जो कां गिरि सिंधुतरींत तीरीं तरींत त्याचें प्रतिबिंब नीरीं
नीरें तयातें प्रतिबिंब आलें बिंबांत तें त्याच जळें निमालें ॥३१॥
जळधिभीतरि ये भरतें जयीं जळ तरींत उचंबळतें तयीं
जळ चटे गिरिहीवरि जे धवां मग दिसे प्रतिबिंब न ते धवां ॥३२॥
त्रिभुवनात्मक बिंब चराचरीं पसरतें मन शुद्ध तयावरी
तनुमधें प्रतिबिंब दुजें नुरे मन जयीं निज - बिंब - सुखीं मुरे ॥३३॥
जों अशा अनु भवास न पावे चित्त चिन्मय असें न थिरावे
तोंवरी अनुभवास न आलें ज्ञान शाब्दिकचि केवळ झालें ॥३४॥
गीतेमधें हरिहि येरिति बोलियेला
कीं अर्जुना तरिच तूं वद बोध झाला
भूतें अशेष जरि देखसि आत्मरुपीं
तेव्हांचि देखसिल ऐक्य मम - स्वरुपीं ॥३५॥
ज्ञान - प्रशंसा बहुसाल केली तों अर्जुनाची करुणा उदेली
याचा करावा उपदेश याला आली कृपा हे करुणालयाला ॥३६॥
परि नये शरणागत तों नदे अभयहस्त न तत्त्व तया वदे
गुरु दयाळु तथापिहि येरिती वदति दाटुनि तत्व न त्या प्रती ॥३७॥
तरी कृपा ये करुणालयाला देखोनि सत्पात्र म्हणे तयाला
कीं ज्ञान सर्वाहुनि थोर आहे जाणूनि तें होउनिं धन्य राहें ॥३८॥
भावें वदे या हरि अर्जुनाला कीं हें कळावें सकळां जनांला
कीं जाण तें संत कृपे करुनी तयां गुरुत्वें त्दृदयीं वरुनी ॥३९॥
म्हणे अर्जुना संत धुंडूनि आधीं तयांपासुनी ज्ञान हें शीघ्र साधीं
करुनी नमस्कार साष्टांग सेवा करावी पहावें जसें देवदेवा ॥४०॥
कृपादृष्टिनें पाहती तूज जेव्हां करावा अरे अर्जुना प्रश्न तेव्हां
तुटे बंध का केविं हें दुःख नाशे कसा नित्य आनंद आत्मा प्रकाशे ॥४१॥
अशा वंदन - प्रश्न - सेवा - प्रसंगें जयीं त्यांस तूं सेविसी अंतरंगें
तुतें वेद शास्त्रज्ञ जे तत्ववेत्ते कृपादृष्टिनें पाहती तेधवां ते ॥४२॥
तें ज्ञान तूज उपदेशिति तेधवां ते
जेणें करुनि सकळांसहि मुक्ति होते
ते संत तूज उपदेशिति तत्त्व जेव्हां
ऐसा पुन्हा न तुज मोहं पडेल तेव्हां ॥४३॥
अनुभव मज कैसा होय तो बोध होतां
म्हणसिल तरि पार्था सांगतों तूज आतां
सकळ विविध भूतें देखसी स्वस्वरुपीं
तुज मज मग तेव्हां ऐक्यता विश्वरुपीं ॥४४॥
या कारणें ज्ञान जयांस होतें ते स्वस्वरुपांत समस्त भूतें
असे पहाती प्रतिबिंब तेव्हां बिंबीं मिळे येरिति बोध जेव्हां ॥४५॥
या कारणें तव - कृपा - लव - लेश जेव्हां
जाणेल येरिति तुझ्या महिमेस तेव्हां
नाहीं तरी म्हणतसे विधि याच भावें
कीं ज्ञान तों वरि तयास कसें म्हणावें ॥४६॥
श्लोकामधें पहिलिया वदला विधाता
कीं ज्ञान तें तव - कृपांश - लवें अनंता
बोलेल या उपरि कीं मज तोचि देवा
द्यावा प्रसाद - लव जो तव - पाद - सेवा ॥४७॥
तूझा प्रसाद - लवही परि भाग्य - वृंदा
जो आमुच्या उपजवी मज तो मुकुंदा
येथेंचि होउनि कृतार्थ करो मुरारी
जन्मांतरीं तरि घडो दुसर्‍या शरीरीं ॥४८॥
तूं कल्पवृक्षसम सर्वजनास देवा
तुझा प्रसाद करितां तव - पादसेवा
मी दास यद्यपि जरी अपराध केला
कीं वत्स वत्सप हरुनि समूह नेला ॥४९॥
अन्याय थोर घडला मजलागिं देवा
तो प्रार्थितों म्हणुनि मागुति वासुदेवा
चित्तांत हा धरुनि भाव वदे विधाता
कीं तो प्रसाद मज मागुति हो अनंता ॥५०॥
हा सापराध जरि देह तुझ्या प्रसादा
आयुष्य - शेषवरि पात्र नव्हे मुकुंदा
जन्मांतरीं तरि घडो मज अन्यदेहीं
तूझा प्रसाद - लव - लेश तदंश कांहीं ॥५१॥
ऐसें वदोनिहि सशंक असा विरिंची
कीं सापराध तरि उत्तम योनि कैंची
याचा प्रसाद तरि एक मनुष्य - देहीं 
शंका असीं उपजतां स्मृति होय कांहीं ॥५२॥
इंद्रद्युम्न द्रविड धरणीपाल जो पांड्यराजा
जो कां विष्णु - व्रत - धर करी तत्प्रसादार्थ पूजा
तो देवाची करित असतां तेथ आला अगस्ती
त्याची पूजा नृत्य नकरि तैं तो म्हणे होय हस्ती ॥५३॥
झाला गजेंद्र नृप जो मग त्यास नक्रें
पायीं जळांत धरितां हरिनें स्वचक्रें
नक्रास मारुनि गजाधिप सोडवीला
वैकुंठ - मुक्ति - सदनीं निजरुप केला ॥५४॥
पूजा - प्रसाद हरिचा मज हो म्हणूनी
केली मधेंच मुनि - शाप - बळें कुयोनी
तो पावला परि तशांतही या मुकुंदें
केला प्रसाद सुर - सेव्य - पदाऽरविंदें ॥५५॥
या कारणें विधि म्हणे हरिचा विरोधी
मी वत्स वत्सप हरुनि महाऽपराधी
झालों म्हणोनि हरि होइल दुष्ट योनी
प्रार्थी प्रसाद मज तेथहि हो म्हणूनी ॥५६॥
या कारणें म्हणतसे हरिला विधाता
कीं दुष्ट योनि मज होय जरी अनंता
तेथें प्रसाद मजलागिं तुझा मुकुंदा
हे प्रार्थना इतकि या चरणार विंदा ॥५७॥
ती योनि भोगुनि अशाच पदास यावें
कीं मुक्तिचें पद तिचे पदवीस जावें
ब्रम्हा म्हणे हरि असा अभिलाष नाहीं
मागेन एक हरि दे मज तेंचि कांहीं ॥५८॥
प्रसाद श्रीकांता करि मज असा कीं तुझि जिहीं
पदान्नांची सेवा सतत धरिली त्यांतचि मिही
तुझ्या या पायांचा भृतक असि भृत्यांत गणना
प्रसादें त्या पावे तव चरण भावें मुनिधना ॥५९॥
मोक्षादि सर्व पुरुषार्थ - पदें विशेषें
सेवा - सुधा तुझि असार करी अशेषें
सेवा - प्रसाद - फळ यास्तव मागता हे
ब्रम्हा हरी सफळ वामन तेंचि लाहे ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : July 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP