खंड ६ - अध्याय ३३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति म्हणे अन्य देवींप्रत । देवेश आतुर सैन्य पाहत । अपार नानाशस्त्रें युक्त । तैं ते गेले गणेशाजवळी ॥१॥
देवेश म्हणती तयाप्रत । आला असे कामासुर । महाबळ तो त्याच्या पुढयांत । देव वाटती मशकासम ॥२॥
ज्याचें शस्त्रबळ अमोघ असत । कोणी त्याच्या सम न जगांत । तैसा कामासुर अद्वितीय उद्यत । वध करण्या देवांचा ॥३॥
आतां कामा सुरें संत्रस्त । आम्हीं जाहलों देव समस्त । रक्षण करी आमुचें सांप्रत । अन्यथा संकट अटळ असे ॥४॥
तूं जरी आम्हीं न राखशील । तो कामासुर येथ वधील । देवर्षीसी निश्चित या वेळ । विकटा तूं गणेशा ॥५॥
त्यांचें तें ऐकून भयभीत वचन । गजानन देई आश्वासन । भय भाळगू नका उन्मन । प्राज्ञांनो महासुरास वधिन मीं ॥६॥
माझ्या अनुग्रहें समर्थ समस्त । व्हाल यांत संशय नसत । दानवांसह लढा निश्चिंत । संरक्षण तुमचें करिन मीं ॥७॥
विकटाचे ऐकून वचन । देव झाले मनीं प्रसन्न । गर्जना करिती भय सोडून । शक्तींनो ते शस्त्रधारी ॥८॥
त्यांच्या गर्जनाशब्दें व्याप्त । दिगंतर तेव्हां होत । दैत्य जाहले भयभीत । जे आले होते रणांगणीं ॥९॥
परी धीर धरून मानसांत । क्रोधावेशें दैत्येश गर्जत । बळिमुख्य़ सिंहनाद करित । शंखनादही त्यासमयीं ॥१०॥
दैत्यगण तदनंतर सोडित । शस्त्रवृष्टि मेघासम अविरत । पर्वत वृष्टिधारांनी मेघ ताडित । तैसे देवांवरी बाणांनी ॥११॥
देव आपल्या शस्त्रांनी निवारिती । असुरांची शस्त्रे लावून शक्ती । दैत्य देव महा उग्र ते लढती । परस्परांशी त्या वेळीं ॥१२॥
कोण आपुला कोण पर । याचाही बोध न होय सुरासुर । लढतां उडाली धूळ अपार । तेणें सूर्य झांकळला ॥१३॥
देवासुर परस्परांशी वधिती । वापरून शस्त्रास्त्रें अति शक्ति । मर्मभेदी घाव घालिती । रक्ताची नदी वाहत होती ॥१४॥
ती रक्तनदी वेगानें वाहत । त्यांत धूळ बसूनही शांत । ऐसें एक दिवस युद्ध अत्यंत । महाघोर चाले अहोरात्र ॥१५॥
देव आणि दैत्य लढत । परस्पर जयोद्यतत । देवांचा नंतर होत । दैत्य मुख्यांत वधिती ते ॥१६॥
दैत्य मुख्य पळून गेले । तें पाहून कामास आश्चर्य वाटलें । दैत्येंद्र क्रोधें जळू लागले । बळि मुख्य उतरले रणमंडपीं ॥१७॥
त्यांनी शस्त्रास्त्रबळें वधिले । देवांचें सैन्य जर्जर केलें । अमरसंघ तैं पळाले । भयभीत होऊन दशदिशांत ॥१८॥
तदनंतर इंद्र रणांगणांत । धैर्यशाली लढण्या येत । कोपप्रभावें तो वधित । बळि असुरासी वज्राघातें ॥१९॥
देव तेव्हां हर्षयुक्त । घनघोर गर्जना करित । कुंभकर्ण हाणी महेंद्रा त्वरित । ह्रदयावरी मुष्टिघातें ॥२०॥
इंद्र भूतलावर पडला । मुष्टिघातें त्या मूर्च्छित झाला । महाबळ विष्णु सरसावला । रणभूमींत त्या वेळीं ॥२१॥
सुदर्शन चक्र त्यानें सोडिलें । त्याच्या तीक्ष्ण धारेनें वधिलें । असंख्य दैत्य तेव्हां केलें । रावणें तेथें आगमन ॥२२॥
क्रोधरक्त तो रणोद्यत । गदेनें विष्णू त्यास हाणित । त्यायोगें तो होत मूर्च्छित । कुंभकर्णासही ताडिलें त्यानें ॥२३॥
त्या समयीं दुर्मदक असुर धावत । शंकरासुरही सहाय्या येत । महाविष्णूस मारण्या जात । केशव व्याकुळ तेधवां ॥२४॥
शंकर स्वतः त्रिशूलधर । वेगें गेला उग्ररूपधर । सूर्यदेवही सत्वर । रणांगणीं उतरला ॥२५॥
भानूने करून गदाघात । दुर्मद असुर पाडिला मूर्च्छित । तो मुखांतून रक्त ओकित । रणभूमीवरी असहाय ॥२६॥
शंकर त्रिशूलानें मारित । शंकरासुरासी पाडवित । धरापृष्टीं तो मूर्च्छित । विष्णूसही उत्साह चढला ॥२७॥
तदनंतर तो चक्र सोडित । महिष असुरा करी मूर्च्छित । दैत्य दानव सारे पळत । शुक्राचार्यास शरण जाती ॥२८॥
देवांचा जय होत । असुर धारातीर्थी मृत । तें पाहून दैत्यमुख्यांस जीवित । करी प्रयत्नें शुक्रमुनी ॥२९॥
तेवढयांत महाकाली तेथ येत । त्या शुक्राचार्यास धरून नेत । गुहेमध्यें बंदिस्त करित । संजीवन असुरांचें बंद झालें ॥३०॥
तदनंतर कामासुर शोकयुक्त । दैत्य निश्वास सोडी प्रतापवंत । परी धैर्य धरून लढण्या निघत । स्वयें देवांविरूद्ध ॥३१॥
ताता तुम्हीं थांबा सदनांत । आम्हीं तुमचे उभय सुत । जाऊं सत्वर रणांगणांत । मारूं महारिपू विघ्नपा निःसंदेह ॥३२॥
ऐसे बोलून ते उभय सुत । महावीर रणस्थळीं जात । शंकर विष्णू देवांसी तेथ म्हणत । उत्कट क्रोधें त्या वेळीं ॥३३॥
शोषण म्हणे महादेवाप्रत । थांब दुष्टा पहा सांप्रत । माझें अपूर्व पौरुष जगांत । ठार मारीन मीं तुजला ॥३४॥
दैत्यगणांस तूं मारिलें । त्याचें प्रायश्चित्त पाहिजे घेतलें । शिव असशी तूं तुजला शोभलें । अरण्यरुदन शिवेसमान ॥३५॥
वृद्ध कोल्हीण रानांत । जैसी आनंदे राहत । तैसा पशुतुल्य तूं वनांत । राहण्या योग्य सर्वथा ॥३६॥
ऐसें जरी न करशील । माझ्या हस्तें मरशील । श्रीशंकर ऐकून वचन तें दुर्बल । म्हणती त्या शोषणासुरासी ॥३७॥
अरे तूं कैसा सामर्थ्यंयुत । तें पाहीन मीं त्वरित । दाखव आपुलें पौरुष समस्त । विकटाहूनी विकट मीं ॥३८॥
हें ऐकतां महाबाहू सोडित । बाण भयंकर देवांवरी क्रोध युक्त । देवगण पडले मूर्च्छित । शंकर त्वेषें लढतसे ॥३९॥
तो असुर करी शरसंधान । शंकरावरी करी दुर्मन । शंकरें त्रिशूलाघात करून । शोषणास रणीं पाडियलें ॥४०॥
परी क्षणभरांत सावध होऊन । शंभूस कोपानें धरून । महापर्वत गरगरा फिरवून । शिशरीं फेकले तयासी ॥४१॥
तेव्हां हर्षभरें जययजकार । दैत्य करिती सम्ग्र । विष्णूजवळीं जात दुष्पूर असुर । रागावून म्हणे सुरेश्वरासी ॥४२॥
तो महाबाहू अत्यंत गर्वित । म्हणे विष्णू तूं मदमत्त । मज न जाणसी दुर्वृत्त । दुर्मती तुं दुष्ट अससी ॥४३॥
तूं महावीर दैत्यनायक । रणांत मारिलेस असंख्याक । आतां त्याचें त्याचें फळ निःशंक । भोग आतां माझ्या करीं ॥४४॥
देवानुयाय़ांचा साहाय्य असमी । आतां माझ्या हस्तें यमगृहा जासी । त्याचें तें वचन ऐकून तयासी । केशव म्हणे क्रोधानें ॥४५॥
त्या दैत्यपुत्रासी गर्वयुक्तासी । श्रीविष्णु म्हणे महावीरासी । तूं काय हें अघटित वदसी । पाप्या तुज मीं ठार करीन ॥४६॥
विकटाच्या पाठिंब्यानें चित्तांत । दैत्यजा गर्व नको धरूं उन्मत्त । ऐसें बजावून विष्णु हाणित । गदेनें त्या दुष्पूरासी ॥४७॥
त्या गदाघातें अति विह्वल । तो दुष्पूर दैत्य पडला खल । धरणीतळावरी तात्काळ । शुद्ध हरपली तयाची ॥४८॥
नंतर शस्त्रवृष्टि सुरवर । करिती त्या असुरावर । तोही सावध होऊन तयांवर । बाण सोडी त्वेषानें ॥४९॥
शंभर बाण सूर्यावर सोडित । बाणशतें इंद्रास ताडित । तैश्याच बाणें व्याकुळ करित । यमवायू ब्रह्मासी ॥५०॥
तेव्हां सावधान राहून । विष्णूनें चक्र सोडून । त्या दुष्पूरासुरा विद्ध करून । मूर्च्छित केलें रणभूवरी ॥५१॥
परी पुनरपि जाग येऊन । तो विष्णूस करी ताडन । हजारों बाण सोडून । अति त्वेषानें तयावरी ॥५२॥
ऐसें भयंकर कर्म करित । दुष्पूर तैसा शोषण बळवंत । शक्तींनो तेव्हां जयप्रभाव युत । दैत्येंद्र स्तविती त्या नेत्यांसी ॥५३॥
ते दैत्यराजाचे दोन सुत । रणांगणीं शौर्य गाजवित । बळिमुख्य दैत्येंद्र प्रमुदित । प्रशंसिती म्हणोनी ॥५४॥
तदनंतर देवगणास मारण्या धावती । तेव्हां क्रुद्ध झाले गणपति । द्विरदानन तो पाश सोडिती । अंकुश ही फेकिती गजानन ॥५५॥
गजाननाचा पाश कंठांत । शोषणाच्या गुंडाळत । श्वास कोंडून तो पडत । रणांगणांत बेशुद्ध ॥५६॥
हात पाय आपटित । तत्क्षणीं झाला मृत । अंकुश सहसा उदरांत । घुसला दुष्पूर असुराच्या ॥५७॥
तो दुष्पूरही दैत्यराक्षसांसमोर । मरून पडला अति उग्र । तदनंतर पाश अंकुश रणमंडळावर । हाहाकार उडविती ॥५८॥
गजाननाचीं शस्त्रें संचार करिती । अनेक दैत्यांसी वधिती । बळिमुख्य दानव तैं पळून जाती । लाज सारी सोडून ॥५९॥
शस्त्रहीन ते दशदिशांत । जेव्हां पळाले भयभीत । तेव्हां पाशांकुश पुनरपि परतत । गणेशाच्या हातांत ॥६०॥
ते पाहून अमरगण । उठला पुनरपि आनंदून । बळसंपन्न होऊन । दुःख विसरला क्षणांत ॥६१॥
ते देव समस्त स्तविती । विकट देवासी अतिप्रीतीं । दैत्य शोकाकुल करिती । रुदन दाही दिशांत ॥६२॥
अद्यापि कामासुर रणांत । आला नव्हता बळवंत । त्याचे वर्णन पुढिल अध्यायांत । अति सुरस वाचावें ॥६३॥
ओमिदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विकटचरिते कामासुरपुत्रवधो नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP