श्रीमद्भागवताची आरती

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


( चाल-आरती सप्रेम जय जय विठ्ठ्ल परब्रह्म )

आरती ओंवाळूं जय जय श्रीमद्भागवता ॥
या कलिकालामाजि दयाळा सुलभ मार्ग भक्तां ।
दाविसी सुलभ मार्ग भक्तां । आरती ओंवाळूं ० ॥धृ०॥

अनंतकोटि ब्रह्मांडांचा स्वामी श्रीकृष्ण ॥
सांठविला या ग्रंथीं प्रेमें गाउनि गुणगान ॥
प्रथमस्कंधीं राव परीक्षिति गुणगानीं मग्न । विरागें गुणगानीं मग्न ॥
दुर्लभ भेटी होइ शुकांची जाइ तयां शरण ॥ आरती० ॥१॥

द्वितीयस्कंधीं मोक्षसाधनें कथिती शुकदेव ॥
भक्तिविणें या जगतीं म्हणती व्यर्थ मनुजदेह ॥
चतुःश्लोकमय मूळ भागवत, तेंवि सकल विश्व निर्मिलें केंवि सकल विश्व ।
कथूनि, विविध अवतार हरीचे गाती मुनिराय ॥ आरती० ॥२॥

तृतीयस्कंधीं मैत्रेयांचा विदुरासी बोध ।
वराहरुपें वधिला हरिनें दुष्ट हिरण्याक्ष ॥
देवहूतितें कर्दमआश्रमिं कपिल करिति मुक्त । बोधुनी कपिल करिति मुक्त ।
श्रीहरि साक्षात्‍ कपिलस्वरुपें गाति सांख्यशास्त्र ॥ आरती० ॥३॥

चतुर्थस्कंधीं दक्षकथा, ध्रुव अढळपदीं बैसे ।
वेनविनाशन, पृथुचरित्र जें तारक सुजनांतें ॥
पुरंजनाचें रुपक अंती धन्य ते प्रचेते । विरागें धन्य ते प्रचेते ।
विदुरालागीं मैत्रेयांचें बोधवचन ऐसें ॥ आरती० ॥४॥

पंचमस्कंधीं प्रियव्रत, नाभि, ऋषभदेव श्रेष्ठ ।
भरतकथा उद्‍बोधक कथिली तेंवि भुवनकोश ॥
खगोल वर्णुनि, नरक कथियले जनउध्दारार्थ । कथियले जनउध्दारार्थ ।
स्थूल प्रभूचें रुप जाणितां कळे सूक्ष्मरुप ॥ आरती० ॥५॥

षष्ठस्कंधीं अजामिळाची कथा दुरितहारी ।
कूटबोध तैं दक्षकन्यकावृत्त बोधकारी ॥
वृत्रकथा तैं मरुद्रणांचा संभव सुखकारी । कथियला संभव सुखकारी ।
पुंसवनव्रतें दितिनें स्तविला वैकुंठविहिरी ॥ आरती० ॥६॥

सप्तमांत ती बालभक्त प्रल्हादकथा कथिली ।
अष्टमस्कंधीं गजेंद्रमुक्ति, सुधाहि मेळविली ॥
कूर्म, मोहिनी, पावन वामनलीला वर्णियली । शुकांनीं लीला वर्णियली ।
हयग्रीववध करुनि मत्स्यहरि वेदां सांभाळी ॥ आरती० ॥७॥

नवमस्कंधीं इला, सुकन्या, अंबरीषभक्त ।
हरिश्चंद्र, श्रीराम, पुरुरवा, परशुराम श्रेष्ठ ॥
तेंवि ययाति, दिवोदास त्यापुढती यदुवंश । कथियला पुढती यदुवंश ।
संक्षेपें श्रीकृष्णकथाही गाइली स्पष्ट ॥ आरती० ॥८॥

दशमस्कंधीं मूर्तिमंत श्रीकृष्ण उभा केला ।
मथुरा गोकुळ वृंदावनिंच्या निवेदिल्या लीला ॥
कंसादिक खळ वधुनि भूमिचा भार दूर केला । भूमिचा भार दूर केला ।
द्वारावतिपुरवास करुनियां तोषवि जगताला ॥ आरती० ॥९॥

एकादशस्कंधांत उध्दवा ज्ञानामृत कथिलें ।
भक्ति-ज्ञानें धर्म सजवुनी मंदिर बांधियलें ॥
साधुनियां निजकार्य विप्रवच अंति सत्य केलें । विप्रवच अंति सत्य केलें ।
स्वीकारुनि निजधाम शेवटी विबुधां तोषविलें ॥ आरती० ॥१०॥

द्वादशस्कंधीं युगधर्मादिक वर्णुनि कलिमाजी ।
तारक सकलां एक हरिकथा शुकमुनि हें कथिती ॥
परीक्षितीउध्दार जाहला हरिभक्ती ऐसी । सुलभ जनिं हरिभक्ती ऐसी ।
भागवतीं ज्या भक्ति सदोदित, तोचि वंद्य लोकीं ॥ आरती० ॥११॥

नित्य निरंतर चिंतन करुनी तन्मय जो होई ।
मूर्ति वाड्‍.मयी ’ग्रंथराज ’ हा प्रत्यय त्या येई ॥
साक्षात्‍ दर्शनलाभ घडोनी जन्म सार्थ होई । तयाचा जन्म सार्थ होई ।
’ वासुदेव ’ या ध्यानें हरिपदिं रंगुनियां जाई ॥ आरती० ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP