यशवंतराय महाकाव्य - सर्ग चोविसावा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


कोटा - शहर रजपूत लोकांस परत द्यावें व यशवंतवायास तेथील राजपदावर स्थापावें अशा अर्थांचा पेशव्याकडून मल्हारराव होळकरास हुकूम येतो - कोटा शहरांत जिकडे तिकडे आनंद - नागरिक लोक यशवंतरावास तेथील राजपद स्वीकारण्याविषयीं प्रार्थना करितात - यशवंतराव ती अमान्य करितो - भूषणसिंगाचा मुलगा अभयसिंग यास कोटा देशाच्या गादीवर बसवावें अशी यशवंतरा्व सूचना करितो - ती सर्वांस मान्य होते - यशवंतराव अभयसिंगास जोधपुराहून आणून राज्यावर बसवितो - यशवंतरावाचा भूषणसिंगाचीकन्या लीलावती हिजशी विवाह - यशवंतराव अभयसिंगाच्या बालदशेंत राज्य कारभार सुरळीत चालेल अशी व्यवस्था करून कोटा शहर सोडितो - उपसंहार.

श्लोक
सकाळिं सूर्योदय जों न जाहला । पुण्याहुनी येउन दूत पावला ॥
पुढें तदा ठेवुन राज - शासन । करीत तो होळकरास वंदन ॥१॥
असेल पत्रार्थ समग्र कायसा । कळे तया पूर्वि विचित्र - साहसा ॥
परंतु तें वंदुन पत्र वाचतो । पुराधिकारी यशवंत ऐकतो ॥२॥
“ प्रधान पंत स्थित पुण्य - पत्तनीं । स्व - शौर्य - संपादित - वैभवाग्रणी ॥
हुकूम हा होळकरास धाडिती । समग्र कोट्यांतिल जाणुनी स्थिती ॥३॥
महाभुजा ! शौर्य तुझ्या भुजीं वसे । स्वराज्य - भाराश्रय तेंच कीं असे ॥
तयावरी ठेवुन भार सर्व ही । सुखें वसो पाळित हिंदुची मही ॥४॥
पराक्रमाचे तव दुंदुभि - ध्वनी । दुरून ऐकों बसुनी पुण्यांतुनी ॥
विनम्र होऊन तुझ्याच दंडनीं । पुण्याकडे धाडिति भूप खंडणी ॥५॥
शिवाजि शौर्याद्भुत - कृत्य - मंडित । स्वराज्य जें स्थापि युद्ध पंडित ॥
तयास तूं स्तंभच होइजे सदा । कृती तुझी हिंदुस होउन सौख्यद ॥६॥
प्रसंगि जे स्नेह अम्हांस दाविती । परंतु शत्रुत्व रनांत ठेविती ॥
तयांसवें वैरच आपुलें बरें । घडे न मित्रत्व तयांसवें खरें ॥७॥
कसा असावा पर - धर्म शर्मद । न मित्र दिल्ली - पति योग्य दुर्मद ॥
विपक्ष जे नांदति उत्तरेकडे । निशाण चालो भगवें तयांपुढें ॥८॥
मदांध तो मोंगल हिंदुंचा अरी । अनाथ लोकां छळणा किती करी ॥
अशा प्रसंगीं स्वजनास मोकळें । करील सद्वीरच तो अम्हां कळे ॥९॥
खरे इमानी रजपूत सद्भट । स्वधर्म - संरक्षण - दक्ष उद्धट ॥
करूं पहातां निज देश मोकळा । तुवां तयां त्रास कशास तो दिला ? ॥१०॥
अपार संपत्ति मिळेल आपणा । नकोच मैत्री सह मोंगलां जनां ॥
विनाश झाला तरि हिंदुला तुवां । सहाय व्हावें चिर शौर्य - वैभवा ! ॥११॥
महामनें भूषित शौर्य - संचय । स्व - धर्म - चारी रजपूत दुर्जय ॥
सुखामधें राहुत वीर संतत । मराठि भाला न शिवो तयांप्रत ॥१२॥
परस्परीं स्नेहच उत्तरोत्तर । असून वृद्धिंगत होउ तो स्थिर ॥
करोत अस्मच्छिव - चिंतनास ते । अमाल्य पावोत सुखें स्वतंत्रते ॥१३॥
सहाय आम्हां रजपूत होतिल । तरीच जातील लयास मोंगल ॥
मराठि झेंडा अटकेस जाइल । भयार्त पंजाब तयास पाहिल ॥१४॥
लढाइ कोटा - शहरासभोंवती । असेल जी आजवरी हि चालती ॥
मनुष्य - हानी घडली तियेमधें । मनास ती आमुचिया विषाद दे ॥१५॥
प्रहार शस्त्रें अमुचींच संगरीं । करून जे पाडिति हिंदु भूवरी ॥
मही तयांच्या बहु लाल शोणितें । कलंक काळा अमुच्या सुकीर्तितें ॥१६॥
आतां घडो जे घडलें पुन्हा नये । केला महाघोर अनर्थ हा स्वयें ॥
झाडें वनीं आपटुनी दवाग्निला । तीं जन्म देती कुल - नाश हेतुला ॥१७॥
करी तुझ्या लेख पडेल ज्या स्थळीं । तदा तिथे सोडुन देइजे कळी ॥
स्वसैन्य मोर्चे उठवून आंवरीं । स्वहेतु विज्ञात तया पुरीं करीं ॥१८॥
जनास आश्वासन पूर्ण देउन । निरालस प्रीतिस दाविं आपण ॥
सुखांत नांदो घरदार वैभव । घडो न पीडा जप फार यास्तव ॥१९॥
असो स्वतंत्र प्रिय आजपासुन । प्रसिद्ध कोटापुर विश्व - भूषण ॥
न मोंगल श्वान शिवोत तें स्थळ । सदैव चालो रजपूत अंमल ॥२०॥
महाबल ख्यात यशःप्रकाशित । गुणी रणाग्रीं यशवंत पंडित ॥
स्ववर्तनें प्रीति अम्हांस फार दे । खुशाल त्यातें करूं थोरशा पदें ॥२१॥
मराठि सैन्यीं सरदार उद्भट । बलाढ्य जे जे रण - कीर्ति - मंडित ॥
तयांमधें हा विलसो, सुनायक । म्हणोत या आठ हजार राउत ॥२२॥
जया जनां मानुन पुत्र संतत । करीं तयांचें निरपेक्ष तो हित ॥
तयाच कोटा - शहरांतल्या जनीं । करूं तया भूपती आजपासुनी ॥२३॥
महाजन श्रेष्ठ तया पुरामधीं । धनाढ्य जे जे गुण - नीतिचे निधी ॥
समक्ष त्यांच्या बसवीं नृपासनीं । सुमित्र हातें यशवंत सद्गुणी ॥२४॥
अनंतर श्रीयुत शौर्य - वैभवा ! । समागमें घेउन सैन्य तें तुवां ॥
निजस्थळीं मालव - देशिं चालणें । न अन्य राजे रजपूत पीडणें ” ॥२५॥
हुकूम जो धाडित पंतपेशवा । धरून मल्हार मनांत तेधवां ॥
म्हणे मला हर्ष असा कसा दिला । सदाशिवें साधुन डाव आपला ! ॥२६॥
अनिष्ट माझें दिनरात्र चिंतिता । नसून इच्छाहि करी महा हिता ॥
समुद्र झुंजे गिरिशीं कधीं कधीं । अनर्घ्य रत्नें विखरी शिळांमधीं ॥२७॥
मला जरी वागवितो अरीसम । सदाशिव प्रीतिस पात्र हा मम ॥
सुतास माझ्या यशवंतराजया । समृद्ध केलें करितां मदप्रिया ॥२८॥
स्वतंत्रता पौरजनांस लाधली । अशी सुवार्ता नगरांत फांकली ॥
न पेशवे घेतिल देश आपणा । न मोंगला स्थान मिळेल हें पुन्हा ॥२९॥
स्वराज्य येतें स्वकरामधें स्वयें । पळून जातात अनंत तीं भयें ॥
जिथे मराठे करणार रक्षण । कुठून दुःखी असती तिथे जन ? ॥३०॥
महामना दिल्लिर - भिल्ल - मर्दन । लहान थोरां सम - सौख्य - वर्धन ॥
पुरस्थ - नारी - नर - नेत्र - नंदन । पुरास रक्षी यशवंत आपण ॥३१॥
अनंत धीमंत बुधाभिनंदित । पुण्याहुनी येउन तेथ पावत ॥
तयास पाहूं जन ते उतावळे । त्यजूनिया स्व - व्यवहार धांवले ॥३२॥
सुविद्य वाचस्पतिपुत्र ज्यापरी । प्रवेश देवेंद्र - पुरामधें करी ॥
तसा अनंत प्रिय - दर्शन स्वयें । महोत्सवें साजत आज आंत ये ॥३३॥
कृतज्ञ तेव्हां यशवंत तो कृती । गुरूस साष्टांग करी नमस्कृती ॥
तयास हातें उठवून सत्वर । उरीं स्व - शिष्या धरि धीमतांवर ॥३४॥
कुलीन मानी रजपूत सज्जन । करीति ते होळकरास वंदन ॥
सुखावले पावुन आदराप्रत । मनीं वसे द्वेष न लेश सांप्रत ॥३५॥
कोट्यांत गोष्टी असल्या घडून । येतां तिथे होति जन प्रसन्न ॥
त्या उत्सवीं तों यशवंतराया । उद्देशुनी लागति भाट गाया ॥३६॥
“ त्वद्वाण दंडि बल - गर्वित शत्रु भारी ।
तूं कालिदास असुनी भव - भूति - धारी ॥
श्री - हर्ष - दायक अम्हां सकलां सुबंधो ! ।
साष्टांग पात करूनी तुज लोक वंदो ॥३७॥
अग्न्यत्रिपुत्र - विधि - शंकर - शंभुजांहीं ।
जीं दोन तीन अणि चार हि पांच साही ॥
वाटे मुखें धरिलिं जाणुन याच भावा ।
एक्या मुखें तवगुण - स्तव केंवि व्हावा ? ” ॥३८॥
अनंत ते दोहन मान सागर ।
जमून हर्षें दुसरे हि नागर ॥
नय - प्रवीणा यशवंतराजया ।
समादरें लागति ते वदावया ॥३९॥
“ समुचित - गुण ऐसा कांत विक्रांत पावे ।
वरुन तुजसिं वाटे राज्यलक्ष्मी सुखावे ॥
पितृसम परिपोषीं सुप्रजा स्वप्रजांतें ।
चिर धरिं यशवंता राज्य - सूत्रांस हातें ॥४०॥
तुजसम जन जे जे घेति या लोकिं जन्म ।
करून मिळविती ते श्रेष्ठता थोर कर्म ॥
म्हणुनि भरंवसा जो ठेविला याच पायीं ।
व्यसन - शतिं हि राया रक्षिला त्वां उपायीं ॥४१॥
स्तविति तव गुणांतें लोक हे लक्ष कोटी ।
तुजविषयिं तयांच्या अंतरीं भक्ति मोठी ॥
इतर नृप - पदातें योग्य नाहें मनुष्य ।
नमुनि विनवितों हें आयकावें अवश्य ” ॥४२॥
उदार यशवंत तो परिसुनी वचा यापरी ।
सदुत्तर पित्याकडे बघुन पौरलोकां करीं ॥
“ विनंति बहु नम्र मी करितसें तिला आयका ।
विचार सगळे तुम्हीं मिळुनियां करावा निका ॥४३॥
अहो सुजन थोर हो ! स्तवितसां मला पामरा ।
उदारतर भाव हा तुमचिया मनींचा खरा ॥
अशी न तरि काय मीं करणि केलि लोकोत्तरा ।
तुम्हीं करितसां धनी मजसिं आपुल्या किंकरा ॥४४॥
निरालसपणें पुरा झगडलों करूं रक्षण ।
न दे जरि अरी बसूं सुखित शांत चित्तें क्षण ॥
प्रभाव तुमचाच तो सकल जाणतों हें मनीं ।
सहाय असतां तुम्ही भिइन काय काळा रणीं ? ॥४५॥
लहानपण जेथ मीं दवडिलें सुखें खेळतां ।
जिथील जन जाणते शिकविती सुविद्या स्वतां ॥
अनंत उपकार तो किसनदास मातें करी ।
अकारण - सुद्दत्तम प्रथम राहिला या पुरीं ॥४६॥
जमीनिंत जया रूजे वट - फळांतलें बीज तें ।
दिनीं दिनिं हि आर्द्रता जिथिल शोषुनी वाढतें ॥
जमीनिस तया अशा तरू विशाल तो होउन ।
स्वविस्तर भरें उन्हा धरि शिरीं करी रक्षण ॥४७॥
स्व - धर्म - पर ज्या स्थळीं सदय लोक सौख्यें वसे ।
अशी जननभूमि ही प्रिय नरा न कोणा असे ? ॥
पदांत परतंत्रता पडलि थोर तीच्या बिडी ।
अधन्य नर कोणता व्यसनिं या धरी आवडी ॥४८॥
म्हणून झटलों जरी इथुन घालवूं मोंगलां ।
निरिच्छ मम जीव हा क्षण न वैभवीं लोभला ॥
नको मजसिं राज्य मी सविनय स्वयें प्रार्थितों ।
न मंदमतिला गमे मजसिं मान हा शोभतो ॥४९॥
अफाट विधिनें असे जग विचित्र हें निर्मित ।
फिरेन मिळवीन मी सुयश वैभवें मंडित ॥
पिता मम जसा स्वये मिळवि संपदा सन्मत ।
तसें करिन संमत प्रिय तुम्हां असो मन्मत ॥५०॥
स्वराज्याचे इथे असो जरि असे अशी कामना ।
सुयुक्ति कथितों तुम्हां क्षण शिवो न शंका मना ॥
वसे महित भूषण प्रिय पुरीं गुणालंकृत ।
पुरातन - नृपान्वयीं जनन त्या घडे संमत ॥५१॥
तयास अदयें जया समयिं दिल्लिरें मारिलें ।
स्वकीय गृहिं रक्षिलीं जपुन मीं तयाचीं मुलें ॥
कसे विसरतां ? अरी करिल घात हें वाढलें ।
न जोधपुरिं काय मीं त्वरित त्यांजला धाडिलें ? ॥५२॥
गुणी अभय भूषणात्मज सुरूप लीलावती ।
खुशाल नृप मंदिरीं प्रथित त्या पुरी राहती ॥
म्हणून ह्मणती तुम्ही अभयसिम्ग रामाप्रत ।
निमंत्रण समादरें समुचितें करा सांप्रत ॥५३॥
करील नृप राज्य तो सुगुण भूषणाचा सुत ।
प्रजांस सतत श्रमें करिल शांत आनंदित ॥
करीत असतां असा नृपति भूमिचें रक्षण ।
तुम्हांसह हि साहसी कवण वैर बांधी क्षण ? ॥५४॥
पुसाल जरि काय मी करिन तें तुम्हां सांगतों ।
स्वहेतु पुरवावया जगदधीश्वरा प्रार्थितों ॥
मला न करणें असे किमपि या पुरीं राहिलें ।
शरीर मन आज मीं सदय पेशव्या वाहिलें ॥५५॥
निशाण भगवें करीं धरुन रामदासार्पित ।
स्वराज्य पसरीन मी करिन पूर्वजां तर्पित ॥
बलाढ्य यवनांसवे झगडतां जिथे अर्पिला ।
स्वदेह मम पूर्वजीं मजसिं तोच जागा भला ॥५६॥
वयस्क पुरुषीं हठें समरिं देह देतां बळी ।
स्वधर्म परिवर्धनीं प्रबळ आस जी ठेविली ॥
तिला तरूण हे अम्ही न करूं काय हो पूरित ? ।
निशाण भगवें हिमालय - शिरीं करूं रोपित ॥५७॥
परंतु गत गोष्टिचें स्मरण होय जेव्हां मला ।
स्मरेन सकळां तुम्हां सुखभरें तदा वत्सलां ॥
शकेन जरि साह्य मी करूं तुम्हां असें वाटलें ।
हुकूम मजसी करा गरिब मूल हें धाकुलें ॥५८॥
प्रजेवरिच वर्षती अमित नित्य जे फायदे ।
असे नर - पती करो स्वजन - शासनीं कायदे ॥
गृह - स्थितिमधें असो भरभराट दुःखक्षय ।
अनेकविध संपदांसहित येथ नांदो नय ॥५९॥
असोत तुमचीं घरीं सुखित बायका लेंकरें ।
स्वराज्य - सुख ही तुम्हां सतत थोर लाभो खरें ॥
सदैव तुमचा असो सदय पाठिराखा हरी ।
अशी नमुत मागणी प्रभु - वरा तया मी करीं ” ॥६०॥
ऐसा सुनिश्चय करी यशवंतराय ।
ते देति संमति नसे दुसरा उपाय ॥
निर्लोभ आणिक उदार असें तयाचें, ।
तें वाक्य मोहित जना करि रम्य साचें ॥६१॥
जोधपुरास महाजन नंतर पाठविती ।
नागर तेथुन भूषण - पुत्रक आणविती ॥
नेमुन एक मुहूर्त सुमंगल - लग्न - युत ।
स्थापिति राज - पदीं अभया यशवंतनुत ॥६२॥
तें दिन तेथिल लोक अजूनहि आठविती ।
गोष्टि जुन्या स्मरणीं सुखदायक सांठविती ॥
क्रीडन गायन वादन नर्तन गान पुरीं ।
चालति उत्सव त्या दुसरी न वसेच सरी ॥६३॥
जे लोक प्रिय निज देश - रक्षणार्थ ।
शौर्यानें लढुनच होति देह - मुक्त ॥
त्यां त्यांच्या गरिब मुलांस ही स्त्रियांतें ।
वात्सल्यें धन यशवंत देत हातें ॥६४॥
जे जे होते कणत समरीं वार लागून भारी ।
शुश्रूषेची तजविज करी त्यांचिया योग्य सारी ॥
जे जे कष्टी रडति मरतां आप्त तत्सांत्वनानें ।
यत्नें यत्नें सुखवि कमला - पुत्र तो दानमानें ॥६५॥
राजा होय लहान यास्तव तया दे दोहनाच्या करीं ।
कोशाधीश्वर मान सागर हि तो सेनापतित्वा धरी ॥
मुख्यामात्यपदीं अनंत वसला ज्याची कुशाग्रा मती ।
योजी त्या यशवंत युक्ति घडते जेणेंचि राज्योन्नती ॥६६॥
अभयाप्रत मुख्य मुख्य त्याचे ।
अधिकारी सुकृतज्ञ सुज्ञ साचे ॥
उपदेशिति मागणी नृपाळा ।
यशवंता करणें अशी दयाळा ॥६७॥
“ केले अनंत उपकार तुवां तराया ।
कोठून शक्ति मज त्यां यशवंतराया ॥
आहें कृतज्ञ बहु लीन विचार - शीला ।
विज्ञापना करिन सांप्रत ऐक तीला ॥६८॥
तातानें भगिनीस आणिक मला हातीं तुझ्या दीधलें ।
मातें राज - पदीं तुवां बसवुनी मद्भद्र संपादिलें ॥
हातें घेउन पल्लव - प्रभ सख्या लीलावतीचा कर ।
ने श्लाघ्या गृहिणी - पदास तिजला तूं हृष्ट तीतें कर ” ॥६९॥
जावोनी यशवंत संनिध गळां प्रेमें मिठी घालुनी ।
मंत्र्यानीं उपदिष्ट बाल - नृपती त्या आर्जवी भाषणीं ॥
बोले तों यशवंत “ काय अभया याहून मातें प्रिय ? ।
धिक्कारीन तुझें मनोगत असें मानूं नको तूं भय ॥७०॥
होता तुझा जनक वांछित हेंच राया ।
लीलावतीस मज उत्सुकता वराया ॥
प्रेमा तिचा मजवरी बहु होय वाटे ।
आज्ञापिसी सदय तूं हि असेंच मातें ॥७१॥
सुरासुरच काय हे मिळति पौर ही दक्षणी ।
बलाढ्य झटती हटें रण - पयोब्धिच्या मंथनीं ॥
तुझा उदय जाहला म्हणुन जाण चंद्रासम ।
शिवीं स्थिति तुला मिळे प्रिय असें घडे हें मम ॥७२॥
लक्ष्मीस जेंवि हरि त्यापरि मी वरीन ।
स्त्रीरत्न दुर्लभ तुझी अभया ! बहीण ॥
संग्राम - सिंधु - मथनीं थकलों विसावा ।
लीलावतीस वरूनी मजला मिळावा ” ॥७३॥
भुवन - सुखद शोभे चंद्रिका जेंवि चंद्रा ।
मिळुन विमल किंवा जन्हु - कन्या समुद्रा ॥
वरून विलसली ती भूषणाची सुकन्या ।
गुण निधि यशवंता होय या लोकि मान्या ॥७४॥
आल्या गोष्टि अशा घडून पुरल्या इच्छा समस्तांचिया ।
सैन्यें घेउन शूर होळकर तो संगें निघे जावया ॥
तद्भार्या कमला गुणाढ्य सुतही लीलावती - संगत ।
जाती - यास्तव होति लोक सगळे कोटापुरीं दुःखित ॥७५॥
कन्या जामात नातू विनविति न असे शक्त देह श्रमाया ।
राहें आम्हांस द्याया चिर सुख जवळी नित्य आनंदराया ॥
योगी आनंद गेला पुनरपि परि तो दूर तीर्थाटनातें ।
सार्थक्या देह लावी प्रभु - वर - चरणां चिंतुनी मंगलातें ॥७६॥
या कालानंतर श्री - गुण - युत कमला - पुत्र देशाभिमानी ।
दंडोनी पेशव्यांचे समरिं अरि तयां नम्र वृत्तीस आणी ॥
मेघच्छन्ना रवीचा अवचित पडतां सृष्टि हर्षे प्रकाश ।
तैसा विश्राम त्याचा अतिसुखद असा होय लीलावतीस ॥७७॥
सुतभ्युदय पाहतां सुखित होय मल्हार तो ।
वदे  ‘ कवण धन्यता मजविणें जगीं पावतो ’ ॥
सुतासह तया अरी समरिं गांठितां जर्जर ।
ह्मणे मनिं ‘ अवार्य हा प्रबळ कीं जसा निर्जर ! ’ ॥७८॥
फोडी सह्य - शिला दरींतुन निघे रानीं वनीं चालते ।
वेगानें खडकाळ भूमिवरि जी ठेंचाळुनी भागते ॥
कृष्णा तीच सपाट देशिं शिरतां शोभे प्रशांताकृती ।
पाणी प्राशुन गोड निर्मळ तिचें सृष्टी सुखावे किती ! ॥७९॥
तैसी पुत्रपराक्रमा परिसते पाहे स्नुषा - सद्गुण ।
कांत - प्रेम - समादरें भरुनियां शांती धरी तन्मन ॥
दुःखें पूर्ववयामधील कमला स्वप्नापरी मानिते ।
नेते काल परोपकारिं तिजला होती कवी वानिते ॥८०॥

समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP