खंड ६ - अध्याय ३६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति म्हणे शक्तींसी । पाहून महाशांतियुक्त कामासुरासी । सुरर्षींच्या चित्तासी । विस्मय फार जाहला ॥१॥
विकटास पूजून ते जोडिती । आपुले कर ते भावभक्ती । देव ऋषि त्यास विनविती । स्तोत्र उत्तम गाऊनिया ॥२॥
जन्मरहित प्राचीन अव्यय । सदा आत्मरूप सकलावभासमय । असद्विहीन विविध अंतरस्थ सदय । त्या विकटा परेशा भजतो आम्हीं ॥३॥
जयासी । आदिमध्य अंत नाहीं । सुजीवन । ज जीवनधर्मधारवाही । सदा अमृत । ब्रह्मविकारहीन प्रत्यहीं । माया विकटा परेशा भजतों आम्हीं ॥४॥
आपणच स्वबिंबापासून । माया रचून देई स्वयं प्रसन्न । जीवन बिंबवीर्य ती करी तैं पूजन । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥५॥
जैसें असद्रूपमय सांख्य रचित । तैसेंच ब्रह्म सुबोधरूपयुक्त । अनंतभेदाश्रित अप्रमेय सतत । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥६॥
तदनंतर स्वबोधानें सोऽहंकृत । आदिरूप पवित्र एकाश्रित । जगद्वर बिंदुमय पुनीत । त्या परेशा विकटा भजतों आम्ही ॥७॥
चतुष्पादमय जें जगत । व्यष्टी समष्टीनें जें युग निर्मित । अजांत संजीवनप्रद गणेश असत । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥८॥
नाथा भेदविहीनभावें संतत । जग हें सारें तूं पसरवित । प्रकाशरूप अनंत लीला करित । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥९॥
अजन्मा अससी तूं गजानन । तथापि सर्वत्र तुझें होत दर्शन । भक्तीनें गम्य विकट नामें संपन्न । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥१०॥
विष्णुस्वरूपें हया जगा रक्षिसी । विनायका रजोगुणें सृजिसी । तमोयुक्ततेनें हयास संहारिसी । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥११॥
कर्में सारी निर्मून । संजीवनरूपें त्यांचें नियमन । क्रियास्वरूपें शक्तिसंपन्न । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥१२॥
आत्मरूपें ढुंडिराजा सदा । विश्वंभरा विश्वमूर्ते सौख्यदा । तुज जगीं प्रवेश कैसा मोहवा । त्या विकटा परेशा भजतों आम्हीं ॥१३॥
सर्वदा आदिपूज्य सकल वंदित । गणेश सिद्दिप्रद आसमंतांत ॥ सुचित्तभास कर्णाधार वर्तत । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥१४॥
स्वानंद नाम नगरांत । जो त्रिनेत्रयुक्त सुस्थित । मूषकवाहन महोदर सर्वस्व नष्ट करित । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥१५॥
विराजें जो स्वभक्तपक्षांत । असे विघ्नाविहीन मनेप्सित । अभक्ताचें सर्वस्व नष्ट करित । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥१६॥
नियंतृरूपें तुझ्या करांत । नानाविध ब्रह्मीं तैसें जगांत । महाअंकुश ऐसा एकला धरित । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥१७॥
भ्रमात्मक जें एक बंधन । तो परशु तुझ्या करीं विराजमान । करिसी हनन स्वभक्तांचें बंधन । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥१८॥
जे सर्वदा तुझा आश्रय घेत । त्यांना सत्वरें अभय दावित । तुज त्यागिती दुष्ट ते भय पावत । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥१९॥
निजामृत विघ्नपातें जें अन्न । अर्वत्र जगांत असे पावन । तें मोद्क प्रतीकानें हस्तग मोदकर शोभन । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥२०॥
सर्वगता विभिन्न असन्मयी । परी ती माया तुझ्यांत शांतिमयी । म्हणोनि जन विकट म्हणती विनयी । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥२१॥
आम्हीं अल्पमति काय स्तवित । जेथ निगमादिक झाले असमर्थ । शुकादींसही स्तवनातीत । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥२२॥
तथापि तुझ्या दर्शनानें प्राप्त । बोध ब्रह्मेशा जो आम्हांप्रत । त्यानें रचिलें दीनपाला हो संतुष्ट । त्या परेशा विकटा भजतों आम्हीं ॥२३॥
आदिशक्ति नंतर सांगत । ऐशी स्तुति करून विकटाप्रत । प्रणाम घालिती साष्टांग विनत । सर्व सुरर्षी नाचती ॥२४॥
तेव्हां महादेवींनो तो विकट । सर्वेश भक्तियंत्रित । देवर्षींना त्या भक्तवात्सल्यें म्हणत । भक्तिसंयुतांसी प्रभू ॥२५॥
देवांनो मुनिसत्तमाम्नो सांप्रत । वर मागा जो असेल इच्छित । स्तोत्रें संतुष्ट मीं जो त्वरित । देईन तुम्हां भक्तियुक्तांसी ॥२६॥
हें तुम्हीं रचिलेलें स्तोत्र मत्पदप्रद । होईल पाठका वाचका सुखद । भुक्तिमुक्तिप्रद पुत्रपौत्रद । धनधान्यादिक काम पुरवी ॥२७॥
षट्‍कर्म साधनकर । परकृत्य विनाशक थोर । सेवकांसी नानारोगहर पूर्णानंदप्रदायक ॥२८॥
जे असतील कारावासांत । त्यांची सुटका होईल त्वरित । सहस्त्रावर्तन जरी करित । तरी सौभाग्य वाढेल ॥२९॥
नाना पापसमूहांचें दाहक । वाचनें सर्व सिद्धिप्रदायक । होईल निःसंशय सुखकारक । स्तोत्र हें सर्वदा सर्वकाळ ॥३०॥
निरंतर प्रतिदिवस वाचील । स्तोत्र हें एकवीस वेळा विमल । त्याचे सर्व काम पूर्ण होतील । एकवीस दिवस क्रमें वाचितां ॥३१॥
ऐसें विकटाचें वाक्य ऐकून । देवर्षि उत्तम करिती वंदन । शक्तींनो ते म्हणती वचन । विनयनम्र भक्तीनें ॥३२॥
गजानना कामासुरास शांत । महावीरासस तूं केलेंस सांप्रत । तें पाहून कृत्य अद्‍भुत । संतुष्ट झालों सर्व आम्हीं ॥३३॥
आतां द्विजादिक कर्मपर । देव स्वपदीं स्थिर । स्वधर्मयुत जन उदार । होतील आतां जगांत ॥३४॥
वरदानें जे साधनार । तें तें आधींच मोदकर । होतां इच्छित पूर्ण सत्वर । आणखी काय मागावें ॥३५॥
परी आतां एकचि मागणें । स्थिर भक्तीचें द्यावें लेणें । कामभय नष्ट होय जेणें । तथाऽस्तु म्हणे विकट तेव्हां ॥३६॥
विकट अन्तर्धान पावला । देवर्षीस खेड झाला । देवाचा विरह कोणाला । दूःखड होणार नाहीं जगीं ? ॥३७॥
तदनंतर मुनिगणाहस्तें स्थापित । विकटमूर्ति देव मुदित । आनंददायक मूर्ति प्रख्यात । हिमाचलप्रांतीं तें स्थान ॥३८॥
वायुदिशेंत तेथ विलसत । विकटाचें तें स्थान पुनीत । महादेवींनो सर्वसिद्धि देत । पूजकांसी सर्वदा ॥३९॥
देवऋषि मूर्ति स्थापून । पूजा यथाविधि करून । आपापल्या स्थानीं जाऊन । पुनरपि परतले क्षेत्रांत या ॥४०॥
अंशानें आपुल्या अधिकारक्षेत्रांत । राहतो देवर्षी कार्यरत । पूर्णभावें त्या क्षेत्रांत । राहून भजती विकटासी ॥४१॥
चौकोनी तें महाक्षेत्र । दशयोजनें त्याचा विस्तार सर्वत्र । तेथ मध्यभागीं पवित्र । साक्षात्‍ विकट विलसत असे ॥४२॥
चार दिशांत चार देव । शंभु विष्णु शक्ति सूर्य अभिनव । अन्य देव भूषविती वामभाग अपूर्व । उजव्या बाजूस मुनिजन ॥४३॥
क्षेत्रयुक्त तीर्थ पश्चिमेस । पुढयांत भक्तजन सेवेस । उपस्थित मूषक वाहक त्यास । स्थापिती तेव्हां देवगण ॥४४॥
वामांगीं सिद्धि वसत । दक्षिणांगीं बुद्धि सेवित । ब्रह्मप्रिय गण सर्व स्थित । शस्त्रधर विकटप्रिय ॥४५॥
तेथ विकटतीर्थ विख्यात । त्यांत स्नाननमात्रें ईप्सित । लाभती प्राणिमात्र त्वरित । अंतीं मुक्ति लाभतसे ॥४६॥
स्वानंदांत मिळे स्थान । ऐसें हें विकटप्रिय तीर्थ पावन । त्रैलोक्यांत विश्रुत महान । ऐसा पूर्व वृत्तान्त हा ॥४७॥
अन्यही तीर्थमुख्यें वसत । देवर्षीच्या समंतांत । विकटक्षेत्रीं जीं स्नानकर्मे होत । सुखप्रद भक्तांसी ॥४८॥
अन्य देवांचें जे नर भक्त । मृत्यु पावतील या क्षेत्रांत्त । तेही विकटाच्या लोकीं जात । हें निश्चित जाणावें ॥४९॥
तेथ भोग अमित भोगित । अंतीं स्वानंदांत लय पावती । विकटदर्शनानें होती । ब्रह्मभूत ते सारे ॥५०॥
भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी । त्या दिनीं मूर्ति स्थापिती । विकटाची म्हणोनि जगतीं । ती तिथि मुख्यत्व पावली ॥५१॥
त्या तिथीस महोत्सव करिती । प्रतिवार्षिक भावभक्ती । माध्यान्ह काळीं पूजिती । सर्वसिद्धिप्रदायकासी ॥५२॥
स्वल्प सिद्धिद आद्य हें व्रत । जाणावें शास्त्रसंमत । धन्य ते लोक जगांत । जे पाहती विकटासी ॥५३॥
ते कृतकृत्य होत । ऐसें वचन वेदांदींत । तेथ देवर्षी नाना वसत । क्षेत्रांत भजती जे विकटासी ॥५४॥
नित्य हर्षयुक्तें भजती । विकटाचीं चरित्रें वर्णिती । आनंदाश्रू नयनीं दाटती । रोमांच उठती अंगावरी ॥५५॥
नरदेह अपूर्व लाभून । विकटाचेम दर्शन न घेती जे जन । त्यांचें निष्फळ असे जीवन । पशुतुल्यस्वभाव ते ॥५६॥
ऐसें हे क्षेत्रसंभव महिमान । कथिलें संक्षेपें पावन । जरी वर्णीन विस्तारें करून । तरी अयुत वर्षेही न पुरतील ॥५७॥
वर्षकोटी जरी वर्णिति । अन्य देवमुख्य योगी जगती । तरी तेही समर्थ न होती । विकटक्षेत्र वर्णन करण्या ॥५८॥
ऐसे नान अवतार घेत । धर्मधर प्रभु चराचरर रक्षित । कलांशानें विकट श्रेष्ठ । देवींनो हें रह्स्य जाणा ॥५९॥
हें विकटाचें महिमान । जो वाचील करील श्रवण । त्यास सर्व ऐहिक फळ लाभून । अंतीं ब्रह्ममय तो होईल ॥६०॥
त्यास कामासुराचें भय न बाधत । कामहीन स्वभावें होत । विशेष सुखद काम लाभत । ऐसें माहात्म्य विकटाचें ॥६१॥
ऐशापरी कामास वश करून । शांत करी त्यास गजानन । विकट गणेश हें पावन । कथानक तुम्हां सांगितलें ॥६२॥
आतां आणखी काय ऐकण्यास । इच्छा असे तुमच्या चित्तास । तें सांगा तुम्हीं मज या समयास । पुरवीन तुमची मनःकामना ॥६३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खण्डे विकटचरिते विकटावतारचरितसमाप्तिवर्णनं नाम षट्‍त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP