यशवंतराय महाकाव्य - सर्ग विसावा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


मल्हारराव होळकर अजमीरच्या लढाईनंतर घडलेला आपला वृत्तांत आनंदरावास कळवितो - त्या लढाईंत पराजित झालेल्या मल्हाररावाची दुर्दशा - बादल नांवाच्या भिल्लाशी लढाई - कमळाबाईची सुटका - मल्हाररावास जखमा लागून तो अजारी पडतो - त्याच्या मनाची स्थिति - बाळपणची आठवण - थोरपणांतील उलाढाली - कमलेनें केलेली मल्हाररावाची सेवा प्रीति - गांधर्वविवाह - वियोग - तज्जन्यदुःख - आनंदरावानें मल्हाररावाचें केलेलें सांत्वन - मल्हारराव होळकराचा मुलगा यशवंतराय.

श्लोक
आनंदराव स्व - चरित्र सांगे । मल्हार तें देउन चित्त ऐके ॥
डोळ्य़ांस पाणी मग येउं लागे । तें आवरूं शक्त नसे विवेकें ॥१॥
कित्येक वर्षें नयनांत पाणी । ठावें न ज्यातें जनमान्य मानी ॥
तो स्फुंदला सद्गद - कंठ झाला । आनंदरावा बघवे न त्याला ॥२॥
शत्रु - स्त्रियांच्या नयनोदकानें । कोपाग्निला शांतिस उग्र जो ने ॥
ज्याचा दरारा भुवनांत गाजे । तो ही रडे भीति जयास राजे ॥३॥
आश्चर्य तेव्हां डफळ्यास वाटे । तो स्वस्थ पाहे निरखून त्यातें ॥
तों बोलला होळकर प्रसिद्ध । वाणी अशी शांतपणें विशुद्ध ॥४॥
“ आनंदरावा ! अति सुस्वभावा ? । मातें तुझा निर्मळ भाव ठावा ॥
तूं ठेवसी प्रेम असें पवित्र । माझ्यावरी मी न तयास पात्र ॥५॥
जी प्रार्थना तूं करण्यास येसी । माझ्यापुढें व्यक्त जरी करीसी ॥
ती मी क्षणीं याच पुरी करीन । आनंद अत्यंत मनीं धरीन ॥६॥
अन्योपकारास्तव देह ज्याचा । आजन्म गेला मन आणि वाचा ॥
केला अशाचाहि महापराध । होतो मना यास्तव फार खेद ।७॥
मीं घोरकर्मा मति - मंद नीच । आहें पुरें जाणुन या परीच ॥
मोठ्या मनीं ठेव ममापराध । स्नेहीं दयाळा ! न करींच भेद ॥८॥
कन्या तुझी ती मम धर्म - भार्या । खाणी गुणां दुर्मिळ धन्य आर्या ॥
मी दुर्मती तत्पति तीस रानीं । सोडून आलों अपुल्या करांनीं ॥९॥
गर्भे जिची सुंदर देह - यष्टी । झाली तशा घोर वनांत कष्टी ॥
कन्या तुझी ये स्मरणांत जेव्हां । हा व्यर्थ वाटे मम देह तेव्हां ॥१०॥
मी वृत्त सांगें स्मरूनी क्षणैक । वाटे तयानें उतरेल शोक ॥
कांहीं न मी चोरून गोष्ट ठेवीं । माझी कथा सर्व तुला कळावी ॥११॥
वेलीस तो अंकुर मात्र येतो । कालें वरी वाढुन वाढ घेतो ॥
काळें तयाला फुटती तंवारे । ते व्यापिती मात्र दिगंत सारे ॥१२॥
वेगें हवेंतून करीत नाद । येतो पडे भूमि - तळा धडाड ॥
गोळा जसा कीं कुलुपी उडून । देहां असंख्यात करी विदीर्ण ॥१३॥
येतें तसें संकट एक वेळ । तें मांडितें नंतर फार खेळ ॥
कांहीं जनां दुःख दिल्याशिवाय । होई न तें नष्ट उपाय काय ? ॥१४॥
दुष्काळ वा वादळ भूमि - कंप । बुद्धें महापूर असे प्रकोप ॥
हे ईश्वराचे समजें मनांत । होतात यांहीच असंख्य घात ॥१५॥
जाटांत तें युद्ध मराठियांत । होऊन झाला मम फार घात ॥
तें दुःख देतें स्मरतां अपार । गेला जरी लोटुन काळ फार ॥१६॥
जी पद्धती भूप शिवाजि घाली । दे ती तयाला जय सर्व काळीं ॥
ती योग्य युद्धांत मराठियांला । आणील कोठें न पराजयाला ॥१७॥
आम्हीं सडे स्वार चहूंकडून । झुंजूं जसे शत्रु मधें धरून ॥
तोफा तशा देतिल लाभ काय ? । ही रीति आम्हांस करी अपाय ॥१८॥
तोफांवरी पायदळावरी ही । विश्वास जो ठेवुन पूर्ण राही ॥
युद्धामधें तो मिळवील कीर्ति । ही गोष्ट वाटे मजलागिं खोटी ॥१९॥
येतील जे जे परकी फिरंगी । घेऊन त्फोआंप्रत युद्ध - रंगीं ॥
भाला मराठी पळवावयाला । आहे तयां शक्त गमे मनाला ॥२०॥
जाटांसवें तो समर - प्रसंग । होतां वरी सैन्य मराठि भंग ॥
चोहींकडे होउन धूळधाण । गेले मराठे सगळे पळून ॥२१॥
भांडून सर्वां पुढतीहि अंगें । पराजयाचा मज डाग लागे ॥
मी मावळ्याला परतावयाला । चालें मना खेद विशेष झाला ॥२२॥
जे दक्षणी स्वार सडे कुलीन । पन्नास माझ्या जवळील जाण ॥
राखूं मला ते झटले अपार । मीं जिंकिलें शत्रुस तीन वार ॥२३॥
मी गुप्त राहीन तरी खुशाल । नाहीं तरी नाश जिवा घडेल ॥
यासाठिं खोटेंच धरून नांव । पवार झालों जगदेवराव ॥२४॥
तें धाकटें घेउन सैन्य संगें । मी चाललों कंठित वाट अंगें ॥
आला धराया रिपु तीन वेळां । नाहींच मी सांपडलों तयाला ॥२५॥
न अन्नपाणी नच वस्त्रपात्र । मिळे प्रवासें थकलेंहि गात्र ॥
रात्री दिनीं चालुन शीण आला । थाराच कोठें न मिळे अम्हांला ॥२६॥
सांजेस एका दिवशीं समस्त । मिळून होतों गमना करीत ॥
कोसार्ध कोसावरि धूळ लोटे । पाहून आश्चर्य अम्हांस वाटे ॥२७॥
मीं पाहिले ते निरखून दूर । माझ्याकडे धांवति भिल्ल शूर ॥
नीट व्यवस्थेंत उभे करून । लोकांस माझ्या बसलों विषण्ण ॥२८॥
रक्तें तयांच्या भरवूं स्वशस्त्र । हल्ला जरी ते करितील मात्र ॥
वाटेस त्यांच्या न बळेंच जाऊं । आपापलें मार्ग खुशाल पाहूं ॥२९॥
देशांत त्या काळिं महाप्रचंड । करी बळें बादल भिल्ल बंड ॥
त्याचा दरारा सकळांस होता । नामेच जो कंप परीं भरीत ॥३०॥
सैन्यें मराठी फुटुनी पळालीं । लुटून यानें धन फार केली ॥
असंख्य लोकां धरिलें वधीलें । बंदींत नेवोनि हि ठेवियेलें ॥३१॥
त्या दुष्ट भिल्लास समोर पाहें । माझ्या कशी शांति मनास राहे ॥
दुष्टास त्या शासन योग्य द्यावें । आलें मनीं भिल्ल पुण्यास न्यावे ॥३२॥
माझे प्रवासें जन शक्ति - हीन । होते अजारी अणि फार दीन ॥
त्या बादलाची जिरवीन खोड । हेतूस या कांहिं निघे न तोड ॥३३॥
तों सांगती येउन दूत माझे । चातुर्य नैसर्गिक ज्यां विराजे ॥
कीं त्या दिनी बादल भिल्ल घाली । हल्ला मराठ्यांवर लूट झाली ॥३४॥
घेऊन संपत्ति मदांध डोले । हर्षे स्वदेशा परतून चाले ॥
आनंदराया ! तव धन्य कन्या । घेऊन जातो स्वगृहास वन्या ॥३५॥
तूं मित्र माझा बहुता दिसांचा । कुलीन लोक - स्तुत - कीर्ति साचा ॥
कन्या तुझी पाहुन संकटांत । मला कसें बा बसवेल शांत ? ॥३६॥
मी भोंगते स्वार करून गोळा । त्यांते असा हा उपदेश केला ॥
कीं ‘ मित्रहो ! हा कठिण प्रसंग । साहूं नकाहो क्षण मान - भंग ॥३७॥
स्वदेशची एक कुलीन कन्या । नेतात हे भिल्ल धरून धन्या ॥
हातीं हत्यारें असुनीं उपाय । करूं न ती सोडविण्यास काय ? ॥३८॥
कन्या स्त्रिया आमुचिया परांनीं । न्याव्या अशा शुद्ध धरून रानीं ॥
बाणा मराठी अमुचा असून । घ्यावें कसें हें तरि आयकून ? ॥३९॥
झालों जरी दीन परायजानें । वाटेचियाही शिणलों श्रमानें ॥
आम्हांमधें तेज मराठि वागे । हल्ला करूं तेंच अम्हांस सांगे ॥४०॥
उठा धरा नीट जपून भाला । घालाल भिल्लांवर नीट घाला ॥
यथेच्छ वाटे मज ध्याल सूड । दंडाल हा बादल भिल्ल हूड ’ ॥४१॥
हे शब्द माझे परिसून कानीं । मानी मराठे उठले इमानी ॥
घोड्यावरी बैसुन धांवतात । तिराप्रमाणें जणु काय जात ॥४२॥
‘ हर्हर्महादेव ’ करीत शब्द । नेती नभाला निज सिंह - नाद ॥
चोंहींकडोनी करितांच हल्ला । आवेश आला झुजण्यास भिल्लां ॥४३॥
मी त्या लढाईंत पुढें सरून । भिल्लां स्वयें झुंज दिलें झटून ॥
हाणीत हाणीत पुढें निघालों । मी बादला सन्निध नीट गेलों ॥४४॥
टोळीवरी शंभर भिल्ल जींत । पाहून हल्ला दचके मनांत ॥
घोड्यावरी घालुन त्या स्त्रियेला । भिल्लांस सांगे तिस रक्षण्याला ॥४५॥
कन्या मराठी हरणार दुष्ट । पाहून झालें मम चित्त रूष्ट ॥
मी गर्जलों ‘ रे मति - मंद भिल्ला ! । मल्हार मी येइं धरून भाला ॥४६॥
केलेस जे तूं अपराध हातें । देतों तयांचें फळ तूं पहा तें ॥
खरा जरी तूं अससी शिपाई । न दूर जाया करिशील घाई ॥४७॥
राहें उभा युद्ध करूं हत्यार । घे राहिजे सावध हो तयार ॥
दंडीन जेणें उतरेल माज । गात्रें तुझीं छिन्न करीन आज ॥४८॥
वाटेल भीती जरि शस्त्र घेऊं । इच्छा जरी नश्वर देह ठेवूं ॥
खालीं शिरा वांकव तूं प्रणामें । दे त्या स्त्रियेला कर वाद सामें ॥४९॥
त्या स्त्रीस जो तूं धरणार नीच । शिक्षा तुला योग्य असे रणींच ॥
रक्तें तुझीं भूमिस शिंपडीन । मल्हार मी सत्य जरी असेन ’ ॥५०॥
बोलून हे शब्द तया क्षणींच । मी गांठिला तो मति - मंद साच ॥
तो ही मला पाहुन रुष्ट दर्प । दावीत आला जणु काय सर्प ॥५१॥
ती सुंदरी कांहि कमी स्वशोक । करी तदा पाहुनियां स्वलोक ॥
मी पहिलें कंपित रम्य गात्र । ते अश्रूंनीं पूर्ण तिचे सुनेत्र ॥५२॥
संग्राम होणार भयाण साचा । पूर्वीं कळेना परिणाम त्याचा ॥
पुण्यें हिच्या होइन मी सुधन्य । वाटे धुळीला मिळवीन अन्य ॥५३॥
तो भिल्ल रागें मग ओंठ चावी । खायास पृथ्वी जणु भाव दावी ॥
घोड्यास दे टांच चढून आला । मी घेतला सज्ज करून भाला ॥५४॥
मी दाबिला अश्व पुढें पहातां । तो जों न आला वर सात हातां ॥
मी मारिला नेमुन नीढ भाला । दिव्य प्रकाशें झळकून केला ॥५५॥
त्याचा हि भाला चुकवून वेगें । मी धांवलों नीट तसाच रागें ॥
घोड्यांस झाल्या जखमा म्हणून । आलों जमिनीवर भीति - हीन ॥५६॥
आवेश दोघांसहि झुंज देऊं । परस्पर - प्राण रणांत घेऊं ॥
अल्पेंचि काळें परि त्यास खालीं । मीं आणिलें कीर्ति मला मिळाली ॥५७॥
त्याच्या उरीं देउन पाय राहें । मी जों उभा जीवित घेउं पाहें ॥
धांवून अंगावर भिल्ल येती । बाणीं जणों पाउस पाडिताती ॥५८॥
सोसून ते वज्र - समान तीर । माझे मराठे उठले सुवीर ॥
रक्षावयाला मज धांव घेती । भिल्लांस रागें उधळून देती ॥५९॥
मीं सोडवीलें कमलेस वेगें । भिल्लां दिलें शासन योग्य रागें ॥
शत्रु दिले सोडुन जाण दीन । झाले मला वार परंतु तीन ॥६०॥
सुराजमल्ल प्रिय मित्र माझा । साधूं झटे नित्य मदीय काजा ॥
राज्यांत हे आश्रय या प्रसंगें । असे यथाशक्ति सहाय अंगें ॥६१॥
वर्मी मला लागुन बाण वार । जे जाहले ते भयकारि फार ।
आले जणो ते यम - दूत न्याया । सर्व प्रयत्नें झटलों जगाया ॥६२॥
मी वांचतों कीं मरतों कळेना । निश्चित निद्रा क्षण ही मिळेना ॥
होतों बिछान्यावर मी पडून । रुचे सुचे अन्न न पाणि आन ॥६३॥
डोळ्यांवरी झांपड दाट आली । वाणी मुखांतील हि बंद झाली ॥
ते सोडिती कान हि ऐकण्याचें । न ज्ञान बाहेरिल वस्तु यांचें ॥६४॥
ही रात्र कीं हें दिन ओळखाया । मी शक्त झालों क्षण त्या न ठायां ॥
माझी स्मृती सुस्थिर ती रहाली । भिन्नस्थळीं हिंडत भिन्नकाळीं ॥६५॥
झाली मनाची स्थिति जी तियेला । वर्णावया शक्ति न या जिभेला ॥
मूर्च्छा नव्हे स्वप्न नव्हे न निद्रा । भिन्नस्थिती होय मनःसमुद्रा ॥६६॥
हीं इंद्रियें होउन अप्रबुद्ध । यांच्या गती सर्वहि होति बद्ध ॥
अर्थांत ये चंचलता स्वचित्ता । तेथें जिवाची सगळी व्यवस्था ॥६७॥
उदास जें निर्जन वाळवंट । उष्णांत चालून तयांत वाट ॥
बागेमधें जेंवि शिरे प्रवासी । क्षुधा तृषा क्लेश करीति ज्यांसी ॥६८॥
तैशीच माझी स्मृति या जगांत । जे जाहले घोर अनर्थ घात ॥
त्रासून त्यांतें करि हायहाय । ती आठवूं पूर्व वयास जाय ॥६९॥
वाटे पुन्हा होउन मी लहान । आहे गुरें राखित गात गान ॥
तापी नदीचें बहु रम्य तीर । आहेत तेथें कुरणें हि गार ॥७०॥
माझ्या सुखी शांत दुधाळ गाई । घेऊन मी त्या कुरणांत जाई ॥
पांवा मुखीं घेउन वाजवीत । मी बैसलों धेनुस रंजवीत ॥७१॥
पाणी जिये सुंदर गार गोड । मी पोंहण्याचें पुरवीन कोड ॥
सोडून काखेमधली शिदोरी । मी बैसलों कोण मला विचारी ? ॥७२॥
होतो सुखी खेळुन सोबत्यांत । आशा मनाला शिवली न शांत ॥
जो एकदां दूर कुठे पळाला । आनंद तो नाहिं पुन्हा मिळाला ! ॥७३॥
शेजारचें नंदुरबार थोर । धनाढ्य वाडे दिसतात दूर ॥
जाणून तें सौख्य न लोभ वागे । माझी मला भाकरि गोड लागे ॥७४॥
तेथून धांवे मन दूर देशीं । त्या आडकाठी करणार कैसी ? ॥
लक्षावधी स्वार सभोंति राहे । मी माअळवा झुंजत घेत आहें ॥७५॥
मी जिंकितों वेढुन देश झांशी । मी भांडतों दायबहादराशीं ॥
भागीरथीच्या उदकांत घोडीं । मीं घातलीं फौज सवें न थोडी ॥७६॥
राजे हि जिंकून करून दीन । मी मेळवीलें धन कोटि तीन ॥
पाहून माझा अतुल प्रभाव ।  प्रसन्न होतो मग बाजिराव ॥७७॥
त्या त्या स्थितीचा घडतां विचार । वेडें फिरे चित्त निमग्न फार ॥
यावें पुन्हा शुद्धिवरी सभोंती । पाहोनियां भीति मनास होती ॥७८॥
होता दिवा मंद जया स्थळांत । उदास ऐशा समयीं प्रशांत ॥
सभोंवती दीन अशक्त पाहें । कन्या तुझी तेथ बसून राहे ॥७९॥
रात्री दिनीं चाकरिला जपून । राहे बिछान्याजवळी बसून ॥
घाली स्वहस्तें शिजवून अन्न । माझी स्थिती पाहुन होय खिन्न ॥८०॥
विसंबली ती क्षण एक नाहीं । करीत बैसे उपचार कांहीं ॥
होतां मला जों सुख - लेश पाहे । न हर्ष तीचा गगनांत माई ॥८१॥
माझ्यावरी प्रीति तिची अपार । मच्चिंतनीं काळजी दावि फार ॥
मातें जपे जेंवि पिलांस आई । झाली मला यास्तव हर्षदायी ॥८२॥
जेव्हां खचे धैर्य निराश होईं । तेव्हां मला ती बहु धैर्य देई ॥
केले तिणें जे श्रम तेच आले । फळास तेणें मम कार्य झालें ॥८३॥
झालों बरा यापरि कांहिं काळें । जावें स्वदेशास मनांत आलें ॥
वार्ता अकस्मात मला कळे तों । माझा धनी उत्तर देशिं येतो ॥८४॥
पराजयाचें मम वर्तमान । त्यातें कळे तो बहु होय खिन्न ॥
त्याच्यापुढें मी धजलों न जाया । कीं हर्ष होईल न बाजिराया ॥८५॥
घडेल जेव्हां प्रभुचा प्रसाद । भृत्यास जाया पुढती न खेद ॥
या ही स्थळीं तेथवरी रहावें । वाटे घडे काय कसें पहावें ॥८६॥
मी राहिलों हा करुनी विचार । जपें प्रयत्नें कमलेस फार ॥
परस्परांचे कळतां स्वभाव । प्रेमा मिळाला सहजीच वाव ॥८७॥
एके दिनीं रात्रिस शांत वेळीं । मातें गुणाढ्या कमला म्हणाली ॥
नेत्रांतुनी वाहति अश्रु, खालीं । ती लाजुनी सुंदर तोंड घाली ॥८८॥
‘ प्राण - प्रिया ! हे जगदेवराया ! । जी मी विनंती धजत्यें कराया ॥
ती तूं मनीं सांठविं अत्युदारीं । माझ्यावरी प्रीति करीसि भारी ॥८९॥
माझा पिता वत्सल जाय कोठें । मातें न आतां कळणार वाटे ॥
जें बोलणें त्यासच योग्य होतें । माझ्या हिता भाषण तें करीत्यें ॥९०॥
भिल्लांचिया हातुन सोडवून । तूं आणिलेंसी मजला लढून ॥
सत्ता स्वदेहावर सुस्वभावा ! । माझी न राहे जगदेवरावा ! ॥९१॥
युद्धामधें जिंकुन शत्रु - सैन्य । त्यांच्या धनें फेडिति वीर दैन्य ॥
वांट्यास आल्यें तव या प्रकारें । स्वीकार माझा कर सद्विचारें ॥९२॥
प्राणांवरी होउनियां उदार । आलास कामा व्यसनांत फार ॥
बक्षीस द्यावें तुज काय आतां ? । देत्यें तुझ्या हा मम देह हाता ॥९३॥
दाई जया रक्षिति पांच नित्य । ज्या खेळवाया झटले हि भृत्य ॥
ज्या रंगवूं सोडिति आप्त कृत्य । बाल्यांतला हा मम देह सत्य ॥९४॥
ज्याची पिता काळजि फार वाहे । प्रीती हि अत्यंत करीत राहे ॥
तो देह या निर्जन भूमि - भागीं । मी एकटी अर्पितसें अभागी ॥९५॥
पाहें तुझे सद्गुणरूप शील । मी जाहल्यें मोहित दीर्घ काळ ॥
माझा हि अव्हेर करावयाला । तूं शक्त नाहींस गमे मनाला ॥९६॥
कन्या जनाची विनय - प्रवृत्ति । सोडून मी जी करित्यें विनंति ॥
प्रीती स्थिती सांप्रतची दयाळा ! । हेतू न उद्दामपणा तियेला ॥९७॥
अनन्यभावें तुज ईश्वराला । मी अर्चित्यें लाज तिथे कशाला ? ॥
होणार कोणी जरि या जगांत । माझा तरी होशिल तूंच कांत ’ ॥९८॥
हे ऐकतांना अमृत - प्रलाप । न सांठवे हर्ष मनीं अमूप ॥
परंतु त्याचा उपयोग काय ? । योजूं शकें कांहिं न मी उपाय ॥९९॥
जो होय आम्हांमधिं जाति - भेद । ठावा मला तो बहु देह खेद ॥
मोठे मराठे डफळे कुलीन । ही त्यांत कन्या गुणरूप - खाण ॥१००॥
अश्लाघ्य माझें कुळ अन्य जाती । ठाऊक कोठून असे तिला ती ? ॥
खोटें च माझे जगदेव नांव । होती न तें जाणत सुस्वभाव ॥१०१॥
तारूण्य सौंदर्य कुल स्वभाव । प्रीतीमधें निर्मळ फार भाव ॥
गोष्टी अशा मोहक जीवमात्रीं । वेडावलों पाहुन रम्य - गात्री ॥१०२॥
निंदोत वंदोत करोत कांहीं । मी लोक - रीतीस पहात नाहीं ॥
लक्ष्मी घरीं चालुन आलि तीतें । लावावया दूर न धैर्य मातें ॥१०३॥
मी अन्य काळीं मम सत्य नांव । सांगेन हीतें कुल शील गांव ॥
उदार चित्तें अपराध पोटीं । घालील दावील दया हि मोठी ॥१०४॥
झाला असा निश्चय जों मनाचा । मी बोललों हात धरून तीचा ॥
नक्षत्र - तारा - ग्रह - रत्न पूर्ण । विस्तीर्ण आकाश निळें बघून ॥१०५॥
‘ अंभोज - नेत्री ! कमले ! सुगात्री ! । म ई वाहतों आण निवांत रात्री ॥
आकाश पृथ्वी जल या दिशाही । साक्षीस ठेवून पवित्र दाही ॥१०६॥
मल्लारि मार्तंड महाप्रभाव । माझ्या कुळीं जेजुरि - वासि देव ॥
त्याचीं पदें मी हृदयीं स्मरून । मी वाहतों या समयास आण ॥१०७॥
आम्ही मराठे भजतों जियेला । जी शोभवीते तुळजापुराला ॥
त्या देविचेही चरण स्मरून । मी वाह्तों या समयास आण ॥१०८॥
पूर्वीं वसिष्ठादि ऋषी पवित्र । झाले असे निर्मळ यच्चरित्र ॥
मूर्ती तयांच्या मनिं आठवून । मी वाहतों या समयास आण ॥१०९॥
शिवाजि शाहू नृप रामदास । ज्ञानेश्वरा ज्ञान - पयोनदास ॥
ध्यानीं तुकोबास हि आठवून । मी वाहतों या समयास आण ॥११०॥
कीं आजपासून तुला वरून । राहीन संसार सुखें करून ॥
प्रीतींत आणील बिघाड कांहीं । वस्तूच ऐशी भुवनांत नाही ! ॥१११॥
धर्मार्थ कामीं धरिशील जे तूं । ते सर्व ही मी पुरवीन हेतू ॥
तूं धर्म - पत्नी मम मी हि भर्ता । सौख्यें भजूं ईश्वर सर्व - कर्ता ॥११२॥
दारिद्र्य - ऐश्वर्य - सुखीं विलासीं । दुःखीं सखी तूं मम पूर्ण होसी ॥
प्राणावरी संकटही पडले । सोडीन तूतें न असें घडेल ’ ॥११३॥
गांधर्व - योगें अमुचा विवाह । झाला न तेथें द्विज हव्यवाह ॥
होता झरा वाहत मात्र तेथ । मंदस्वरें शब्द करीत जात ॥११४॥
पुष्पांस जेथें बहु दिव्य गंध । वाहे जिथे शीतळ वात मंद ॥
तेरीं नदीच्या कुरणांत गार । झालें अम्हां खेळुन सौख्य फार ॥११५॥
माझ्या सवें शूर शिपाइ तीस । होते म्हणें मी प्रिय मित्र ज्यांस ॥
मी कोण हें नाहिं तिला कळून । त्यांनीं दिलें मद्वच आठवून ॥११६॥
एकांतवासांत अशीं अनेक । गेलीं दिनें कीं घटिका च एक ॥
माझी प्रिया गर्भ धरी तयानें । आनंद अत्यंत मनांत बाणे ॥११७॥
संगें स्वकीयांतुन लोक घ्यावे । शिकारिला दूरवरी हि जावें ॥
यावे घरा घेउन मांस नित्य । आरंभिलें हे मग मीं स्वकृत्य ॥११८॥
आम्ही शिकारीस असे निघलों । ते एकदां दुर्गम रानिं गेलों ॥
रक्षावयाला कमलेस होते । संगें तिचे लोक घरी रहाते ॥११९॥
जों वीस कोसांवरि लांब गेलों । मी एकदां दुर्गं वनांत चालों ॥
तों पाहिले चार मनुष्य तेथें । येतां त्वरेनें अमुच्याच पंथें ॥१२०॥
मीं ज्या स्थळीं राहुन काळ नेला । तें होय ठावें स्थळ मज्जनाला ॥
माझे च हे हेर मला पहाया । आले स्ववार्तेस तिथे कथाया ॥१२१॥
ते सांगती कीं मज ‘ पेशवा तो । सेनेसवें मालव - देशीं येतो ॥
होतें निजामासह युद्ध मोठें । त्या हारवाया झटती मराठे ॥१२२॥
रात्री दिनीं कीं तुमचाच ध्यास । त्या पेशव्याच्या धरितो मनास ॥
गेला कुठे शोध करी अपार । नाहीं तुम्हीं यास्तव खिन्न फार ॥१२३॥
एका क्षणाचा न विलंब लावा । सर्वां मराठ्यांस सवें बलावा ॥
जा पेशव्याच्या चरणा समीप । उन्मत्त हा होय निजाम भूप ’ ॥१२४॥
स्त्री आप्तवर्गा समयीं त्यजावें । सांगेल जेथें धनि तेथ जावें ॥
आम्हां मराठ्यांत अशीच चाल । लंघावया कोण तिला धजेल ? ॥१२५॥
जाऊन मी जों कमलेस भेटें । तेणें घडे फार विलंब वाटे ॥
म्यां धाडिला यास्तव दूत एक । देऊन संगें सुख वाच्य लेख ॥१२६॥
‘ जातों रणा आज निघून हा मी । जो पेशव्याच्या पडणार कामीं ॥
गांठी कधीं होतिल कोण जाणे । वाटे मना खेद विशेष तेणें ॥१२७॥
मल्हार मी होळकर प्रसिद्ध । ज्या प्रीति - पाशीं करितेस बद्ध ॥
भार्या अशी तूं गुणवंत माझी । व्हावें न का मी यशवंत आजी ? ॥१२८॥
पूर्वीं तुला मीं मम नांव गांव । केला नसे विश्रुत मत्प्रभाव ॥
साध्वी तुझा हा अपराध केला । तो पाहिजे त्वां विसरून गेला ॥१२९॥
होतो जरी सांप्रत हा वियोग । भेटावयाचा हि घडेल योग ॥
येईन घालून सुकीर्ति - हार । होऊं नको यास्तव तूं अधीर ॥१३०॥
जें मूळचें कोमळ शोभमान । प्रसूतिनें होईल अंग खिन्न ॥
आहेस तेथें च तुवां रहावें । पुढील काळास सुखें पहावें ॥१३१॥
माझा असे मित्र सुराजमल्ल । यत्नें तुझें रक्षण तो करील ॥
रक्षूं तुला वीस शिपाइ तेथें । आहेत ते देतिल धीर तूतें ॥१३२॥
माझ्या करींची तरवार युद्धीं । देईल ती वांछित कार्य - सिद्धी ॥
येईन न्याया तुज मी ससैन्य । दावूं नको यास्तव लेश दैन्य ’ ॥१३३॥
माझें खरें नांव तिला कळावें । गेलों कुठे ज्ञात असें हि व्हावें ॥
मीं धाडिलें यास्तव तें सुपुत्र । परी विधीची करणी विचित्र ! ॥१३४॥
मी त्या प्रसंगीं मग बाजिराया । जाऊन भेटें झटलों लढाया ॥
भोपाळच्या संनिध शत्रु गांठीं । मी लागलों जिंकुन त्यास पाठी ॥१३५॥
आरंभीली ध्वंसुन शत्रु लूट । शत्रूंत झाली पुरतीच फूट ॥
झालें पुण्याच्या दरबारिं नांव । माझें, जनीं वर्णिति मत्प्रभाव ॥१३६॥
त्या गांविं गेलों परतून वेगें । भार्येस भेटूं मज ध्यास लागे ॥
होती न तेथें परि हायहाय ! । दैवापुढें काय असे उपाय ? ॥१३७॥
मीं धुंडिलें पुष्कळ आसपास । विलाप केला स्मरूनी तियेस ॥
‘ ये ये प्रिये रूष्ट कशास होसी ? ’ । धांवें वनीं मारित हांक ऐसी ॥१३८॥
‘ मीं काय केला अपराध सांगें । गेलीस तूं सोडुन दूर रागें ॥
आतां तुझे होतिल हाल फार । ये हर्ष दे भेटुन एक वार ’ ॥१३९॥
मातें कळे कीं मम लेख दूत । घेऊन पाहूं कमलेस जात ॥
त्या भेटले राजपुरूष कांहीं । त्यांनीं तयाला धरिलें उपायीं ॥१४०॥
‘ कोट्यांतला एक गरीब वाणी । आहें मला कां छळितां धरूनी ’ ॥
ऐसें वदे तो ममदूत धूर्त । ‘ वंचीन यांतें ’ म्हणतो मनांत ॥१४१॥
वृत्तांत ज्याचा कथिलास सज्जना । त्या कृष्णदासास धरावया पुन्हा ॥
होतेच हे हिंडत राजसेवक । त्यांच्या करीं हा पडला अचानक ॥१४२॥
‘ भला भला सांपडलास दुष्टा । जाशील कोठें पळुनी न आतां ’ ॥
दूतास माझ्या वदले शिपाई । त्याच्या बिड्या ठोकिति हातपायीं ॥१४३॥
माझी बघे वाट परंतु मी न । आलों म्हणोनी बहु होय दीन ॥
याया स्वदेशा कमला निघाली । जाणें न कोठें परि गुप्त झाली ॥१४४॥
पासून तेव्हां झुरणी दयाळा ! । लागे मनाला अनुताप झाला ॥
मी कष्टतों तद्गुण - शील - रूप । येतात जेव्हां स्मृतिला अमूप ॥१४५॥
जन्मांत या होइल काय भेट ? । आशा कशाला मज ती अचाट ॥
संसार - मार्गांतरिं दुःख मोठें । आहे मला एकच हेंच वाटे ॥१४६॥
लोकांस ज्या दुर्लभ वस्तु लोकीं । आहेत त्या सर्व मला विलोकीं ॥
नाहींच कांहीं उपयोग त्यांचा । आहें धनी मी यम - यातनांचा ॥१४७॥
सन्मान ऐश्वर्य मिळून धन्य । झालों तसा होइल काय अन्य ? ॥
मन्मृत्यु - काळीं परि जीव नाहीं । जाणार शांतींत सुखांत पाहीं ॥१४८॥
परोपकारा करितोस यत्ना । तूं निर्मिता त्या कमला - सुरत्ना ॥
माझा तुझा स्नेह हि पूर्वि दाट ।  हें सर्व मी जाणतसें मनांत ॥१४९॥
जाणून माझा अपराध मित्रा ! । क्षमा जरी तूं करिशी पवित्रा ! ॥
कांहीं समाधान वरील चित्त । मीं वर्णिलें यास्तव सर्व वृत्त ” ॥१५०॥
आनंद तो सद्गद - कंथ झाला । शांत - स्वरें होळकरा म्हणाला ॥
“ मल्हारराया प्रभुचीच लीला । अगाध बा जाणिल कोण तीला ? ॥१५१॥
पराजयें होय जयास दैन्य । होतें तुझें तें श्रम - खिन्न सैन्य ॥
कन्या - जनाचा अपमान झाला । येणें तुला रोष परंतु आला ॥१५२॥
अनाथ कन्या परदेशि माझी । त्वां राखिली संकटिं लाज तीची ॥
जिंकून त्या दुष्ट नराधमातें । कन्येस माझ्या हरिलेंस हातें ॥१५३॥
अर्थांत तीचा पति व्हावयाला । होतास तूं योग्यच बा सुशीला ! ॥
तूं वीर - वर्या ! जरि हीन - जाती । मानीन मी थोर उणीव कां ती ? ॥१५४॥
टाकून जाशी कमलेस जेव्हां । गर्भालसा ती बहु होय तेव्हां ॥
पुत्रास दे जन्म सुयोग्य काळीं । ज्यानें जगीं येउन कीर्ति केली ॥१५५॥
आहे तुझा पुत्र खुशाल कांता । पाहे तुझी वाट सुशील शांता ॥
सव्वीस वर्षें दिनरात्र चिंता । वाहे सती निर्मळ बुद्धिमंता ! ” ॥१५६॥
मल्हार बोले “ गुणवंत भार्या । ती भेटले कोठुन सांग आर्या ! ॥
रानीं कुणी ओढुन दूर नेली । रागें मला टाकुन दूर गेली ॥१५७॥
ऐश्वर्य किर्ती मम जीव आणी । घालीन सर्वांवर आज पाणी ॥
ती पृथ्विच्या पाठिवरी खुशाल । आहे जरी हें मजला कळेल ॥१५८॥
तूं बोलसी कीर्ति करी जगांत । आहे कुठे तो कमलात्मजात ॥
त्या पाहुनी मी निववीन डोळे । वांट्यास वाटे मम हें न आलें ” ॥१५९॥
आनंद बोले मम “ काय मित्रा ! । पाहूं तुझ्या इच्छिसि काय पुत्रा ? ॥
बंदींत राहे जवळी न काय ? । सुश्लाघ्य मानी यशवंतराय ॥१६०॥
धीमान् शौर्य - बलाढ्य पुत्र तुमचा मल्हारराया ! गुणी ।
जो दावी करणी रणीं प्रहरणीं पौरामधें अग्रणी ॥
आणा त्यास धरा उरीं कडकडी आलिंगतां पाहुं द्या ।
सौख्याच्या तुमच्या कुटुंबि सखया वाहोत आता नद्या ” ॥१६१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP