खंड ६ - अध्याय १२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ पंचदेव तैं प्रार्थित । मयूरद्वारयात्रा जे करित । ऐशा कोणा सिद्धि लाभत । त्यांचें वर्णन सांगावें ॥१॥
देवभूमींत या जे मृत । त्यास सिद्धि जी लाभत । तैसेचि एकद्वाराश्रित । यात्रा करिता काय मिळे ॥२॥
ऐसे सर्व सांग आम्हांप्रत । भ्रशुंडे महामुने समस्त । ऐकून कथा रमणीय चित्त । हर्षोत्फुल्ल झालें आमुचें ॥३॥
आदिमध्यांतग सर्वत्र । आपण आहांत विचक्षण प्राज्ञ । माहात्म्य सांगून मर्मज्ञ । आम्हां पंचदेवांसी करावें ॥४॥
भ्रुशुंडी तैं त्यास सांगत । कथा जी रम्य पूर्ववृत्त । म्हणे पंचदेवही ऐका सांप्रत । सांगती गुरु मुद्‍गला नमून ॥५॥
द्राविड देशीं ब्राह्मण असत । विद्याहीन पूर्वी दुस्थित । तेथेंच अंत्यज जातींत । जन्मलेला नर एक होता ॥६॥
त्यांचे मातापिता नष्ट झाले । सुहृज्जनांनी त्यास त्यागिलें । तेव्हां स्वदेशभूमी सोडून भटकले । महीतलावरी ते दोघे ॥७॥
एकदा अन्य जनांसहित । दैवयोगें ते मयूरक्षेत्रांत । आले दोघेही हर्षयुक्त । प्रातःकाळीं स्नान करिती ॥८॥
तदनंतर शमीदूर्वादि घेऊन । विघ्नेशपूजेस्तव करिती । गमन । अंत्यज नरें आपुलें पूजन । करविलें ब्राह्मणहस्तानें ॥९॥
त्या ब्राह्मणास नव्हतें येत । पूजा मंत्रादि तरी पूजित । भक्तिभावें त्या काळांत । विधिहीन जलपत्रांनी ॥१०॥
नंतर ते उभय करित । जनांसह गर्भद्वारयात्रा पुनीत । पूर्वद्वारीं जाऊनि पूजित । बुद्धिदेवीस भक्तीनें ॥११॥
पुनः गणेशासी पूजिती । ते दोघे तेथें राहती । उपोषणासि करिती । विधानपूर्वक त्या दिनीं ॥१२॥
दुसर्‍या दिनीं यात्रा न करित । ते दोघे भुकेलेले अत्यंत । यात्रा अपूर्ण सोडून जात । क्षेत्र सोडून तें महाअद्‍भुत ॥१३॥
अकस्मात ते ज्ञानसंयुक्त । विद्यायुक्त दोघे होत । आपापली जात आठवत । विचार करते झाले तैं ॥१४॥
म्हणती क्षेत्र माहात्म्य अद‍भुत । आपुल्याला हें वर्णनातीत । एका द्वाराची यात्रा करित । तरी ज्ञानविद्या लाभली ॥१५॥
जरी संपूर्ण यात्रा करित । तरी केवढा लाभ अद्‍भुत । मिळेल यांत न चित्तांत । संदेह आता कांहीं उरला ॥१६॥
ऐसा विचार करित । ते स्वनगरीं परत जात । सर्व मान्यता लाभत । गणेशास पूजिती त्या संस्कारें ॥१७॥
भक्तीच्या बळें अंतीं जात । देवांनो ते स्वानंदलोकांत । तेथ विघ्नेश्वरास पाहून होत । ब्रह्मभूत ते दोघे ॥१८॥
ऐशियापरी नाना जन । द्वारयात्रा तेथ करून । पावले सिद्धि त्याचें वर्णन । वर्षसतेंही पूर्ण न होय ॥१९॥
अन्य द्वारींही सर्वत्र । जें जें फळ सांगे शास्त्र । तें तें सर्व लाभतें पवित्र । त्यांत संदेह मुळीं नसे ॥२०॥
मयूर क्षेत्रांत जे मृत्यु पावत । त्यांस कोणती सिद्धि लाभत । देवमुख्यांनो ती तुम्हांप्रत । सर्व संतोषपर सांगतों ॥२१॥
पूर्वीं एक शूद्र दैववशें येत । ह्या मयूरक्षेत्रांत । धूम्र नाव त्याचें असत । कुष्ठरोगें व्याकुळ तो ॥२२॥
तो उच्छिष्टादी भोजन करित । भिक्षा मागून राहत । ऐसा एक महिना रोगपीडित । धूम्र होता मयूरक्षेत्रीं ॥२३॥
त्यास नंतर मृत्यु प्राप्त होत । तो स्वानंद लोकी जात । होऊनिया ब्रह्मभूत । ऐसे नाना ज्ञन उद्धरले ॥२४॥
त्यांचें समग्र चरित । वर्णन करण्या अशक्य असत । ते सर्वही यथोक्त फलभोक्ते होत । यांत संशय कांहीं नसे ॥२५॥
येथ क्षेत्रस्थित नर मरती । पापपरायण जरी ते असती । तरी त्यांना यमाची भीती । नसे या क्षेत्राच्या प्रभावें ॥२६॥
नग्नभैर्व नाम क्षेत्रपालक । दंडधारक जनीं एक । मयूरवासी जनांस धाक । तयाचा सतत वाटतसे ॥२७॥
त्याच्या सर्व क्षेत्र अधीन । वैनायक हें पावन । दंडय नरास शुद्ध करून । स्वानंदांत तो स्थापी ॥२८॥
देवेश तेव्हां विचारित । कोण हा भैरव असत । नग्नस्वरूप तो कां वर्तत । पापकार्‍यास त्याची कैसी यातना ॥२९॥
भ्रुशुंडी म्हणे तयांप्रत । मायासंग विहीन असत । साक्षी सदा तो वर्तत । म्हणून म्हणती नग्न त्यासी ॥३०॥
गाणपत्यांचा अग्रणी ख्यात । तत्वांस ज्याचें भय वाटत । म्हणोनी तीं जग चालवित । कांहीं व्यत्यय न आणितां ॥३१॥
ब्रह्मा सृष्टि निर्माण करित । विष्णु पालनकर्ता होत । हर संहार तिचा करित । भयानें त्या नग्न भैरवाच्या ॥३२॥
सूर्य नित्य तळपत । संमोहकारिणी शक्ति वर्तत । ऐसे सकल वस्तुजात । स्वपदीं स्थित त्याच्या भयें ॥३३॥
हा आपुलाली कर्में करवित । म्हणोनि भैरवक नामे स्मृत । गणराजाच्या मायेनें निर्मित । सर्वार्थदायक भयंकर ॥३४॥
गर्भागार गणेशाचें ज्ञात । रहस्यमय सतत । म्हणोनी यत्नपूर्वक त्या स्थानांत । रहावें देवेशांनो भक्तीनें ॥३५॥
तेथ पूजादिक कार्य करावें । सत्कार्यही सतत करावें । असत्यादि न आचरावे । मानवानें कदापि ॥३६॥
देवतांनो मूत्रमल त्याग न करावा । तेथ पवित्र नियम पाळावा । गणेशभावें निवास करावा । मानवांनी सदा आनंदानें ॥३७॥
जैसे येथ जें पुण्य घडत । ते अन्य क्षेत्रांहून अधिक वाटत । तैसेच येथ जें पाप घडत । तेही ख्यात अधिक उग्र ॥३८॥
म्हणोनि क्षेत्रीं पापें न करावीं । यथाशास्त्र जोड करावी । पुण्याची न्याय । विधानें बरवी । ऐसें रहस्य जाणावें ॥३९॥
पाप अन्य क्षेत्रांत घडत । पंचदेवांच्या नराकडून जगांत । तें या मयूरक्षेत्रांत । क्षणार्धांत नष्ट होते ॥४०॥
लोक मयूरक्षेत्रांत । परी जें पापकर्म करित । तें वज्रलेप होत । कदापिही नष्ट ना होई ॥४१॥
परी तेथ विधि असत । तो ऐका देवहो सांप्रत । जेणें संशयहीन होऊन जगांत । पापमुक्त तुम्ही व्हाल ॥४२॥
मयूरक्षेत्रीं जें पाप घडत । तें विनाश पावे देवालयांत । देवालयीं जें घडत । गर्भागारीं तें लय पावे ॥४३॥
गर्भागारीं जें पाप घडत । तें द्वारयात्रेनें दूर होत । यांत संदेह अल्पही नसत । प्रदक्षिणा घालतां ॥४४॥
द्वारयात्रेंत जे पाप घडत । तें मात्र वज्रलेप होत । नरास यातना देऊन मारित । ऐसें पाप तें भयंकर ॥४५॥
जन्मापासून मरणापर्यंत । मयूरक्षेत्रीं पाप करित । त्या नरास यातना प्राप्त । दहा हजार वर्षावधि ॥४६॥
नग्नभैरव त्यास यातना देऊन । शुद्ध करी तनमन । त्रिविध त्याच्या यातना महान । सांगतो तुम्हां संक्षेपें ॥४७॥
अग्निकुंडादिक तेथ संस्थित । भैरवाच्या क्षेत्रांत । यमपुरीहून तें असत । उग्र लक्षावधि पटीनें ते ॥४८॥
आधीच तो उग्र यातना देत । तदनंतर यमासम धाडित । घोर पीडा भैरव देत । भयदायक तो पाप्यांसीं ॥४९॥
तदनंतर भूतपिशाच्चादि संभूत । यातना तो पाप्यांस देत । तदनंतर शुद्ध करून नेत । स्वानंदपुरांत अपराध्यासी ॥५०॥
चाळीस हजार वर्षे यातना । भैरव स्थानीं पापी जनां । तदनंतर यमयातना । तीनहजार वर्षप्रमाण ॥५१॥
तदनंतर पैशाची योनींत । तीन हजार वर्षे राहत । ऐसी भयंकर यातना देत । नग्नशूलधर तो भैरव ॥५२॥
ऐसें सर्व सांगितलें । यातनांचें भय जें असलें । जें मयूर क्षेत्रीं मरतां लाधलें । सदैव पापीजनांसी ॥५३॥
पापरूप जे नर संस्थित । खल स्वभाव गणेशांत । त्यांना भैरवाधीश काढित । बाहेर ओढून भयप्रद ॥५४॥
पुण्यशीलांस हृदयांत । महेश्वरांनो तो स्थान देत । क्षेत्रांत निवास देऊन रक्षित । आदरें नित्य तयासी ॥५५॥
मयूरक्षेत्रांत निवसत । क्षेत्र संन्यास जो घेत । त्यांस दुःखलेशही न प्राप्त । होत देवेंद्रसत्तमही ॥५६॥
लक्ष्मीद्वारें तयास करित । नारायण त्यांसी धर्मयुक्त । पार्वती हस्तें शंकर देत । त्यांस नाना विधि अर्थ ॥५७॥
रतीच्या हस्तें नाना काम । काम देव तयां अभिराम । भूमिद्वारें शाश्वत ज्ञान परम । वराहक देतो तयांसी ॥५८॥
म्हणोनि सर्व सोडून । मयूराचा आश्रय घेऊन । राहतीं मित्रांसह जें जन । ते ब्रह्मभूत होतील ॥५९॥
स्त्रीपुरुषयुक्त नाना योनिगत । जंतू असती देहपोषणसक्त । नरदेह लाभून जात । गणेशक्षेत्रीं तो गर्दभतुल्य ॥६०॥
पाचवें ब्रह्मरूप हें भूमिगत । क्षेत्ररूपानें ज्ञात । त्यास जो न सेवित । ते पशुतुल्य जाणावे ॥६१॥
स्वर्गांत देवमुख्यही इच्छित । मानव देह लाभून मयूर क्षेत्रांत । आम्हां मृत्यु यावा ईप्सित । सद्‍भाग्य तें आम्हीं मानूं ॥६२॥
तेथ मृत्यु येतां लाभत । पाचवें ब्रह्म प्राण्यांप्रत । धर्मार्थ काम मोक्षातीत । परात्पर जें गणेश ब्रह्म ॥६३॥
काशी आदिक मुख्य क्षेत्रांत । नर जें सुकृत आचरित । त्या संस्कारयोगें लाभत । मयूरक्षेत्रीं निवास ॥६४॥
ऐसें निवास महिमान । सांगितलें तुम्हां पावन । याचें करिता श्रवण पठन । क्षेत्रवासासम फळ लाभें ॥६५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍ले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते मयूरक्षेत्रवासशुभाशुभवर्णनं नाम द्वादशोध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP