गौळण - १८१ ते १८८

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


१८१

एकी म्हणती हरि आमुचा सोयरा । दुजी म्हणे घरा पुसों जांई ॥१॥

तिजी म्हणे काली आणिला पोसणा । चौथी म्हणे कान्हा यशोदेचा कीं ॥२॥

एकी म्हणे माझा नोवरा साजणी । एकी म्हणे बहिणी पाठीची मी ॥३॥

निळा म्हणे म्हणती आमुचा पिता । एकी म्हणे चुलता सखा माझा ॥४॥

१८२

एकी म्हणती हा आमुचा सांगाती । दुजी म्हणे परती भाऊ माझा ॥१॥

तीजी म्हणे हरि आमुचा मेहुणा । चौथी म्हणे पैसुन्या देखणी झणें ॥२॥

एकी म्हणती हा आमुचा गोवळ । सहावी म्हणे बाळ नंदाचा कीं ॥३॥

निळा म्हणे जैशा श्रुती विवादती । तैशा या भांडती परस्परें ॥४॥

१८३

करितां तयां काम धाम । तमाळश्याम ध्यानीं मनीं ॥१॥

तेणें पावल्या आनंदा । वेधीं गोविंदा वेधलिया ॥२॥

जागृति स्वप्न सुषुप्ती आंत । नेणेति माता आणिकांची ॥३॥

निळा म्हणे अहोरात्रीं । देखती नेत्रीं तेंचि रुप ॥४॥

१८४

कृष्णरुपा वेधिल्या नारी । देखती अंतरी तेंचि रुप ॥१॥

गमनीं शयनीं आसनी भोजनीं । देखती जनीं वनीं दृष्टीपुढें ॥२॥

एकांती लोकांती घरीं दारीं बाहेरी । त्याविण निजाचारीं नेणती दुजें ॥३॥

निळा म्हणे सर्वहि त्याचा परिवार । होवोनी सारंगधर ठेला घरीं ॥४॥

१८५

बोलती चालती देखती ऐकति । सर्वत्री श्रीपती त्यांचे दृष्टी ॥१॥

सासुरे माहेर सासु सासरा दीर । देखती त्या भ्रतार हरीच्या रुपें ॥२॥

सोयरेसज्जनइष्टमित्रजन । कन्याकुमरेधन कृष्णचि गोत ॥३॥

निळा म्हणे त्यांचे संपत्ति वैभव । पशुवादिक सर्व झाला कृष्ण ॥४॥

१८६

बोलती बोलणें चालती चालणें । करिती देणें घेणें परि तो ध्यानीं ॥१॥

जेविती जेवणीं खेळत खेळणीं । मिरविती भूषणें परि चित्त तेथें ॥२॥

गीतीं गाती गीत विनोदीं हांसती । रुदनीं रुदत परि त्या कृष्णीं ॥३॥

निळा म्हणे सुखें भोगिती नानाभोग । परि त्यांचे श्रीरंग ध्यानी मनीं ॥४॥

१८७

येतां देखोनियां भार । गाई मनोहर गोवळांचे ॥१॥

धांवचि घेऊनि गौळणी येती । पाहावया श्रीपती मदनमूर्ती ॥२॥

एकीस न पुसतां एकी । माय लेकी सास्वा सुना ॥३॥

निळा म्हणे पाहोनि मुख । भोगताती सुख कैवल्यापर ॥४॥

१८८

पशु पक्षी जीव श्वापदें वनचरें । अवघीं कृष्णाकारें झालीं तयां ॥१॥

माडया उपरमाडया बैसती बैसणीं । नाना अलंकार लेणीं झाला कृष्ण ॥२॥

मनीं त्यांचे कृष्ण ध्यानी त्यांचे कृष्ण । श्रवणीं त्यांचे कृष्ण वदनीं वाचे ॥३॥

निळा म्हणे कृष्णीं झाल्या कृष्णरुप । अवघ्या नामरुप क्रियासहित ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP