जयें गोधना संकटीं रक्षियेलें । किती जीव अन्नोदकें तृप्त केलें ॥
बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ति । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ति ॥९॥

श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवेनम: ।  श्रीरामसमर्थ ।
जयजय सद‍गुरु तरूवरा । संतप्त पांथिकां आसरा । कल्पतरुहुनि साजिरा । निर्विकल्प ॥१॥
कल्पतरू काय देतो । कल्पिली वस्तु पुरवितो । कल्पनातीत जीव होतो । गुरुछायेसी ॥२॥
संसारपथ महाथोर । त्रिविध तापें पोळे शरीर । भेटतां मार्गी गुरुवर । कृपाविस्तार साउली ॥३॥
तरीच क्षीण अवघा जाये । ना तरी किरणें घेतील धावे । याकारणें संत तुझिये । आश्रयें सुख भोगिती ॥४॥
शांती सुगंध सुमनांचा । मेवा भ्रमर संतांचा । ताप निवाला जन्मांतरीचा । तेथेंच गुंग जाहले ॥५॥
बोध सुमनें जमविली । आत्मारामाची वाहिली । फलाशेची वाट मोडिली । बहुत संतजनांनी ॥६॥
वृक्षविस्तार बहु मोठा । माजीं अनंत जीवांच्या पेठा । छायेसी न पडे तोटा । आकार कोणा न गणवे ॥७॥
कीर्ति मोहोर विस्तारला । चैतन्य फळानें लिगडिला । पक्षी समुदाय लोटला । स्वानंदरस चाखाया ॥८॥
सेवूनिया स्वानंदरस । पूज्य झाले जगतास । अनुहत ध्वनी श्रवणास । अति आल्हाद देतसे ॥९॥
वासनेच्या पर्जन्यधारा । तयांसी तूचि आसरा । सकला करिसी निवारा । कृपा सागरा गुरुमूर्ते ॥१०॥
जे जे तव आश्रया आले । ते तेथेंचि स्थिर झाले । पुन्हा परतोन नाहीं गेले । त्रिविध ताप सोसाया ॥११॥
ऐशी तुझ्या छायेची गोडी । वाढतें सुख घडोघडी । संसारदु:खावर पडी । जाहली कितीयेक ॥१२॥
अहंकारें उन्मत्त झाले । ते त्वदाश्रयासी मुकले । अहंकाररहित नम्र झाले । ते पावले निजरुपा ॥१३॥
निबिड संसारकानन । अज्ञान अंध:कार पसरला गहन । षडरिपू श्वापदें हिंस्त्र दारुण । जीच नेती कुंभिपाकी ॥१४॥
ज्ञानसूर्य मावळला । विद्युन्मायेचा गलबला । शब्दज्ञान खद्योत भला । एकाचे एक दावितो ॥१५॥
अनिती काटेरी कुंपणे । अणु प्रवेशें करिती सदनें । यमकिकरादि पिशुनें । भिवविती जीवासी ॥१६॥
दारिद्य सर्प डसों देती । लोकेषणा वृश्चिक फिरती । कामेषणा गिळूं म्हणती । अजगर थोर काननींचे ॥१७॥
ऐसा प्राणी बहू भ्रमला । आशा तृष्णा गर्ती पडला । तव आकस्मात भेटला । पूर्व संचित सोबती ॥१८॥
तेणी हाती धरोनी गेला । जेथें ज्ञानतरु सद्‍गुरु भला । संतसमुदाय असे भरला । कृपाछायेसी ॥१९॥
कोठें सूर्याऐसी दीप्ती । नांदे तेथें तो रघुपती । विवेक शूर सेनापती । श्वापदें दूर पळवीतसे  ॥२०॥
आनंद भरोन आनंदरुप । प्राणी होत निस्ताप । द्वैतभावना संकल्प । विरोन जाती मुळिहूनी ॥२१॥
ऐसा तूं सद्‍गुरुवरा । संसारकाननीचा आसरा । निस्वार्थदाता दुसरा । दिसेना त्रिखंड शोधिल्या ॥२२॥
अखंड अगाध अविनाशी । नामरुप भेद न ज्यासी । भक्ताकारणें साकारशी । निरुपाधि निराकारा ॥२३॥
दयेचा निधी असे भरला । अनंत जीव शांतविला । धर्म आदरेम संरक्षिला । अधर्मप्रवर्तक युगीं ॥२४॥
कैसें युगाचें महिमान । अधर्मकर्मी प्रेम गहन । दुर्जन तोचि भाग्यवान । दिसो लागले ॥२५॥
देह ममता बहु लागली । तेणी सुखायतनें जमविली । धर्म हानी होऊं लागली । हें ध्यानीं येईना ॥२६॥
धर्मबीज रक्षणकर्ते । विप्र वागूं लागले भलते । यजनादिकी कर्मे निरुते । राहिली पूर्वीपासोनी ॥२७॥
केवळ राहिलें वाग्जाळ । अर्थभाग्याची पडली भुरळ । तेणीं मती जाहली चंचल । अनुभव दूर राहिला ॥२८॥
येणेच रिती सर्व वर्ण । अनेक मतें भिन्नभिन्न । उपाहासती अन्योन्यालागुन । सत्य कांहीच उमगेना ॥२९॥
धर्मे मर्यादा कथियेली ॥ कर्मे सर्व आंखून दिलीं । सोडितां सत्ता बुडाली । उभय लोकांची ॥३०॥
दैवी शक्ती समूळ गेली । मानवी सत्ता राहिली । धर्मभेदें दुहि माजली । तेणे आली विकळता ॥३१॥
धर्म जीवाचें जीवन । धर्म राष्ट्राचें भूषण । अभ्युदयासी कारण । धर्मचि एक ॥३२॥
धर्मविन्मुख जे झाले । इहपर सुखासी मुकले । आचार सर्वही भासले । निरर्थक सकळांसी ॥३३॥
शरीरी रोग अति गहन । आणि पथ्य दिधलें सोडून । मग औषध वाटा गुणहीन । रोगीया जैसें ॥३४॥
शब्दज्ञानी शहाणे ठरले । भाविक मुर्खामाजीं गणलें । अनुभव नेत्र जाता आंधळे । होवोन भांडती येकमेक ॥३५॥
धर्म दुही बहु जाहली । तेणें समाजा फुटी पडली । आपली वैरी आपणा झाली । दुजीयाची काय कथा ॥३६॥
स्वात्मसुख स्वप्नवत । होवोनि झाले विषयासक्त । विषयी द्वैताची मात । सहजची आली ॥३७॥
विषयीं वाढे अनाचार । विषयीं वाढे मत्सर । विषय व्य़सनाचें माहेर । तनू जीर्ण विषय करिती ॥३८॥
विषय साधनीं विक्षेप । विषय म्हणजे महा पाप । विषय वाढविती संताप । विषय विषया वाढविती ॥३९॥
धर्महीन झाले सकळ । गेले ऐक्यतेचें बळ । पराधीनतेनें विकळ । होऊं लागले ॥४०॥
भगवदाज्ञें कली आला । तैसा धर्म क्षीण झाला । बोल नाही इतरांला । ऐसें पूर्वीच कथियेलें ॥४१॥
परी प्रारब्धें रोग झाला । प्रयत्नें पाहिजे तटविला । कांही काळ सुखाचा गेला । म्हणजे बरें ॥४२॥
यास्तव साधू अवतरती । वेळोवेळीं धर्म रक्षिती । कली प्रबळ झाला जगतीं । परी कांहीसा उपाय ॥४३॥
कलीनें बुध्दी भारली । कलीनें क्षिती व्यापिली । प्रथम चरणी गती झाली । प्रत्यक्ष पहा ॥४४॥
वर्णाश्रमधर्म राहिला । मतामतांचा गलबला । मूर्तीपूजेसी कंटाळला । प्राणी दिसे ॥४५॥
काम्यकर्मे कांही राहिलीं । नेष्कर्मता समुळ गेली । धर्ममर्यादा शिथिल झाली । रुढी पडल्या अनेक ॥४६॥
देशसुपीक साजिरा । तेणें आळसा दिधला थारा । धनिक सुत दिसे बरा । परी बहुधा गुणहीन ॥४७॥
आळसें आला करंटपणा । धूर्त मारिती टोमणा । अन्नवस्त्रा बापुडावाणा । होवोनि गेला ॥४८॥
करूम नये तेचि करीती । भ्रष्टाकार माजविती । कोठेंही मिळेना शांती । मती भ्रष्ट जाहली ॥४९॥
उदरपूर्तीकारणें । लागोनीच सेवा करणें । योग्यायोग्य कोण जाणें । धनसंग्रह मुख्य काज ॥५०॥
सत्य विश्वास उडाला । असत्य अविश्वास भरला । कामिकांचा सुकाळ झाला । आपपर नेणती ॥५१॥
एवढेच मानिती भाग्य । तेंचि पुरुषार्थाचें अंग । कुलकलंक निसंग । नारीनर किती झाले ॥५२॥
अधर्मे धरणी पिकेना । पिकतां खाऊ देईना । निशक्तासी रोग नाना । नवे नवे उद‍भवती ॥५३॥
प्रथम चरणी ऐसी स्थिती । अंती होईल कोण गती । पशुसम मानव होती । प्रज्ञाबल तेजहीन ॥५४॥
पुराणे सांगती बहुत । पुनरावृत्ती नको येथ । कार्यकारण ऐसें कथित । श्रोती रोष न धरावा ॥५५॥
अधर्मा आणिक कारण । धनसंचय मुख्य जाण । त्यालागीं वेचिती प्राण । आणि घेती इतरांचे ॥५६॥
पोटचें मांस विकून खाती । वयसीमाही न पाहती । त्यांच्या जिण्या पडो माती । वृध्दा देती बालिका ॥५७॥
तेंणें घडती अनाचार । कुलक्षय झाले फार । भेसळ जाती अनिवार । होवोनि गेल्या ॥५८॥
उद्भव तैसा अंकूर । तैसी बुध्दी आणि विचार । पाखांड माजले फार । धर्मिकांसी निंदिती ॥५९॥
धर्म झाला दुबळा । रुढीनें विसंग पावला । परकीयांनी लाग साधिला । छिद्रे शोधू लागले ॥६०॥
दीन दारिद्रे पीडिले । अथवा धनाशे जे भुलले । माइक वैभवासी भाळले । तया तया भ्रष्टविती ॥६१॥
विहित आचार कळेना । रुढींत तत्व मिळेना । कळतें तेंही वळेना ।  विषयासक्तिचे नियोगें ॥६२॥
देह विषय व्यसनाधीन । तेणे अत्यंत जाहला क्षीण । पद्मपत्रीचें जीवन । तैसे आयुष्य जाहलें ॥६३॥
लहान शिकविती थोरास । मिथ्या म्हणती वेदश्रुतीस । स्त्रिया ठेविती पतीस । सत्तेखालीं आपुल्या ॥६४॥
सूकरीं बहुत प्रसवली । दुबळी संतती वाढली । अल्पकाळीं मुखीं पडली । महाथोर मृत्युच्या ॥६५॥
रोगे आयुष्य क्षीण झाले । जोडपें विजोडता पावले । पुनरावृत्ती करुं लागले । पशु जैसे ॥६६॥
आणिकही बहुत प्रकार क। लिहितां ग्रंथी ये विकार । खेचरी सृष्टी अनिवार । होवोनी गेली ॥६७॥
स्त्रीपुरुषे दोघेजण । राहती पक्ष्यासमान । आप्तइष्ट बंधुजन । परवा न करिती कोणाची ॥६८॥
पशुपक्ष्यांचा उपजत धर्म । तोही न मानिती हे अधम । प्रज्ञामानवा विश्राम । मलीन झाली कळेना ॥६९॥
आहार विहार सात्विक । जावोन रजतमात्मक । राहतां बुध्दिही नि:शंक । राजस तामस वाढली ॥७०॥
रजप्रधान बुध्दी जाहली । सुखाची हाव अति सुटली । यांत्रिक कला निघो लागली । अधिकाधिक ॥७१॥
प्रवृत्ती ज्ञान भेदयुक्त । भेद भेदा वाढवित । अष्ठधेचा कर्दम बहुत । दुरत्यय मानवा ॥७२॥
जितुके शोधोनि काढावे । तितुके गूढचि स्वभावें । अनंतजन्म शिणावें । तरी ज्ञान पुरेना ॥७३॥
आदिमाया विश्वजननी । चौर्‍याऐंशी लक्ष जीवयोनी । अनंत ब्रह्मांडे जिचेनी । सत्तामात्रे चालती ॥७४॥
पंचमाहाभूताचा मेळा । वासना कर्दमा निराळा । प्रकृती पुरुषांचा सोहळा । रामचि जाणें ॥७५॥
असो राजस ज्ञान पोफावेल । तम मिश्रित भ्रष्ट झाले । वित्तशुध्दीसी मुकले । धन्य कलीयुगाची ॥७६॥
येथें जे स्मरले राम । तेचि पावले विश्राम । सर्वा घटीं आत्माराम । आदी अंती निर्मळ ॥७७॥
रामभक्त सद्‍गुरुराय । सध्दर्मा करिती साहाय्य । पुढील समासीं तेचि ध्येय । श्रोतेजनीं परिसावें ॥७८॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते नवमोध्या
यांतर्गत प्रथम समास:। ओवीसंख्या ॥७८॥
॥ श्रीसद्‍गुरुब्रह्मचैतन्य पादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP