मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणतीसावा|
श्लोक ३४ वा

एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


मर्त्यो यदा त्यक्तसमस्तकर्मा, निवेदितात्मा विचिकीर्षितो मे ।

तदाऽमृतत्वं प्रतिपद्यमानो, मयाऽऽत्मभूयाय च कल्पते वै ॥३४॥

जें बोलिलीं धर्मार्थकाममोक्षार्थ । तें साधनें सांडूनि समस्त ।

जे अनन्यभावें मज भजत । विश्वासयुक्त निजभावें ॥२१॥

त्यांसी हे स्वरुपस्थिती । जे त्वां भोगिली आत्मप्रतीती ।

ते तत्काळ होय प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२२॥

धर्मार्थकामवासना । असोनि लागल्या मद्भजना ।

तरी तेही पुरवूनियां जाणा । सायुज्यसदना मी आणीं ॥२३॥

भक्तांसी स्वधर्मकर्मावस्था । तेही लाविल्या भजनपंथा ।

स्वधर्मकर्मीं अकर्मात्मता । माझिया निजभक्तां उद्बोधीं मी ॥२४॥

भक्त वांछी भोगकाम । भोग भोगोनि होय निष्काम ।

ऐशिया निजबोधाचें वर्म । मी आत्माराम उद्बोधीं ॥२५॥

भक्त मागे अर्थसंपन्नता । त्याचे गांठीं धन नसतां ।

माझी षड्‌गुणैश्वर्यसमर्थता । वोळंगे तत्त्वतां त्यापाशीं ॥२६॥

सर्व भूतीं माझी भक्ती । भक्त भजे अनन्यप्रीतीं ।

तैं चारी मुक्ती शरण येती । मद्भक्तां मुक्ती स्वतःसिद्ध ॥२७॥

वैद्य धडफुडा पंचानन । नाना रोगियांची वासना पोखून ।

मागे तें तें देऊनि अन्न । वांचवी रसज्ञ रसप्रयोगें ॥२८॥

तेवीं धर्म अर्थ काम वासना । भक्तांच्या पोखूनियां जाणा ।

मी आणीं सायुज्यसदना । तेही विवंचना सांगितली ॥२९॥

नाना साधनाभिमान । सांडूनियां जो ये मज शरण ।

त्यासीही स्वरुपप्राप्ति पूर्ण । उद्धवा जाण सुनिश्चित ॥६३०॥

भक्त सकाम जरी चित्तीं । तो जैं करी अनन्यभक्ती ।

तैं काम पुरवूनि मी दें मुक्ती । भक्तां अधोगति कदा न घडे ॥३१॥

बाळकें थाया घेऊनि कांहीं । मिठी घातल्या मातेच्या पायीं ।

धन वेंचोनि अर्पी तेंही । परी जीवें कांहीं मारीना ॥३२॥

तेवीं माझी करितां अनन्यभक्ती । जो जो काम भक्त वांछी चित्तीं ।

तो तो पुरवूनि मी दें मुक्ती । परी अधोगती जावों नेदीं ॥३३॥

देखोनि बाळकाची व्यथा । जेवीं सर्वस्वें कळवळी माता ।

तेवीं निजभक्तांची अवस्था । मजही सर्वथा सहावेना ॥३४॥

काम पुरवूनि द्यावया मुक्ती । काय माझे गांठीं नाहीं शक्ती ।

मी भक्तकैवारी श्रीपती । त्यासी अधोगती कदा न घडे ॥३५॥

माझें नाम अवचटें आल्या अंतीं । रंक लाहे सायुज्यमुक्ती ।

मा माझी करितां अनन्यभक्ती । भक्तां अवगती मग कैंची ॥३६॥

माझा भक्त जयाकडे कृपें पाहे । तोही माझी भक्ति लाहे ।

मा मद्भक्ता अवगती होये । हा बोल न साहे मजलागीं ॥३७॥

सोसूनियां गर्भवासासी । म्यां मुक्त केला अंबर्षी ।

विदारुनि हिरण्यकशिपूसी । प्रल्हादासी रक्षिलें ॥३८॥

चक्र घेऊनियां हातीं । म्यां गर्भी रक्षिला परीक्षिती ।

तो मी भक्तांसी अधोगती । कदा कल्पांतीं होऊं नेदीं ॥३९॥

माझिये भक्ताचेनि नांवें । तृण तेंही म्यां उद्धरावें ।

भक्तां केवीं अवगती पावे । जे जीवेंभावें मज भजले ॥६४०॥

काया वाचा मन धन । अवंचूनि, अनन्यशरण ।

त्यांचा योगक्षेम जाण । मी श्रीकृष्ण स्वयें सोशीं ॥४१॥

ऐसा अनन्यभक्तीचा महिमा । सांगतां उत्साह पुरुषोत्तमा ।

तेणें उद्धवासी लोटला प्रेमा । स्वेद रोमां रवरवित ॥४२॥

ऐकोनि भक्तीचें महिमान । देखोनि उद्धवाचें प्रेम पूर्ण ।

श्रीशुक सुखावला आपण । स्वानंदपूर्ण डोलत ॥४३॥

हरिखें म्हणे परीक्षिती । धन्य हरिभक्त त्रिजगतीं ।

ज्यांसी सर्वार्थीं मुक्ती । स्वमुखें श्रीपती बोलिला ॥४४॥

जैसें भक्तीचें महिमान । तैसेंचि उद्धवाचें प्रेम गहन ।

हें उद्धवाचें प्रेमलक्षण । श्रीशुक आपण सांगत ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP