खंड ६ - अध्याय ३५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । आदिशक्ति अन्य शक्तींस सांगत । कामासुर जाई विकटाप्रत । त्यास म्हणे भयसंयुक्त । हितकारक वचन ऐसें ॥१॥
विकटा तूं प्राज्ञा ब्रह्म साक्षात । तुज नसावा पक्षपात मनांत । परी सुर असुरांतून दोघांत । सुराचा पक्ष कां घेसी ॥२॥
तूं विकट ब्रह्म वेदांत । जरी जन्मादिहीन भावें वर्णित । तरी कैसा देहधारक दिसत । हें सर्व रहस्य सांग मजला ॥३॥
तुज यथार्थ जाणून । तरीच येईन तुज शरण । नाथा येईन प्रसन्नमन । अन्यथा नाहीं नमणार ॥४॥
विकट तेव्हां त्यास सांगत । माया नाना विध असत । मी त्या मायेस धारण करित । क्रीडा करितों ब्रहुप्रकारें ॥५॥
तिच्या आधारें भेद करून । मज मयूरेश अभिधान । माया शब्द मयूरनिदर्शन । करी ऐसें वदति तत्त्वज्ञ ॥६॥
त्या मायेचा स्वामी जगांत । मयूरेश ऐसें जाण मनांत । नानाभेदमय जें ब्रह्म वर्तत । त्यास असद्‍रूप बुध म्हणती ॥७॥  
तुपत्तिस्थितिसंसहारयुक्त । असद्‍ब्रह्म प्रदर्शित । परी अमृतमय ब्रह्म वर्तत । भेदविसर्जित सर्वकाळ ॥८॥
तेंच विकट सत्यत्वें असत । तोच मी गजानन तुझ्या पुढयांत । सदा अखंडमय जें ज्ञात । त्यास जन्ममृत्यूभय कैसे ॥९॥
तें साक्षिरूप ब्रह्म ख्यात । चारविहीन चारयुक्त । अमृतसंज्ञ विकट उदात्त । भेदाभेदातीत तें ॥१०॥
सर्वांचें जीवनाधार ब्रह्म । विकट तोचि परम । त्यास भज तूं निष्काम । मृत्युहीन तरी होशील ॥११॥
सिद्धि भ्रांतिकर्ती ज्ञात । बुद्धि ती भ्रांतिधारक असत । त्यांचा स्वामी गणेश उदात्त । विचार करी हा ह्रदयांत ॥१२॥
दैत्या पंचविध चित्त । पंचधा भ्रांति वर्तत । भ्रांतियुक्त महाचित्त । त्याग त्याचा करी तूं ॥१३॥
चिंतामणीसी तू भजावें । सर्वांच्या चित्तांत बरवें । स्थान माझें जाणावें । मत्प्रीत्यर्थ प्रयत्न करी ॥१४॥
महामते मीं देहधारी होऊन । भक्तांस शांति देत महान । माया माझी ही जाण । संप्रज्ञात नराकार मीं ॥१५॥
संप्रज्ञात्मक शिर असत । त्यांच्या योगें देहधारी गज होत । म्हाणून गजवक्त्र मी दिसत । व्यावहारिक जनांसी ॥१६॥
परी योगिजनांस मीं वर्तत । स्वसंवेद्य स्वानंदवासविराजित । मायाक्रीडार्थ रचित । आनंदरूप मी विविधवर्ण ॥१७॥
विश्व स्वस्वधर्मयुक्त । त्यांत मीं नित्य राही चित्तांत । देव असुर सारे माझ्यांत । सामावले भिन्न न कांहीं ॥१८॥
परी धर्मरक्षणार्थ वधित । सर्वांसी मी संशयरहित । स्वर्गांत देवांसी स्थापित । नरांसी या पृथ्वीवरी ॥१९॥
असुरांस पाताळ विवरांत । स्थान त्रिविध । विश्वांत । जेव्हां लोभयुक्त होत । असुरांवरी हल्ला करिती ॥२०॥
महा असुरांसी मारण्या उद्युक्त । विष्णुमुख देव लोभे होत । उत्सुक ते क्रोधयुक्त । तेव्हां मी प्रेरक दैत्यांसी ॥२१॥
त्यांच्या ह्रदयांत विराजत । त्यांना तपाची प्रेरणा देत । त्यायोगें करी सामर्थ्ययुत । देवांसवें लक्षण्यासी ॥२२॥
त्यासमयीं मी विघ्न आणित । देवसंघाच्या मार्गांत । दैत्यांचें विघ्न हरण करित । विघ्नकर्ता विघ्नहर्ता मीच ॥२३॥
त्यायोगें दैत्येंद्राचा जय होत । देव होती पराजित । असुर जेव्हां त्यांसी ताडित । तेव्हां वनवासी ते होती ॥२४॥
माझ्या इच्छेनें हें न घडत । देवांची कर्में त्यास नडत । तैसेचि दैत्य होतां मदयुक्त । कर्मनाश करिती ते ॥२५॥
देवांचें मूळ उच्छेदिती । महादुष्ट असुर पीडिती । सरळ सात्त्विक जनांसी जगतीं । तेव्हां देवपक्षपाती मी ॥२६॥
देवांस बलशाली करित । ते दैत्य नायकांसी वधित । दैत्यांचीं छिद्रें दाखवित । देवांच्या ह्रदयीं प्रवेशून ॥२७॥
ब्रह्मादि देवांस अजिंक्य होत । दैत्य जेव्हां मदोमत्त । त्यांचा वध करण्या न शक्त । तेव्हां देह मीं धारण करी ॥२८॥
असुरांचें करी हनन क्षणांत । ऐसें रहस्य जाण तूं मनात । जेव्हां देवदैत्य उभय वर्तत । स्वधर्मांनें स्वनीतीनें ॥२९॥
तेव्हां त्याच्या ह्रदयांत । सर्वांच्या मी विलसत । सर्व विश्व सौख्यें नांदत । मीं न पीडी कोणासही ॥३०॥
अरे धर्मलोपका तूं पीडिलेंस । भळदर्पें समस्त देवगणांस । वरप्रभावें माजलास । म्हणून देवपक्षपाती मीं ॥३१॥
आलों तुजला मारण्यास । महादुष्टा जरी न नमलास । माझा अवमान करण्यास । प्रयत्न जरी तूं करिशी ॥३२॥
तरी मी तुझें करीन हनन । परी वैर जरी देशील सोडून । देवांचें तरी तुज जोवन । वरदान रुपें देईन मीं ॥३३॥
ऐसें बोलून विकट थांबत । तेव्हां कामासुर चित्तांत । प्रसन्नपणें विचार करित । भक्तिगौरव मनीं आणी ॥३४॥
म्हणे हा विकट संशयातीत । सुरासुरांचा आधार सतत । हा पूर्ण ब्रह्म साक्षात । यास शरण मी जाईन ॥३५॥
कामासुर ऐसा विचार करित । निश्चय करूनियां मनांत । आपुलें शस्त्रादिक टाकून देत । दोन्ही कर जोडी विकटापुढें ॥३६॥
प्रणास करी तयास । हर्षभरित चित्तें पूजनास । करूनिया विघ्नपास । संतोषवी तो स्तवन करूनी ॥३७॥
कामासुर स्तोत्र गात । विकटा गणेशा नमन तुजप्रत । परामात्म्या सर्वपूज्या मी विनत । सर्वेशा तुज अभिवादन ॥३८॥
देवासुरमयासी । अनत मायायुक्त्तासी । ब्रह्मभूतस्वरूपासी । गजानना तुज नमन असो ॥३९॥
हेरंबासी देवेशासी । शूर्पकर्णासी विघ्नचालकासी । भक्तांचें विघ्नहर्त्यासी । अभक्तविनाशका तुज नमन ॥४०॥
स्वानंदवासीसी योगाकारस्वरूपासी । योग्यांसी शांतिदात्यासी । योगेशासी अनामयासी । सर्वदिपूज्या तुला नमन ॥४१॥
ज्येष्ठरूपासी ज्येष्ठांस पददात्यासी । ज्येष्ठ राजासी गणपतीसी । सिद्धिबुद्धिप्रदात्यासी । सिद्धिबुद्धिविहारा तुजा नमन ॥४२॥
सिद्धिबुद्धिस्वरूपासी । त्रिनेत्रासी चतुर्बाहु धरासी । लंबोदरासी ब्रहोशासी । ब्रह्मपतीसी नमन असो ॥४३॥
देवांच्या पालकासी । दैत्यासी वरदात्यासी । सर्वास समभावासी । ढुंढिराजा तुला नमन ॥४४॥
विष्णुपुत्रासी शंभूसी । शक्तिपुत्रासी काश्यपासी । वरेण्यसुता सर्वांच्या मातापित्यासी । किती स्तवूं मीं तुजला ॥४५॥
योगींद्रमुख्य जेथ थकले । वेदादीही मूक झाले । तेथ माझें काय चाले । मंदबुद्धी मीं काय स्तवूं ॥४६॥
मायासुखा भ्रांतिप्रद । विशेषें भुलवी जें सौख्यद । प्राणिमात्र सोडितां तें मोह्द । भक्तीनें दृढ तुज प्राप्त करी ॥४७॥
अशांत मायेनें युक्त । सदा चित्त भ्रांतियुत । विकटांत । शांति पावत । म्हणूण विकट नांव तुझें ॥४८॥
ऐसी स्तुति तो कामापुर करित । तैं रोमांच अंगावरी उठत । तो भावभक्तीनें नाचत । कंठ त्याच्या रुद्ध झाला ॥४९॥
त्याचें मन भक्तियुक्त । पाहून विकट त्यास म्हणत । वर माग कामासुरा मी तुष्ट । सारें मनोवांच्छित पुरवीन ॥५०॥
मी येथ क्रोधयुक्त । आलों वध करण्या तुझा विश्चित । परी आतां तूं शरणागत । म्हणोनि तुज न मारीन ॥५१॥
तूं केलेलें हें स्तोत्र असत । अत्यंत प्रियतम मजप्रत । सर्वकामप्रद पुनीत । पाठकां वाचकां उभयतांसी ॥५२॥
प्रथम ऐहिक ऐश्वर्य मिळून । अंतीं स्वानंदलाभ महान । सुखमय होईल जीवन । हया स्तोत्राचे पाठ करितां ॥५३॥
ऐसें गणपतीचें वाक्य ऐकून । कामासुर करी वंदन । हर्षसंयुक्त करी स्तवन । म्हणे प्रसन्न जरी तूं मजवरी ॥५४॥
तरी तुझी भक्ति उत्तम । दृढ करी मच्चित्तीं अनुपम । स्थानादिक मज मनोरम । देई तेथें राहीन मीं ॥५५॥
त्या जागीं निवास करून । देवा मी सतत करीन भजन । गाणपत्यप्रियत्व पावन । देई नित्य गजानना ॥५६॥
याहून अन्य न मीं याचित । योगींद्रमुख्यासही दुर्लभ जगांत । ऐसें तुझें साक्षात । दिव्य चरण पाहिले तुझे ॥५७॥
तुझें पद सुदुर्लभ असत । हें मज कळलें रहस्य अद्‍भुत । त्यांचें वचन ऐकून म्हणत । भक्तवत्सल विकट देव ॥५८॥
गणेश कामुका कामासुरास । विकट बोले महाभक्तास । महासुरा तुझ्या चित्तास । दृढ भक्ति माझी लाभेल ॥५९॥
गाणपत्यप्रिय तूं होशील । योगपरायण सदा अमल । पूर्ववत्‍ आपुल्या स्थानीं राहशील । पीडा देई अभक्त नरांसी ॥६०॥
जेथ नसे माझें स्मरण । न करिती जे नर पूजन । त्या सर्व कार्यांत कामा तू दारूण । प्रभाव दाखवी आपुला ॥६१॥
तेथ आसुरस्वभावें । तूं सारें कर्मफळ भोगावें । परी माझ्या भक्तांसी न करावें । तूं कधींही सकाम ॥६२॥
ऐसें ऐकून गणेशाचें वचन । तैसेंचि मीं वागेन । ऐसें त्यासी प्रार्थून । महायशें कामे वंदिलें तयासी ॥६३॥
तेव्हां गणेश स्वस्थाना जात । भक्तिकामुक जो शाश्वत । कामासुरास शांत पाहुन परतत । महिषादिक असुर स्वस्थानीं ॥६४॥
ते कामासुरास त्यागिती । आपापल्या सदनीं जाती । हा दैत्येंद्र बिघडला म्हणती । लागला भजनीं विकटाच्या ॥६५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते कामासुरशांतिवर्णनं नाम पंचत्रिंशत्तमोऽध्यायः
समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP