करी वामन प्रार्थना हे मुकुंदा तुझ्या भक्त - पायांचिया धूळिवृंदा
हरी घालिं माझे शिरीं सर्वकाळीं वहातोसि आगेंचि ज्या पाय धूळी ॥९१॥
या कारणें चरण दैवत जो मुरारी
आत्मा उपेंद्र हरि वामन - नाम - धारी
तो घेउनी व्रज - जनांऽग्नि - सरोज - धूळी
मातें कृतार्थ करि या कलि - दुष्ट - काळीं ॥९२॥
श्रीकृष्ण तो पदरजें व्रजिच्या जनाच्या
दुर्वासना हरितसे हरि वामनाच्या
आत्मा उपेंद्र तरि वामन - नाम देहा
सेऊनियां पदरजें करि धन्य पाहा ॥९३॥
आत्मैक्य नामैक्यहि शेषशायी देऊनि मातें निज - भक्त - पायीं
उपेंद्र तो वामन जेथ आहे धूळीमधें धन्य करुनि पाहे ॥९४॥
बुद्ध्यादि देव अकरा विधि बोलियेला
जे आपणासहित भाग्य असें तयांला
विश्वात्मतेंकरुनि भाग्य उपेंद्र मानी
कीं धूळि हे स्व - जन - वैभव - राजधानी ॥९५॥
येथेंचि टीका करिताति कोणी कीं यांत पद्मोद्भव श्रूळपाणी
मिळोसि तेराजण देव होती श्रीकृष्ण - पादाब्ज - रसार घेती ॥९६॥
श्लोकार्थ तों होत असे असाही परंतु भावार्थ विरुद्ध कांहीं
कीं मित्र जो देव गुदेंद्रियाचा तद्भाग्यही वर्णिल काय वाचा ॥९७॥
शास्त्रीं विराडिंद्रियसृष्टि जेथें गुदेंद्रियाला नरकत्व तेथें
त्या इंद्रिया लाभ कसा हरीचा बोलेल सांगा विधि तो स्ववाचा ॥९८॥
चित्तीं स्फुरे हरि गुदेंद्रियकर्म होतां
ऐसें म्हणाल तरि तें मन - बुद्धि चिन्ना
सर्वेद्रियें करुनि कर्म घडे तथापी
सद्भक्त - मानस असे हरिच्या स्वरुपीम ॥९९॥
पात्रें जसीं आणिक इंद्रियांचीं श्रीकृष्ण - सेवा असि यास कैची
म्हणूनि पात्रें अकराचि साचीं जे देव एकादश उक्ति त्याची ॥१००॥
समर्पिती कर्म कळूनि देवा होतें विसर्ग सुख तेंचि सेवा
आत्मा सुखें तें सुख वासुदेवा हा भाव यालागिं कसा वदावा ॥१०१॥
कर्मार्पणादि विधि यांस कधीं कळेना
हा कृष्ण ईश म्हणऊनिहि आकळेना
नैसर्गिक - प्रियपणें भजती मुकुंदा
देहेंद्रियें करिति सर्वहि कृष्ण - धंदा ॥१०२॥
या इंद्रियें करुनि काय घडेल सेवा
सर्वेद्रियें सहज सेविति वासुदेवा
यावेगळेचि अकराजण देव होतां
हा क्लिष्ट कल्पितहि अर्थ किमर्थ आतां ॥१०३॥
आम्हीं शिवादि अकरा अतएव धाता
या दोंसुरांसहित बोलियला अनंता
त्यामाजि - सेवटिल इंद्रिय गोपिकांचें
झालें कृतार्थ म्हणऊनि म्हणाल साचें ॥१०४॥
तथापि हा काळ जयीं स्तुतीचा तयां न तो लाभ तयां रतीचा
कात्यायनीचें व्रत गोपकन्या करुनि होती रति - लाभ - धन्या ॥१०५॥
हे धन्य देव अकरा जण मात्र जेव्हां
वत्सें हरुनि विनवी विधि येथ जेव्हां
श्लोकार्थ आणिक अबाधित अर्थ जो हा
श्रोते तुम्हीं करुनि येथ विवेक पाहा ॥१०६॥
व्रज - जन - विभवाचा पार नेणे म्हणूनी
विभव सुरवरांला जें तदंशें करुनी
विशद कथुनि आतां श्लोक हा बोलतो कीं
व्रज - जन - पद - रेणू लभ्य तो धन्य लोकीं ॥१०७॥
तें भाग्य थोर तरि कीं जरि जन्म येथें
कांहीं घडे हरि असें तव दास्य जेथें
हे कृष्ण - भक्ति - पदवी जरि लभ्य नाहीं
या गोधनांत तरि हो पश्रु जन्म कांहीं ॥१०८॥
सप्रेम भक्त तुज पाहति शेषशायी
वृंदावनांत तुज येरिति वत्स गायी
हेही महापदवि लभ्य उगीच नाही
हो या वनीं तरुलतादिहि जन्म कांहीं ॥१०९॥
जे या वनी तरु - लतादिक जन्म घेती
कोणाचिया पदरजें तरि धन्य होती
झालें जिणें सकळही हरिरुप ज्यांचें
त्यांचें पदाब्जरज लाधति भाग्य त्यांचें ॥११०॥
यांचे जिणें सकळ माधव रुप झालें
ऐसें व्रजस्थ - जन - वैभव बोलियेलें
या भक्तिचें फळ रमापति काय यांला
देयील की म्हणुनि येथ सशंक झाला ॥१११॥
श्लोकांत यांत वदतो म्हणऊनि धाता
कीं तूं व्रजस्थ - जन - भक्ति - रसें अनंता
झालासि केवळ ऋणी फळ काय देसी
उत्तीर्ण कोण फळ देउनि त्यांस होसी ॥११२॥
जे या गोवळवाडियांत असती तूं काय देसी तयां
मोटी मुक्ति तुझी परंतु नव्हसी उत्तीर्ण देऊनियां
द्वेषीही कुळ - मुक्ति - युक्त पदवी पावे तुझी पूतना
तेही देउनियां ऋणी व्रजजन प्रेमें जगज्जीवना ॥११३॥
जे थानीं विष घालुनी तुज हरी मारावया पातली
द्वेपेही स्तन पाजितां स्वपदवी तीतें तुवां दीधली
प्रेमें श्रीमुख पाहतां स्तन युगीं पान्हा जयांचा पिसी
त्याला देउनि मुक्ति ते हरि कसी उत्तीर्णता पावसी ॥११४॥
आतां यां सकळां कुळांसहितही देसील मुक्ती जरी
उत्तीर्ण व्रजिंच्या जनास करुणासिंधू नहोसी तरी
भाऊ जो अघनाम आणि वकही बंधू असी पूतना
तीतें जें पद तें तयांसहि दिल्हें देवा जगज्जीवना ॥११५॥
ज्याला तूज निमित्त वित्त सकळ प्राणादिहिं आपलें
देवा वाटत गोड तूजविण तें टाकूनि जीही स्थळें
त्यांला जे गति पूतनेसि दिधली ते देउनीचा कसा
उत्तीर्ण प्रभुवर्य होसिल मनीं हा मोह माझ्या असा ॥११६॥
यालागिं काय हरि देउनियां जनाला
उत्तीर्ण होसिल असें नकळें मनाला
देऊनि मुक्तिहि ऋणी व्रजवासियांचा
भावें अशा वदलि तेथ विरिंचि वाचा ॥११७॥
कृष्णा तूज निमित्त सर्व सदन प्राणादि ज्यांचें जिणें
मुक्तीचें पद राक्षसांसि दिधले तें त्यांसि देणें उणें
याचें तूं ऋण केविं फेडिसि असें श्लोकामधें पूर्विल्या
भक्ति श्रीव्रजिच्या रमापति पुढें येणेरिती वर्णिल्या ॥११८॥
येथें असें विधि वदोनि सशंक झाला
कीं हें खरेंच परि मागुति या जनांला
आहे गृहादि अनुराग विराग नाहीं
कीं गोप हे रमति सर्वहि देह गेहीं ॥११९॥
टाकूनियां गृह - सुतादि कलत्र वित्तें
जाती यती भजति त्यास विशुद्ध चित्तें
जो मोक्ष त्यांस हरि यांसहि तोचि देतो
उत्तीर्ण येरिति करुनि मुकुंद होतो ॥१२०॥

N/A

References : N/A
Last Updated : July 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP