मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक ३ रा

एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अन्तरिक्ष उवाच - एभिर्भूतानि भूतात्मा महाभूतैर्महाभुज ।

ससर्जोच्चावचान्याद्यः स्वमात्रात्मप्रसिद्धये ॥३॥

अंतरिक्ष म्हणे राया । तुंवा पुशिली हरीची माया ।

तो प्रश्नचि गेला वायां । बोलणें न ये आया बोलक्याचे ॥३२॥

बंध्यापुत्राचा जन्मकाल । रायें आणविला तत्काल ।

राशिनक्षत्र जाति-कुल । सांगों जातां विकल वाचा होय ॥३३॥

मृगजळाची पव्हे बरवी । गंधर्वनगरीं घालावी ।

वारा वळूनि सूत्रस्वभावीं । वाती लावावी खद्योततेजें ॥३४॥

निजच्छायेचें शिर फोडा । आकाशाची त्वचा काढा ।

शिंपीं आंधारु खरवडा । बागुलाचा रांडवडा निजशस्त्रें कीजे ॥३५॥

वांझेचे सुने पुत्र झाला । तेथ भीष्मस्त्रियेसी पान्हा आला ।

तेणें पयःनानें तो मातला । घरभंगु केला दिगंबराचा ॥३६॥

जातीं लहान दळावा वारा । अश्वशृंगें आकाश चिरा ।

नपुंसकाचीं नातोंडें घरा । सूर्योदयीं अंधारा लपों आलीं ॥३७॥

गुंजेचे निजतेजें दिवी । हनुमंतलग्नीं लावावी ।

या सोहळियालागीं विकावी । वोसगांवीं निजच्छाया ॥३८॥

आकाशाचीं सुमनें । सुवासें कीं वासहीनें ।

हें विवंचिती जे देखणे । ते मायेचें सांगणें सांगोत सुखें ॥३९॥

एवं मायेचें जें बोलणें । तें सांगतांचि लाजिरवाणें ।

नुपजत्याचें श्राद्ध करणें । तैशी सांगणें महामाया ॥४०॥;

’माया’ म्हणवी येणें भावें । जे मी कदा विद्यमान नव्हें ।

यालागीं ’अविद्या’ येणें नांवें । वेदानुभवें गर्जती शास्त्रें ॥४१॥

भ्रम तो मायेचें निजमूळ । भ्रांति हेंचि फूल सोज्ज्वळ ।

भुली तें इचें साजुक फळ । विषय रसाळ सदा फळित ॥४२॥

हे नसतेनि रुपें रुपा आली । सत्यासत्यें गरोदर जाहली ।

तेथें असत्याचीं पिलीं । स्वयें व्याली असंख्य ॥४३॥

वासनाविषयगुणीं । गुंफिली मिरवे वेणी ।

मीपणाच्या तरुणपणीं । मदनमोहिनी चमके ॥४४॥

मृगजळींच्या मुक्ताफळीं । मस्तकीं वाणली जाळी ।

गगनाच्या चांपेकळीं । मिरवे वेल्हाळी अतिसौंदर्यें ॥४५॥

रज्ज्जुसर्पमाथ्याचा मणी । काढूनि लेइली ते लेणीं ।

शुक्तिकारजत-पैंजणीं । चाले रुणझुणी खळखळत ॥४६॥

शशविषाणपादुका । लेऊनि ते चाले देखा ।

तिसी तो ’अहंकारु’ सखा । अतिनेटका ज्येष्ठपुत्र ॥४७॥

कुळविस्तारालागीं पाहीं । ’ममता’ व्याली ठायीं ठायीं ।

’मोहो’ उपजवूनि देहीं । घरजांवयी त्या केला ॥४८॥

अहंमोहममतायोगें । जग विस्तारलें अंगें ।

स्थूळ सबळ प्रयोगें । ममता निजअंगें वाढवी ॥४९॥

संकल्पविकल्पांचीं कांकणें । बाणोनि ’मन’ दिधलें आंदणें ।

घालोनि त्रिगुणाचें ठाणें । माया पूर्णपणें थोरावे ॥५०॥

ऐशी मिथ्या मूळमाया । वाढली दिसे राया ।

ते कैसेनि ये आया । सांगावया अनिरुप्य ॥५१॥

’संत’ म्हणों तरी ते नासे । ’असंत’ म्हणों तरी आभासे ।

आधीं असे पाठीं नासे । ऐसीही नसे निजांगें ॥५२॥

जैसें मृगजळाचें ज्ञान । दिसे तरी तें मिथ्या पूर्ण ।

तैसें आभासे भवभान । ते माया जाण नृपनाथा ॥५३॥

श्रुतिशास्त्रां मायामाग । पुसतां आरोगिती मूग ।

मायेसी साचाचें अंग । पाहतां चांग दिसेना ॥५४॥

मृगजळाची महानदी । कोण गिरिवर उद्बोधी ।

हें सांगावया नाकळे बुद्धी । तेवीं मायासिद्धी अनिर्वाच्य ॥५५॥

आरसां काय प्रतिबिंब असे । जो पाहे तोचि आभासे ।

तेवीं आपुलेनि संकल्पवशें । माया उल्हासे नसतीचि ॥५६॥

रज्जुसर्प जीत धरिला । त्याचें कौतुक पाहों चला ।

ऐसे बोलती जे बोला । ते मायेचा सोहळा सांगोत सुखें ॥५७॥

उडवों जातां आपुली छाया । सर्वथा न उडवे ज्याची तया ।

तेवीं तरतां दुस्तर माया । जाण राया निश्चितीं ॥५८॥

अग्निसंकल्पु सूर्यी नसे । शेखीं सूर्यकांतींही न दिसे ।

तळीं धरिलेनि कापुसें । अग्नि प्रकाशे तद्योगें ॥५९॥

तेवीं शुद्ध ब्रह्मीं संकल्पु नाहीं । शेखीं न दिसे केवळ देहीं ।

माझारीं वासनेच्या ठायीं । देहाभिमानें पाहीं, संसारु भासे ॥६०॥

जागृतिदेहाचा विसरु पडे । सवेंचि स्वप्नदेह दुजें जोडे ।

तेणें मिथ्या प्रपंच वाढे । स्वप्नीं स्वप्न कुडें कदा न मने ॥६१॥

सुषुप्तीं देहाचा असंभवो । तेथ नाहीं भवभावो ।

जन्ममरण तेंही वावो । संसारसंभवो देहाभिमानें ॥६२॥

तेवीं आत्मत्वाचा विसरु । तेणें मी देह हा अहंकारु ।

तेणें अहंकारें संसारु । अतिदुस्तरु थोरावे ॥६३॥

जेवीं मृगजळीं मिथ्या मासे । तेवीं ब्रह्मीं प्रपंचु नसे ।

तो निरसावया कैसें । साधनपिसें पिशाचा ॥६४॥

दोनीच अक्षरें ’माया’ । जंव गेलों सांगावया ।

तंव श्लोकार्थ दुरी ठेला राया । वाढला वायां ग्रंथु सैरा ॥६५॥

माया पाहों जातां हर्षें । सज्ञानही झाले पिसे ।

नांवारुपांचिये भडसें । कल्पनावशें माया वाढे ॥६६॥;

मायेचें मुख्य लक्षण । राया तुज मी सांगेन खूण ।

आपली कल्पना संपूर्ण । ते माया जाण नृपवर्या ॥६७॥

निजहृदयींची निजआशा । तेचि माया गा मुख्य क्षितीशा ।

जो सर्वथा नित्य निराशा । तों पूज्य जगदीशा पुर्णत्वें ॥६८॥;

आतां कांहीं एक तुझ्या प्रश्नीं । माया सांगों उपलक्षणीं ।

सर्गस्थित्यंतकारिणी । त्रिविधगुणीं विभागे ॥६९॥

जेवीं सूर्यासी संकल्पु नसे । तरी नसतां त्याच्या ठायीं दिसे ।

जेव्हां कां निजकिरणवशें । अग्नि प्रकाशे सूर्यकांतीं ॥७०॥

तेवीं शुद्धस्वरुपीं पाहीं । संकल्पमात्र कांहीं नाहीं ।

नसतचि दिसे ते ठायीं । ते जाण विदेही ’मूळमाया’ ॥७१॥

स्वरुप निर्विकल्प पूर्ण । तेथ ’मी’ म्हणावया म्हणतें कोण ।

ऐसेही ठायीं स्फुरे मीपण । ते मुख्यत्वें जाण ’मूळमाया’ ॥७२॥

तया मीपणाच्या पोटीं । म्हणे मजचि म्यां पहावें दिठीं ।

मजसीं म्यां सांगाव्या गोठी । अत्यादरें भेटी माझी मज होआवी ॥७३॥

मज माझी अतिप्रीती । माझी मज होआवी रती ।

माझ्याचि म्यां घेऊनि युक्ती । मज माझी प्राप्ति मद्बोधें व्हावी ॥७४॥

म्हणे मज मियां आलिंगावें । मज मियांचि संभोगावें ।

मज मियांचि संयोगावें । नियोगावें स्वामिसेवकत्वें सर्वदा ॥७५॥

ऐकें आजानुबाहो नृपनाथा । ऐसें आठवलें भगवंता ।

तो आठवो जाला स्त्रजिता । महाभूतां भौतिकां ॥७६॥

चारी वर्ण चारी खाणी । चारी युगें चारी वाणी ।

चारी पुरुषार्थ चहूं लक्षणीं । मुक्तीची मांडणी मांडली चतुर्धा ॥७७॥

उभारुनि तिन्ही गुण । आठवो रची त्रिभुवन ।

तेणें मांडूनि त्रिपुटीविंदान । कर्मही संपूर्ण त्रिधा केलें ॥७८॥

एवं एकपणीं बहुपण । रुपा आणी मूळींची आठवण ।

परी बहुपणीं एकपण । अखंडत्वें पूर्ण तें कदा न भंगे ॥७९॥

जीं जीं कुंभार भांडीं करी । आकाश सहजेंचि त्यांभीतरीं ।

तेवीं महाभूतें भौतिकाकारीं । समन्वयें हरि सर्वदा सर्वी ॥८०॥

राया जाण येचि अर्थी । बोलिलें उपनिषदांप्रती ।

’एकाकी न रमते’ या श्रुती । द्वैताची स्फूर्ति भगवंतीं स्फुरली ॥८१॥

किंबहुना एकपणें समस्तें । रुपा आलीं महाभूतें ।

तीचि ’हरीची माया ’ येथें । जाण निश्चितें नृपनाथा ॥८२॥

भूत-भौतिक स्फुरे जे स्फूर्ती । ते प्रकाशूं न शके माया स्वशक्तीं ।

मायाप्रकाशकु चिन्मूर्ती । अखंडत्वें भूताकृतीं प्रवेशला भासे ॥८३॥

मुख्य मायेचें निजलक्षण । प्रकाशी परमात्मा चिद्धन ।

तोचि भूतीं भूतात्मा आपण । प्रवेशलेपण नसोनि दावी ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP