खंड ६ - अध्याय १५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ भ्रुशुंडी म्हणे देवाप्रत । देवालयाचीं चार द्वारें वर्तत । त्याचें चरित्र अति अद्‍भुत । सांगतों आतां तुम्हांसी ॥१॥
गुर्जर देशांत दुष्ट वसत । शंभुनामा शूद्रजातींत । तो होताअ धनसंपन्न सुस्थित । सुहृदांसी प्रिय फार ॥२॥
एकदा संध्याकाळीं तो जात । गावाबाहेर कार्यव्याप्तचित्त । तेथ पिशाच्चें त्यास वेढित । भयभीत अत्यंत तैं झाला ॥३॥
तदनंतर तीं पिशाच्चें प्रवेशत । त्याच्या शरीरीं दारुणरूपयुक्त । तो तेथेंच भूवरी पडत । मित्रांसी कळली ती वार्ता ॥४॥
ते सारे त्या स्थळीं जाऊन । गेले स्वगृहीं तया घेऊन । परी तो पिशाच्चतुल्य मन । हिंडू लागला भूमीवरी ॥५॥
त्याच्यासाठीं मित्र करित । यत्न नानाविध समस्त । तथापि त्यास महाप्रेतें न सोडित । तीं हिंडती सर्वत्र त्यासवें ॥६॥
तो ज्या तीर्थक्षेत्रीं जात । तेथ तेथ ती पिशाच्चें हिंडत । त्यास कदापि न सोडित । मित्र नेती त्यास मयूरक्षेत्रीं ॥७॥
मयूरेशासी पूजून । शंभूस संगतीं घेऊन । नग्न भैरवास करण्या नमन । गेले नंतर मित्रजन ॥८॥
महेशांनो भैरवाचें घेतां दर्शन । पिशाच्चें भयभीत होऊन । शंभूस सोडून तत्क्षण । पळून गेलीं सर्वही ॥९॥
शंभूस पीडासुक्त पाहती । मित्रजन विस्मय करिती । विघ्नेशासी पुनरपि पूजिती । तदनंतर गेले स्वनगरासी ॥१०॥
नग्नभैरवाचें घेतां दर्शन । पिशाच्चप्रेतदोषापासून । मुक्त होतो श्रद्धाळू जन । यांत संशय कांहीं नसे ॥११॥
ग्रहपीडा भूतपीडा । अन्यपीडा वेताळपीडा । देवेशांनो या सर्वांचा निवाडा । नग्नभैरवदर्शनें होय ॥१२॥
नानाविध जन त्या महाक्षेत्रांत । त्यास नमून विधानयुक्त । यात्रामात्रें दोषमुक्त । झाले ऐसा इतिहास ॥१३॥
त्याचें वर्णन वर्षशत । केलें तरी न संपेल समस्त । तथापि संक्षेपें तुम्हांप्रत । कथिलें मीं यथामती ॥१४॥
आतां दक्षिणद्वाराचें महिमान । सांगतों कथा निवेदून । तेथ देवेश्वर नीलकंठ पावन । साक्षात राहित भक्तीनें ॥१५॥
गणेशाची आराधना करून । त्यानें समुद्रज विष केलें प्राशन । महा उग्र तें सर्व भस्मकारक महान । ऐसा प्रभव या द्वाराचा ॥१६॥
ज्या विषाच्या स्पर्शानें होत । विष्णुदेव श्यामवर्ण विशेषयुक्त । गर्वयुक्त प्रभावें पतित । परी गणेशस्मरण केलें पुढें ॥१७॥
शिव महाविष्णूस उपदेशित । परवीरहा तो श्रद्धायुक्त । गणेशकृपेनें शंकर पीत । तें विष तेव्हां दाह होतां ॥१८॥
मयूरेश नावाचा जप करित । दाहहीन तैं झाला त्वरित । क्षणार्धें शीतलता होत देहाप्रत । लाभली त्यासी मयूरेशाश्रयें ॥१९॥
तेथेंच तो नीलकंठ निवसत । महेश्वर गणराजाच्या सेवेंत । धाराधीश त्यास वंदित । ते जन विषहीन होती ॥२०॥
इतिहार याविषयीं सांगेन । तो ऐका परमेश्वरांनो मन लावून । दंडकारण्यांत सुलोचन । नामा एक क्षत्रिय होता ॥२१॥
तो राजा नाना शास्त्रांत । होता कोविद पारंगत । अन्य राजांस जिंकित । शस्त्रबळानें आपुल्या ॥२२॥
ते अन्य भूप निस्तेज । त्यास शरण येऊन सहज । त्या उग्रदंडकर्त्यास अपमानज । शिक्षा कण्याचे ठरविती ॥२३॥
कांहीं कपट करून पाजित । त्या सुलोचन नृपाप्रत । जेव्हा विषबाधा त्यास बाधत । तेव्हां तो मनीं उमजला ॥२४॥
विषाची व्यथा उग्र असत । ती त्यास असह्य होत । मयूरेशास तो शरण जात । प्रधानासहित आदरें ॥२५॥
महाविषानें स्तंभित होत । मयूरक्षेत्रीं पोहोचत । तैं त्या विषप्रभावें पीडित । देहकार्य थंडावलें ॥२६॥
प्रधान तैसेची त्यास उचलून । दक्षिणयात्रा करिती विधिसंपन्न । नीलकंठास भक्तीनें पूजून । तीर्थ शिंपिती नृपमस्तकीं ॥२७॥
महेशाच्या प्रभावें होत । राजा तत्क्षणीं विघ्नमुक्त । विषहीन होऊन पूजित । तदनंतर परतला स्वराज्यीं ॥२८॥
दुर्जनांस दंड देऊन । नीतिपर करी राज्य विनीतमन । ऐशिया परी यात्रा विधान । प्रभावकारी तैं झालें ॥२९॥
त्या राजाचा विषवेग । शमला मयूरेश कृपेनें सवेग । नीलकंठासह सुभग । पूजी तो परम गणेशासी ॥३०॥
देहान्तीं कैलासांत जात । तो नृप विविध सुखें भोगित । पुनरपि ब्राह्मणकुळांत । जन्मला तो मयूरक्षेत्रीं ॥३१॥
तेथ गणराजासी सतत । भक्तिभावें तो पूजित । धर्मशील नामें ख्यात । अन्तीं गेला स्वानंदलोकीं ॥३२॥
ब्राह्मण तो तेथ ब्रह्मभूत । परम तेजें तळपत । ऐश्यापरी नाना जन पावत । सिद्धि अवर्णनीय संख्या त्यांची ॥३३॥
आतां पश्चितमद्वाराचें महिमान । सांगतो महेशांनो पावन । महिषासुराचा पुत्र गजासर बलवान । त्रैलोक्य पीदिलें तयानें ॥३४॥
महाभळवंत तो अजेय असत । सर्वभूतमात्रांसी जगांत । कर्मखंडत करून पीडित । समस्त देवांसी तो दृष्त ॥३५॥
तेव्हां शंकर शोकसंतप्त । मयूरक्षेत्रीं त्वरित जात । विघ्नेशासी मनोभावें पूजित । दैत्यासी मारी गणेशकृपेनें ॥३६॥
तदनंतर त्या क्षेत्रांत । पार्वतीचा पति निवसत । द्वाराधीश त्यास करित । गणेश विघ्नेश्वर प्रेमानें ॥३७॥
गजचर्म पांघरून असत । देवागाराच्या पश्चिमद्वारांत । भजणार्‍यांचे मनोरथ पुरवित । ह्या विषयीं ऐका अन्य कथा ॥३८॥
आंध्रदेशीं द्विज वसत । पापकर्म परायण दुर्विनीत । आसुर धर्माचा आश्रय घेत । त्याचे मित्र त्यास उपदेशिती ॥३९॥
त्याच्या ह्रदयांत राहत । राक्षस त्यास वारण्या सतत । परी ते समर्थ न होत । अंतीं गेले एका तपस्व्याजवळी ॥४०॥
अतिशय शोकग्रस्त । त्या द्विजाचा सर्व वृत्तान्त । ते मित्र त्या तपस्व्यास सांगत । तेव्हां तो म्हणे तयांसी ॥४१॥
मलत्याग करून हा विप्र होत । शौच भ्रमयुत सतत । राक्षस पिंगल नामा पाह्त । ऐशा स्थितींत या द्विजासी ॥४२॥
अपवित्र त्यास पाहत । त्याच्या शिरला ह्रदयांत । म्हणून असुरकर्म करित । त्या राक्षसाच्या आदेशें ॥४३॥
या मयूरक्षेत्रांत । कृत्तिवास शंकर अधरपदीं राहत । द्वारयात्रा विधानें तोषवा त्याचें चित्त ॥ त्यानें या द्विजास मुक्तिलाभ ॥४४॥
अन्यथा दहासहस्त्र वर्षे प्रयत । तरी हा न होईल पापमुक्त । हें ऐकतां ते मित्र जात । मयूरक्षेत्रीं आनंदानें ॥४५॥
पश्चिमद्वाराची यात्रा करिती । गजचर्मधरा शंकरासी भजती । त्यासमयीं तो ब्राह्मण लाभे मुक्ति । राक्षसबाधेपासून ॥४६॥
स्वधर्मे तो वागूं लागला । आपल्या गृहासी परतला । गणेशातें भजे तयाला । कृत्तिवासकृपेनें मुक्ति मिळे ॥४७॥
तो प्रथम कैलासलोकीं जात । तदनंतर पुनः ब्राह्मणकुळीं जन्मत । मयूरेशक्षेत्रीं वसती करित । तेथे संन्यासभावें भजतसे ॥४८॥
नित्य आदरें पूजा करून । अंतीं तो ब्रह्मभूत । होऊन । गणपतींत झाला विलीन । ऐसें माहात्म्य पश्चिमद्वाराचें ॥४९॥
नाना जन ही यात्रा करून । झाले पिशाच्चपीडाविहीन । आतां सांगतों तुम्हांसी महान । वर्णन उत्तरद्वार यात्रेचें ॥५०॥
कुंभकर्णापासून राक्षसाच्या उदरांत । राक्षसाधिप जन्मत । भीम तो शैवमार्गाचा ध्वंस करित । शैव कांहीं त्यानें मारिले ॥५१॥
कांहींस त्यानें पकडलें । पुढें एकदा त्यानें धरलें । महापाशुपत द्विजांसी टाकिलें । कारागारांत आपुल्या ॥५२॥
तो पाशुपत उपोषण करित । शिवासी सदैव ध्यात । राक्षसाचा वध इच्छित । ह्रदयस्थ शंकर पूजितसे ॥५३॥
तैं शंकर अत्यंत क्षुभित । भीमास मारावया येत । युद्धांत त्यास भीम ताडित । तेव्हां शंकर पळाला ॥५४॥
मयूरेश क्षेत्रांत । जाऊन । करी शंकराचें पूजन । त्या पुण्यप्रभावें युक्त होऊन । पुनरपि गेला लढावया ॥५५॥
त्या भीम राक्षसाचा वध करित । त्यायोगें भीमनाथ नामें ख्यात । ब्राह्मण त्याची स्थापना करित । शैव पूजिती हर्षभरानें ॥५६॥
तो भीमनाथ मयूरक्षेत्रांत । भक्तिभावें सदैव जात । त्याची पूजा मनोभावें करित । द्वाराधीश केलें गणाधीशानें ॥५७॥
देवासाराच्या उत्तरेस असत । भीम शंकर नामें ख्यात । त्यास पूजितां सत्तायुत । नर होय निःसंशय ॥५८॥
याविषयीं आद्य इतिहास । सांगतों तुम्हांसी सुरस । दंडकारण्य देशीं राजेश । उग्रसेन विख्यात होता ॥५९॥
तो सर्वविद्यापारंगत । बलहीन झाला वायुदूषित । जडासम चलनहीन राहत । दुःख फार तयासी ॥६०॥
वैद्यनायक नाना उपाय करित । परी नृपासी शांति न लाभत । तो न झाला रोगमुक्त । पीडा असहय तयासी ॥६१॥
तदनंतर अकस्मात । मुखभोक्ता महादैत्य चाल करित । त्या राजाचें राज्य जिंकित । प्रधान त्यासह पळाले ॥६२॥
ते सर्वही मयूरेश क्षेत्रांत । जाऊन गाणपत्यां उपाय विचारित । ते सांगती द्वारमाहात्म्य अद्‍भुत । ऐकतां सारे आनंदले ॥६३॥
नृपास घेऊन ते करित । उत्तरद्वारयात्रा श्रद्धायुक्त । त्यायोगें राजा रोगमुक्त । होऊन झाला सत्ताधारी ॥६४॥
गणेशास पूजून स्वनगराप्रत । सैन्य जमवून तो जात । स्मरून गणेशासी युद्ध करित । दैत्यांसह निश्चयाने ॥६५॥
शस्त्रास्त्रांनी युद्ध करित । दैत्य अत्यंत क्रोधयुक्त । मल्लयुद्धास आव्हान देत । उग्रसेन नृपासी तो ॥६६॥
विघ्नेश्वरास मनांत स्मरून । राजा मल्लयुद्धाचें आव्हान । स्वीकारी तैं दैवी सत्ता महान । प्रवेशली त्याच्या देहांत ॥६७॥
तैं तो असुर क्षीणशक्ति । सुखभोक्ता महाबळ परी चित्तीं । भयभीत होऊन शरणागती । स्वीकारून पळून गेला ॥६८॥
तदनंतर उग्रसेन । नगरांत प्रवेश करून । उत्तम रीतीनें राज्य करून । पूजी भीमेशसहित गणेशासी ॥६९॥
अंती कैलासांत जात । उत्तम भोग तेथ भोगित । पुनरपि मयूरक्षेत्रांत । ब्राह्मणकुळांत तो जन्मला ॥७०॥
गणेशमागें तो भजत । गणनायकास भक्तियुक्त । अंतीं स्वानंदलोकीं जात । तल्लीन झाला तदनंतर ॥७१॥
ऐसे नाना विध जन । देवागार यात्रा करून । भीमेशास पूजून । देवहो सारे सिद्धि पावले ॥७२॥
आता देवालयाची पूर्ण यात्रा करित । त्याचें माहात्म्य सांगत । संक्षेपें जें झालें पूर्वीं वृत्त । ऐकावें देवश्रेष्ठांनो ॥७३॥
द्राविडांत शुद्र कुळांत । विषयप्रिय नामें नर असत । तो एकदा स्वकार्यरत । मार्ग एकाकी चालत होता ॥७४॥
तेव्हां तो अशुचि स्वभावें वर्तत । राक्षस कोणी तें पाहात । त्याच्या शरीरीं प्रवेशत । त्यायोगें असुरस्वभाव झाला ॥७५॥
पिशाच्चेंही त्यास पकडती । त्याच्या शरीरीं प्रवेशती । जाहली त्याची पैशाचक वृत्ती । वीर्यविहीन तो झाला ॥७६॥
नाना रोगांनी तो पीडित । त्यास घेऊन त्यास जात । ब्राह्मण मित्रांच्या उपदेशें त्वरित । मयुरेशक्षेत्रीं भक्तिभावें ॥७७॥
ते यात्रा यथाविधि करित । चारही दारयात्रा आचरित । तेथ त्यांसी सर्प चावत । परी ते यात्रा न सोडिती ॥७८॥
नग्नभैरवदेवाचें करिती पूजन । तेव्हां पिशाच्चें घाबरून । त्या शूद्रास सोडून । पळून गेली सर्वही ॥७९॥
नीलकंठाचें होतां दर्शन । विषबाधाही नष्ट होऊन । राक्षस गेला पळून । पाहून कृत्तिवासातें ॥८०॥
तो विषयप्रिय शूद्र वीर्ययुक्त । भीमेशपूजनानें होत । विघ्नेशासी पूजून परतत । आपल्या ग्रुहासी तदनंतर ॥८१॥
मानसी अत्यंत विस्मित । गणनायकासी तो स्मरत । चतुरद्वारयुत त्यास भजत । अंतीं गेला शैवलोकीं ॥८२॥
तेथ विविध भोग भोगित । पुनरपि मयूरक्षेत्रीं जन्मत । क्षत्रियकुळीं तो क्षेत्रसंन्यासयुक्त । गणनायका भजतसे ॥८३॥
अन्तीं ब्रह्मभूत तो ओत । ऐसेचि नानाविश्वजन पावत । सिद्धि त्या मयूरक्षेत्रांत । देवागाराच्या यात्राप्रभावें ॥८४॥
देवालयाच्या यात्रांचें महिमान । जो ऐकेल वा वाचील एकमन । विघ्नेश प्रसन्न होऊन । प्रभुत्व लाभे सर्वत्र ॥८५॥
ओमित श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विघ्नराजचरिते देवागारयात्रामाहात्म्यवर्णनं नाम पंचदशोऽध्यायः समाप्त । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP