जोगेश्वरी महात्म्य-पाठ

जोगेश्‍वरी मातेचा नवाक्षरी मंत्र अत्यंत प्रभावी आहे.


श्री जोगेश्वरी महात्म्य-पाठ

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः। श्री दत्तात्रयाय नमः ।

श्री गुरुदेवाय नमः । सर्व देवाय नमो नमः ।

श्री गणेशाय नमः ॥

ॐ नमोजी गणनायका । सकळादी तू प्रारंभा ।

आठवूनि तुझी स्वरुप शोभा । वंदन भावे करितसे ॥१॥

महाराष्ट्र देशी परममंगल । पुण्यपतन नगरी विशाल ।

जोगेश्‍वरी मातेचे येथ देऊळ । अति जागृत दैवत अद्‌भुत्‌ ॥२॥

ग्राम देवता अती प्राचीन । श्रध्देने करावे आईचे पूजन ।

देईल भक्‍तास दर्शन । माता कृपाळू ही ॥३॥

धन्य धन्य तेची जन । श्रध्देने करिती मातेचे स्तवन ।

घेती जोगेश्‍वरीचे नित्य दर्शन । सकल संकटे संपती ॥४॥

दुःखाने पिडला जो प्राणी । करावी त्याने मातेची मनधरणी ।

मुक्‍त करील दुःखातूनि । अद्‌भुत हीची करणी ॥५॥

सौभाग्य अखंड ही देईल । भवसागर तरुन नेईल ।

पति पुत्राना संकटी वाचवील । जोगेश्‍वरी दयेची साऊली ॥६॥

होतील मुले निरोगी । बरे होतील महारोगी ।

झळकेल दीव्य कांती अंगोअंगी । कृपा होता हीची भक्‍तावरी ॥७॥

जय मात जय जोगेश्‍वरी । कृपा कर या भक्‍तावरी ।

सहस्त्र लोटांगणे चरणावरी । संकटातूनि वाचीव आम्हासी ॥८॥

माता ग्रामदेवता जोगेश्‍वरी । आपत्तीतूनि घोर, भक्‍ताना तारी ।

शीतल कृपादृष्टि हीची चंद्रापरी । उचंबळूनि येती भक्‍तीच्या लहरी ॥९॥

कृपा होता हो हिची एकदा । नष्ट होतील सार्‍या आपदा ।

भरुनि वाहेल घरी संपदा । रोग छळतील शरिरास ना कदा ॥१०॥

जोगेश्‍वरी ही विघ्न हरेश्‍वरी । पौर्णिमा जणू कोजागिरी ।

सुचिता हिची धवल गंगेपरी । करुणा मूर्तिमंत अहो ही गौरी ॥११॥

वाळवंटी बहरतील मळे । झुळझुळतील झरे निळे ।

कातळी उमलतील कमळे । कृपा होता हीची ॥१२॥

दया करी करुणेश्‍वरी मजवरी । माते, ग्रामदेवते, जोगेश्‍वरी ।

दुःख समुद्रातून तूच ने पैलतिरी । नाही चित्तास शांती ॥१३॥

संसाराने पोळलो अति । चिंतन करितो तुझे एकांती ।

स्थीर नाही माझी मती । दया करी गे माऊली ॥१४॥

तीर्थांची सुचिता तुझे पायी । काशी रामेश्‍वर तुझे ठायी ।

तू तुळस, तू चंदन, तू आई । संकटातून तार माते ॥१५॥

आता ऐका एक कथा । एकवटूनि सार्‍या चित्ता ।

सत्य घटना घडली सर्वथा । बाधती ना संकटे व्यथा ॥१६॥

जो वाचील ही ठेऊनि श्रध्दा । नष्ट होतील सार्‍या आपदा ।

भरुनि वाहेल घरी संपदा । रोग छळतील शरिरास ना कदा ॥१७॥

दुःख दारिद्रय सकल । जोगेश्‍वरी सर्व निरसेल ।

होतील हेतु पूर्ण सफल । भावे जो श्रवण करील ॥१८॥

विश्‍वास धरी जो कथा श्रवणी । त्या वरी करील कृपा जोगेश्‍वरी जननी ।

कार्यसिध्दी होईल हटकूनि । भाव ठेवा मातेवरी ॥१९॥

अति धनवान एक व्यापारी । राहतसे पुण्यपत्तन नगरी ।

असती अगणित सुवर्ण राशी त्याचे भांडारी । विपुल भूमि, इमले किती तरी ॥२०॥

पत्‍नी त्याची निरोगी सुंदर । सुरेख एक कन्या, पुत्र तसा हुशार ।

म्हणोनि गर्वाने फुगली फार । कठोर शब्दांचे करी सर्वावरी प्रहार ॥२१॥

ऐश्‍वर्या नाव तिचे सार्थ अति । लाड पुरवी सर्व तिचे पति ।

अलंकार अंगावर सुवर्णाचे लखलखती । पातळे भरजरी नाही त्याची गणती ॥२२॥

चरणी लोळती सुखाच्या राशी । नोकर चाकर सदा सेवेशी ।

गाडी, घोडे उभे अनेक दाराशी । कसा मिळेल प्रवेश तिथे दुःखाशी ॥२३॥

होती एक तिच्याकडे स्वयंपाकीण । सात्विक अति गरीब ब्राह्मण ।

करी नित्य जोगेश्‍वरी पाठाचे पठण । नाम तिचे सावित्री वैशंपायन ॥२४॥

घेई रोज जोगेश्‍वरीचे दर्शन । श्रध्देने करी प्रतिमेचे पूजन ।

राही मालकिणीकडेच जेऊन । नित्य नियम असे तिचा ॥२५॥

घेतला होता वसा तिने जोगेश्‍वरीचा । क्रम नित्य पाठ पठनाचा ।

तसा ठेवला नेम मातेच्या दर्शनाचा । भक्‍तीने ये सात्विकता तदा ॥२६॥

एकदा काय घडले हो ऐका । बोलविल्या ऐश्‍वर्याने जेवण्यास बायका ।

सावित्री गेली होती जोगेश्‍वरी दर्शना । स्वयंपाक नाही झाला वेळेवर तदा ॥२७॥

तो संतापली अति ऐश्‍वर्या । उशीर थोडाहि तिला साहिना ।

पुसे कशाला गेलीस जोगेश्‍वरी दर्शना । खपणार नाही देवीचे स्तोममजला ॥२८॥

तो म्हणे सावित्री 'क्षमा करा मजला' । अपराध माझा अति घोर झाला ।

शिक्षा करा हवी ती मला । परि करु नका देवीची विटंबना ॥२९॥

कशास जातेस त्या जोगेश्‍वरीला । नाही महत्व वाटत माझे तुजला ।

पर्वा नाही त्या देवीची मजला । शिकवू नकोस भाबडेपणा असला ॥३०॥

"पाषाण बसविला कुणी काळा । घातल्या त्यावर पुष्पांच्या माळा ।

म्हणती देवीचा स्वयंभू आहे तांदळा । वेडे सर्व त्यास पुजती ॥३१॥

श्रध्दा ठेविती व्यर्थ या पाषाणी । कशास दगडाची त्या मनधरणी ।

नाव दिले त्यास जोगेश्‍वरी कुणी । बोले कठोर ऐसे ऐश्‍वर्या ॥३२॥

"हो चालती निलाजरे बाहेर । करु नकोस भलते थेर ।

घेऊ नकोस जोगेश्‍वरीचा कैवार । म्हणे ऐशी ती निंदेने ॥३३॥

टाकी जोगेश्‍वरीची प्रतिमा फाडून । तुकडे रस्त्यावर दिले फेकूनि ।

हाकलले सावित्रीला तिने घरातून । क्रोधाने कापे फार ॥३४॥

विटंबिली जोगेश्‍वरी मातेला । विवेक ना राही श्रीमंतीला ।

अंध बनविते पूर्ण मानवाला । सत्य हे जाणा ॥३५॥

उलटला तद नंतर एक मास । ऐश्‍वर्याच्या पति गेला परदेशास ।

व्यापार सुवर्णाचा करण्यास । खरेदिल्या असंख्य लगडी त्याने ॥३६॥

देऊनि रोख रुपये दोन कोटी । भरली सुवर्णाने पेटी ।

मनी म्हणे करु याचे वीस कोटी । परतला अभिमानाने घरी ॥३७॥

ठेविली पेटी त्याने गुप्त तळघरात । मग हळूच जाऊन मध्यरात्री आत ।

उघडी हर्षाने पेटीचे कुलूप गर्वात । तो काय हो झाला चमत्कार ॥३८॥

सुवर्ण लगडीच्या त्या कित्येक । झाल्या होत्या पिवळ्या धामिणी एकएक ।

त्वेषाने विळखा त्यास घालती भयानक । कोसळूनि पडला तदा तळघरात निश्‍चेष्ट ॥३९॥

घरात कुणास नाही कळला प्रकार । झाली सकाळी शोधाशोध सर्वत्र बाहेर ।

धाडिले लोक ऐवश्‍वर्याने दूर दूर । कुठे पति गेला कळेना तिला ॥४०॥

धाय मोकळूनि लागली रडू ढसाढसा । हा हा कार उडाला घरात सारा तसा ।

कळेना पति नाहीसा झाला कसा । धुळीस मिळे क्षणात वैभवी संसार असा ॥४१॥

पाहूनि मातेची ही अपदा । कन्या झाली भ्रमिष्ट तदा ।

हसू लागली सारखी मोठ मोठ्यांदा । स्वैर धावू लागे ती रस्तोरस्ती ॥४२॥

भीषण आणखी विपरीत घडले । पुत्र, जावई युध्दात नाहीसे झाले ।

आली लेकी, सुनेच्या नशिबी पांढरी कपाळे । कठीण दुःखाचे पहाड कोसळले ॥४३॥

असे कसे हे विपरीत घडले । भरल्या घराचे अहो स्मशान झाले ।

क्षणात जीवन सारे पालटले । जीवन अशाश्‍वत समजले सारे ॥४४॥

सुख-वैभव हे क्षण भंगूर । जीवन सारे असे नश्‍वर।

आधार एक माता जोगेश्‍वरी थोर । सारा पडे प्रकाश ॥४५॥

कळले ऐश्‍वर्यास सारे गूढ । गर्वाने बनली होती मूढ ।

देवीचा अपमान केला तिने गाढ । धावे मग सावित्रीकडे ॥४६॥

म्हणे "चुकले माझे क्षमा करा । झाले मागे जे सारे ते विसरा ।

कळले जोगेश्‍वरी मातेचा हा कोप सारा । वसा मजसी मातेचा तुम्ही सांगा ॥४७॥

तदा सावित्री म्हणे" जोगेश्‍वरी माता थोर । मायमाऊली कनवाळु फार ।

घ्या वसा तिचा तुम्ही वर्षभर । व्हाल दुःखातून सार्‍या पार ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP