खंड ६ - अध्याय १०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ पंचदेव तेव्हां प्रार्थित । भ्रुशुंडीस विनययुक्त । स्वानंद क्षेत्राचा विस्तार किती असत । तें माहात्म्यासह सांगा ॥१॥
धर्म अर्थ काम मोक्ष । या क्षेत्राच्या चार द्वारांत दक्ष । कैसे राहती हें सर्वसाक्ष । महामुने आम्हां सांगावें ॥२॥
पूर्वद्वारांत धर्म राहत । दक्षिणेस अर्थ वसत । काम पश्चिमेस नांदत । उत्तरद्वारसंस्थ मोक्ष असे ॥३॥
हे चार पुरुषार्थ विभक्त । चार ब्रह्म ऐसें श्रुत । प्रथम शाक्त साधून सौर प्राप्त । तदनंतर ब्रह्म वैष्णव ॥४॥
तदनंतर समाधीनें शैवब्रह्म । नरास प्राप्त होय मनोरम । त्यानंतर गाणेश्वर लाभत अभिराम । क्रमानें योगभूमिस्थ ॥५॥
ऐसा नर ब्रह्मभूत होत । तेथ आदि वैष्णव ब्रह्मद्वारभूत । नरोत्तम यात्रामार्गें साधित । ऐसें तुम्हीं सांगितले ॥६॥
तदनंतर शैव त्यापुढें शाक्त । त्याच्या पुढतो सौर असत । ऐसा क्रम विपरीत । सांगितला त्याचें कारण काय ॥७॥
शक्ति सूर्यब्रह्माचें उल्लंघन । करितां कैसा वैष्णव बुद्धिहीन । अकस्मात्‍ भ्रांतभावें उन्मन । भ्रष्ट होतो मानव ॥८॥
आदिशक्ति म्हणे अन्य शक्तींप्रत । ऐसें पंचदेव विचारित । तैं भ्रुशुंडी परमार्थवेता सांगत । रहस्यज्ञान तयांसी ॥९॥
धर्म तो स्वधर्मरूप असत । सर्व सिद्धिप्रद पुनीत । अर्थ समर्थरूप ज्ञात । सर्वदायक जगांत ॥१०॥
काम शरीरभोगरूप वर्तत । ह्रद्य सौख्य तो देत । चार शरीरांच्या अतीत । मुक्ति असते सर्वथा ॥११॥
धर्म सर्वसमान सर्वदा असत । कर्मानुसारें फळ नित्य देत । आपपरभाव धर्माच्या चित्तांत । कदापि ना वर्ततसे ॥१२॥
शुभ वा अशुभ जैसें करित । तैसें फळ त्यास लाभत । समान वैष्णब्रह्म स्थित । त्यानें धर्माची धारणा ॥१३॥
पूर्वभागीं महाभागानों असत । सर्वधर्म प्रकाशक ज्ञात । जरी प्रमथ स्वधर्मनिष्ठ असत । तरी पुढती सर्वोत्तमता ॥१४॥
लाभेल नर यांत संदेह नसत । मूळ कारण धर्म असत । विष्णूचा अंगमय तो ख्यात । विष्णुद्धारीं समाश्रित ॥१५॥
म्हणून प्रथम धर्मास्तव पूर्वद्वार । आचरावें तेणें धन्य नर । अर्थ समर्थ रूपें ईश्वर । ईश्वराहून न अन्य समर्थ ॥१६॥
म्हणून देवेंद्रांनो अर्थ तेथ स्थित । ऐसें जाणावें गुपित । समर्थभावें जर कांहीं देवता वर्तत । त्या सर्व त्याच्या कला मात्र ॥१७॥
सर्व शास्त्रांत ईश्वर । शिव एकच ज्ञात थोर । शिवांगातून अथाचा जन्म मनोहर । म्हणोनि अर्थ शिवाश्रित ॥१८॥
धर्म करितां समर्थ होत । मानवोत्तम सर्वकार्यांत । देवेंद्रांनो एक क्रम वर्णित । द्वितीयाश्रित यात्रेंत ॥१९॥
दक्षिणद्वार संभवा यात्रा । सर्वभावज्ञ सांगती पवित्रा । सर्व सिद्धि लाभार्थ सुपात्रा । समस्त नरांनो भूतळीं ॥२०॥
काम हा भोगात्मक उक्त । दहांसी विषय दाता ख्यात । विषयांचें कारण असत । सत्यत्त्वें शक्ति हीच ॥२१॥
शक्तीच्या अंगापासून । काम झाला उत्पन्न । म्हणोनि तिच्या आश्रयें स्थान । सर्व कामविवर्धकासी ॥२२॥
प्रथम धर्माचा आश्रय घेऊन । समर्थ होतसे जन । तदनंतर कामभौगांचे सेवन । नाना सुखप्रदांचें तो करी ॥२३॥
म्हणोनि तिसरें दार । काम भोगफलप्रद उदार । यात्राविधानांत सांगितलें सर्व । जाणावें ज्ञात्यांनीं हे सदा ॥२४॥
मोक्ष तो नाम मृत्युहीन । ऐसें सांगती विद्वज्जन । शुक्लगती करी सूर्यप्रदान । मोक्षाप्रत जे जाती त्यांसी ॥२५॥
आत्मा सूर्य ऐसें म्हणती । सूर्यापासून मोक्षगती । म्हणोनि सूर्याश्रये स्थिति । अदैव जाणा मोक्षाची ॥२६॥
कामांनी धर्मसंयुक्त । मानव मात्र तृप्त होत । तदनंतर मुक्ति इच्छित । तृष्णारहित होता यत्नानें ॥२७॥
देवांनो जो वासनायुक्त । ऐशा भावें असे वर्तत । तो मुक्त नसे होत । म्हणोनि चवथें दार मुक्तीचें ॥२८॥
ऐसें हें दारांचें रहस्थ कथिलें । तें ऐकिले वा वाचिलें । त्यास सौख्यप्रद झालें । ऐसा अनुभव बहुतांचा ॥२९॥
म्हणोनि या क्रमाप्रमाणें यात्रेंत । प्रथम धर्मांचा आश्रय ख्यात । वैष्णब्रह्म तेंच ज्ञात । विघ्नेश निर्मित दार हें ॥३०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विकटचरिते द्वाररहस्यवर्णनं नाम दशमोध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु  ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP