महाराष्ट्रिया माणगंगातिरातें । असें पुण्य गोदांवलें क्षेत्र तेथें ॥
यजुर्वेदि विप्रगृही जन्म घेती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ॥२॥
श्री गणेशाय नम: । श्रीसीतारामचंद्राय नम: श्रीमहारुद्रानुमत नम: श्रीसद्‍ गुरुनाथाय नम: श्रीरामसमर्थ ॥
जयजय श्रीज्ञानसूर्या । सच्चिदानंदा गुरुराया । अवस्था भेदोनी तुर्या । सहज स्थिती निवासा ॥१॥
तुझिये कृपाप्रकाशें । वस्तुजात तितुकी दिसे । स्पष्टपणें उमजत असे । नित्यानित्य ॥२॥
उदय होतां गभस्ती । डोळस क्रिया चालती । अज्ञानाची निवृत्ती । होत असे ॥३॥
तैसा सद्‍गुरू दिनकर । दवडी अज्ञान अंध:कार । भाविकांसी पैलपार । ज्ञानतेजें पाववी ॥४॥
जे अज्ञानरजनीं निजेले । स्वस्वरुप विसरले । जन्ममरणस्वन्पीं भ्रमले । सदोदित ॥५॥
कोणी अहंकारें उन्मत होती । घरघरा घोरों लागती । तस्कर हिरावोनि घेती । अर्थ ज्याचे ॥६॥
कित्येक अंधारी फिरती । सर्प विंचू दंश करिती । दु:खे तळमळोनि पडती । अधो भागीं ॥७॥
लोभमोहाचेनि नेटें । स्वप्नवैभव खरें वाटें । सवेंचि जातां भ्रष्टे । वृत्ति जयांची ॥८॥
कित्येक नृप थोर थोर । स्वप्नीं भिक्षा दातोदार । मागोनि भरती उदर । हरपले स्वसत्ते ॥९॥
मुमुक्षु अत्यंत बिहाले । जन्म मृत्यु पिशाच्च देखिलें चातला परी पाहों लागले । वाट उदयाची ॥१०॥
कमल सुमनी गुंतले भुंगे । विषमपरागाचेनि संगें । उदय होतांचि वेगें । मुक्त होती ॥११॥
दक्षाचिये पोटी । उद्यमाची आवडी मोठी । परी अंधाराची मिठी । कांही न चाले ॥१२॥
तैसें बध्द मुमुक्षु अंध । झाले असती सखेद । जंव ज्ञान सूर्य गुरुपद । उदय न पावें ॥१३॥
तमी दाटलें चित्त । मोहने भ्रमोनि बरळत । तया सद्‍गुरु अभय देत । ज्ञान ज्योती उजळोनी ॥१४॥
कैसें नवल उदयाचें । नाशिले विकार त्रिगुणांचे । तुर्यातीत अवस्थेचें । ज्ञान न होय ॥१५॥
तम म्हणजे अंध:कार । दीपतेज रज विकार । सत्व चांदणें निर्धार । लया गेलें ॥१६॥
सर्वसाक्षिणी तुर्या अवस्था । येतसे साधकांचे हातां । भवसिंधू तरुनी जातां । सुलभ होय ॥१७॥
अरुणोदयाचे संधी । अनुतापें जै चित्त शुध्दी । तै ज्ञानोदय कृपानिधी । सदगुरुनाथ ॥१८॥
मग वासना निमाली । मना उन्मनता आली । ज्ञानदृष्टी पैसावली । भूतीं देखे भगवंत ॥१९॥
तैसी भक्ति घररिघे । वैराग्य रोमरंध्री जागें । ज्ञानरुप होवोनि अंगें । सहजानंदीं निमग्न ॥२०॥
ऐसा ज्ञानसूर्य गुरुवर । मुमुक्षु चातकां आधार । निजसखा हाचि निर्धार । इतर सर्व मायिक ॥२१॥
रवीहोनि तेजाळ । परी उष्ण ना शितळ । विकार रहित निर्मळ । सहज समाधी ॥२२॥
उदयास्त पावे भास्कर । सद्‍गुरू नित्य निरंतर । आदिमध्यांत विकार । नाहीं तेथें ॥२३॥
उदय होतां गभस्ती । सत्यासत्य क्रिया चालती । होतां सद्रुरुप्राप्ती । विमल मार्गी पवाडे ॥२४॥
उदय पावले सद्रुरु । लीला तयांची अदरूं । साष्टांगें वंदन करूं । प्रेमळ भावें ॥२५॥
मागां श्रोतीं जें पुसिलें । गुरुलीला विशद बोले । सप्रेम वंदोनी पाउलें । निरुपिजेल ॥२६॥
येरवी सांग गुरूकथा । गुरु वाचोनि दुजा न वक्ता । परी व्हावया समाधान चित्ता । आला प्रसाद अंगिकारूं ॥२७॥
अनंत कोटी ब्रह्मांड । माजीं पृथ्वी नवखंडा । त्यांतील जें भरतखंडा । पुण्यभूमी ॥२८॥
जें धनधान्यादिकें समृध्द । सुवर्णभूमी नामें प्रसिध्द । जेथे मूर्तिमंत वेद । नांदतसे ॥२९॥
जें विद्येचें माहेर । ज्ञानाचें असें कोठार । सत्वगुणें केलें घर । पुण्यक्षेत्र म्हणोनी ॥३०॥
हरिहरादिक मूर्ती । नित्य नूतन अवतार घेती । दुष्ट छेदोनि सुखी करिती । सर्व जन ॥३१॥
कृषीवल नांगरी शेत । हरळी कुंदा काढिती । उत्तम पिकें होय युक्त । भूमिका जेंवीं ॥३२॥
तैसें हरिहरादिक भले । वेळोवेळां काढिती किडाळें । श्रेष्ठ पुरूष सत्वागळे । प्राप्त होती ॥३३॥
भगीरथें गंगा आणिली । सदाशिवें वस्ति केली । पुंडलिकें विटे माउली । भक्तजनां आधार ॥३४॥
कोणी सुर्य़ातें झांकिती । देव शत्रू विदारिती । कोणी समुद्र प्राशिती । तपोबळें ॥३५॥
कित्येक देवांशीं झुंजती । त्रिलोकीं सत्ता स्थापिती । कोणी धैर्याची मेरुमूर्ती । होऊनि गेले ॥३६॥
विश्व वायु निरोधी कोणी । प्रतिसृष्टी निर्मिती ज्ञानी । कित्येक स्वस्वरुपां पावोनी । निश्चल झाले ॥३७॥
कोणी निर्जिवा चालवी । पशुमुखें वेअ बोलवी । स्वर्गीचे पितर जेववई । प्रत्यक्ष येथें ॥३८॥
देहाच्या करी पुष्पें तुलसी । देहासहित वैकुंठवासी । पाषाणमुखीं प्रासासी । घाली कोणी ॥३९॥
ऐसा जो कां पुण्य देश । भक्त भावे पावन विशेष । नाना तिर्थाचे प्रदेश । जया ठायीं ॥४०॥
तयाचे दक्षिण दिग्भागीं । कृष्णा गोदा चालिल्या वेगीं । पावन करित भेटी लागीं । सरितपतीच्या ॥४१॥
महाराष्ट्र नामे देश । दोन्ही नद्या मध्य प्रदेश । माण गंगा तटाक विशेष । माण नामें प्रसिद्ध ॥४२॥
ऐशिया माणदेशी । गोंदावलें नाम ग्रामासीं । बुद्रुक संज्ञा जयासी । सद्गरुंचे जन्मस्थान ॥४३॥
पूर्वदिशे पंढरपूर । सहा योजनें असे दूर । मार्गी जो का सिध्देश्वर । म्हसवडीं नांदे प्रसिध्द ॥४४॥
दक्षिणेसी शुकस्थान । दुजें कुरोली सिध्द जाण । सिंहनाद होतो गहन । परम पावन क्षेत्र जें ॥४५॥
पश्चिमे वेरळा तीरासी । नागनाथ क्षेत्र परियेसी । उत्तरे शिखर शिंगणापुरासी । कैलासपती नांदतसे ॥४६॥
माण गंगा तीरासी  । ज्ञान वापी संगमासी । पुण्य क्षेत्रीं गोंदावलीशी । भीमाशंकर स्थान असे ॥४७॥
असो ऐशिया क्षेत्रांत । विप्र कुटुंब नांदत । घुगरदरे उपनाम विख्यात । पूरी होतें प्रसिद्ध ॥४८॥
अंगिकारीली जें वृत्ती । कुलकर्णी ऐसे वाहती । इनाम मिळविली शेती । इनामदार कोणी म्हणे ॥४९॥
देशस्त यजुर्वेदी ब्राह्मण । शास्त्र असे माध्यंदिन । वसिष्ठ गोत्र असे जाण । सुप्रसिध्द तें ॥५०॥
उदरनिर्वाहा पुरती । लेखनवृत्ती आदरिती । गृहस्थाश्रमीं वर्तती । नीति न्यायें ॥५१॥
जयांचे कुळीं दैवत । मुख्यत्वें असे पंढरिनाथ । शुध्द एकादशी नेमस्त । वारी जयांची ॥५२॥
नित्य होत हरिभजन । आवडी नाम संकिर्तन । रुद्रा माळा हें भूषण । असे जयांचे ॥५३॥
वंशवृक्ष विस्तारिला । फल पुष्प भारें शोभला । लिंगोपंग पुरूष भला । नामें झाला विख्यात ॥५४॥
संपत्ती जयाची आगळी । उत्तरोत्तर वाढली । धान्यादिकें समृध्दी झाली । बहु प्रकारें ॥५५॥
सुंदर गाई वांसरें । महिषी वृषभ जनावरें । शेळ्या आणि कोंकरें । किती एक ॥५६॥
दास दासी कुलवाडे । शेती चालली धडाडे । धन धान्याचा ढीग पडे । भाग्यवंत ॥५७॥
ग्रामाधिकार यथान्याय । चालवी न करी अन्याय । अधिकारीवर्ग गुण गाय । बहुप्रकारें ॥५८॥
संपत्ति घरीं पाणी भरी । आणि परमार्थी आवडी भारी । दोन्ही नांदती एक सरी । दुर्मिळ स्थळ ॥५९॥
लक्ष्मीमदें धुंद होती । लक्ष्मीनायका विसरती । न कळे धर्माधर्म नीती । विषय भोगीं अतृप्त ॥६०॥
स्वेच्छाचारें वर्तती । सूज्ञासी धर्मवेडा म्हणती । आयुष्य जाईल विलयाप्रती । ऐसें स्वप्नीं नये कदां ॥६१॥
जेथे श्री आणिआ श्रीधर । उभय कार्य चाललें थोर । तो भगवंदश निर्धार । सत्य सत्य जाणावा ॥६२॥
लिंगोपंत अत्यंत सात्विक । गृहधर्म पाळी अशेख । अतिथी सेव नि:शक । अत्यादरें करितसे ॥६३॥
पंढरीकुलधर्म घरीं । नित्य नेमें वारी करी । भजन कळाकुसरीं । टाळ विणा मृदंग ॥६४॥
प्रात:काळीं करुनि स्नान । ब्रह्मकर्म देवतार्चन । भगवद्गीता करी पठण । अति प्रीती ॥६५॥
नित्य हरिपाठ वाची । आल्या अतिथा अन्न वेंची । आवडी अध्यात्म श्रवणाची । जयालागी ॥६६॥
रात्रौ हरि भजनी सादर । वाणी जयाची मधुर । प्रेमें वाहें नयनीं नीर । नाचतसे निर्लज्ज ॥६७॥
भगवद्चराणीं अढळ लक्ष । प्रपंची उद्यमीं अति द्क्ष । दीनाचा घेउनि पक्ष । युक्ति प्रयुक्ती सांभाळी ॥६८॥
भार्या राधा पतिव्रता । पति वाचूनि देवता । न मानी जी तत्वतां । एक निष्ठ सेवा करी ॥६९॥
गृहीं गृहिणी शोभली । बाह्यकिर्ति पैसावली । तया भाग्याची साउली । इच्छिती जन ॥७०॥
संसार थोर चालला । संतती संपत्तीनें भरला । रावजी नामें पुत्र झाला । स्थिर बुध्दी ॥७१॥
विद्या वृत्ती व्यवहार । शिकवोनी केला थोर । मग विवाहाचा विचार । करों लागलें ॥७२॥
वर पहावयां अनेक । गांवो गांवचे येती लोक । विद्या वैभव वागणूक । वररूप पाहती ॥७३॥
कोणी वैभव वांछिती । कोणी वयसीमा पाहती । कोणी शरीर संपत्ति । आणि स्वरुप ॥७४॥
म्हणती पाहिजे वर केवळ । नको सासु सासर्‍यांचा छळ । नणंद जावांचा जोंजाळ । असूंच नये ॥७५॥
म्हणती विद्वान असावा । कोणी म्हणे उद्यमी हवा । धारिष्टें असावा बरवा । सकलां ठायीं ॥७६॥
कोणी म्हणे भलते झालिया । स्थावर असावें खाया । हिस्सेरसीनें जावाया । काय येईल ॥७७॥
कित्येक जे बिडालबुध्दी । विक्रयें खाती द्रव्यनिधी । असेल जें जें प्रारब्धीं । तैसें कन्येचें होईल ॥७८॥
न पाहती वय सीमा । कुल विद्या आणि आरामा । कन्या विक्रयीं अधमाधमा । अधोगती होतसे ॥७९॥
कित्येक धनानें भुलले । अधर्माचे पाये घातले । कुलवंत सात्विक भले । विरळा शोधी ॥८०॥
असो ऐसी लोकस्थिती । नोवर्‍या सांगोन येती । लिंगोपंत विचारी चित्ती । वधू कैसी योजावी ॥८१॥
मातुल गृहीचे आचार । संतती करित अंगिकार । जाणोनि हा आधार सुक्ष्म दृष्टी न्याहाळी ॥८२॥
कुलवंत बुध्दिवंत । आचार शील दयावंत । विवेकी आणि भागद्भक्त । असतां भली ॥८३॥
अधर्मे धन मेळविती । धार्मिकांचा आंव घालिती । धना पाहुनी भुलती । कितीएक ॥८४॥
अथवा धनाचे मदभारें । वागती नाना कुविचारें । म्हणोनि सूक्ष्म विचारें । निरीक्षण करी ॥८५॥
दैवयोगें दारिद्य आलें । नीतीनें पाहिजे भोगिलें । कुनीती करितां गेलें । श्रेष्ठत्व कुळाचें ॥८६॥
पूर्वजांची महाव्याधी । क्वचित्‍ संततीसी बाधी । यास्तव तो सूक्ष्मबुध्दी । शोधितसे ॥८७॥
वाघमारे कलढोणकर । सात्विक सज्जन इनामदार । नारायणकन्या उपवर । निश्चित केली ॥८८॥
विवाह समारंभ केला । वधूप्रवेश गृहीं झाला । गीतानामें पाचारिती जिला । उभय कुलोध्दारक ती ॥८९॥
लिंगोपंत वृध्द झाले । प्रपंच करोनि थकले । रावजी हातीं काज दिलें । नीति न्यानें । सांभाळी ॥९०॥
मज आलें वृध्दपण । हरि-चिंतना वाचूनि जाण । आतां काज नसे अन्य । उचित बापा ॥९१॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते द्वितियाध्यायांतर्गत । प्रथमसमास ओवीसंख्या ९१
॥ श्रीगुरुनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीरामसमर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP