मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २|
ढगाएवढा राक्षस काळा का...

बालगीत - ढगाएवढा राक्षस काळा का...

फुलपाखरे रंगीबेरंगी कविता करतात आणि या सगळ्यांचे प्रतिबिंब मुलांना आकाशात दिसत राहते आणि हेच नाते ते आनंदाशी जोडून टाकतात.


ढगाएवढा राक्षस

काळा काळा कुट्‌ट,

डोंगरदरीत निखळून पडलाय

त्याचा मोठ्ठा बूट !

काळोखातील वडावरुन

भूत मारते उडी,

पारंब्यांतून त्याची मला

लांबून दिसते दाढी !

रात्री माझ्या स्वप्‍नात येते

सोनचाफी कळी

हळूच उघडते डोळे आणि -

होते तिची परी !

कधी कधी उडत येतो

रुख पक्षी घरी,

पाहयला जातो लटकून त्याला

सिंदबादची दरी !

धपकन खाली दरीत पडतो

- आणि उघडतो डोळे,

कसा कुठून जाऊन आलो

काहीच कसे नकळे !

आई म्हणते, "काय रे झाले,

पाहतोस काय खालीवर ?"

गंमत जंमत सांगू कशी

कसा गेलो वर वर ?

काळाकुट्ट मोठ्ठा राक्षस

कसा होता सांगू मी ?
कशी नाचली सोनपरी

नाचून कसा दाखवू मी ?

"थांब आई, सांगतो तुला

कशी होती सोनपरी

अन् दाखवतो काढून तुला

हिर्‍या-माणकांची खोल दरी !"

पेन्सिल घेऊन कागदावर

राक्षसाचा काढला कान,

माझ्या मनातल्या स्वप्नांची

चित्रे झाली छान छान !!

N/A

References :

कवी - अनंत कांबळे

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP