सोळा सहस्त्र युवती घटिकेचि माजी
रुपें करुनि तितुकीं तितुक्यां समा जीं
श्रीकृष्णजी वरुनि त्यांत अनादि शांत
स्वामी वसे म्हणुनि कीर्ति दहादिशांत ॥१॥
हे कीर्ति गातां सुर - गायकांनीं श्रीनारदें अयिकिली स्वकांनीं
ये द्वारके विस्मित चित्त झाला पाहूं म्हणे त्या पुरुषा अजाला ॥२॥
सोळा सहस्त्र - युवतीं सहि ऐकला हो
ऐके घडीस वरि हें हरि केविं लाहो
नांदे कसा तितुकियां सदनीं सदा हा
पाहां दिशा सकळ वर्णिति ज्यास दाहा ॥३॥
परम कौतुक मानुनि ये मुनी प्रतिगृहीं हरि - दर्शन नेमुनी
गगन - पंथ धरुनिच धांवला त्वरित मुक्तिपुरी प्रति पावला ॥४॥
जटा मस्तकीं वाजवी ब्रम्हवीणा हरीचे गुणीं मिश्र वाणी प्रवीणा
प्रभूची मुखीं गाउनी कीर्त नाचे नवे नित्य घे सोहळे कीर्तनाचे ॥५॥
तो नारद द्वारवतीस पाहे कीं स्वर्गशोभेस करी वपा हे
समृद्ध देखे जन संपदांसी घरोघरी हीं अणिमादि दासी ॥६॥
द्वारकेंत अति रम्य नळे हो श्री जयांतिल कधीं न मळे हो
पुष्पितें उपवनें मुनि लक्षी मोजितां न धरिती शत लक्षी ॥७॥
विहग ज्यांत उदंड अखंड जी मधुरता वरिजे जिहिं अंडजीं
कुसुमित द्रुम सुंदर साजती फळभरेच लवोन विराजती ॥८॥
सरोवरे निर्मळ नीर ज्यांचें कीं ज्यामध्यें कानन नीरजाचें
तयां अजी वर्णिल कोण पद्मा जेथें असे सद्य करुनि पद्मा ॥९॥
पराग नीरीं नव - पंकजांचे कस्तूरि धिक्कारिति पंक ज्यांचे
देखोनि त्या मुक्तपुरीं जळाला संसार - संताप असे जळाला ॥१०॥
अन्य सर्व उपमा भ्रम राहो पंकजें मुनि - मन भ्रम राहो
द्वारका - पति - पदें दिसती हो जीं स्तनीं धरि अनादिसती हो ॥११॥
हरिपदोपम पद्म सरोवरीं परमहंस मुनींद्र सरोवरी
दिसति हंसहि सात्विक साजिरे वसति लाभ दुज्यां न असा जिरे ॥१२॥
हरिपदाकृतिनें असि सारसीं प्रभुपुरींत तया जळसारसीं
त्यजुनि आवडि लौकिक - सारसीं वसति माडियली द्विज सारसीं ॥१३॥
सांडिला कुसुम - संभ्रम रानीं द्वारका - जळरुहीं भ्रमरांनी
जेरिती मुनि - मनो - मधुपांनीं कृष्ण - पाद - कमळीं मधु - पानी ॥१४॥
कृष्ण - पाद - कमळीं न रसाचा स्वाद घे ननरवानर साचा
वानगदिकहि राघव तारी हा तरे न कवणे अवतारीं ॥१५॥
निर्माण ज्याणें विधि शंभु केले त्याकारणें लोचन हे भुकेले
त्याची पदाब्जेंचि पहावयाला त्वरा दुजा न प्रिय भाव याला ॥१६॥
असे सर्वठायीं जरि हा उदास प्रभूची पुरी रम्य त्या नारदास
गमे कीं हरीची तनू त्यास वाटे पहातां उठे प्रेम उल्हास - वाटे ॥१७॥
द्वारका - विभव जो मुनि लक्षी माडियांसि गणना नवलक्षीं
उच्च श्रुभ्र - रजता स्फटिकाच्या चांदण्या रजनिच्या घटिकाच्या ॥१८॥
चांदण्यांत सित वसु विराजे वर्णिती निपुणजे कविराजे
भौक्तिकारुहित चांदवियांची दीप्ति तृप्ति करि चांद वियांची ॥१९॥
भूमि त्या नगरिं रत्नमणींची कोंदणें जडित इंद्रमणींचीं
वाट ते गज - रथाऽश्व - नृपाची हेम दिव्य वरि सुंदर पाची ॥२०॥
रत्न - हेम - रवधिता पडशाळा सत्सभा बहु अशाचि विशाला
पंक्ति रत्नमय हाट वट्याचीं दीप्ति रातिस दिसे दिवट्यांची ॥२१॥
देखे असींच नवले मुनि फार वाटे
देखोनि कृष्ण गृहसौख्य अपार वाटे
द्वारीं उभे सकळही सुर लोकपाळ
श्रीकांत ज्यांत असतो भुवनैकपाळ ॥२२॥
देखिलें हरिचिया भवनाशी दर्शनेंकरुनि जें भव नाशी
त्यांत षोडश - सहस्त्र - सतींचीं मंदिरें हरिचिये वसतीचीं ॥२३॥
कौशल्य तें परम कीं भव - बंध नाशी
कौशल्य तें न अजि जें करि बंधनाशी
कौशल्य वांछित असें नरराजथाला
कौशल्य अर्पुनि भजो यदुराजयाला ॥२४॥
काव्यांत ज्या कुनर आणि अपूतनारी
वर्णूनि वर्णिति जयांत न पूतनारी
तें काकतीर्थचि कदापि न मानसाच्या
हंसाचिया रमति हो गति मानसाच्या ॥२५॥
स्वकौशल्य तें विश्वकर्मा विशेषें हरीचे गृहीं दाखवी हो अशेषें
गृहें त्यांत सोळासहस्त्रें समाने अशाही पुरीमाजि जे भास माने ॥२६॥
सहस्त्रें जीं सोळा यदुपति - गृहें त्यांतहि मुनी
निघे एक्या गेहीं हरि - पद - रजांलागिं नमुनी
निघाला वैकुंठी म्हणुनि मुनिला वाटत असे
विलास श्रीकांत क्षितिवरिहि दावी अजि असे ॥२७॥
स्वयंभ स्तंभ श्रीमरकतमणीचेच वरते
फळाच्याही रुपें खचित मणि वैडुर्य वर ते
न रात्रींहीं जेथे किमपि तम कीं उत्तम - मणी
प्रकाशीती जाणों उदित तितुकेही दिनमणी ॥२८॥
शशीची प्रभा पांढरी चांदव्याला गमे विश्वकर्माब्धितो चांदव्याला
जया भोंवतें वृंद मुक्ता - द्विजांचें जिहीं मोहिलें नेत्र मुक्ता द्विजांचें ॥२९॥
चांदव्या करुनि त्याचि अपारा तृप्ति मानिति चकोर दुपारी
कृष्ण - पाट - नख - चंद्र सुधाते देखतां विहगबुद्धिहि धाते ॥३०॥
गृहांतील कृष्णागराचा निघे तो नभीं धूग्वही मेघ मानूनि घे तो
सुखें नाचती देखती त्यास मोर स्त्रिया हांसती ज्या उभ्या त्या समोर ॥३१॥
ज्या कांकण्या वक्र गृहाग्रभागीं रत्नांकिता त्यांत यथा - विभागीं
चकोर पारावत हंस पक्षी मयूरही नेत्र जयांसि पक्षी ॥३२॥
त्या अंडजांमाजि चकोरजाती ते चांदव्यालागिं गृहांत जाती
बाहेर ये वृंद तया घनाचें विलासमानी शिखिवृंद नाचे ॥३३॥
इत्यादि या कुशलता करि विश्वकर्मा
दावी म्हणे जड - सचेतन - विश्व - कर्मा
संतुष्ट हो किमपि मानुनि हे स्वसेवा
भावें अशा कुशळ हो तुम्हिं कां न सेवा ॥३४॥
कौशल्य जें ज्यांस असेल लोकी ते श्रीहरीच्याच कृपावलोकीं
देणें हरीचेंच तया हरीतें न अर्पिता काळ वृथा हरी तें ॥३५॥
पेरुनि लाभ अधिकाधिक घे पिकाचा
तो एक पक्क म्हणवे न कदापि काचा
दे भूमितें करुनि अन्न न पाणि खातो
पेरी न तींत तरि पात्र न आणिखा तो ॥३६॥
दृष्टीं धुतां अन्न न काय सांचें गर्ताजळीं त्या मग वायसांचे
समूह धाती न कदापि जाती त्या काकतीर्थाप्रति हंस - जाती ॥३७॥
उच्छिष्ट ताटांतिल अन्न सांचे धुतां जळीं त्या मग वायसांचे
समूह तें घेउनि तृप्त जाती न पाहती ते शुक - हंस - जाती ॥३८॥
धनाकारणें जे पराधीन वाणी कवी नाचवीती वृथा दीनवाणी
अहो त्यांत अन्योन्य उच्छिष्ट सारें कवित्वें जना वाटती तींच सारें ॥३९॥
हरि - गुण - अमृतें जीं वाटिलीं व्यासदेवें
श्रुकसम जनवृंदे तींच घेती सदेवें
विविध मग असे ते ग्रंथ उद्गार साचे
सहज निघति त्यांच्या तत्पदांच्या रसाचे ॥४०॥
यालागिं जे कुशळता करि विश्वकर्मा
संतुष्ट हो मज म्हणे प्रभु विश्व - कर्मा
एवं असेल कुशलत्व नरा जयाला
तो तें समर्पण करु यदुराजयाला ॥४१॥
मुकुंदाच्या पायीं कुशळ न समर्पी कुशळता
करी आयुष्याचा व्यय कुशळता ते विपलता
पहा तो कौशल्यें यदुपतिकृतें वामन न मनीं ॥४२॥
हरीच्या या लीला नवरस - सुधा - सार सकळा
हरीती ज्या गातां कुरस - भवरोगादि - सकळा
असो ते हे गाडी रसिक जन हे साक्षि हरि तो
अजी जे या ग्रंथी त्रिगुण तरि नामेंच हरितो ॥४३॥
नजाणें कौशल्यें किमपि परि पोटी नियम कीं
हरीच्या या लीला हरिच रचितो चित्र - यमकीं
तरी सर्वा ग्रंथीं प्रतिपदहि अर्पूनि हरिला
अहंकर्तृत्वाचा अनुसृतहि संस्कार हरिला ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 29, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP