मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणतीसावा|
श्लोक ५ वा

एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तं त्वाऽखिलात्मदयितेश्वरमाश्रितानां,

सर्वार्थदं स्वकृतविद्विसृजेत को नु ।

को वा भजेत् किमपि विस्मृतयेऽनुभूत्यै,

किं वा भवेन्न तव पादरजोजुषां नः ॥५॥

विधाता आणि हरि हर । हे मायागुणीं गुणावतार ।

तूं मायानियंता ईश्वर । भक्तकरुणाकर सुखदाता ॥३९॥

त्या तुझी करितां नि भक्ती । चारी पुरुषार्थ चारी मुक्ती ।

भक्तांसी लोटांगणीं येती । एवढी अर्थप्राप्ती निजभक्तां ॥१४०॥

निजभक्तांचें मनोगत । तूं सर्वज्ञ जाणता भगवंत ।

भक्तहृदयींचें हृद्गत । जाणोनि सर्वार्थ तूं देसी ॥४१॥

भावार्थाचें भोक्तेपण । जाणता तूं एक श्रीकृष्ण ।

तुजवेगळें हें लक्षण । आणिका जाण कळेना ॥४२॥

ऐसा स्वामी तूं उत्तमोत्तम । तुझेनि साधकां सुख परम ।

आणिक नाहीं तुजसम । तूं स्वामी पुरुषोत्तम सर्वांचा ॥४३॥

तूं सर्वांचा स्वामी होसी । परी कृपाळु निजभक्तांसी ।

अग्निविषादि नाना बाधेंसीं । तुवां ’प्रर्‍हादासी’ रक्षिलें ॥४४॥

तुज भक्तांची कृपा प्रबळ । उत्तानचरणाचें तानें बाळ ।

करोनियां वैराग्यशीळ । ’ध्रुवासी’ अढळ तुवां केलें ॥४५॥

शत्रुबंधु ’विभीषण’ । तुज झाला अनन्यशरण ।

त्याचे कृपेस्तव जाण । सकुळीं रावण उद्धरिला ॥४६॥

छळूनि बांधिलें ’बळीसी’ । शेखीं कृपा उपजली कैसी ।

त्याचे द्वारीं द्वारपाळ होसी । निजलाजेसी सांडूनि ॥४७॥

ऐशी भक्तकृपा तुजपाशीं । भक्तहृद्गत तूं जाणसी ।

ऐशा सांडूनि निजस्वामीसी । कोण धनांधांसी सेवील ॥४८॥

देहेंद्रियां जें सुख भासे । तें तुझेनि सुखलेशें ।

तो तूं सकळसुखसमावेशें । प्रसन्न अनायासें निजभक्तां ॥४९॥

साधु जाणती तुझा महिमा । तूं ज्ञानियांचा अभेद आत्मा।

भक्तप्रिय पुरुषोत्तमा । तुझा सुखाचा प्रेमा अप्रमेय ॥१५०॥

तुझे सेवेचिया संतोखें । भक्त सुखावले निजसुखें ।

त्यांसी देहद्वंद्वजन्मदुःखें । स्वप्नींही संमुखें कदा नव्हती ॥५१॥

तुझ्या भजनसुखें तुझे भक्त । विषयीं होऊनि विरक्त ।

ते राज्य समुद्रवलयांकित । थुंकोनि सांडित तुच्छत्वें ॥५२॥

सकळभोगवैभवेंसीं । स्वर्ग आलिया भक्तांपाशीं ।

ते उपेक्षिती तयासी । जेवीं राजहंसीं थिल्लर ॥५३॥

जे विनटले भजनाच्या ठायीं । ते तूं सुखरुप करिसी पाहीं ।

देहीं असतांचि विदेही । सर्वा ठायीं समसाम्यें ॥५४॥

ऐसा स्वामी तूं हृषीकेशी । सदा संतुष्ट निजभक्तांसीं ।

कठिणत्व नाहीं सेवेसी । कैसें म्हणसी तें ऐक ॥५५॥

जाणें न लगे परदेशासी । आणि अनवसरु नाहीं सेवेसी ।

भक्तांनिकट अहर्निशीं । तूं हृदयनिवासी निजात्मा ॥५६॥

सेवेलागीं न लगे धन । शरीरकष्ट न लगती जाण ।

तुझ्या चरणीं ठेविल्या मन । तूं स्वानंदघन तुष्टसी ॥५७॥

तूं तुष्टोनि करिशी ऐसें । सांडविसी प्रपंचाचें पिसें ।

त्रिगुणेंसीं त्रिपुटी नासे । अनायासें मिथ्यात्वें ॥५८॥

ऐसा तूं सुसेव्य आणि कृपाळू । निजस्वामी तूं दीनदयाळू ।

तुझी सेवा सांडी तो बरळू । मूर्ख केवळू अतिमंद ॥५९॥

निमेषोन्मेषांचे व्यापार । तुझेनि चालती साचार ।

तुझे सेवेसी विमुख नर । ते परमपामर अभाग्य ॥१६०॥

तुझी सेवा सुखरुप केवळ । तीस उपेक्षूनियां बरळ ।

विषयांचे विषकल्लोळ । जे सर्वकाळ वांछिती ॥६१॥

ज्या विषयांचा विषलेश । थित्या निजसुखा करी नाश ।

जन्ममरणांचा विलास । दुःख असोस भोगवी ॥६२॥

त्या विषयांचे विषयदाते । इंद्र-महींद्र कृपणचित्तें ।

त्यांसी भजती जे विषयस्वार्थे । तेही निश्चितें अभाग्य ॥६३॥

तुझिया कृपा तुझे भक्त । सुखसंपन्न अतिसमर्थ ।

संसारीं असोनि विरक्त । हें नवल एथ नव्हे देवा ॥६४॥

तुझें चरणरज जे सेविती । पृथुजनकादि नृपती ।

त्यासी इंद्रादिक वंदिती । पायां लागती ऋद्धिसिद्धी ॥६५॥

आकल्प करितां तपःस्थिति । ज्या सिद्धींची नव्हे प्राप्ती ।

त्या सिद्धी भक्तां शरण येती । ऐसी श्रेष्ठ भक्ति पैं तुझी ॥६६॥

आणिक साधनें न करितां । तुझे भजनीं ठेविल्या चित्ता ।

सर्व सिद्धी होती शरणागता । स्वभावतां भक्तांसी ॥६७॥

यापरी तुझे उपकार । भक्तांप्रति घडले अपार ।

त्यासी तैंचि घडे प्रत्युपकार । हरिचरणीं साचार जैं स्वयें विरे ॥६८॥

तेंचि विरालेंपण ऐसें । जेवीं प्रतिंबिंब बिंबीं प्रवेशे ।

कां घटकाशींचेनि आकाशें । होईजे जैसें महदाकाश ॥६९॥

ऐसें तुजमाजीं न विरतां । प्रत्युपकार न ये हाता ।

जो पुरवी सर्व स्वार्था । त्यासी विसरतां अधःपातु ॥१७०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP