यशवंतराय महाकाव्य - सर्ग आठवा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


लढाईची तयारी - शहराचा बंदोबस्त - रात्रीचे पहारेकरी - यात्रेकरुचा वेष घेऊन शहरांत शिरलेला मल्हारराव होळकर व यशवंतराव यांची गांठ - त्यांचें संभाषण - मल्हारराव निघून जातो.

श्लोक
आज्ञा करीतो यशवंत लोकां । येईल केव्हां न कळेचि धोका ॥
या कारणें सावध सर्व व्हावे । आपापलें काम करूं झटावें ॥१॥
दे धीर पौरांप्रत वीर मोठा । “ राखूं हठानें समयास कोटा ॥
वर्षोनवर्शे झगडूं श्रमानें । जाऊं मराठ्यांस न हार मानें ॥२॥
राहेल जों एक जिवंत पौर । ठेवील खाली न कधीं हत्यार ॥
ज्या जन्म - भूमीवर जन्म त्याचा । अव्हेर नाहीं करणार तीचा ” ॥३॥
तटावरी ठेउन तोफखाना । तयार यंत्रें दुसरींहि नाना ।
करांत घेती तरवार पौर । पुन्हा पुन्हा लाविति दृष्टि दूर ॥४॥
जेथें जिथे कोसळुनी तटाला । झाला असे भंग तिथे तयाला ॥
लावून कारागिर नीट केलें । तें काम होतां दिन आठ गेले ॥५॥
येती मराठे कवण्या प्रकारें । जाणावया उत्सुक होति सारे ॥
वार्ता कळाया बहु दूर दूत । हुशारसे पाहुन धाडितात ॥६॥
कोण्या प्रकारें कपट - प्रवेश । होईल त्यांचा न कळेचि लेश ॥
शूरासवें युद्धि न भीति कांहीं । धूर्तापुढें चालत शक्ति नाहीं ॥७॥
घेण्यामधें दुर्गम दुर्ग मोठे । कौशल्य जें दाविति कीं मराठे ॥
जें शौर्य त्यांचे लढण्यांत आहे । स्वप्नामधें चित्र उभेंच राहे ! ॥८॥
लावून दृष्टि क्षितिजास तीक्ष्ण । घेऊन हातांत धनुष्यबाण ॥
तठावरी रात्रि उभा शिपाई । कंटाळुनी झोंप तिथेच घेई ॥९॥
स्वप्नामधें पाहतसे मराठे । धाके, तयाचें मग ऊर फाटे ॥
‘ धांवा ! उठा ! शत्रु समीप आला । जागा असें बोलुन नीट झाला ॥१०॥
गेलें फुलोनी वन काजव्यांनीं । वाटे तयाला परि दीप कानीं ॥
हळूच बोलावुन सोबत्यांला । विचारितो - ‘ काय म्हणाल याला ? ’ ॥११॥
पूर्वेकडे धूम्रसमान कांती । क्रमें पयोदाकृति ऊठताती ॥
वाटे धुळीचे दिसतात लोट । वेगें वरी धांवति ते अलोट ॥१२॥
होता न कोणा प्रतिबंध याया । कोट्यांत मार्गस्थ जनां रहाया ॥
त्यातें न्यहाळून परी पहावें । चित्तांत शंका उठती स्वभावें ॥१३॥
सूर्यास्त व्हाया अवकाश आहे । तों वसे प्रत्येकहि बंद राहे ॥
होतां घडी दोन दिन प्रभातीं । द्वारें खुलींसर्व जनास होती ॥१४॥
घोड्यावरी बैसुनि रात्र सारी । हिंडे पुरीं मुख्य पुराधिकारी ॥
देखे जरी तो भय - हेतु कांहीं । तेथें स्वतां जाउन नीट पाही ॥१५॥
एका प्रसंगीं पुर रक्षण्याला । जातां दिसे थोर उजेड त्याला ॥
पाहे तिथे देउळ एक थोर । पांथस्त वस्ती करितात फार ॥१६॥
मार्गीं तिथे चार उभे शिपाई । लोकांस पृच्छा करितात कांहीं ॥
ऐकोनियां उत्तर शंकतात । पुन्हा पुन्हा त्यांस विचारतात ॥१७॥
“ आलांत कोठून कशास येथें ? । जाणार कोठें ? कवण्या स्वपंथें ? ॥
आहे तिथे काम कसें कुणाचें ? द्या लोकहो ! उत्तर नीट याचें ” ॥१८॥
खोदून खोदून विचारितां हें । संतापला पांथ - समूह राहे ॥
शस्त्रें उगारुं बघतात कांहीं । गेले बिचारे भिउनी शिपाई ! ॥१९॥
झाला पुढें तों यशवंतराय । तों वंदिती रक्षक नम्र पाय ॥
“ इच्छा तुझी पूर्ण करावयाला । आम्ही इथें हिंडतसों दयाळा ! ” ॥२०॥
पुराधिकारी यशवंत बोले । हळूहळू संनिध धीठ चाले ॥
“ हे लोकहो !  श्रेष्ठ तुम्हांत कोण । येवो पुढें निर्भय त्या बघेन ॥२१॥
कोठून आलां मजला कळेल । शंका मनांतील तदा पळेल ॥
कोटा - पुरीं रक्षण मीं करावें । विचारितों संप्रति याच भावें ” ॥२२॥
तों एक धिप्पाड पुरूष आला । पुढें उभा धीर पदें रहाला ॥
उग्राकृती नेत्र लहान काळे । सदा जयांचा व्यवहार चाले ॥२३॥
बोले - “ अम्ही केवळ सुस्वभाव । आलों इथे हिंडत गांवगांव ॥
यात्रेकरू काशिहुनी निघालों । रामेश्वरा दक्षिण - देशिं चालों ॥२४॥
सूर्यास्त होऊन निशा उदेली । कोट्यामधें यास्तव वस्ति केली ॥
विश्रांति आम्हांस अवश्य झाली । जाऊं उद्यां येथुनियां सकाळीं ॥२५॥
संसार सोडून सुखें तयाची । भक्ती करूं संतत ईश्वराची ॥
हीं राजकार्ये अमुच्या न पंथीं । चित्तांतही यास्तव तीं न येती ॥२६॥
तूं धार्मिकां रक्षसि थोर कष्ट । भोगून पुण्याकर धर्म - निष्ठ ॥
खोटी अशी कीर्ति गमे मनाला । देतोस पीडा दुबळ्या जनाला ॥२७॥
माझा गुरू पावन देवळांत । ब्रम्हैक - चिंता बसला करीत ॥
होवो न त्याला गलबा म्हणून । जावें तुवां हें विनवीन दीन ” ॥२८॥
बोले अशी ऐकुन उक्ति सारी । तीक्ष्ण - स्वरें काय पुराधिकारी ॥
“ हीं वाटती केवळ सर्व ढोंगें । व्हावें कशाला तुज शस्त्र संगे ? ॥२९॥
कीं भासतें स्पष्ट असें मनाला । संसार नाहीं अजुनी त्यजीला ॥
अंगावरी तीन नवीन वार । कोठील हें सांगसि एकवार ! ॥३०॥
ही दुग्ध मांसादिक - सेवनानें । अंगावरी उज्वल कांति जाणें ॥
ही दंडितां देह कशी मिळावी ? । हिंडोनि तीर्थें तरि केंवि यावी ? ॥३१॥
नेत्रांतलें तेज भयाण मुद्रा । दावी विशेषें कृति फार घोरा ॥
अद्यापि वाटे तुमचा न काम । घातें पराच्या वरितो विराम ॥३२॥
या सर्व पाहूनच लक्षणांतें । आतां सुचे गोष्ट अशी मनातें ॥
बाणा शिपाई धरितां समस्त । आयुष्य गेलें समरांगणांत ॥३३॥
वंचावया दावुन वेष खोटा । आलास येथें असुनी मराठा ॥
आम्ही पुरीं काय करूं पहाया । तूं इच्छिसी गुप्तपणें रहाया ॥३४॥
यासाठिं तूं दंड्य गुरू तुझाही । व्हावी तुम्हांला न कधीं क्षमाही ॥
कारागृहीं बैसवितों पहाल । तेथून कृत्यें अमुचीं खुशाल ! ” ॥३५॥
तो बोलला तो परका मनुष्य । “ आम्ही गुरूचे प्रिय पट्टशिष्य ॥
मारा धरा काय रूचे करा तें । आम्हां, न सोसूं शिवतां गुरूतें ” ॥३६॥
तो सेवकांतें जवळीओल सांगें । तेव्हां प्रतापी यशवंत रागें ॥
“ कोठें गुरू ? कोठिल शिष्य कोण ? । बांधा तुम्हीं या सकळां धरून ” ॥३७॥
तों आंतुनी एक पुरूष आला । ज्या साठ वर्षे असती वयाला ॥
दाढी मिशा डोकिवरील केश । सुशुभ्र ज्याचे जणु काय फेंस ॥३८॥
घारीप्रमाणें बहु तीक्ष्ण नीत्र । बांधा बळी उंच शरीर गौर ॥
छातीमधें रुंद मुखीं उभार । अंगावरी शोभति आठ वार ॥३९॥
झाला पुढें - बोलत शब्द काय । ऐकून घेतो यशवंतराय --, ॥
आम्हांस तूं बांधुन नेसि बाळा ! । आलें न हें आजवरी कपाळा ! ॥४०॥
मी कोण ? तूं ओळखिसी मला कीं ? । मल्हार मातें वदतात लोकीं ॥
छत्तीस वर्षें करूनी सुयुद्ध । मल्हार मी होळकर प्रसिद्ध ॥४१॥
जो बाजिराया उजवाच हात । ज्यातें मराठे सगळे चहात ॥
रामेश्वरापासुन लांब दिल्ली - । पर्यंत ज्याची गुण - कीर्ति गेली ॥४२॥
जो रोहिल्यांतें हि पराभवीता । कीं जो मराठे अटकेस नेता ॥
बंगालचे इंग्रज ज्यास भीती । ज्या पाहतां शीक पळून जाती ! ॥४३॥
जिकी बळें जो समरीं निजाम । जिंकावया ज्या भुवनास काम ॥
झुंजोनि घेतां वसई फिरंगी । ते जाणती यब्दल त्या प्रसंगीं ॥४४॥
त्या तूं मला बांधुन काय नेसी ? । वांछा अशी दुर्घट कां धरीसी ॥
मी एक पन्नास तुझे शिपाई । ये तूं हि होसिद्ध करूं लढाई ” ॥४५॥
मल्हार बोले जंव या प्रकारीं । मागें सरे शूर पुराधिकारी ॥
तो दृष्टि शत्रूवरि नीट देतो । भीती न पावून सकंप होतो ॥४६॥
जो हा मराठ्यांत महापुरूष । भीष्माउणें ज्यास न वीर्य लेश ॥
होता जरी शांतपणें पहात । त्या पाहतां नेत्र दिपून जात ॥४७॥
पाहे वरी काय विचार चाले । बोले मधें अस्फुट ओंठ हाले ॥
इच्छा नसूनी मनिं हात गेला । खड्गाकडे, स्तब्ध उभा रहाला ॥४८॥
बोले पुन्हा तों यशवंत धीर । “ मल्हार तूं होळकर प्रवीर ॥
कोणासही माहित कीर्ति नाहीं ? । भ्यालो तुला पाहुन मी न कांहीं ! ॥४९॥
तूं दिल्लिच्या बादशहास साह्य । देतोस त्याचें करितोस कार्य ॥
जिंकावया हें पुर येथ येसी । अथात तूं वैरि आम्हांस होसी ॥५०॥
सन्मान जो योग्य तुला असावा । तो या प्रसंगीं हि कसा न द्यावा ? ॥
की शस्त्र - विद्या तुजपासुनीच । घेती मराठे जन थोर नीच ॥५१॥
तूं बाजिरायास अमूल्य साह्य । देऊन झालास कृतार्थ आर्य ॥
लक्षावधी वीर तुझी धरीती । आज्ञा शिरीं भीति अरींस देती ॥५२॥
तो तूं हिरा पूज्य महोपयुक्त । येथें तुला हो लय हो लय हें न युक्त ॥
जा आपुला पंथ धरीं खुशाल । राहूं नको या पुरिं दीर्घकाळ ॥५३॥
जो हिंदु - भूमि - गगनीं शशिसा विराज ।
नक्षत्रसे विहत - तेज जयास राजे ॥
अज्ञात हें स्थळ अशा समयीं तयाला ।
धाडून असत - गिरिला न वरीं जयाला ॥५४॥
आहेस तूं नगरिं हें समजून लोक ।
येतील होइल कसें मग ? तूं विलोक ॥
होती तवानुचर संनिध सात आठ ।
आहे अम्हांजवळ सैन्य पुरीं अफाट ॥५५॥
आचार्य तूं सकल शस्त्र - धरीं वरिष्ठ ।
व्हावें तुशीं रण असें म्हणतो मनांत ॥
इच्छा असे बहु मनीं परि हान काळ ।
येईल तो सुदिन साधिन योग्य वेळ ! ” ॥५६॥
हे शेवटील मग ऐकुन धीट शब्द ।
मल्हारराव हंसला करि सिंह - नाद ॥
आहे तुझें वय लहान परी उदार ।
चित्ते, म्हणून मज आवडतोस फार ॥५७॥
तूं युद्ध एक समयीं हि न पाहिलेंस ।
माझ्या सवें रण कसेंमग इच्छितोस ? ॥
जा शीक नाउन अजून बहूत वर्षें ।
हें शस्त्र - शास्त्र गहनांबुधि - तुल्य भासे ! ॥५८॥
येऊन येथ दिन आजच दोन झाले ।
हें धुंडिलें नगर जेंवि मनास आले ॥
जाईन येथुन पुन्हा स्वजना मिळेन ।
ह्याले तुझें परिसुनी वच तुष्ट कर्ण ॥५९॥
मल्हार वाजवि तुतारि पुढेच चाले ।
चारी दिशेकडुन लोक तिये मिळाले ॥
हे गुप्त हेर सगळे मिळती क्षणांत ।
स्वच्छंद जाति धरूनी निज नीट पंथ ॥६०॥
ही बातमी पसरली नगरांत पूर्ण ।
वेशीवरील जन सावध होति तूर्ण ॥
गेले परंतु रिपु कोण पथें कळेना ।
कोट्यामधें करिति नागर तर्क नाना ॥६१॥
आकाशांतुन शत्रु हा उतरला कीं काय कोटापुरीं ।
किंवा भूमि विदारूनी उसळला खालून भासे वरी ॥
गेला कोण पथें कसा म्हणुनियां चिंता पदे नागरीं ।
तों वार्ता उठली पुरावर उद्यां मल्हार हल्ला करी ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP