चंद्रहासाख्यान - कीर्तन पूर्वरंग निरुपण

कीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.


श्रीमन्महागनाधिपतये नमः ॥ इत्यादि नमनं ॥

पद-

भज भज परमानंद मना तूं ॥ भज भज परमानंद ॥ध्रु०॥

परमात्मा जो निर्गुण अव्यय ॥ सच्चित्सुख हा कंद ॥

मना भज भज पर० ॥१॥

धन सुत जाया अवघी माया ॥ सोड विषयाचा छंद ॥ मना ०॥२॥

दास कृष्णाचा विनवि निश्चयें ॥ तुटेल हा भवबंध ॥मना० ॥३॥

भजन-

गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद ॥

अभंग-

सांठविला हरी ॥ जेणें हृदयमंदिरीं ॥१॥

त्याची सरली येरझार ॥ झाला सफळ व्यापार ॥२॥

हरी आला हाता ॥ मग कैंची भय चिंता ॥३॥

तुका म्हणे हरी ॥ कांहीं उरुं नेदी उरी ॥४॥

आदौ कीर्तनारंभीं सत्पुरुषांची वाणी ॥ तुकोबा महाराज साधकांप्रत सुमार्ग दाखवितात. चौर्‍यायशी लक्ष योनी भ्रमण करीत अवचित दुर्लभ नरदेह प्राप्त झाला असतां, कोणी चौर्‍यायशीची येरझार चुकविली आणि नरदेहास आल्याचा व्यापार कोणाचा सफळ झाला म्हणाल तर सांगतों. ज्या नरानें परमात्मा हरि हृदयीं सांठविला त्याचीच येरझार सरुन त्याचाच व्यापार सफळ झाला. श्रोतेजन आशंका घेऊन म्हणतात कीं, तुकोबा हा जातीचा शूद्र, त्यास पूर्ण ज्ञान नसल्यामुळें, ’सांठविला हरी’ असें पद घातलें. कारण हरीवांचून रितें स्थळच नाहीं. मग सांठविणें कोठून होणार ? भगवंताचेंच वाक्य असें आहे की, भगवद्गीतेंत भगवान् अर्जुनास सांगतात.

श्‍लोक-

मत्तः परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय ॥

मयि सर्वमिदं प्रोक्तं सूत्रे मणिगणा इव ॥२॥

अर्थ-

मी सर्व जगताचे ठायीं ओतप्रोत भरलों आहें; मजहून अन्य किंचित्‌ही स्थान रितें नाहीं; सुतामध्यें मणी ओंवावे अशा ब्रह्मांडाच्या माळा माझेच ठायीं आहेत.

श्‍लोक-

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ॥३॥

सर्व भूतांचे हृदयस्थ मी राहतों. आणि सर्व भूतांचे ठायीं माझी व्याप्ति आहे. मोरोपंडित म्हणतात.

आर्या-

भू जल तेज समीर ख रवि शशि काष्ठादिकीं असे भरला ॥

स्थिर चर व्यापुनि अवघा जो जगदात्मा दशांगुलें उरला ॥३॥

पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश या पंचमहाभूतांचेठायीं तसाच चंद्र, सूर्य आणि दश दिशा, या प्रकारेंच स्थावर, जंगम संपूर्ण विश्व व्यापून जगदात्मा दहा अंगुलें शेष उरला आहे. पंतांचे वचनावर भरंवसा नसेल तर श्रुतिवाक्यही असेंच आहे. ’अत्यतिष्ठद्दशांगुलं’ असा हरि सर्वव्यापक असतां सांठवावयास स्थळ कोठें बरें राहिलें ? आणखी तुकोबाचे म्हणण्यांतही पुरतेपणा नाहीं. ’जेणें हृदयमंदिरीं’ असें म्हणतात, तेव्हा जेणें म्हणजे कोणी एका पुरुषानें. याजवरुन असें झालें कीं, सर्वांचे हृदयांत हरि नाहीं.तस्मात् श्रुतिवाक्य सोडून तुकोबाचें वचन आम्ही मानीत नाहीं. तुकोबा जातीचा वाणी, त्याचें ज्ञान तें किती ? अशी शंका खरी म्हणावी तर वामनपंडित म्हणतात,

श्लोक-

जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी ॥

म्हणावें कसें हो तयालागिं वाणी ॥

परब्रह्मरुपीं न कैसा तुकावा ॥

तयाचे तुकीं कोण ऐसा तुकावा ॥४॥

मोरोपंत म्हणतात.

आर्या-

मुगुटमणी संतांचा शिवशिव तुकया म्हणूं नये वाणी ॥

नेलें जड वैकुंठीं विठ्ठल विठ्ठल म्हणोनियां वाणी ॥५॥

अशी ज्या तुकोबाची योग्यता त्याचे शब्दाम्स दूषण येणें नाहीं. ज्या प्रभूनें अर्जुनाला सांगितलें कीं, माझी सर्वत्र व्याप्ति आहे; तेंच पुनः व्यवस्थापूर्वक सांगतात.

श्लोक-

मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं ते व्यवस्थितः ॥

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरं ॥६॥

अर्थ-

माझे ठायीं सर्व भूतें राहतात, परंतु मी त्यांचे ठायीं रहात नाहीं; हा माझा ईश्वरी योग पहा. मोरोपंत म्हणतात. प्रभूचें म्हणणें असें कीं,

आर्या-

मी भक्तांचे हृदयीं माझे हृदयीं सदैव भक्त वसे ॥

भक्तावांचुन जे जन मातें सप्राण भासती शवसे ॥७॥

मी भक्तांचे हृदयांत आणि भक्त माझे हृदयांत राहतात. त्याविरहित जनाचे ठायीं माझी व्याप्ति नाहीं असें नाहीं. आहे; परंतु शवाचे ठायीं जशी व्याप्ति आहे तद्वत‌. इतर जन मी शवासारिखे मानतों. कवि म्हणतात, हा प्रभूचा भक्तवत्सलपणाचा साहजिक योग आहे.

आर्या-

यद्यपि सर्वत्र समस्तथापि स च हर्षितः श्रिते पुरुषे ॥

ममताभिमान्मुञ्चैर्वहति विवस्वान् यथोपले जगति ॥८॥

प्रभू सर्वत्र ठायीं समान कह्रा; परंतु आश्रित जनांचे ठायीं आहे तसा अन्य जनांचे ठायीं नाहीं. जसा सूर्य सर्वत्र समान तथापि सूर्योत्पलाचे ठायीं स्वाभाविक सविशेष, त्या प्रकारें अनन्यतेच्या योगास्तव भक्ताचे ठायीं प्रभूचें वास्तव्य पूर्णत्वेंकरुन आहे. चराचराचे ठायींही आहे, परंतु ती व्याप्ति कशी, ज्या प्रकारें काष्ठाचे ठायीं अग्नि, तिळाचे ठायीं तेल, इक्षुदंडाचे ठायीं शर्करा. परंतु क्रियेवांचून प्राप्ति नाहीं. कोणी एक गृहस्थ मार्गानें जात होता. त्यानें ऐकिलें होतें कीं, काष्ठाचे ठायीं अग्नि आहे. तदनंतर मध्यान्हसमयीं एका सरोवरावर उतरला आणि स्नान करुन दगडाची चूल केली. त्यांत काष्ठें घालून त्यावर स्थाली ठेविली. उपरांत दोन घटिका झाल्या तरी उदकही ऊन झालें नाहीं. एक प्रहर झाला तरी तसेंच. तेव्हां आश्चर्य करुन चिंतातुर बसला. तों मार्गानें दुसरा गृहस्थ आला. त्यानें चिंतातुर बसण्याचें कारण त्यास विचारल्यावरुन त्यानें सांगितलें कीं, काष्ठांत अग्नि आहे म्हणून शास्त्री पंडित यांनी सांगितल्यावरुन चुलींत काष्ठें पुष्कळ भरुन त्याजवर भात शिजविण्यास तपेलींत तांदूळ व पाणी घालून चुलीवर ठेवून भात शिजण्याची वाट पहात बसलों आहें. एक प्रहर झाला तरी तपेलींतील पाणीही ऊन झालें नाहीं ! असें ऐकून तो गृहस्थ म्हणाला बापा, तूं वेडा आहेस काय ? काष्ठांत अग्नि आहे खरा; पण त्याची क्रिया झाल्यावांचून कार्य होणें नाही. अग्निहोत्र्याकडून मंथा, रवि, दोर आणून काष्ठमंथन करावें तेव्हां अग्नि प्राप्त होईल. तात्पर्य क्रियेवांचून तिळांतलें तेलही प्राप्त होत नाही. तेल्याचे घाण्यांत तीळ घालून : मळावे तेव्हां तेल प्राप्त होणार. तशीच उंसाची साखर. चरकांत ऊंस घालून रस काढून त्याचा रांधा करावा, तेव्हां शर्करा प्राप्त होणार. तसा ईश्वर सर्वत्र व्यापक खरा, परंतु सद्‌गुरुस शरण जाऊन त्याचे उपदेशानुरुप क्रिया केली म्हणजे हृदयांत हरि अखंड प्रगट राहतो ॥यः क्रियावान् स पंडितः ॥ जो सत्क्रियेनें वागणारा तोच पंडित होय. यास्तव तुकोबा म्हणतात ’सांठविला हरी ॥ जेणें हृदयमंदिरीं’ ॥ एका समयीं हस्तनापुरीं नारद प्राप्त झाले. त्या कालीं धर्मराजानें त्यांचें आगतस्वागत करुन पूजन केलें; आणि बद्धांजलियुक्त प्रार्थनापूर्वक म्हणतो. महाराज, आपण परमात्मा जो हरि त्याहून वरिष्ठ आहांत.

श्‍लोक-

चंपूंतील ॥ पृथ्वी तावदियं मत्‍हसु महती तद्वेष्टनं वारिधिः ।

पीतोऽसौ कलशोद्भवेन मुनिना स व्योम्नि खद्योतवत्‌ ॥

तद्विष्णोर्दनुजाधिनाथदमने पूर्णं पदं नाभवद्देवोऽसौ

वसति त्वदीयहृदये त्वत्तोधिकः कः परः ॥९॥

अर्थ-

सर्वांत पृथ्वीएवढा मोठा पदार्थ नाहीं, तस्मात् पृथ्वीच मोठी म्हणावि तर तिच्या सभोंवती समुद्राचें वेष्टन आहे. एवढा मोठा समुद्र तो अगस्तीनें प्राशन केला. तो अगस्ति आकाशाचे ठायीं काजव्यासारखा लहान दिसतो, म्हणून आकाश मोठें म्हणावें तर तें महाविष्णूनें बलिदैत्यदमनकालिं वामनरुप धरिलें त्या समयीं कसें झालें पहा; वामनपंडित म्हणतात.

श्‍लोक-

एका पदें भूमि भरुन थोडी ॥

दूज्या पदें अंडकटाह फोडी ॥

दे तीसरा पाय म्हणे बळींला ॥

म्हणोन पाशीं दृढ आकळीला ॥१०॥

याप्रकारें आकाश मोठें तथापि विष्णूच्या पदाएवढें न होतें झालें. तस्मात् सर्वांहून विष्णु श्रेष्थ. हे मुनीश्वरा, तो तुझ्या हृदयांत राहतो. यास्तव तुझ्याहून दुसरा कोण अधिक श्रेष्ठ आहे ? म्हणून तुकोबा म्हणतात. त्याच्याच जन्ममृत्युची येरझार सरली. कोणाची तर ॥ ’सांठविला हरी ॥ जेणें हृदयमंदिरीं’ ॥ प्रभूची सर्वत्र व्याप्ति खरी; परंतु हृदयांत सांठविण्यास स्थळ रिकामें आहे. तें असें कीं, हृदयाचे ठायीं जीव आणि शिव राहतात. शिव ब्रह्मरुप साक्षिभूत आहे. आणि जीव जो तो त्याची छाया (प्रतिबिंब) आहे. एतदर्थीं गुरुगीतेंत सांगितलें आहे.

ओंवी-

जळ जळीं मिळालें ॥ घटीं मठी नभ संचलें ॥

तैसे जीवशिव एक झाले ॥ भेदरहित ॥११॥

प्रतिछाया म्हटली म्हणजे अवकाशाखेरीज छाया पडत नाहीं. तसें शरीरांत जो परमात्मा आहे, त्याचा अंश तद्रुप असून पृथक्‌पणानें जीव हा आरोप केला आहे. तो दूर करुन ज्या पुरुषानें आपले हृदयीं परमात्म्यास सांठविलें तोच धन्य ॥ ’त्याची सरली येरझार ॥ झाला सफळ व्यापार’ ॥ ज्या पुरुषानें भगवान्‌ हृदयस्थ केला, त्याची सकल चिंता हरली असें म्हणावें.

अभंग-

हरी आला हाता ॥ मग कैंची भय चिंता ॥

बुधजनाचें वचन -

श्‍लोक-

लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः ॥

येषामिंदीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ॥१॥

अर्थ-

ज्यांनीं इंदीवरश्याम जनार्दन हृदयस्थ केला त्यांस पराजय कोठून होणार ! निरंतर लाभ आणि जय हे सहजीं प्राप्त होतात. एतद्विषयीं जैमिनी अश्वमेधांतील चंद्रहासाची कथा कविजन निरुपण करिताहेत.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP