श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीगुरुभ्यो नम: । श्रीराम समर्थ ॥
द्वितीयोध्यायीं ऐशी कथा । देशकालादि अनुकूल असतां । प्रयत्नें मानव ईशसत्ता । नि:संशय मिळवितसे ॥१॥
कुलशील असतां भलें । तरीच ऐसी सत्ता चाले । वनीं जन्मती जंबुकापिलें । गज कैसे विदारित ॥२॥
याकारणी कुल शील । राखावें अति निर्मल । विषयलालसेनें केवळ । घात न करावा पुढिलांचा ॥३॥
चतुरें पाया घातला । मध्यें आपणां भाग आला । तरी न ठेवावा ढिला । पुढिलांचा घातक ॥४॥
लक्ष्मीचा दुअंगी टोला । नीतिनें पाहिजे सोसिला । येतां मंदे धुंद केला । जातां तृष्णा मोह पाडी ॥५॥
प्रारब्धयोगें भाग्य येतां । बहुत चाले त्याची सत्ता । तेणे जननिंदां दोषवार्ता । विसरोनि जोडि अधर्म ॥६॥
अथवा दैवें दारिद्र आलें । आणि वैराग्य नाहीं वाणलें । विषयनृष्णें व्याकुळ केलें । धर्माधर्म पहावेना ॥७॥
असो संपत्ति अथवा विपत्ति । दोन्ही ठायीं चित्तवृत्ति । शांत ठेवोनि नीति । राखितां बरें ॥८॥
परमार्थ साधावा मुख्यत्वें । प्रपंचहि करा दक्षत्वें । लिंगोपंत रावजीचा तत्वें । सूक्षमपणें विवरावी ॥९॥
सूर्योदय होइल पुढतीं । परि आधी प्रभा पैसावती । तैसे दृष्टांत डोहळे होती । शुभाआधी शुभशकुन ॥१०॥
धर्मस्थापनेचे नर । केवळ कारणिक अवतार । परि वेष तैसाअ आचार । अंगिकारिती अत्यादरें ॥११॥
असो मानववेशांत । अवतार घेती सद्‍गुरुनाथ । सुकृतें फळा आली समस्त । गीता रावजी धन्य केले ॥१२॥
सुपुत्र पित्याचा उध्दार । मोकळें करी स्वर्गध्दार । परि स्वर्गागून जें पर । तेथें स्वयेंचि कष्टावें ॥१३॥
मायोद्भव लोभ अहंता । नसताचि घालिती गोता । तेणे जीव सुखदु:खभोक्ता । होतो ऐसें जाणावें ॥१४॥
बाळलीला तृतीयाध्यायीं । पहा कैसी नवलाई । सत्य ज्ञाना नाश नाहीं । अनंत जन्म घेतलिया ॥१५॥
प्रवृत्ती ज्ञान नाशिवंत । जेथील तेथें लया जात । याकारणें ज्ञान सत्‍ । आत्महिता धरावें ॥१६॥
नरदेहीं वस्ती थोडी । न भरे ब्रह्मयाची घडी । याकारणें शाश्वतजोडी । अति यत्नें साधावी ॥१७॥
साखर शोधित मुंग्या जाती । बालपणीच वाढली महंती । आणिक एक धरा चित्ती । मंत्रदीक्षा ॥१८॥
आत्महित साधायासी । आचार कथिती देवऋषी । अदूरदृष्टी निरर्थक त्यासी । मानोनि अव्हेर न करावा ॥१९॥
वेदबीज मंत्रबीज । ज्ञानबीज धर्मबीज । वेल मूळी वासनाबीज । शुध्द भूमुके रुजलिया ॥२०॥
उपदेशक असावा ज्ञाता । अपरोक्षानुभवी पुरता । तरी घडे सार्थकता । उपासनाबळें ॥२१॥
यांतील एक असतां उणें । वैराव्य कदापि न बाणे । मां समाधान कोण जाणें । कैसें आहे ॥२२॥
आचार शुध्द विचार शुध्द । भूमिका शुध्द संगती शुध्द । तरीच हे होईल साध्य । वेदगुह्य ॥२३॥
परि कालधर्म उफराठा । ब्रह्मकर्मा दिधला फांटा । यास्तव ज्ञानियाच्या वाटा । शोधूं निघाले ॥२४॥
अनुताप उपजला पोटी । वैराग्य बाणलें उठाउठीं । परि मायबापासाठी । गृहस्थाश्रम आदरिला ॥२५॥
मायबाप आधिदैवत । हेंहि दाविलें नेमस्त । आणि आपुलाहि स्वार्थ । साधावया धांवले ॥२६॥
एक असतां एक नाही । ऐसें असतें बहुतां ठायीं । परिज्ञानी सर्वत्र विदेही । जळीं राहोन कोरडा ॥२७॥
तृतीयाध्यायाचे अंती । बाहेर निघाला गणपती । मायामोहाची गुंती । अल्पवयीं सोडविली ॥२८॥
चतुर्थाध्याय़ींचा प्रसंग । दाविलें विवेक वैराग्य । कैसी अनुताप तगमग । भरतखंड शोधिलें ॥२९॥
सद्‍गुरु शिष्यातें परिक्षी । सतशिष्य सद्‍गुरु लक्षी । अलिप्तपणें गरुडपक्षी । साध्य जैसा शोधितसे ॥३०॥
उपमर्द कोणाचा न केला । वाद कोणासी न घातला । सूक्ष्म दृष्टी जगताला । शोधूं लागलें ॥३१॥
काम क्रोध्द दंभ अहंता । लोभ तृष्णा दुस्तर ममता । विवेकें वैराग्ये मलिनता । चित्ताची घालविली ॥३२॥
साधोनियां चित्तशुध्दी । लीन होतां गुरुपदीं । प्रसाद व्हावया अवधी । पळभरी नाहीं ॥३३॥
असो नामस्मरण तीर्थाटण । संतदर्शनें उपोषण । ऐसें करीत साधन । समाधान शोधिलें ॥३४॥
पंचमाध्यायप्रसंगी । तुकाराम महानयोगी । तेथें लीन सर्वांगीं । होवोनि केलें सार्थक ॥३५॥
सरिता सागरी मिळाली । द्वैतभावना अवघी गेली । परी वळण लावावया केली । गुरुसेवा बहुविध ॥३६॥
निर्गुणी व्हावें अनन्य । सगुणीं सगुणत्वें भजन । हेंहि दाविलें वळण । स्वयें सेवा करोनी ॥३७॥
ज्ञान होती परमहंस । परि सगुणीं उदास । ऐसियानें जगतास । काय बोध होईल ॥३८॥
ऐसे बहुत साधू झाले । आपाआपणा पुरते तरले । परि ही नौका अखंड चाले । बहुतांसी तारक ॥३९॥
असो कठीण सेवा केली । गुरुमाय आनंदविली । कासासी वृत्ती न डगली । लेशमात्र दिवानिशी ॥४०॥
सुखासनी सुग्रास भोजनी । वेदांत वदोनि ह्मणती ज्ञानी । परी माया कसोटी घर्षनीं । उतरणें कठिण आहे ॥४१॥
भ्याड बहु वल्गता करी । प्रसंग आल्या अंग चोरी । ऐसीयानें माया असुरी । मरणार नाही ॥४२॥
जगदोध्दार करावयासी । आज्ञापिती ज्ञानराशी । पोई घातली तृषितांसी । शांतवाया नि:स्वार्थ ॥४३॥
अज्ञ सूज्ञ भेद इतुका । परार्थ न वेची रुका । ज्ञानीयाचा प्रपंच देखा । परहिता कारणें ॥४४॥
सहावियांत तीच कथा । प्रपंची दाविली विदेहता । नाना जीवां आश्रयदाता । इहपर सौख्य दाविलें ॥४५॥
नि:स्वार्थे प्रपंच केला । घराचा देव्हारा बनविला । पाकगृहाची घर्मशाळा । केली समस्ताकारणें ॥४६॥
हजार येती हजार जाती । खाती पिती सुखी होती । मूढ ज्ञानी एका पंक्ती । बैसविलें निरंहंकारें ॥४७॥
तारक नमस्मरणासी । लाविले लहान थोरांसी । नाना प्रपंचव्याधीसी । दिधल्या दूर झुगारुनी ॥४८॥
संसारचक्रीं जे भ्रमले । आपत्तीनें कष्टी झाले । बहुत पीडितां कुरवाळिले । गुरुमायेनें ॥४९॥
अन्नदान सौख्यदान । त्याहीवरी ज्ञानदान । तेंहि परिसा सज्जन । सप्तमाध्यायी ॥५०॥
काळ वेळा कठिण आली । सदसद्विवेकबुध्दी गेली । महामायेनें भुलविली । नाना प्रकारें ॥५१॥
इच्छामात्रें सकळ घडी । निमिष्यार्वे करी विघडो । नाथिली परी कोडी । अनंत अगाध ॥५२॥
माया महा वटवृक्ष । शाखापल्लव गणितां लक्ष । बीजरुपें अनंत वृक्ष । शोधितां पुढती धांवतसे ॥५३॥
याची गणना होणे नाहीं । पाहिलें तेंहि शाश्वत नाही । अष्टधेचा कर्दम पाही । अनंत चमत्कृति मोहक ॥५४॥
मोहें भुलविलें जनांस । परमार्थी पाडिले वोस । शुश्द ज्ञा लयास । जाऊं लागलें ॥५५॥
माया सोडितां सुटेना । धरितां हाती लागेना । इहपर कांहीच साधेना । मानवासी ॥५६॥
शुध्दज्ञानें माया निरास । इहपर साधेल स्वहितास । ज्ञानरुप सद्‍गुरु परेश । पाहोन चरणी लागावें ॥५७॥
यास्तव सद्‍गुरु ओळख । कथिली परिक्षा निष्कलंक । काळवेळ पाहोनि देख । व्यवहासाधन कथियेलें ॥५८॥
स्वल्प परि अर्थे जाड । कथन केले गुह्यगोड । अनुभवज्ञान नव्हे वाड । शब्दावडंबर निरर्थक ॥५९॥
शब्दज्ञानी घरोघरी । अनुभवीं क्वचित गिरिगव्हारी । उथळ जळा खळखळ भारी । डोह शांत गंभीर ॥६०॥
सप्तमाध्याय करोनि पठण । ठेवितां तैसें आचरण । दुस्तर काळी भवतरण । होईल जाण निश्चयें ॥६१॥
क्रिया करोनि दाविली । तीच जना उपदेशिली । रसाळ मधुर फळें आली । ती कथिलीं अष्टमीं ॥६२॥
 इति श्रीसद‍ गुरुलीलामृते त्रयोदशोऽध्यायांतर्गत द्वितीय समास :। ओवीसंख्या ॥६२॥
॥ श्रीसद्‍गुरुनाथार्पणमस्तु  ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP