गोष्ट सेहेचाळिसावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट सेहेचाळिसावी

मूर्ख फसती, आणि त्यांच्या जिवावर धूर्त मजा मारती.

वरुण पर्वतालगतच्या प्रदेशात राहणारा मंदवीष नावाचा साप, जवळच्याच एका सरोवरातले बेडूक मारून, त्यावर आपला चरितार्थ चालवीत होता. पण वाढत्या वयाबरोबर त्याच्य अंगची चपळता कमी झाली आणि त्याला बेडूक पकडता येईनासे झाल्याने, त्याची उपासमार होऊ लागली. म्हणून त्याने बेडूक आयते मिळविण्याची एक युक्ती शोधून काढली.

एकदा तो त्या सरोवराच्या काठी दुःखी चेहेर्‍याने बसला. त्याबरोबर एका बेडर बेडकाने त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा मंदवीष सर्प दुःखाचा सुस्कारा सोडून म्हणाला, 'बाबा रे. काल नदीवर स्नानाला गेलेल्या एका ब्राह्मणकुमाराला दंश करून मी त्याचा प्राण घेतला, म्हणून त्या मुलाच्या पित्याने 'तू यापुढे बेडकांचे वाहन होशील व त्यांना पाठीवर घेऊन पाण्यात फिरत राहशील.' असा मला शाप दिला. म्हणून तुम्हाला पाठीवर घेऊन या सरोवरात संचार करण्याकरिता मी इकडे आलो आहे.'

त्या बेडकाने ही गोष्ट त्याच तळ्यात राहणार्‍या आपल्या राजाच्या कानी घालताच तो राजा आपल्या मंत्र्यांसह त्या सर्पाच्या पाठीवर बसला आणि तो सर्प त्यांना त्या तळ्यात फिरवू लागला. दोन दिवस याप्रमाणे फिरवून झाल्यावर, तिसर्‍या दिवशी तो सर्प त्या बेडकांना पाठीवर घेऊन त्या सरोवरात अत्यंत मंदगतीने संचार करू लागला. बेडकांच्या राजाने त्या सर्पाला त्याची गती मंदावण्याचे कारण विचारता, तो त्या बेडकांच्या राजाला म्हणाला, 'महाराज, गेल्या दोन दिवसात पोटात अन्नाचा कण गेला नसल्याने, आपल्याला पाठीवर घेऊन पाण्यात घिरट्या घालण्याची माझ्यात ताकदच उरली नाही.' हे त्याचे उत्तर ऐकून त्याच्या पाठीवर बसून पाण्यात विहार करण्याची चटक लागलेला तो बेडूकराजा त्या सर्पाला दररोज तीन चार बारीक बेडूक खाण्यासाठी देऊ लागला. त्यामुळे त्या सर्पाची प्रकृती सुधारू लागली.

एके दिवश त्या बेडूकराजाला व त्याच्या मंत्र्यांना काही वेळ पाठीवरून त्या तळ्यात फिरवून व त्याने दिलेले तीन-चार बेडूक स्वाहा करून, तो मंदवीष सर्प आपल्या वारुळाकडे चालला असता, तो प्रकार पाहिलेल्या एका ओळखीतल्या सर्पाने त्याला विचारले, 'मंदवीषमामा, तुमच्यासारख्या प्रतिष्ठित सर्पाने त्या क्षुद्र बेडकांना पाठीवर घेऊन त्या सरोवरात फिरत राहणे योग्य आहे का?'

यावर तो मंदवीष सर्प म्हणाला, 'बाबा रे, आपली कामे साधण्यासाठी वाट्टेल ती सोंग आणून मूर्खांना फसवावे लागते. म्हणून तर त्या यज्ञदत्त ब्राह्मणाने तूप खाऊन आंधळे झाल्याचे सोंग आणले ना?'

तेव्हा, 'ती गोष्ट काय आहे?' अशी त्या दुसर्‍या सर्पाने पृच्छा केली असता, मंदवीष त्याला ती गोष्ट सांगू लागली-

 

 

 

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP