मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक ४० वा

एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यर्ह्यब्जनाभचरणैषणयोरुभक्त्या, चेतोमलानि विधमेद्गुणकर्मजानि ।

तस्मिन् विशुद्ध उपलभ्यत आत्मतत्त्वं, साक्षाद्यथाऽमलदृशोः सवितृप्रकाशः ॥४०॥

निर्विकारस्वरूपप्राप्ति । अवश्य पावणें आहे चित्तीं ।

तैं करावी भगवद्भक्ति । उत्कटा प्रीति अविश्रम ॥७३८॥

त्यजूनि पुत्रवित्तेषणेचें काज । जिणौनि लौकिकाची लाज ।

पद्मनाभभजनें भोज । अतिनिर्लज्ज नाचावें ॥७३९॥

पुत्रवित्तलोकेषणा । त्यजूनि भजतां हरिचरणां ।

तंव तंव चित्ताचे चैत्यमळ जाणा । क्षणक्षणां नासती ॥७४०॥

रजतमादि कर्मज मळ । चित्तीं बैसले जे सबळ ।

ते प्रक्षाळती सकळ । भक्तिप्रेमजळक्षाळणें ॥७४१॥

जंव जंव थोरावे सप्रेम भक्ति । तंव तंव पाया लागे विरक्ति ।

स्वयें विरमे विषयासक्ति । होय चित्तवृत्ति निर्मळ ॥७४२॥

निर्मळ जाहलिया चित्तवृत्ति । परमात्मया सर्व भूतीं ।

भजों लागे अनन्यप्रीतीं । हे ’चौथी भक्ति’ उदार ॥७४३॥

हे भक्ति अतिशयें उदार । निर्दाळी भक्तांचा अहंकार ।

उद्धरी सुर नर स्त्रिया शूद्र । आनंदनिर्भर करी जीवु ॥७४४॥

हे भक्ति जैं लागे हातीं । तैं भवभयाची निःशेष शांति ।

पायां लागती चारी मुक्ती । ऐशी उदार भक्ति हरीची ॥७४५॥

जेवीं डोळां असतां पडळ । सविता उगवे सर्व काळ ।

तो सन्मुख न देखे रविमंडळ । मा पदार्थ सकळ त्या कैंचे ॥७४६॥

तेंचि फिटलिया पडळ । दृष्टी होय अतिनिर्मळ ।

देखों लागे पदार्थ सकळ । रविमंडळसमन्वयें ॥७४७॥

तेवीं निजात्मा हृदयीं वसे । परी चित्तवृत्ति मळिण असे ।

तंव परब्रह्म न प्रकाशे । चित्त वासनादोषें दूषित ॥७४८॥

तेथ करितां भगवद्भक्ति । निर्मळ होय चित्तवृत्ति ।

तेव्हां निर्विकारस्वरूपप्राप्ति । भक्त पावती निजभजनें ॥७४९॥

पावावया परमप्राप्ति । जगीं दाटुगी भगवद्भक्ति ।

ते म्यां सांगितली तुजप्रती । यथानिगुतीं नृपनाथा ॥७५०॥

जेवीं डोळ्यांचें पडळ फिटे । तेथ प्रकाशेंसीं सविता भेटे ।

तेवीं कल्पनालोपें प्रगटे । नेटेपाटें परब्रह्म ॥७५१॥

जेथ निर्विकल्प समान । निश्चयेंसीं जाहलें मन ।

त्यासी देहीं वर्ततांही जाण । भवबंधन स्पर्शेना ॥७५२॥

ऐसें गर्जोनिया जाण । हर्षें बोले पिप्पलायन ।

तंव राजा सुखावला संपूर्ण । जीवींची खूण बाणली ॥७५३॥

ऐकतां ब्रह्मनिरूपण । राजा लांचावला पूर्ण ।

पुढें वाढावया निरूपण । अन्वयें प्रश्न पुसतसे ॥७५४॥

जेणें तुटे कर्मबंधन । त्या कर्मयोगाचें लक्षण ।

समूळ ऐकावया जाण । राजा आपण सादरें पुसतु ॥७५५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP