श्रीगणेशायनम: । श्रीरामसमर्थ ।
कलियुग प्राप्त झालें । जाणिवेसी विसरलें । आपत्तीनें व्यापिले । सर्वजन ॥१॥
अल्पायुषी झाले प्रथम । तेजोबलहीन परम । बुध्दीस पडाला भ्रम । सत्यासत्य कळेना ॥२॥
स्वात्मसुखा नेणती । देहसुखा वाढविती । चुके मार्ग ऐसे चित्तीं । नाणिती कदां ॥३॥
देहा चाळवी चैतन्य । तया ओळखितां अनन्य । चित्‍ सौख्य लाभे पूर्ण । सर्वभावें ॥४॥
आत्मज्ञान विसरले । साधनांसी अव्हेरिले । बाष्कळपणें बोलूं लागले । अन्योन्यासी ॥५॥
बहुतेकीं धर्म सोडिला । भरतभूमीं कांही राहिला । सत्‍ पुरुषें रक्षिला । वेळोवेळां ॥६॥
कलियुगाचे अंतीं । अधर्मे ग्रासेल जगती । बीज रहावया निश्चिती । अवतार होय ॥७॥
आपत्काळी कृषीवल । बीज रक्षणी दक्ष केवळ । तोचि सुज्ञ सुशील । स्थिरबुध्दी ॥८॥
भरतभूमीं पुण्यदेश । सात्विकां सहाय विशेष । आत्मोन्नति व्हावयास । अनुकूल असे ॥९॥
अगणित पिकें धरणीं । नाना तीर्थे उत्तम पाणी । म्हणोनियां भववंतांनी । धर्म येथेंची रक्षिला ॥१०॥
जैसे जैसे दिवस गेले । तैसे अधर्मे ग्रासिलें । म्लेंच्छ उदंड वाढले । हिंसाधर्मी ॥११॥
तीर्थे क्षेत्रें भ्रष्टविलीं । देवालये उध्वस्त केलीं । गोवधाची झाली । परमसीमा ॥१२॥
धार्मिकांसी भ्रष्टविती । सध्दर्मासी निंदीती । बहुत प्रकारें छळिती । भाविकांसी ॥१३॥
सत्यधर्म सनातन । याचें करावया रक्षण । गोदातीरी हनुमान । अंशरुपें अवतरले ॥१४॥
रामदास नामें भले । भक्ति ज्ञाने चकित केलें । रामें येवोनी उपदेशिले । वायुनंदन साह्य करी ॥१५॥
विवाहकाळी सावधान । म्हणतां तोडिले गृहबंधन । केलें बहूत अनुष्ठाण | श्रीरामा तोषविलें ॥१६॥
कुरवाळोनि भक्तासी । आज्ञा देती दक्षिण देशी । जावोनि शिवरायासी । साह्य करावें ॥१७॥
शिव स्थापील राजसत्ता । वाढवावें त्वां भक्तिपंथा । सध्दर्मा लावावें समस्तां । मलिन झाले ॥१८॥
आज्ञा वंदोनिया शिरीं । पावले स्वामी कृष्णातिरी । महाराष्ट्र देशाभीतरीं । वास केला ॥१९॥
स्वतेजें प्रकाशती । नाना चमत्कारातें दाविती । उपासना दुमदुमविती । समुदाय थोर मेळविला ॥२०॥
रामनामाच्या धडधडाटें । महाराष्ट्रदेशी अंबर फाटे । रघुवीर समर्थ म्हणोनि नेटें । भक्तजन गर्जती ॥२१॥
शिवरायास कळली मात । सद‍गुरू रामदास समर्थ । पावले अधर्म छेदनार्थ । दक्षिणदेशी ॥२२॥
स्वामी दर्शनाचे आशें । धुंडाळी वनें प्रदेशें । संत भेटी अनायासें । होईल कैसी ॥२३॥
तळमळ लागली मोठी । अनुताप उपजला पोटी । मग समर्थ चरणीं मिठी । दृढ केली ॥२४॥
उभयतांसी संतोष झाला । शिवाजी रुपें शिव आला । उपदेश वचनें बोधिला । धन्य धन्य म्हणोनी ॥२५॥
सेवेच्छा दावी नृपती । स्वामी बोलती तयाप्रती । तुज सेवाही निश्चिती । धर्मरक्षणाची ॥२६॥
राजधर्म केला कथन । दुर्जनें गांजिले जन । स्त्रियागाई ब्राह्मण । रक्षण करी ॥२७॥
श्रीकृपेवांचोनी खटपट । ती पोंचट आणि लटपट । राम उपासनेची लगटा । करित असावी ॥२८॥
भगवतकृपा होतां पाही । जगीं दुर्मिळ नसे कांही । यास्तव रामभक्ती लवलाही । केली पाहिजे ॥२९॥
विरक्त होऊनि शिवराज । स्वामिचरणीं अर्पितां राज्य । दास म्हणती आम्हां गरज । नसे याची ॥३०॥
जोहार मोडोनि रामराम करवी । मारुती स्थापी गांवोगांवीं । भगवा झेंडा जगीं मिरवी । हिंदुत्वाचा ॥३१॥
दासबोध वीसद्शक । केला ग्रंथे अध्यात्मिक । विवरितां इहपर सुख । प्राप्त होय ॥३२॥
मनाची शतें आदि करोनी । कविता लिहिली अमोल वाणी । की ही ब्रह्मरसाची खाणी । शब्दरुपें दाविली ॥३३॥
काष्टाच्या खडावा पायांत । कुबडी स्मरणी हातांत । कौपीन मेखला भगवी शोभत । खांद्यावरी ॥३४॥
भृकुटीं आवाळूं वागविती । जटाभार दिव्य कांती । द्वादश मुद्रा शोभती । गिरिकंदरीं नित्यवास ॥३५॥
शिष्य संप्रदाय वाढला । शिवबा निजधामा गेला । स्वामींनीं निरोप घेतला । ज्योतीस ज्योत मिळाली ॥३६॥
सज्जनगड समाधिस्थान । स्थापिलें श्रीरामाचें ठाण । नित्य पूजन अन्नदान । होत असे ॥३७॥
ऐसा काळ बहुत गेला । कांही कार्यभाग चालिला । दिवसेंदिवस कली वाढला । अधर्मे जाळें पसरिलें ॥३८॥
जैसा जैसा कली वाढे । तैसें धर्मा क्षीणत्व जडे । शहाणेंच होती वेडे । कलिधर्मे ॥३९॥
म्लेंच्छ सत्ता उडाली । मराठेशाही कांही चालली । पुढें साहेबी आली । सृष्टिनियमें ॥४०॥
म्लेंच्छे छळोनि भ्रष्टविलें । मध्यें कांहींसें रक्षिले । परधर्मापाठीं लागले । अजाणपणें ॥४१॥
सनातन धर्मी लोकां । अध्यात्मविद्या मुख्य जे कां । तदनुरोधें आचारादिका । नियमन केलें ॥४२॥
उत्तम क्वचित लाभतें । मिळवाया कष्टावें लागतें । तनुमनधन वेचावेंते । तरीच जोडे श्लाध्यता ॥४३॥
आधीं कष्टानें मिळतें क। विषम काळीं दुर्लभ होतें । चित्ता मलिनता येते । विवेका ठाव नाही. ॥४४॥
वडिलें शुध्द ज्ञानाचा धडा । शिकाया घातला आचार गाढा । परी निष्फळ वाटे मुढां । सांडिलीं साधनें ॥४५॥
क्षणा एक वाटतें चित्ती । शुध्द बीज मिळवावें हाती । प्रयत्ना सांडिले वृत्तीं । विषयालस्यें ॥४६॥
आंबट म्हणूनी टाकिली । जंबुका ऐशी वृत्ती झाली । जनता सैराट धावली । प्रवृत्ति -ज्ञान शोधाया ॥४७॥
ज्ञानामाजीं दोन भेद । प्रवत्ति निवृत्ति असे विशद । निवृत्ति-ज्ञानें सकल साध्य । होत असे ॥४८॥
प्रवृत्ति -ज्ञान भेदयुक्त । देह्द सुखातें वाढवित । संपत्ति बलातें देत । सुख सोई ॥४९॥
जें नाशिवंत गणलें । वेदासवें गुप्त झालें । सत्य कांहीसें राहिलें । निवृत्तिज्ञान ॥५०॥
सत्य राजे शाश्वत । दृश्य तें तें अशाश्वत । चौदा चौसष्टींची मात । बुडत गेलीं ॥५१॥
कांहींसा वेद राहिला । स्तुतिनीति रुपें उरला । प्रवृत्ति -मार्ग बुडाला । सर्वस्वेसी ॥५२॥
विप्र केवळ धर्ममूर्ती । क्षत्रिय तयांतें रक्षिती । वैश्य शुद्र संगतीं तरती । ऐशी स्थिती बुडाली ॥५३॥
विप्र क्षत्रिय पुढारा । वता लागले अनाचारी । वैश्यें शूद्रेंही त्यापरी । कृषि सेवा सोडिली ॥५४॥
वर्णाश्रमधर्म बुडाला । आत्मोन्नतीचा मार्ग खुंटला । धर्म शास्त्रा नाही उरला । भूमंडळीं ॥५५॥
घरची कुलवधू टाकिली । कुलटा हवीशी वाट्ली । तिचे ठायी रंगूं लागली । वृत्ति जयांची ॥५६॥
अधो मार्गाचे दीपक । म्हणती आंम्ही सुधारक । स्वैर आचाराचें सुख । वाटों लागलें ॥५७॥
व्हावया चित्तशुध्दी । वेद प्रणित क्रियाविधी । आचरितां भवनदी । तरोनि जाय ॥५८॥
चित्तशुध्दी होय जैशी । प्राणी पावती जन्मासी । उच्चनीच वर्णासी । योग्य ते सरिसें ॥५९॥
वर्णाश्रमधर्मे वर्ततां । चित्तां येतसे शुध्दता । म्हणोनि वेद आखितां । यथाक्रमें जाहला ॥६०॥
क्वचित कोणी भाग्यवंत । भक्तिबळें शिखरा जात । क्रमाक्रमानें चालत । बहुतेक जन ॥६१॥
कांही उफराटे चालती । नीच योनीप्रति जाती । कलिधर्मे बहुतांची वृत्ती । मागें धांवे ॥६२॥
कर्महीन झाले सकळ । गेलें आयुष्य आणि बळ । मुमुक्ष पडिलें विकल । अंधत्व आलें ॥६३॥
भविष्य जाणोनि भगवंतें । सोपे सुलभ मार्गातें । दाविलें नाम एक चित्तें । स्मरतां सकलसिध्दी ॥६४॥
उच्चनीच सर्व याती । नाम स्मरतां मुक्त होती । चित्तशुध्दी आणि भक्ती । प्राप्त होय ॥६५॥
अज्ञ विकल्पी दुराचारी । अशांसही नाम तारी । पातकाची नुरे उरी । ज्ञानबोधें ॥६६॥
कलियुगीं साधन श्रेष्ठ । इतर साधनीं बहुकष्ट । अधिकारयुक्त कर्मनिष्ठ । उरला नाहीं ॥६७॥
परी मुमुक्षूची तळमळ । न जाय अंतरीचा मळ । संतीं दाखविला सोज्वळ । भजन मार्ग ॥६८॥
नेणती स्वधर्म कर्म । करूं जातां चुकें वर्म । उभय हानी कष्टि परम । समाधान नाहीं ॥६९॥
यास्तवसाधुजनीं । बहुतां लाविलें भगवत्भजनीं । ज्ञानेश्वत आदि करोनी । सिध्द पुरुषें ॥७०॥
बहुतेकीं आदरिलें । कर्मठांनीं अव्हेरिलें । कर्मही सांग न झालें । कलिधर्मे ॥७१॥
भजनमार्ग आजिचा नव्हे । चहुयुगीं सारखा स्वभावें । स्वयें आचरिला सदाशिवें । समाधान पावावया ॥७२॥
आचार भ्रष्ट जाहलें । मंत्र सामर्थ्य कांहीं न चालें । समाधान दुरी राहिलें । निश्चयेसी ॥७३॥
वेद गेले भजन गेलें । अभिमान डोहीं बुडाले । उभयपक्षीं नागवले । सर्वस्वेसी ॥७४॥
अन्न न मिळे उदरपुतीं । अंगिकारिली शुद्रवृत्ती । नीचयाती हेवा करिती । समसाम्यें ॥७५॥
नास्तिक झाले प्रबळ । गुरुत्व ज्ञान तपोबळ । लया जावोनि केवळ । आभिमानी राहिले ॥७६॥
सामर्थ्य नसतां सत्ता । कोणी न मानी तत्वतां । अपमान उपहास्यता होऊं लागली ॥७७॥
ऐसी उभयपक्षीं हानी । स्वधर्म दिधले टाकोणी । उदरपुर्ती वांचोनी । अन्य साधनें राहिलीं ॥७८॥
थोर कुळें हीनत्वां आलीं । नाना आपत्तीने ग्रासिलीं । आहार विहारें भ्रष्टलीं । कितीएक ॥७९॥
या कारणें जाहला अवतार । अवलोकिती आचार । सुलभ साधनीं नर अपार । रामभजनीं लाविलें ॥८०॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गत तृतियसमास: ओंवीसंख्या ८०
॥ श्रीगुरुनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीरामसमर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP