अध्याय १३ वा - श्लोक ५२

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अणिमाद्यैर्महिमभिरजाद्याभिर्विभूतिथिः । चतुर्विशतिभिस्तत्त्वैः परीता महदादिभिः ॥५२॥

तेजःपुंज आदिमाया । जिणें ईश्वर आला आया । त्याही अनंत होऊनियां । करिती सपर्या पृथक्त्वें ॥७॥
केवळ तमाच्या आकृति । जिहीं जीवित्व आणिलें व्यक्ती । त्या अविद्या अनेक मूर्ति । धरूनि अर्चिती अनंता ॥८॥
माया ज्ञानें अभेदें भजती । अविद्या ममत्वें प्रेमा धरिती । ऐशा भजनाच्या उभय रीति । रायाप्रति शुक सांगे ॥९॥
अणिमा गरिमा लघिमा महिमा । ईशत्व वशित्व प्राप्ति नामा । आठवी बोलिजे प्राकाम्या । या सिद्धि परमा अष्टमा ॥५१०॥
अणिमा म्हणिजे अणूहूनि सान । होऊनि टाकिजे अभीष्टस्थान । अव्याहत त्रिजगीं गमन । हें सामर्थ्य गहन अणिमेचें ॥११॥
सर्षप मात्र असतां स्पष्ट । होइजे मेरूहुनि गरिष्ठ । इच्छामात्रें किजे प्रकट । हें सामर्थ्य उत्कट गरिमेचें ॥१२॥
मनीं उठतां संकल्पमात्र । महा थोर किजे गात्र । मेरूहूनि विशाळतर । हें चरित्र महिमेचें ॥१३॥
थोर असोनि सान होणें । वायूहूनि चपळपणें । चमत्कारें सर्व करणें । हीं विंदाणें लघिमेचीं ॥१४॥
इच्छामात्रें सकळ सृष्टि । करूनि प्रकट दाविजे दृष्टी । ईशत्वसिद्धीची हे रहाटी । दावूनि पोटीं सांठवणें ॥५१५॥
वशित्व म्हणिजे ब्रह्मादिक । संकल्पमात्रें वहाती अंक । सेवा करिती होऊनि रंक । हा विवेक तयेचा ॥१६॥
ब्रह्मांडगर्भीं जे जे वस्त । संकल्पमात्रें होय प्राप्त । कलाकौशल्यें विद्या समस्त । हा वृत्तांत प्राप्तीचा ॥१७॥
मशकापासूनि ब्रह्मावरी । स्वेच्छानुसार सर्वांतरीं । संकल्प मात्र बुद्धि प्रेरी । हे थोरी प्राकाम्यासिद्धीची ॥१८॥
ज्या ज्या दैवताच्या ज्या सिद्धि । तेथवरीच त्यांची प्राप्ति । इया महाप्रभूच्या विभूति । म्हणोनि व्यापिती आब्रह्म ॥१९॥
या प्रभूच्या परिचारिकीं । यासि भुलतां शुद्ध साधकीं । भवप्राप्तीसी पडे चुकी । हे गोष्टि ठाउकी असूंद्या ॥५२०॥
ज्या ज्या दासी या समस्तां । त्यांची वरितां सायुज्यता । अभेदें तत्पद चढे हाता । तेथ कायशी कथा सिद्धीची ॥२१॥
असो या प्रभूच्या विभूति । एक एके मूर्तीप्रति । अनेक अष्टकें पृथक् भजती । हें आश्चर्य चित्तीं विधि मानी ॥२२॥
अव्यक्त महदहंकार । तामस सात्त्विक राजसतर । मूर्तिमंत पृथक् प्रभूतें अर्चिती ॥२३॥
अंतःकरणादि सात्त्विक सर्ग । तीं कर्तृकरणें होऊनि सांग । सगुण मूर्ति पृथक्पृथग् । करिती अनेक सपर्या ॥२४॥
प्राणादि पांच चेष्टाकरणें । श्रोत्रादि पांच ज्ञानकरणें । वागादिकें कर्मकरणें । ये पृथक्सगुणें प्रभु भजती ॥५२५॥
महादिक अष्टमूर्ति । तत्त्वाचिया चोवीस व्यक्ति । भंवत्या वेष्टूनि आराधिती । पृथक्मूर्ति प्रभूच्या ॥२६॥
एवं अंतःकरण चतुष्टय । प्राण ज्ञान कर्म विषय । पृथक्पृथग् हे समुदाय । भजती सदेह प्रभूतें ॥२७॥
महदादि अष्टधा प्रकृति । सूत्रात्मका षोडश विकृति । या पृथग् विवक्षें करूनि होती । चोवीस व्यक्ति तत्त्वांच्या ॥२८॥
इये जगाचीं कारणें । महदादि सूत्रात्मकें भिन्नें । प्रकृति विकृति या अभिधानें । अष्टधा आणी जीवरूपा ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP