचा निजमहिमा देखिला । तो तर्किला न वचे त्या ॥८॥
असाधारण महिमा दृष्टी । देखोनि तर्कितां वितर्क कोटि । न तर्केचि मग परमेष्ठी । मोहदुर्घटीं बुडाला ॥९॥
तर्कागोचर न होतां महिमा । देखावयाही अनर्ह ब्रह्मा । स्वप्रकाश ओजस्वी परमात्मा । स्वमायोपरमा आदरी ॥६१०॥
सपदि म्हणिजे तेचि काळीं । जे न मळे जन्मादिमळीं । नाहीं वस्तूहूनि वेगळी । अजा बोलिली चिच्छक्ति ॥११॥
जे वस्तूचा प्रकाश । जिचेनि भासे विश्वाभास । जेथ भेदाचा न शिवे लेश । जे निःशेष सन्मात्र ॥१२॥
जे वस्तूची आस्तिक्यता । स्वागमेंही नातळे द्वैता । आपणां आपण बहुतां सृजितां । अमलसत्ता प्रभूची जे ॥१३॥
ब्रह्मयासि अनुग्रह । केला पुत्रत्व मानूनि स्नेह । व्हावया सृजनकर्मा अर्ह । तैं त्या अपूर्व प्रकटिली ॥१४॥
तेचि एथ स्वयभंजना । प्रकटिली कीं चतुरानना । अयोग्य जाणूनि तद्दर्शना । अंतर्धाना पावविली ॥६१५॥
झळकोनि मेघःशाम नभा । माजीं लपली विद्युत्प्रभा । अविद्येची लेवूनि शोभा । केला उभा विधि पुन्हा ॥१६॥
जीचे ऐश्वर्यप्रभेपुढें । ब्रह्मा किंमात्र कोण्हीकडे । जैसा खद्योत सूर्यापुढें । जाय बापुडे हारपोनि ॥१७॥
एव्हढें अद्भुत जिच्या तेजें । दैवें देखिलें कंजजें । ते तत्काळ गरुडध्वजें । निम्लोच वोजें आणिली ॥१८॥
अविद्या जवनिकेची बुंथी । घालूनि ध्याना पूर्वस्थिती । आणिला तो देखे पुढती । व्योम जगती दिग्वलय ॥१९॥
लटिकी माया वारूनि परती । यथार्थ आणिली पूर्वस्थिती । ऐसें व्याख्यान जे एथ करिती । ते प्राकृतमति अल्पज्ञ ॥६२०॥
सत्यज्ञानानंतानंद । ब्रह्मैकरसमूर्ति विशद । प्रकाशिल्या ते अकोविद । म्हणती मंद अविद्या ॥२१॥
( श्लोकान्वयाभ्यासः ॥ अजामुपसंहृत्य इति अध्याहारः ॥ जवनिका चछादेति ॥ ) देखावयासि अयोग्य महिमा । म्हणोनि मोहातें पावे ब्रह्मा । हें जाणोनि सर्वज्ञा परमात्मा । ऐश्वर्यगरिमा लोपविली ॥२२॥
ते लोपविली म्हणाल कैसी । अभ्रें झांकिलीया नेत्रासी । भास्कर प्रकट जरी आकाशीं । तरी तो त्यासि तिरोहित ॥२३॥
तैसा अयोग्य जाणोनि विधि । अविद्या अंतर्पटें प्रभु आच्छादी । मग तो देखे पूर्वोपाधि । करणवृंदीं पूर्ववत ॥२४॥
ऐश्वर्यमहिमा देखावया । म्हणाल अयोग्यता कां ब्रह्मया । तरी ते क्षणएक परिसावया । कीजे हृदया ऐकाग्र्‍या ॥६२५॥
स्वप्रकाशमय जें सुख । सेवा अवस्थां प्रकाशक । तें सृजनाभिमानीं रजात्मक । विधि निष्टंक केवीं देखे ॥२६॥
गुणसाम्य प्रकृतीहूनि जें पर । तेथ कैंचा गुणसंचार । ब्रह्मा केवळ सृजनपर । रजोमात्र दृश्यस्थ ॥२७॥
मकारात्मक लयाची बुंथी । घालूनि झांकिली जेथिची प्रतीति । त्यावरी उकारे विक्षेपशक्ति । द्विविधस्थिति पांघुरविली ॥२८॥
सृजनाभिमानें अकारमात्रें । लेवूनि करणांचीं उपनेत्रें । क्रियावंतें विधातृगातें । दृश्य तंत्रें वर्तिजे ॥२९॥
ऐशी अविद्या त्रिगुणात्मक । जो पांघुरला त्रिजगज्जनक । त्यासि विभूचा महिमा अटक । ऐसें निष्टंक कळलें कीं ॥६३०॥
जेवीं श्रीमंताचेनि प्रसंगें । नृपालयीं प्रवेशिजे भणगें । तेवीं ऐश्वर्यदर्शन विधीजोगें । जालें योगें संवगडियां ॥३१॥
एथ आशंका स्फुरेल ऐशी । जें अप्राप्य ब्रह्मयासि । कैसेनि लाभे तें इतरांसि । आशा कायशी मोक्षाची ॥३२॥
तरी ऐसें सहसा न म्हणा । ऐका श्लोकींच्या विशेषणा । उपनिषद्वाक्यें सद्गुरु ज्ञाना । अतन्निरसना प्रबोधी ॥३३॥
एथींचा अभिप्राय ऐसा । साधनचतुष्टयसंपन्नशिष्यां । सद्गुरुचरणीं दृढ विश्वासा । धरितां मानसा शुद्धत्व ॥३४॥
यथोक्तवर्णाश्रमाचरण । तेणें रजतमक्षालन । होय विशुद्धअंतःकरण । सत्त्वसंपन्न सहजेंची ॥६३५॥
सहज सत्त्वीं ज्ञानरति । परी ते विपरीत प्रपंचस्फूर्ति । उपनिषद्वाक्यें कृपामूर्ति । जैं प्रवृत्ति पालटी ॥३६॥
अध्यारोपापवादन्यायें । शोधूनि यथोक्त सांप्रदाये । अतद् वृत्ति उपायें । बोधी द्रव्यास्वयें व्यतिरेक ॥३७॥
रज्जूवरी सर्पाभास । कीं मृगजळत्व रवीप्रभेस । तेवी वस्तु म्हणोनि अवस्तूस । अध्यारोप जाणणें ॥३८॥
यया नाम विपरीत ज्ञान । तमगर्भिं सत्त्वें भ्रमोन । यथार्थ आत्मत्वा विसरोन । देहात्मभान दृढ केलें ॥३९॥
वस्तु केवळ परब्रह्म । त्यासि सच्चिन्सुख हें मायाचि नाम । श्रुतीनें ठेऊनि उपाय परम । केला हा भ्रम निरसावया ॥६४०॥
सच्चित्सुख अद्वितीय । भेदरहित तें आपणचि स्वयें । हें विसरोनियां कवळी विषय । विमुख होय स्वसुखातें ॥४१॥
विषय म्हणजे जगदाभास । पांचभौतिक त्रैगुण्य दृश्य । आकारमात्र नाम त्यास । जे जीवात्मयास भ्रामक ॥४२॥
तोचि मानूनि शाश्वत । बाह्य प्रकाश मानूनि नित्य । एथेंचि होईल आनंद प्राप्त । करी निश्चित हा बोध ॥४३॥
एवं सच्चिदानंदमय । केवळ मानूनि दृश्य विषय । जीव भ्रमोनी बद्ध होय । स्वात्मसोय विसरोनि ॥४४॥
तैसा वस्तूवरी प्रपंचारोप । तो हा बोलिजे अध्यारोप । एथ बहु जन्मार्जित सकृतदीप । तो अनुतप प्रकाशी ॥६४५॥
ईश्वरानुग्रह प्रसादसिद्धि । सद्गुरु भेटे कृपानिधि । उपनिषदर्थें तो जैं बोधी । जीवोपाधि तैं निरसे ॥४६॥
ईश्वरप्रोक्त यथार्थ श्रुति । सद्गुरुवचन तें आप्तोक्ती । तेथ दृष विश्वास ते भक्ति । जे जालिया विरक्ति उपजवी ॥४७॥
ईश्वरपर्यंत विषयाभास । मायाभ्रमात्मक हें दृश्य । अनित्य उमजतां निःषेष आला त्रास फळभोगीं ॥४८॥
अनित्य भोगा अभिलाषणें । हेंचि मूर्खत्वाचें जिणें । अमृत म्हणोनि मृगजळ पिणें । किं स्वप्ननिधानें धनिकत्व ॥४९॥
दृश्य वाळिलें अनित्य बोधें । आत्मा नुमजे शोधितां शोधें । तैं श्रुतिमुखें अतद्वादें । सद्गुरुवरें उमजवी ॥६५०॥
न तद्भूमि न तत्तोय । न तत्तेज न पवननिचय । न तद्व्योम ना व्योमादिकार्य । भौतिकमय चराचर ॥५१॥
ऐसें निरसतां तत्त्वें तत्त्व । झालें विवर्ता मिथ्यत्व । वास्तव विवळलें सत्यत्व । निजात्मत्वें चिन्मात्र ॥५२॥
अतन्निरसनमुखेन । म्हणिजे सद्गुरुमुखें करून । ब्रह्मकमिति हें विवरण । वेदोत्तमांग श्रुतीचें ॥५३॥
एवं सद्गुरु स्वमुखें उपनिषद्भाग । साधनसंपन्न उमजवी साङ्ग । तेव्हां त्यास ब्रह्मीं लाग । ब्रह्मा अयोग्य ते ठायीं ॥५४॥
माया गुणेशीं निरसली । आत्मता ब्रह्मीं समरसली । ब्रह्मया रजोगुणाची भुली । त्यातें झाली अप्राप्ति ॥६५५॥
स्वप्रकाश सुखसाचार । सच्चिदानंद ज्या नामोच्चार । ब्रह्मयासि अगोचर । तो इंद्रियपर म्हणोनि ॥५६॥
समष्टीचा सृजनाभिमान । गुणमयी गर्भींचा रजोगुणज्ञ । विषयोन्मुख परोक्षज्ञ । अयोग्य म्हणोन अपरोक्ष ॥५७॥
बाह्यदृष्टि सृजनवेळे । आकारें विश्व आकारिलें । विषयोन्मुख तें परोक्ष झालें । अपरोक्ष न कळे चित्सुख ॥५८॥
परेहूनि जें परतर । तें रजोभिमानासि अत्यंत दूर । ब्रह्मा केवळ रजोमात्र । कैंचा अधिकार त्या तेथें ॥५९॥
ऐशी तिहीं विशेषणीं । भगवन्महिमा अवलोकनीं । योग्यता ब्रह्मया लागूनि । नाहीं म्हणोनि निरूपिलें ॥६६०॥
ब्रह्मा अयोग्य ऐश्वर्यमहिमे । ऐसें जाणोनि पुरुषोत्तमें । आवरूनि यथार्थ ऐश्वर्यगरिमे । अविद्याभ्रमें झांकिला ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP