मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसद्गुरुलीलामृत|उत्तरार्ध|अध्याय नववा| समास तिसरा अध्याय नववा समास पहिला समास दुसरा समास तिसरा समास चवथा अध्याय नववा - समास तिसरा श्रीसद्गुरुलीलामृत Tags : pothisanskritपोथीसंस्कृत समास तिसरा Translation - भाषांतर श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्गुरुवेनम: । श्रीरामसमर्थ ।अन्न म्हणजे ब्रह्मपूर्ण । जीवन तो नारायण । अन्नभोक्ता भगवान । जठरानलरुपी ॥१॥अन्न जीव रक्षण करतें । अन्न जीवा शांतवितें । दान नाहीं यापरतें । त्रिभुवनीं आणिक ॥२॥जीवन जीवासी जीववितें । जीवन जीवरुप निरुतें । जीवन वदतांच आल्हाद देतें । प्राणिमात्रांसी ॥३॥क्षुधातृषेचें दु:ख भारी । झोंबतें प्राण्या दोप्रहरीं । या दु:खाची सरी । दुजें कोणी करीना ॥४॥अन्नदाता पितयासमान । अन्नदाता धार्मिक गहन । अन्नदाता श्रेष्ठपूर्ण । दातयामाजीं ॥५॥अन्नदानें प्रायश्चित घडे । अन्नदानें दोष उडे । अन्नदानें सुकृत जोडे । व्याधी हरती अन्नदानें ॥६॥अन्नदानें देवतांसी । अन्नदानें पितरांसी । अन्नदानें भूतांसी । आनंद होय ॥७॥बहुत करितां द्रव्यदान । अथवाअ अमोल वस्तु दान । तृप्ती अन्नदानासमान । आणिक कोठें आढळेना ॥८॥सकळ जीवा अन्नदान । करणें हे उचित जाण । सामर्थ्य नसतां त्यांतही प्रधान । कथिती तें परिसावें ॥९॥संन्यासी अतिथी ब्रह्मचारी । भुकेनें पीडित नीच जरी । विप्र विद्यार्थी सदाचारी । साधक सिध्द संतजन ॥१०॥अडाचणींत गवसला जो देख । पोटार्थी देशसेवक । पांथिक अज्ञान अर्भक । व्यंग दीन परोपकारी ॥११॥आणिक जीं देवतामुखें । अग्नि जीवन धेन्वादिके । येथें अन्न अर्पितां निकें । अगणित सुकृत हाती ये ॥१२॥जे वेदविद्या पठण करिती । जे अध्यात्मज्ञानें रंगोनि जाती । ज्यासी बाणली वैराग्यस्थिती । तयां अन्न देतां भलें ॥१३॥पशु पक्ष्यादिकांसी । अन्न द्यावें विवेकेसी । भुकेजल्या व्याघ्रासी । मांस कधी अर्पू नये ॥१४॥विप्र असावा स्वधर्माचरणी । ब्रह्मचारी वेदपठणी । अहिंसायुक्त अन्न सदनीं । असेल ते अर्पावें ॥१५॥अहिंसा म्हणजे परपीडा । चोरी लबाडी घात सोडा । युक्त अन्न देतां जोडा । सुकृतासी दुजा नाहीं ॥१६॥अनंत सुकृतांच्या राशी । तरी घडे अन्नदानासी । तृप्ती नाहीं यासरसी । आणिक कोठें ॥१७॥सद्गुरु आम्हांसी वदती । विप्रोच्छिष्टें जे काढिती । तयांची उच्छिष्टें श्रीपती । स्वहस्तें काढितसे ॥१८॥सद्गुरुगृहीं सर्व काळ । अन्नचा होत सुकाळ । किती शमविती जठरानल । त्याची गणती असेना ॥१९॥मुमुक्षु साधक सिध्द । थोर थोर येती प्रसिध्द । वैदिक शास्त्री आणि वैद्य । विद्वज्जन कितियेक ॥२०॥बहुत येती अन्नार्थी । स्त्रिया लेकुरा नसे मिती । चिंताग्रस्त तृप्त होती । धनिक आणि सदिच्छ ॥२१॥नित्य असे मुक्तद्वार । उपवासी न रहावा नर । येविषयीं खबरदार । असती सतत ॥२२॥गांवोगांवीचे येती नर । भिडस्त आळशी विसर । राहती म्हणोन वरचेवर । निमंत्रणें पाठविती ॥२३॥इतक्याही देतां सूचना । क्वचित् कोणी राहतां जाणा । सर्वज्ञ ते सांगती खुणा । अमुक गृहस्था बोलवावें ॥२४॥धनिक विद्वान आणि दीन । सकळांसी एकचि अन्न । स्वहस्तें प्रसाद देवून । जेवूं घालती अति प्रीती ॥२५॥गुरुवारीं समाराधना । नित्य होती उपासना । विप्र कुटुंबी गांवचे जाणा । सकल जेवूं घालिती ॥२६॥गांव भोजनें तीं किती । वरचेवरी अनेक होतीं । अठरापगड याती मिळती । तृप्त होती गुरुगृहीं ॥२७॥गोंदवलें गांव अति लहान । तेथें बाजार भरविला गहन । गुरुप्रिय गुरुवार जाणोन । नेमून दिलां ॥२८॥कित्येक बाजार दिवशीं । पाचारिती बाळाशी । पाटील आज श्रीरामासी । नैवेद्य असे ॥२९॥मनुष्य न सोडावा बाजारीं । जेवूं घाला पोटभरी । तदनंतर गांवची सारी । रामप्रसाद सेवावा ॥३०॥शिधासहित कोणी देती । काहिली चुलाणीं ठेविती । पुरुष इतर पाक करिती । स्त्रिया भाजिती पुरणपोळया ॥३१॥चुलीच्या करिती हारी । वाटे यात्रा ही साजरी । सत्ताधीश गुरुचे घरीं । गांवोगांवची भरलीसे ॥३२॥असो बाजारी जेवोन जाती । मग गांवची सकल येती । स्वहस्तें श्रीगुरु वाढिती । आग्रहाते करकरोनी ॥३३॥तो सोहळा अपूर्व । जेथें नांदे गुरुराव । प्रसादा येती वाटे देव । मनुष्यवेष घेवोनी ॥३४॥आणि उत्साहीं विशेष । यात्रा भरे गोंदावलेस । ते समयीं अन्नास । गणती कोण करील ॥३५॥नित्य उत्साह गुरुगृहीं । त्यांतही विशेषत्वें पाही । परिसा श्रोते सर्वही । एकचित्तें गुरुमहिमा ॥३६॥चैत्र श्रुध्द नवमीसी । यात्रा भरे दहा दिवशीं । आषाढ शुध्द पौर्णिमेसी । नामसप्ताह गुरुघरचा ॥३७॥गुरुपूजेचा तो दिवस । धांवोन येती सकल शिष्य । सोहळा तो विशेष । आनंद न समाये अंतरी ॥३८॥माघमासी दासनवमी । उत्साह होत गुरुधामीं । झोळीं कुबडी जे नेमी । दीक्षाधारी करिती भिक्षा ॥३९॥एकनाथ, नामदेव तुकाराम । पुण्यतिथीचा सोहळा परम । जयंत्या सण नित्यनेम । महाप्रसाद होतसे ॥४०॥जपानुष्ठान सांगता किती । उपनयनें विवाह होती ।बारशादि संस्कार चालती । नित्य पोळी गुरुगृहीं ॥४१॥भोजना जयजय श्रीराम । हा असे म्हणण्याचा नेम । श्लोक आर्याही सुगम । भगवत् कीर्तिही वर्णाच्या ॥४२॥नाम घेतां भोजन करतां । कित्येकांच्या हरल्या व्यथा । प्रसाद चवी नये वर्णितां । भाविकांसी अति प्रिय ॥४३॥व्याधिपीडित जनांसी । रामतीर्थ औषधी खाशी । प्रसाद देती पथ्यासी । रोगमुक्त व्हावया ॥४४॥सद्गुरुचे चरणतीर्थ । सेवितां समाधान होत । नित्य घेती गुरुभक्त । अत्यानंदे ॥४५॥असो प्रसादें रोग जाती । प्रसादें चित्तशुध्दी होती । प्रसादें वाढे भगवदभक्ती । महिमा किती वर्णावा ॥४६॥प्रसादे अन्नपूर्णा प्रसन्न । कदाही न पडे न्यून । तोही प्रकार सांगेन । विशद करोनी ॥४७॥प्रात:काळीं पाक करिती । सामुग्री घेती जनांपुरती । दोंप्रहरीं भक्त येती । क्वचित्काळीं अनेक ॥४८॥शेंदीडशें लोक येती । त्यांतचि देखा तृप्त करिती । ऐसें गुरु कौतुक दाविती । महदाश्चर्य कलियुगीं ॥४९॥ब्रह्मानंदासी दर्शन । द्यावया कर्नाटकीं जाण । गेले तेथें शेर अन्न । शतकांसी पुरविलें ॥५०॥तैसीच उपहाराची स्थिती । अल्प परी सकळां वाढिती । ऐसे प्रकार नित्य घडती । अन्नपूर्णा वास करी ॥५१॥इंदुरीं असतां गुरुवर । दुष्काळ पडला असे थोर । तेव्हां श्रींचे द्रावलें अंतर । जेवू घालिती गरिबांसी ॥५२॥किती लोक आले धाले । किती अन्न खर्च झालें । हिशेब कोणा न कळे । गुरुगृहींचा ॥५३॥केवळ हिशेब भाजीचा । राखिला कोणी समयाचा । जाहला बहुत शतकांचा । आश्चर्य वाटे सकळांसी ॥५४॥गोंदावलीस असतां किती । वारकरी जेवूं घालिती । शिबिका दिंड्या मार्गावरती । येतां आदरें जेवविले ॥५५॥वागण्याचा ऐसा प्रकार । क्वचित् मीठभाकर । क्वचित पक्वानें मधूर । ऊर्मी एक राहिना ॥५६॥कर्णा सारखी दानता । क्वचित दाविती हीनता । भिकार्यापाशीं भीक मागतां । लाभ काय होईल ॥५७॥क्वचित् भिक्षा मागती । क्वचित ग्रामभोजनें करिती । अंत कोणा न देती । ऊर्मी एक तगेना ॥५८॥क्वचित कफणी भरजरीची । क्वचित् कौपीन चिंधीची । खून जाणा गुरुघरची । आहे आहे नाही नाही ॥५९॥उदकपूर्त्री तैशाच रीती । ज्ञानवापीतीराप्रति । घाट बांधोन कुंडें करिति । शीत स्वच्छ झर्यांचीं ॥६०॥खालती वरती पाणी कमी । आणि तेथेंच वाहतसे नामी । ईशकृपा सदगुरुधामी । साच साच ॥६१॥असो अन्नोदकाचा सुकाल । नित्य करिती गुरुदयाळ । जपतां तयांची नाममाळ । तृष्णा ताप निवेल ॥६२॥व्याधिग्रस्तां वैद्य मिळाला । भूतखेतां मंत्री झाला । दरिद्र्यासी धनिक भेटला । गुरुराजयोगी ॥६३॥अन्नार्थियांसी अन्नदाता । वेदांतियांसी सर्वज्ञता । धेनूंसी होय प्राणदाता । योगिता योग शिकवितसे ॥६४॥नास्तिकां साधनीं लावित । साधकां सिध्द करित । भाविकांसी दावोनि देत । निजरुप ॥६५॥भाविक नास्तिक हट्योगी । यांसी लाविती सन्मार्गी । ऐसी माय भेटली जगीं । तो येक धन्य पुरुष ॥६६॥असो साधकां साधन करावयासी । मंदिरें बांधविती कैसी । हेचि कथा पुढील समासीं । श्रोते हो द्यावें अवधान ॥६७॥इति श्रीसद गुरुलीलामृते नवमोध्यायांतर्गत तृतीय समास:। ओवीसंख्या ॥६७॥॥ श्रीसद्गुरुपादुकार्पणमस्तु ॥॥ श्रीराम समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : October 23, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP