गोष्ट त्रेचाळीसावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट त्रेचाळीसावी

परजातीचा महानही लहान भासे, तर स्वजातीचा लहानही महान दिसे.

याज्ञवल्यमुनी नित्याप्रमाणे एकदा गंगेत स्नान करीत असता, त्यांना ससाण्याच्या तोंडातून गंगेच्या पात्रात एक उंदराचे पिल्लू पडलेले दिसले. या पिल्लाला एखादा मोठा मासा गिळंकृत करील, त्या भयाने त्यांनी त्याला दयेपोटी उचलून आपल्या आश्रमात नेले व मंत्रसामर्थ्याने त्याचे एका लहानग्या मुलीत रूपांतर करून, तिचे लालनपालन सुरू केले. ती मुलगी जेव्हा वयात आली, तेव्हा याज्ञवल्क्यांची पत्‍नी त्यांना म्हणाली, 'नाथ, आपली मुलगी विवाहयोग्य झाली असता, तिच्यासाठी योग्य स्थळं शोधून का काढत नाही ?' यावर मुनिवर्य म्हणाले, 'अगं, तोच विचार मी करू लागलो आहे. पण मुलीसाठी स्थळ पाहताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. म्हटलंच आहे -

कुलं च शीलं च सनाथता च विद्या च वित्तं च वपुर्वयश्च ।

एतान् गुणान् सप्त विचिन्त्य देया कन्या बुधैः शेषमचिन्तनीयम् ॥

(कुल, शील, वडीलधार्‍यांचा आधार, विद्या, धन, निकोप शरीरयष्टी व वय, या सात गोष्टी विचारात घेऊन सूज्ञांनी मुलगी द्यावी, बाकी गोष्टी विचारात घेतल्या नाहीत तरी चालेल.)

याप्रमाणे बोलणे झाल्यावर एके दिवशी सूर्याला देवरूपात आश्रमामधे आणून याज्ञवल्क्य मुनींनी त्या मुलीला विचारले, 'बेटी, हा तेजस्वी भगवान्‌ आदित्य तुला नवरा म्हणून पसंत आहे का?' ती मुलगी नाक उडवीत म्हणाली, 'हा रागीट दिसतो. याच्यापेक्षा श्रेष्ठ नोवरा मला हवा.'

मग मेघराजाला आश्रमात आणून मुनीवर्यांनी तिला विचारले, 'बेटी, त्या तेजस्वी आदित्याला झाकून टाकण्याचे सामर्थ्य असलेला हा मेघराज तरी तुला पसंत आहे का?' कपाळावर आठ्यांचे जाळे पसरून ती म्हणाली, 'छे ! हा सावळा आहे.'

मग वायुदेवाला समोर उभे करून मुनिराज त्या मुलीला म्हणाले, 'बेटी, मागल्या वेळी जो तुला दाखविला, त्या मेघराजाला कुठल्याकुठे उडवून देण्याचे सामर्थ्य असलेला हा वायुदेव तरी तुझ्या मनात भरतो का?' तोंडाचा चंबू करीत ती मुलगी म्हणाली, 'छे छे ! असला चंचल नोवरा सदान्‍ कदा फिरत राहणार, माझ्या नवर्‍यानं सदैव माझ्याजवळ राहून, माझ्या रूपागुणांचं कौतुक केलं पाहिजे. शिवाय तो या वायुदेवापेक्षाही सामर्थ्यवान्‌ असावा.'

ते ऐकून वायुदेव मिष्किलपणे म्हणाला, 'मुनिराज, हिच्या दृष्टीने पर्वतराज हाच तिला योग्य वर ठरेल. एकतर त्याला एकाच जागी बसून राहाण्याची आवड आहे आणि दुसरे म्हणजे मलाही रोखून धरण्याचे सामर्थ्य त्याच्यात असल्याने, तो माझ्यापेक्षा सामर्थ्यवान आहे.'

पण पर्वताकडे तिला नेताच, 'हा तर नुसताच बसून राहणारा आहे. हा मला नको. माझा पती मला इकडेतिकडे फिरवणारा, पण या पर्वतापेक्षा सामर्थ्यवान असा हवा आहे.' असे ती म्हणताच पर्वत आतून थट्टेने पण बाहेरून गंभीरपणे म्हणाला, 'मुनिराज, त्या दृष्टीने उंदीर हा हिला योग्य वर ठरेल. कारण तो मलाही पोखरू शकतो आणि सदैव इकडेतिकडे फिरत असतो.' त्या पर्वताची ती सूचना ऐकून व काही झाले तरी ही मुलगी मुळची उंदरीच आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन याज्ञवल्क्यमुनींनी एका गलेलठ्ठ उंदराला बोलावले व त्या मुलीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. त्याबरोबर ती मुलगी लाजत मुरकत म्हणाली, 'पिताश्री, हेच मला पसंत आहेत.' मग तिला पूर्ववत् उंदीर करून याज्ञवल्क्यमुनींनी तिचे त्या उंदराशी लग्न लावून दिले.

ही गोष्ट सांगून मंत्री रक्ताक्ष म्हणाला, 'स्वजातीकडे प्राणी असा ओढला जात असल्याने, या स्थिरजीवीचा भरंवसा देता येत नाही. म्हणून याला जिवंत ठेवणे योग्य नाही.' पण रक्ताक्षाच्या या बोलण्याकडे राजा अरिमर्दन व त्याचे अनुयायी यांनी दुर्लक्ष केले व ते स्थिरजीवीला आपल्या किल्ल्याकडे घेऊन गेले.

त्या किल्ल्यात गेल्यावर स्थिरजीवी मनात म्हणाला, 'माझ्या मेघवर्णराजाने मला मारल्यामुळे अंगातून अतिशय रक्त वाहून गेले व माझ्या अंगात चालण्या-उडण्याचेही त्राण उरले नाही, असे जे सोंग मी वठवले, ते खरे वाटले व म्हणून अरिमर्दन राजाने मला उचलून या किल्ल्यात आणण्यास त्याच्या सेवकांना सांगितले. अशा स्थितीत जर माझ्याकडून संशयास्पद हालचाल झाली आणि ती या घुबडांच्या ध्यानात आली तर माझ्या कार्याचा विचका उडेल. तेव्हा मी काहीतरी कारण सांगून या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी राहणे हेच योग्य.

मनात असा विचार येताच तो अरिमर्दनाला म्हणाला, 'महाराज, आपले जरी माझ्यावर प्रेम असले, तरी आपल्या काही जातभाईंच्या डोळ्यात मी खुपत असल्याने, मला किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी राहण्याची परवानगी द्या. त्यायोगे मला किल्ल्याची राखण करणेही जमेल आणि आपण प्रवेशद्वारातून जाता येता मला आपले दर्शनही सहजगत्या घडेल.' स्थिरजीवीची ही विनंती राजा अरिमर्दनाने मान्य केली व किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी त्याची राहण्या-खाण्याची त्याने उत्तम व्यवस्था केली.

खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था झाल्याने स्थिरजीवी दिवसेंदिवस मोराप्रमाणे तुकतुकीत होऊ लागला. ते पाहून अस्वस्थ झालेला रक्ताक्ष मात्र राजा अरिमर्दनाला व इतर मंत्र्यांना म्हणाला, 'अहो, त्या संशयास्पद व परक्या स्थिरजीवीशी अशा भोंगळ औदार्याने वागू नका, असे मी परोपरीने सांगत असतानाही तुम्ही माझे ऐकत नाही, उलट तुम्ही दिवसानुदिवस त्याला अधिकाधिक बलवान बनवीत आहात ! खरं बोलायचं तर शिटीतून सोने देणार्‍या त्या पक्ष्याच्या गोष्टीतल्याप्रमाणे मला इथेही मूर्खांचा बाजार भरल्यासारखा दिसत आहे.' यावर त्या मंत्र्यांनी 'ती गोष्ट काय आहे?' असे विचारले असता रक्ताक्ष म्हणाला, 'ऐका -

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP