श्रीगणेशायनम: । श्रीरामसमर्थ ।

भाविक जना सुविचार । न सुचे इह आणि पर । म्हणोनी सद्‍गुरु अवतार । ईशेच्छेनें लाधला ॥१॥
महाराष्ट्रीं माण देशीं । परम पवित्र ब्राह्मणवंशी । अवतरले पुण्यराशी । सद्‍गुरुराय ॥२॥
माता पितया आनंद झाला । अंतर्निष्ठांनीं ओळखिला । कार्यकर्ता पुण्य भला हनुमदंश ॥३॥
बालपणीं क्रीडा ज्याची । देवतार्चन पूजेची । आवडी वृध्द सेवेची । सकलां प्रिय ॥४॥
जनव्यवहारें शिकों घातलें । उपजत ज्ञान ज्याला लाधलें । लोकाचारें वर्तलें । पाहिजेच कीं ॥५॥
करिती मौंजी विवाहादिक । मातापिता पुरविती कौतुक । प्रपंचभार वाहील चोख । म्हणती सुपुत्र आमुचा ॥६॥
लोकाचारें वर्तविती । क्षुद्रवृत्तीसी लाविती । सांभाळी आपुली वृत्ती । उपदेशिती पुत्रस्नेहें ॥७॥
महतकार्य आणोनि चित्ती । जनासारिखें वागती । सूक्ष्मदृष्टी न्याहाळिती । स्थिती सर्व ॥८॥
कळवळा उपजला पोटीं । अज्ञानें होय हानी मोठी । उत्तम देह पावोनि शेवटीं । अधोगती चालले ॥९॥
कर्महीन भक्तिहीन । श्रध्दाहीन विवेकहीन । आर्जवें निर्वाह करोन । राहती निरुपायें ॥१०॥
सन्मार्गी लावावे यांसी । करुणा उपजली मानसीं । कार्यारंभीं भगवंतासी । आपुलेसें करावें ॥११॥
भगवत्कृपेवांचून कांहीं । केवळ प्रयत्नें सिध्दी नाहीं । समर्थे दासबोधी पाहीं । कथिलें असें ॥१२॥
धरिला मनुजाऽवतार । तैसाचि आचारविचार । साधनी झिजविलें शरीर । साधक वृत्तीं ॥१३॥
व्हावया आत्मज्ञान । सद्‍गुरूसी रिधाले शरण । सेवा केली अतिगहन । गुरुकृपा संपादिली ॥१४॥
केली बहूत साधनें तोडिली सकल बंधनें । श्रीरामाचे दर्शनें । धन्य झाले ॥१५॥
सद्‍गुरु बोलती वचन । दुर्धर कली वाढला गहन । जीव आज्ञानी मतिहीन । रामभजनीं लावावें ॥१६॥
लोक संग्रह करावा । प्रपंच थोर वाढवाया । अडवा भुलला बोधाया । युक्तिप्रयुक्तीं ॥१७॥
नाना प्रापंचिक व्यवसाय । पुरवोनि दावी भजन सोय । बुड्त्यासी तरुणोपाय । सुचवीत जावें ॥१८॥
आज्ञा वंदोनि शिरीं । गुरुसेवा केली पुरी । निघाला भक्त कैवारी । जगदुद्वरा कारणें ॥१९॥
सिध्द्पणें विचरती । भूमंडळीं नाना तिर्थी । सूक्ष्मदृष्टीं अवलोकिती । स्थिति सर्व ॥२०॥
जागोजागीं स्थापिलें मठ । भजनीं लाविले भाअविक खट । सुलभोपायें दाविली वाट । परमार्थाची ॥२१॥
प्रपंच करोनि अलिप्त । अध्यात्म ज्ञानें समाधान देत । तापत्नयांतूनी काढित । असंख्य नर ॥२२॥
ज्याचा जैस अधिकर अ। तैसें साधन लहानथोर । दावूने भवसिंधू पार । पावविती ॥२३॥
शांति जयांची आगळी । कल्पांतीही न डळमळीं । स्वानंदस्थिती जी निराळी । न होई कदापि ॥२४॥
भक्त कामना पुरविती । देह दु:खें दूर करिती । भूतपिशांचें नेणों किती । उध्दरिलीं दर्शनमात्रें ॥२५॥
असंख्य धेनू पाळिल्या । कसाया पासोनि सोडविल्या । तैशा कित्येकांसी त्या दिधल्या । पाळावयां कारनें ॥२६॥
नित्य होतसे अन्न्दान । असंख्य तृप्त होती जन । अन्नपूर्णा स्वयें येवोन । अन्नपूर्ती करितसे ॥२७॥
नास्तिकांचे समाधान । साक्षात्कारें करिती पूर्ण । भक्तिपंथा लाउनि जाण । दुष्ट पातकी उध्दरिले ॥२८॥
सकलांठायी समदृष्टी । आपपर भाव नय पोटीं । दर्शनें चरणीं पडे मिठी । पूज्यभाव प्राप्त होय ॥२९॥
क्षणएक घडतां संगती । आनंद न समाये चित्तीं । नयनीं अश्रुपूर लोटती । गुरुचरण क्षालना ॥३०॥
शिष्य संप्रदाय वाढला । स्त् शिष्या स्वाधिकार दिला । रामनामाचा गजर केला । भूमंडळीं ॥३१॥
नास्तिकां लाविलें सुवाटें । ज्ञानियांचे मोडले ताठे । अज्ञानियां भक्ति पेठे । नेऊनि बैसविले ॥३२॥
स्वयें बहुत तारिले । शिष्याकरवीं उध्दरिले । राममंदिरा स्थापिलें । जागजागीं ॥३३॥
सर्वत्रांसी आज्ञा एक । रामनाम घ्या नि:शंक । सुख होईल ब्रह्मांदिक । वांछिती जें ॥३४॥
ऐसें बहूत कार्य केलें । तंव देहा क्षीणत्व आलें । स्वस्वरुपी मीनले । पंचकोश सांडोनी ॥३५॥
वद्य दशमी मार्गशीर्षमास । समाधीचा पुण्य दिवस । येती जें दर्शनास । सद‍गुरूधामीं ॥३६॥
तयां समाधान होय चित्ती । सेवा करितां सायुज्य प्राप्ती । वारी करितां कामना पुरती । भाविकांच्या ॥३७॥
ऐसें हें अगाध चरित्र । श्रवणें होईजें पवित्र । पूर्वपूण्य असेल सूत्र । तरी आवडी श्रवणाची ॥३८॥
श्रवण करावें एक चित्तें । अर्थे विवरावें तयातें । तोडोनिया बंधनातें । सिध्द चालीं चालावें ॥३९॥
तंव श्रोतें केला प्रश्न । स्वल्पसंकेतें दाविली खूण । तेणें तृप्त न होती श्रवण । विशद करावें ॥४०॥
कोण देश कोण धाम । कोणे कुळीं घेतला जन्म । गुरुलीला पावन परम क्क्क्क्क। सविस्तर सांगावी ॥४१॥
गुरू परंपरा विस्तार । कैसा केला जगादुध्दार । भक्त कोण थोर थोर । गुरु कृपा पावले ॥४२॥
कैसें साधन कैसे भजन । दु:खमुक्त झाले कोण । कैसे केलें अन्नदान । कथन करावें ॥४३॥
मंदिरे स्थापिली किती । गोरक्षणाची कैसी स्थिती । कैसी अवतार समाप्ती । स्पष्टोक्ती सांगावी ॥४४॥
वक्ता बोले जी वचन । गुरुलीला परम गहन । मी तव असे अज्ञान । वर्णू न शके ॥४५॥
परी कृपा केलिया गुरुनाथें । असाध्य तें साध्य होतें । वंदूं चरण एकचित्तें । श्रीसद्‍गुरूंचे ॥४६॥
कृपाप्रसाद वोळेल जरी । पुढील अध्यायीं सविस्तारीं । अंतरी राहोनी विवरी । सद्‍गुरुस्वामी ॥४७॥
इतिश्री सद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंद सोहळा । पुरविती रामदासी यांचा लळा । कृपाकटाक्षें ॥४८॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गत । अवतारमालावर्णनं नामचतुर्थ : समाप्त :
॥ श्रीगुरुनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीरामसमर्थ ॥
॥ इति प्रथम अध्याय समाप्त ॥


N/A

References : N/A
Last Updated : October 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP