स्नेहसंबंध - संग्रह ४

स्नेहसंबंधी ओव्या म्हणजेच एकमेकांची चौकशी करणे आणि परस्परांच्या सुखदुःखात भागीदार होणे.


६१.

बुरुड सादवीतो सुपलीमंदी बुट्टी

बाळीसाठी घाला लखुट्यमंदी चिठ्ठी

६२.

सुरेख सुपली आला बुरुड मिरजेचा

खेळ मांडूया गिरजेचा.

६३.

सुतारापरायास न्हावीदादाला देते पाट

राख बाळाची , शेंडीशेजारी झुलप दाट.

६४

.तारापरायास न्हावीदादाची कारागिरी

करतो बाळाची रेघन्दारी.

६५.

टपालवाला आला त्याला वाढीते दहीभात

हौशा राजसाची सांग खुशाली कागदात.

६६.

टपालवाला आला सांगतो कानगोट

माझ्या धनियांची आली खजिन्याची नोट.

६७.

रंधे पाथराच्या मुली, का ग रस्त्याला मोकळी?

माझ्या बाळराजा,न्हाई वाघाला साखळी

६८.

लाकूड तासी सुतार,थलपी उडे नऊलाख

माझा बाळराय माडी बांधतो कडीपाट

६९.

सुताराच्या शाळे ,नवल काय झाल ?

सोन मोडून चाड केल

७०.

सांगुन पाठवते , सुतार मैतराला

माडी आलीया आकाराला.

७१.

गडीण मी केली सुताराची भागू

माझ्या बाळाच्या पाळन्यावर,देई लाकडाच राघू.

७२

वाजत गाजत आलं , गवंडी सुतार

धरला वाड्याचा आकार.

७३.

सुतारापरायास गवंडीदादाची करागिरी

सोडी कमळ वाड्यावरी

७४.

पांच परकाराच गहूं काडते खिरीयेला

गवंडी लावला हिरीयेला

७५

सुतारपरायास मझा गवंडी कारागीर

नक्षी काढतो धोंडयावर

७६.

माडी बांधुनिया,सोपा आलाया आकाराला

दिली बनात सुताराला.

७७.

रंगारिनीबाई रंग तुझ्या गांबल्यात

तान्हा माझा राघु खेळतो बंगल्यात.

७८.

रंगारिनीबाई रंग तुझा ग वाटीत

सखा शेला धरितो मुठीत.

७९.

शिंप्याच्या दुकानी शिंपी दिंडाचा सोडी दोर

आल पेठेला बंधुजी सावकार.

८०.

हिरव्या खनाला रुपै दिले सवादोन

शिंपी म्हणे लेनार कौन ? बंधू बोले पाठची हिरकण.

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP