मुनीलागिं सोळासहस्त्रा पदांतें हरी दाखवी सुंदरां संपदांतें
वदावें किती ज्यास हो पार नाहीं न तर्कास ये जें सरोजासनाही ॥१॥
कोणी त्या शयनीं विचित्र - सुमनीं कृष्णप्रिया कामिनी
कामासक्तमनीं सदा निशिदिनी मेघांत सौदोमिनी
कोणी सेव्य मुनी - पदाऽब्ज नमुनी स्वामी गृह - स्वामिनी
सेवीती सदनीं मृगांकनयनी प्रेमें दिवायामिनी ॥२॥
स्वजन - काम मृगादिक पारधी करुनि ये परतोनि अपारधी
सकळ यादववीर समागमीं गुणगणीं स्तविजे निगमागमीं ॥३॥
कोण्हास दे अभय बोलत उद्धवादी
कोणी जरा सुत मुखांस विरुद्धवादी
कोणावरी म्हणति धाडुनि उग्र सेना
तें द्रव्य द्या म्हणति आणुनि उग्रसेना ॥४॥
जे भिऊनि भजती चरणातें दे तयां अभयही शरणातें
ऐसियांत मुर - भौम - रिपू जी देखतां मुनिस सादर पूजी ॥५॥
घरीं एके पाहें यदुपति - सुता - योग्य नवरी
जयाच्या पुत्रातें चतुर नवरी कोण न वरी
स्वयें पाहे कोठें उचित निजकन्येस नवरा
मुनी देखे ऐशा विविध गति शेषासनवरा ॥६॥
सरोवरें जीं सदनाचमाजी जळांत त्या कृष्ण वधू - समाजीं
क्रीडे स्त्रियांसीं पडतांचि पाणी शिपी तयांही वरि चक्रपाणी ॥७॥
एके घरीं श्रीहरि आंगणांत अश्वावरी त्या अबळा - गणांत
जो लोटितां वेग उणे मनाचे करी असा हो अभिराम नाचें ॥८॥
कोठें हरी धांवडितो गजातें मनीं स्त्रियांच्या करि अंगजातें
सर्वत्र त्या दिव्य मनोभिरामा देखोनित्या पावति मोद रामा ॥९॥
वळखि दे न असा यदुराज तो दुरुनि वेषहि गुप्त विराजतो
कवण वृत्त कसेरितिचें वरी विवरिलक्षितसे स्वगृहांतरीं ॥१०॥
लपोनि स्वयें सर्व - संसार - साक्षी पहातो कशा वर्तती सारसाक्षी
करी कर्म तो अन्य जैसे करीती अशा नारदा दाखवी लोकरीती ॥११॥
प्रधान जे लौकिक कारभारी लपोनि त्यांमाजिहि कैठभाऽरी
पाहे बर्‍या वाइट लक्षणातें लक्षी मुनीत्या कमळे क्षणातें ॥१२॥
मुनीलागिं इत्यादि जें देव दावी नसे अंत वार्ता किती ते वदावी
ऋषी भागला देखतां लोकलीला जगीं नाशते कीर्तनें जे कलीला ॥१३॥
एके घरीं आपण आणि राम विचारितो भक्त - मनोभिराम
कीं संत - कल्याण अशा उपायें करुं जया उद्धरणें स्वपायें ॥१४॥
हांसोनि तो नारद माधवासी बोले पहा काय रमाधवासी
म्हणे तुझ्या या चरिताऽवलोकीं न शक्त योगींद्र न देव - लोकीं ॥१५॥
सलगि करुनि तूझी पाहतों स्वैर माया
क्षितिवरि धरिसी जे लोकदृष्टी रमाया
भयरहित कृपेनें पाद - सेवा - प्रतापें
इतर नर जळे हें पाहतां क्षिप्र तापें ॥१६॥
ब्रम्हा तुझी होउनि योगमाया कांहीं म्हणे दृष्टिस यो गमाया
हरुनि वत्सें मग ते न मोजी जे देखिली आणि म्हणे नमो जी ॥१७॥
पाहों म्हणे अर्जुन विश्वकाया नशक्त कोणी जिस आयकाया
तो मोहिला देखुनियां बरा हो हा दास तैसा झणि घाबराहो ॥१८॥
झणी हे करु मोह माया विभूती हरी दीसताहेस तूं जेविं भूतीं
तुझी कीर्ति सर्वत्र कानीं पडावी तुझ्या प्रीतिची ते कळा सांपडावी ॥१९॥
देहास्य या नारदरुपदेहा जाईल येथूनि निरोप दे हा
प्रपंच पाहेल फिरोन सारा तुझा कथामार्ग फिरो न सारा ॥२०॥
तुझ्या यशें व्याप्त - जगत्रयातें पाहून मी होउनि पात्र यातें
गाईन इत्यादिक लोकलीला निर्दाळिती या श्रवणें कलीला ॥२१॥
म्हणे हरी बोलसि सर्व साच प्रभाव मायेस असे असाच
पाहों तिला ज्या पुरुषें म्हणावें तो मोहिला निश्चित हें गणावें ॥२२॥
भजावेंचि मातें तुम्हीं सर्वथा रे स्वरुपीं तंई चित्त सर्वत्र थारे
पहातांचि मायेस कां सांपडावें पाहावेंचि कीं आणि फांसां पडावें ॥२३॥
तरी नको खेद करुं उगा रे माया न हे तूजवरी उगारे
मी ईमधें मग्न असेंचि वाटे तेव्हांचि ते बुद्धि चुके सुवाटे ॥२४॥
हे धर्म लोकां हरि सीकवीतो धरील जो बुद्धि असी कवी तो
तो मोहपाशीं जन सांपडेना हा मोह तूतें सहसा पडेना ॥२५॥
करी ते जरी मोह माया सुरां रे तरी खिन्न होऊ नको वासुरा रे
करीना तुतें मोह हा स्वैर माया जिला आजि अंगीकरीतों रमाया ॥२६॥
आशा देखतां लौकिका संभ्रमातें मला सक्त मानूनि पावे श्रमातें
तसा भ्रांत पुत्रा अरे होसिना तूं म्हणूनीच माझा खरा होसि नातू ॥२७॥
येरिती सरसिजासन - तातें नातुवासि निज - पाद - रतातें
दाविल्या गृहगृहीं निज - जाया दे निरोपहि गदाग्रज जाया ॥२८॥
सोळा सहस्त्र - सदनीं हरि एकला हो
देखूनि घे मुनि विचित्र अनेक लाहो
तो ध्यान तैं करित जाय पदांबुजाचें
माथां धरी अधिप शंभु पदांबु ज्याचें ॥२९॥
जरि मना यदुराज - कथा - रसीं परम मानुन कौतुक थारसी
जितचि मुक्ति रसास सदा पिसी नगणितां मग मृत्युस दापिसी ॥३०॥
निज - कथा - रस हा बरवा मनीं कथितसें कनकांवर वामनीं
सकळ मोक्ष फिके मज लागती हरिकथाच गमे मजला गती ॥३१॥
या द्वारकाविजयनाम - सुधारसाची
ब्रम्हांड भेदुनि अलौकिक धार साची ॥३२॥
आणूनि उद्धरि जना पद वामनाचा
तो वामनीं स्वरस नित्य नवा मनाचा ॥३३॥
ग्रंथ हा स्व - सुखरुप उपायीं अर्पितां त्रिभुवनेश्वर पायीं
मुक्ति माजिहि न वाम न पावे तें अपार सुख वामन पावे ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 29, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP