श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसदगुरुवे नम: । श्रीराम समर्थ ॥
सद्‍गुरुपदीं लागतां । अनन्यभावें सेवा करितां । भवसिंधु होईल तरता । सतशिष्य जाणावा ॥१॥
शिष्य सद्‍गुरु होईल । भेद मुळीचा विरेल । मानव करणी करील । तरी होये जगदात्मा ॥२॥
कली परमार्थ गहन । म्हणोन न व्हा उदासीन । प्रयत्नें प्राप्त निधान । दुर्लभ तेचि साधावें ॥३॥
कोणी म्हणती संचित नाहीं । संचित पूर्व ठेवा पाही । कष्टे साठविला जीहीं । तयासीच तो लाभतसे ॥४॥
एवं प्रयत्न हेंचि सार । सत्संग तयासि आधार । येणीचि तरेल नर । तरती पुढें तरतील ॥५॥
लहानथोर कथिले भक्त । जे जे गुरुपदांकित । एक वस्ति दुवास्ति जात कोणी पावले मुक्कामी ॥६॥
मार्ग चालू असतां कांही । इच्छित ठाव दुर्लभ नाहीं । अडचणीं गुंता पडता पाही । गुरुमाय हात देतसे ॥७॥
मार्गी देहादि वस्ति ठाव । उणे अधिक भोगी जीव । साधनीं असावा उत्साव । उणे अधिक मानू नये ॥८॥
गुरुभक्तांच्या जाती दोन । सकाम निष्काम करिती भजन । यास्तव थोर आणि सान । कथन केले अवधारा ॥९॥
परि श्रींची हातवटी । सकामिया नैष्कर्म पोटीं । बोधोनी नेती उफराठीं । भाविकासी निजपंथें ॥१०॥
जन्म हेंचि पातक गहन । तैशा वासनाही सघन । परि हंसदृष्टी जाण । क्षीर तितुके सेविलें ॥११॥
आणिक एक जाणणें । लक्ष्यामाजि एक जाणे । क्वचिता हाती येईल केणें । सद्वस्तू कष्टसाध्य ॥१२॥
तैस समर्थाचे सेवक । असती जरी न्यूनाधिक । तरी वंद्यचि नि:शंक । राजमुद्रे मोल चढे ॥१३॥
असो ऐसें अष्टमाध्यायीं । ठेवी प्रस्तुत पुण्याई । तेचि जडक्ले गुरुपायीं । नमन करुं साष्टांगे ॥१४॥
नवमाध्यायी गोरक्षण । तैसेचि कर्थिलें अन्नदान । राममंदिरें स्थापून । सत्कर्म पोयी घातल्या ॥१५॥
गोमाहात्म्य वर्णिले नववे । इहपरहित मानवांचे । सध्दर्म आणि सुभिक्षेचें । साधन हें सभाग्य ॥१६॥
अन्नदान अतिथिपूजा । परमसंतोष गरुडध्वजा । आदरें करोनि गुरुराजा । समस्तांसी बोधितसे ॥१७॥
अन्नपूर्णा पाकशाळी । सदा दावी निज सोहळे । शत सहस्त्र येतांही निराळे । उणें काय त्या ठायां ॥१८॥
कुबेर राहे श्रींचे घरीं । आले अतिथी निवारी । जेथें प्रत्यक्ष श्रीहरी । उणें काय त्या ठायां ॥१९॥
ऋणमुक्त केले किती । मुंजी विवाहा नसे मिती । धेनु: बहुमोले घेती । हिशेब कोणा कळेना ॥२०॥
जितुक्या येती सुवासिनी । खण देती तयांलागोनि । बालका अंगीटोपी करोनी । प्रेमभरें बोळविती ॥२१॥  
ब्रह्मचारी संन्यासी । बैरागी तडीतापसी । वस्त्रें देती तयांसी । ज्याचे त्यापरी ॥२२॥
विद्यावंतांचा अधिपती । तेथें नांदे गणपती । अनेकांच्या शंका फेडिती । साधार स्वानुभवें ॥२३॥
भूतभविष्य जाणोनि । प्रत्युत्तर दे गुरुजननी । उणें अधिक चापपाणी । होवोच नेदी ॥२४॥
इतुक्या असोनिया कळा । वेष अत्यंत साधागे वळा । अखंड शांतिचा जिव्हाळा । उर्निरहित ॥२५॥
बहुत येती निंदक । नीवोत्तरे बोलती अनेक । शांत राहोन गुरुनायक । समाधान करिती तयांचे ॥२६॥
कांही धूर्त परिक्षू येती । स्थिति पाहोन चकित होती । प्रेमभावे शरण रिघती । धन्य साधू ह्मणोनी ॥२७॥
सामर्थ्य असोन लीनता । सर्वा भूती दयार्द्रता । अहंकार सारोनि परता । सानपणा अंगिकारिती ॥२८॥
आम्ही माणदेशीं शेतकरी । रामदासी केवळ भिकारी । कुटुंबवत्सल संसारी । मुमुक्षुजन ॥२९॥
लोकीं उठविलें बंड । साधुत्वाचें घेती कुभांड । येरवी सर्व थोतांड । तुम्ही आम्हीं सारखे ॥३०॥
मूर्तीमंत ज्ञानघन । आदि मध्यांत अविच्छिन्न । परि पांघरोन अज्ञान । पोरांसवें खेळती ॥३१॥
कुणबटासी कुणबट गोष्टी । करिती जुनाट मराठी । ज्ञानियासी ज्ञानभेटी । भाविकांसी भाविक ॥३२॥
योगाभ्यासियासी योग । षटूचक्र भेद अष्टांग । धननित्रय भ्रमर मार्ग । दावोनि देती वायूचा ॥३३॥
सर्वज्ञासी काय उणें । जे जे येतील शहाणे । तितुकियांचीं समाधानें । करिती बहु आदरें ॥३४॥
असो ऐसी बहुत चित्तें । शांतवोनि लाविली भक्तीनें । दुस्तर कलीमाजि निरुते । उपकार केले अगणित ॥३५॥
दशम एकादशांत । हेंचि घ्यावे जी सतत । आणिक अवतार समाप्त । जाणा येथें वर्णिला ॥३६॥
बहुत जनां लाविला लळा । प्रेमतंतूचा जिव्हाळा । गुरुचि देव राउळा । मानोनि गळां पडतील ॥३७॥
ज्ञानचक्षु क्वचितांसी । ते जाणती गुरुपदासी । एरवी सर्व सगुणासी । भजती भावभक्तीनें ॥३८॥
माय बाप सुत जाया । याहुन श्रीचरणीं माया । शोकें त्रस्त होतील वाया । नरनारी बालकें ॥३९॥
यास्तव दूर धाडिले । येत्यासि अडथळें घातले । सगुणज्ञान लोपाविलें । निगुणी झाले अनन्य ॥४०॥
काशीपासून रामेश्वर । बहुत करविला नाम-गजर । असंख्य तारिले नर । ख्याती झाली चहुंदेशी ॥४१॥
आणिक एक कार्य केलें । देशासि जें दौर्बल्य आलें । पारतंत्र्य विकल केलें । पिळपिळोनी काढिती ॥४२॥
यासी सबळ कारण । पाप भरलें अतिगहन । दु:खमूळ दुरित जाण । श्रुतिस्मृति बोलती ॥४३॥
हरिस्मरण दु:खे जाती । हरिस्मरण पापें जळती । याकारणें नामजपाप्रती । लाविले लक्षानुलक्ष ॥४४
भूमिका निर्मळ बीज । असलिया सुफळें येती सहज । तेंहि पुढें दिसेल काज । यथाकाळएवे यथाक्रमें ॥४५॥
दशरथें तप केलें । तेव्हां रामचर्ण लाभलें । भाग्यवान पुरुष झाले । शुध्दभूमिकेपासोनी ॥४६॥
असो पुढील कार्य जें होणें । तें एक श्रीगुरु जाणे । लखोटा लिहुनिया जेणे । ठेविला स्वदस्तुरचा ॥४७॥
पक्का मोर्तब करोनि । वरी लिहिलें श्रींनी । मजवांचोनियां कोणी । फोडूं नये लखोटा ॥४८॥
दुरितनाश कार्यकारण । तप करविलें नामस्मरण । इहपरहित करोन । समाधिस्त जाहले ॥४९॥
द्वासशी समाधीवर्णन । कथिले परिसाजी सज्जन । जेणें करितां समाधान । वैराग्ययुक्त होतसे ॥५०॥
ब्रह्मचैतन्य परात्पर । अखंड अक्षय्य चराचर । संचलें रितें अणुभर । स्थान पाहतां गवसेना ॥५१॥
त्यांतहि विशेष स्थानें । परिसा जी सद्‍गुरुवचनें । गुरुवचनीं विश्वास धरणें । निजकर्तव्य शिष्याचें ॥५२॥
अखंडवास भक्तह्र्दयीं । जेणें चित्त अर्पिले गुरुपायीं । नामजप जेथें पाही । तेथें वास श्रीगुरुचा ॥५३॥
जेथें नामोत्साह चालती । आदरें प्रसाद अर्पिती । तेथें वास गुरुमूर्ती । न्यून पडो देईना ॥५४॥
संकटकालीं भक्तीने वाहती । श्रींसि करुणावचनें । तया स्थळीं धांवोनि जाणें । श्रीगुरुमायबाप ॥५५॥
सतशिष्य जेथें स्थापना करी । अनंत भावना एकसरी । जडल्या तेथें भक्तकैवारी । वस्ती नित्य निर्लिप्त ॥५६॥
जेथें श्रींच्या पादुका । भक्त पूजिती भावें देखा । तेथे वास गुरुनायका । साच साच जाणावा ॥५७॥
मायबापांची करितां सेवा । तेथें आम्हांसी विसावा । आणिक प्रकार परिसावा । गुरुभक्तांचे संगमीं ॥५८॥
सद्‍गुरुलीला जेथें वर्णिती । लिहिती वाचिती पूजा करिती । भक्तिभावें सेवा करिती । साह्य तयासी सर्वदा ॥५९॥
गोंदावलीची मुख्य स्थानें । परिसावी निर्मल मनें । शेजगृहीं नित्य राहणें । वदले आम्हां श्रीगुरु ॥६०॥
समाधी साक्षात गुरुरुप । प्रगट गुप्त भेद अल्प । अनेकाचा हरती ताप । साक्षात्कार घडोघडी ॥६१॥
अनेकांच्या कामना पुरती । कित्येकांसी ज्ञानप्राप्ती । अनेकां साधनें सुचविती । यथाक्रम यथान्याय ॥६२॥
दर्शने सकळां समाधान । होय जेंवी प्रत्यक्ष दर्शन । येविषयी स्वानुभव जाण । कथन करुं तुम्हांसी ॥६३॥
श्रींनीं केला देहत्याग । वियोगें जाहला उद्वेग । समाधीदर्शनें अभंग । गुरुमाय भेटली ॥६४॥
वरी जीं जीं कथिली स्थानें । अनुभवियां खूण बाणे । कांही दृष्टांत इतरां कारणें । कथन करुं अवधारा ॥६५॥
समाधीचे तिसरे दिवशीं । अनुग्रह दिधला द्रविडांसी । दृष्टांतहि बहुतांसी । होतो बहुविधप्रकारें ॥६६॥
वाराणसी विप्रबाळ । बुडतां आठवी गुरुदयाळ । हात देवोनि तीराजवळ । आणोनि जीव वांचविला ॥६७॥
जालनेकरांचे जामात । पांडूरंगबुवा भक्त । बदरिनारायण तीर्थाप्रत । जाऊन मागें परतले ॥६८॥
ह्रषिकेशाचें दर्शन । पुढें चटटी सत्यनारायण । तेथे घोरकानन । व्याघ्र मार्गी आड आला ॥६९॥
गुरुगुरु करी वांकुल्या दावी । अत्यंत भय वाटलें जीवीं । तेव्हा आठविले गोसावी । ब्रह्मचैतन्य सद्‍गुरु ॥७०॥
शरणांगर अभयदाते । साक्षात प्रगट झाले तेथें । व्याघ्र काय करील तूंते । शिरी असतां रामराय ॥७१॥
असों व्याघ्र निघोनि गेला । भक्त संकटी धावून आला । स्थिरचर व्यापून राहिला । जगदात्मा सद्‍गुरु ॥७२॥
आणिकहि बहुतांसी । साक्षात्कार बहुवसी । झाले परी ग्रंथासी । विस्तार होईल ॥७३॥
जैसा भाव तैसा देव । हाचि मुख्य अभिप्राव । अंतर्बाह्य गुरुराय । येत ना जातसे ॥७४॥
घटीं आकाश पाहिलें । तें गोलाकार भासलें । तैसें सदगुरु नटले । भावनेसारिखे ॥७५॥
द्वादशाध्याय मुक्तामाला । त्रयोदश मेरू आगळा । गुरुकृपामृत जिव्हाळ । अखंड आकंठ पान करुं ॥७६॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते त्रयोदशोऽध्यायांतर्गत तृतीय समास :। ओवीसंख्या ॥७६॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP