अध्याय १३ वा - श्लोक ९ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


केचित्पुष्पैर्दलैः केचित्पल्लवैरंकुरैः फलैः । शिग्भिस्त्वग्भिर्दृषद्भिश्च बुभुजुः कृतभाजनाः ॥९॥

एकीं विकसितपुष्पें तळीं । आंथरूनि पत्रावळी । एकीं बुसा पुष्पदळीं । पत्रावळी कल्पिल्या ॥२९॥
प्लक्ष पलाश पिंपळपानें । आम्र जंबु रंभावनें । उंबर दहिवानें धामणें । कुटजपत्रें वटादि ॥१३०॥
करंज कर्मेळी टेंभुरणीं । भल्लातकी मधु रोहिणी । भोंकरी बदाम अंजनपर्णीं । अशोक चंपक पनसादि ॥३१॥
चविचिमुकुरारजनीदळें । अनेक जातीचीं विचित्र कमळें । नानापरी पल्लव कोंवळे । एकीं अंकुर वृक्षांचे ॥३२॥
एकीं कोमळ तृणांकुर । पसरूनि केले पात्राकार । एकीं फळांचे प्रकार । पात्ररचनीं मांडिले ॥३३॥
एक जाळीयाचे पात्रस्थानीं । कल्पोनि बैसले भोजनीं । एक फळादि त्वग्भाजनीं । गडी अशनीं प्रवर्तले ॥३४॥
रंभादित्वचा पात्ररूपा । एकीं घेतल्या पाषाणचिपा । पात्रें जीं ज्यां प्रिय वत्सपां । तीं तीं तिहीं मांडिलीं ॥१३५॥
ऐसी करूनि पात्ररचना । त्यावरी करूनि परिवेशना । करिते झाले सहभोजना । त्या व्याख्याना अवधारीं ॥३६॥
कथितां अन्नाचे प्रकार । ग्रंथ वाढेल तेणें फार । नाहीं बोलिला व्यासकुमार । तदुक्त मात्र बोलिलों ॥३७॥

सर्वे मिथो दर्शयंतः स्वस्वभोज्यरुचिं पृथक् । हसंतो हासयंतश्चाभ्यवजह्रुः सहेश्वराः ॥१०॥

कृष्ण जाणोनि सर्वात्मक । अवघे श्रीकृष्णाचें मुख । कवळ घालिती बल्लवतोक । तो विवेक अवधारा ॥३८॥
आपणासि जें जें गोड । ममता ज्याचें करी कोड । तेथ गुंते मानस वाड । जें अवघड सांडितां ॥३९॥
तये रुचीचे रुचिकर कवळ । कृष्णा वदनीं वत्सपाळ । घालूनि मानिती तोष बहळ । सप्रेमळ सुख भोक्ते ॥१४०॥
संचित प्रारब्ध क्रियमाणा । सहित कर्मफळाशा जाणा । अवश्य भोक्तव्य जें आपणां । तें श्रीकृष्णा अर्पिती ॥४१॥
अहंता ममता घारी पुरी । कल्पना गुळाची गुळवरी । ग्रास घालिती परस्परीं । सर्वीं श्रीहरि लक्षूनि ॥४२॥
पुत्रदारावित्तेषणा । लोकेषणा चित्तेपणा । ऐशा अनेक शाका जाणा । गडी श्रीकृष्णा अर्पिती ॥४३॥
सूक्ष्म वासना बळकट । देहात्मा पय शर्करा सकट । कृष्णवदनीं करिती प्रविष्ट । अति स्वादिष्ट म्हणोनि ॥४४॥
योगक्षेम दध्योदन । अष्टमदांचीं लोणचीं जाण । रुचिकर म्हणोनि कृष्णार्पण । करिती संपूर्ण वयस्य ॥१४५॥
बाह्य दंभ ठोंबरा भला । सलोभ दह्यानें कालविला । लोकमानें रुचिसीं आला । तो अर्पिला हरिवदनीं ॥४६॥
तृष्णा कढी हीं कालवणें । प्रपंच भोजना गोडी जेणें । भवदुःखाचे ग्रास घेणें । रुचिकरपणें जिचेनि ॥४७॥
दीर्घद्वेषें मत्सर मांडे । तदविष्कारें साखर सांदे । मोहघृतेसीं संवगडे । ग्रास रोकडे अर्पिती ॥४८॥
लवण शाका कुसुंबिरी । भरितें कालवणें सांबारीं । ऐशा अनेक विकारपरी । गडि श्रीहरि अर्पिती ॥४९॥
पापड कुरवड्या सांड्या । स्पृहालज्जादि असुया । वडे घारगे ढोकळिया । गडी अर्पिती हरिवदनीं ॥१५०॥
परस्परें घालिती कवळ । भोक्ता लक्षिती श्रीगोपाळ । भोग्यभोक्ता भोक्तृत्वमेळ । होती निर्मळ तत्त्यागें ॥५१॥
ग्रास घालूनि कृष्णामुखीं । आपण तोषोनि होती सुखी । हास्य करिती सकौतुकीं । एकमेकीं उत्साह ॥५२॥
अनेक अन्नाच्या परवडी । पृथक् पृथक् विचित्र गोडी । परस्परें घालूनि तोंडीं । जेविती गडी कृष्णेंशीं ॥५३॥
हास्यविनोद गदारोळी । परस्परें करिती रळी । अनंत ब्रह्मांडें प्रतिपाळी । भोजनकेलि तेणेंशीं ॥५४॥
हांसती आणि हांसविती । ऐसे कृष्णाचे सांगती । परमेश्वरेंशीं जेविती । देवां दाविती वांकुल्या ॥१५५॥
मग कृष्णातें म्हणती गडी । कान्हो कैशी हे तुझी खोडी । आमुच्या जाळ्यांची केली झाडी । मोठा वराडि झालासी ॥५६॥
सिदोरियांचा सरला सांठा । कृष्णा खादाड तूं रे मोठा । आगि लागो तुझिया पोटा । तुझ्या चेष्टा तुज गोड ॥५७॥
मग कृष्ण म्हणे रे सावधान । तुम्हीं अर्पिलें त्वंपद पूर्ण । आतां माझें तत्पद अन्न । सुखें भोजन करा रे ॥५८॥
ऐसें ऐकोनि संतोषले । श्रीकृष्णवदन पहात ठेले । कृष्णस्मरणें गर्जिन्नले सावध झाले भोजना ॥५९॥
म्हणे पेंध्यासी वांकुडा । या कृष्णाचा स्वभाव कुडा । आमुचा घेतल्यावीण झाडा । आपुला तुकडा दाविना ॥१६०॥
पेंधा म्हणे उगाचि राहें । कृष्ण कवळ देणार आहे । नेदीच तरी आमुचें भय । त्यांसि काय विचारीं ॥६१॥
रागें बोलिला सुदामा । आमुचें खाऊं नेदी आम्हां । पुढें येणार कोण्या कामा । हा काय ब्रह्मा उतरला ॥६२॥
बोबडा म्हणे बथा थारे । मात बोलेन यांतें म्होरें । आमुतें अन्न खाऊनि थारें । आपुलें कांरे नेदी हा ॥६३॥
वांकुडा म्हणेरे वांकुडें । बोला तितुकें अवघें कुडें । ग्रास येतां मुखापुढें । विघ्न रोकडें हें त्यांसीं ॥६४॥
वृथा बोलोनि नाशितां काय । अवघे कृष्णाचे धरा पाय । त्यासीच म्हणा बापमाय । होईल सदय तेव्हां तो ॥१६५॥
सर्वें प्रांतां घननीळा । सावध म्हणे वत्सपाळां । तत्पदसिदोरिच्या कवळा । घ्यारे सकळां देतों मी ॥६६॥
विरक्तीचा देतां कवळ । सोज्वळ झाले नेत्रकमळ । तेणें पहाती वत्सपाळ । ब्रह्मगोळ विवळूनि ॥६७॥
वांकुल्या दाविती सुरवरां । म्हणती स्वर्गींच्या वानरां । केवळ कर्मफळांचा चारा । या प्रकारा नेणती ॥६८॥
ऋतुपालटें फळांसी अंत । तेव्हां अचुक अधःपात । अन्यफळांतें धुंडित । नाना चढत देहद्रुमीं ॥६९॥
अनेक सृकुताचिया राशि । जोडुनि झाले स्वर्गवासी । ते पाहती आश्चर्येंशीं । बाळकेलीसी हरीचे ॥१७०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP