सार्थपिड्गलछन्द:सूत्र -अध्याय सहावा

सार्थपिड्गलछन्द:सूत्र


यतिर्विच्छेद: ॥१॥
‘विच्छिद्यतेऽत्रेति विच्छेद:’ म्हणजे पठणास सुलभ जावें म्हणून जेथें पदपाठ विघटित होतो त्या वृत्ताच्या स्थानास यति म्हणतात. अर्थात्‍ वृत्तपठन सुकर व्हावें व ऐकण्यासहि बरें लागावें म्हणून त्याच्यामध्यें समुद्रादि (४) अक्षरांवर ज्या किंचित्‍ थांबण्याच्या जागा ठरविलेल्या आहेत त्या यति होत. जेथें विशेष सांगितला नसेल तेथें पादाच्या शेवटींच यति जाणावा. सूत्रवचनाशिवायही, म्हणणारा आपल्या सोयीप्रमाणें मध्यें मध्यें यति करतो. ह्या यतिसंबंधीं सर्व सामान्य सिद्धान्त भट्टहलायुधाच्या छन्दोवृत्तींत सविस्तर दिले आहेत. जरी ग्रन्थविस्तार होत आहे तथापि ते नियम नवीन काव्यरचनेस अत्यन्त उपयुक्त असल्यामुळें येथें सार्थ देतों.
‘यति: सर्वत्र पादान्ते श्लोकार्धे तु विशेषत: । समुद्रादिपदान्ते च व्यक्ताव्यक्तविभक्तिके ॥१॥
क्वचित्तु पदमध्येऽपि समुद्रादौ यतिर्भवेत्‍ । यदि पूर्वापरौ भागौ न स्यातामेकवर्णकौ ॥२॥
पूर्वान्तवत्स्वरसंधौ क्वचिदेव परादिवत्‍ । एष्टव्यो यतिचिन्तायां यणादेश: परादिवत्‍ ॥३॥
नित्यं प्राक्पदसंबद्धाश्चादय: प्राक्पदान्तवत्‍ । परेण नित्यसंबद्धा: प्रादयश्च परादिवत्‍ ॥४॥
ह्या कारिकांचे अर्थ अनुक्रामानें देतों. सर्व श्लोकांच्या पादान्तीं यति म्हणजे विसाव्याची जागा अवश्य आहे; श्लोकांचे अर्ध संपल्यावर तर, विशेष म्हणजे विभक्तिस्वरुप स्पष्ट दिसणारा पूर्ण यति करावा. तसेंच पादमध्यांत समुद्र, ऋतु वगैरे सूत्रोक्त अक्षरांच्या शेवटींही यति करावा. मग त्यांतील विभक्ति स्पष्ट असो किंवा लुप्त असो, म्हणजे त्या अक्षरावर समासांतील पूर्वपदच संपत असलें तरी चालेल. अशा ठिकाणीं ‘सुपो धातुप्रातिपदिकयो:’ ह्या पाणिनीयसूत्रानें समासमध्यस्थविभक्तीचा लोप होत असल्यानें ती विभक्ती अव्यक्त असते. जसें, ‘कश्चित्कान्ता - विरहगुरुणा स्वाधिकारप्रमत्त:’ ह्या मन्द्राक्रान्तावृत्तांत चवथ्या अक्षरावर यति पाहिजे. परंतु ह्या उदाहरणांत कान्ताविरह समासापैकीं कान्ता हें पूर्वपदच म्हणजे अव्यक्त विभक्तिक पद यति-स्थानीं समाप्त झालें आहे; अशी स्थितिही चालते. पहिल्या व तिसर्‍या चरणाच्या शेवटींहि असला पदमध्यस्थ यति क्वचित्‍ चालतो. परंतु अर्धान्ती असा यति चालत नाहीं. तेथें विभक्ति व्यक्तच पाहिजे ॥१॥
क्वचिस्थलीं असमस्त अशा एका पदांतसुद्धां, समुद्रादि सूत्रोक्तवर्णावर व पहिल्या व तिसर्‍या पादाच्या शेवटीं यति होऊं शकतो. परंतु त्या पदाचे पूर्व व पर (पुढचा) भाग एकाक्षरी होतां उपयोगी नाहीं. जसें, ‘वन्दू नारा-यणचरण ते भुक्तिमुक्तिप्रदाते’ हाही मन्दाक्रान्तावृत्ताचाच पाद आहे व ह्यांत चौथ्या अक्षराच्या शेवटीं एका पदांतही यति केला आहे. कारण पदांतील पहिला भाग नारा व दुसरा भाग यण हे, एकवर्णी नाहींत म्हणून हा यति ठीक आहे. येथें यतिभंगाचा दोष येत नाहीं. येथेंच ‘वन्दावे ई-श्वरचरण ते’ असे रचल्यास यतिभंग होईल. कारण यतिस्थानींचा ई हा पहिला पाभगाग, एकाक्षरी पडतो ॥२॥
यतींचा निश्चय ठरवितांना संधि (स्वरांचे जोड) हे पूर्वपदाचे अन्त्यावयव ठरवावे. मात्र ‘इको यणचि । ह्या पाणिनीय सूत्रानें होणारा यणादेशरुपी संधि हा पुढच्या पदाचा पहिला अवयव समजावा. इ, उ,ऋ,लृ हे स्वर र्‍हस्व किंवा दीर्घ असून त्यांच्यापुढें तद्भिन्न स्वर आले असतां त्यांचे जागीं अनुक्रमानें य्‍ व्‍ र्‍ ल्‍ असे आदेश (बदली) होतात; असा ‘इको यणचि’ ह्या सूत्राचा अर्थ आहे. असो, नियमाचीं उदाहरणें देतों. ‘वन्दा दु:खौषधि-हरिपदा भक्तविश्रामधामा’ ह्या मन्दाक्रान्तेच्या चरणांत, दु:खौषधि ह्यांतला औ हा संधि, ‘पूर्वान्तवत्स्वरसंधौ’ ह्या नियमानें पूर्वपदाचा अन्त्यावयव धरल्यानें, ‘क्वचित्तु पदमध्येऽपि समुद्रादो यतिर्भवेत्‍ ।’ ह्या नियमानुसार यतिभंगाचा दोष येत नाहीं. ‘वन्दा गौर्यड्घ्रिसरसिरुहा भक्तविश्रामधामा ।’ असा पाद रचल्यास, ‘एष्टव्यो यतिचिन्तायां यणादेश: परादिवत्‍ ।’ ह्या नियमाप्रमाणें गौर्यड्घ्रि हा यणादेश पुढच्या पदाचा आद्यावयव असून तो एकटाच (एकाक्षरी) यतिभागांत शिरला आहे, या कारणानें ‘यदि पूर्वापरौ भागौ न स्यातामेकवर्णकौ’ ही अट सांभाळली जात नाहीं. म्हणून यतिभंगाचा दोष येतो. ॥३॥
यतीचा निर्णय करणें असतां नेहमी पूर्वपदाशीं चिकटून रहाणारेच, वा वगैरे शब्द पूर्वपदाचेच अन्त्यावयव समजावे आणि नेहमी पुढच्याच पदाशीं संबद्ध असणारे प्र, निर्‍, आ वगैरे उपसर्ग पुढच्या पदाचे आद्यावयव समजावे. च, वा वगैरे शब्द व उपसर्ग ह्यांचे प्रयोग बहुधा संस्कृतांतच होत असल्यानें त्या चौथ्या कारिकेची उदाहरणें संस्कृतांतच रचून देतों.   
त्यावरुन मराठींतील, ‘हि’ वगैरे पूर्वपदसंलग्न व प्र, सम्‍ वगैरे परपदसंलग्न शब्दांविषयी निर्णय करुन घ्यावा. उदाहरण, ‘मृतो मनुष्यो वा नागो, वा बभाषे युधिष्ठिर:’ हें अनुष्टुपाचें अर्ध आहे. ह्यांतील दुसरा वा, हा संस्कृत भाषेच्या स्वभावाप्रमाणें मागल्या पदाचा अन्त्यावयव मानला पाहिजे; तो एकाक्षरी असून दुसर्‍या चरणांत शिरल्यामुळें यतिभंग झाला. ‘मृतो नरो वा नागो वा’ ‘लभस्व बुद्धि विद्यां च’ असे अनुष्टुप्‍ चरण रचल्यास निर्दोष होतील. ‘अनेन वन्दनेन प्र-सन्नो भव महेश्वर’ हेंही अनुष्टुप्‍चेच अर्ध आहे. ह्यांत नित्य परपदसंबद्ध म्हणजे क्रियापदसंबद्ध असणारा ‘प्र’ हा उपसर्ग, चौथ्या कारिकेप्रमाणें पुढच्या पदाचा आद्यावयव मानिला पाहिजे, परंतु तो एकटाच पहिल्या चरणांत शिरल्यामुळें यतिभंग झाला. ‘अनेन वन्दनेन त्वं प्रसन्नो भव शंकर’ असें श्लोकार्ध रचलें तर तें निर्दोष होईल. ‘गोविन्द आणि गोपाळ-हि गेले पुण्यपत्तनां’ ‘भावें शरण जावें सं-सारतारक ईश्वरां’ ह्या मराठी श्लोकार्धातून, वरच्या नियमाप्रमाणें यतिभंग होतात म्हणून अशी रचना करु नये. आधुनिक पुष्कळ कवींना हे यतिनियम माहीत नसल्यामुळें ते भलत्याच ठिकाणीं यतिभंग करतात. तसेच कित्येक अनभिज्ञ टीकाकारही अज्ञानामुळें, यतिभंगाचे नसणारे दोषही, बिचार्‍या कवींच्या माथीं मारतात. त्या दोघांनाही ह्या यतिविषयक प्रासंगिक विवरणापासून बराच फायदा होईल अशी आशा आहे. ह्या व सूत्रोक्त यतिकथनाशिवाय पद्य म्हणण्यास व ऐकण्यास सुखकारक असे अधिक यति (पदविश्राम) ही मागच्या व पुढच्या वृत्तांतून व नवीन काल्पनिक वृत्तांतूनही, शिष्टसम्मत व परंपरागत असल्यास मानण्यास हरकत नाहीं. कारण हें वर्णन दिग्दर्शक आहे. निदान हें एवढें विवरण तरी लक्षांत ठेवावें. पुढच्या सूत्रांतून अनेक ठिकाणीं यत्यक्षरांचा निर्देश करायचा असल्यामुळें प्रारंभीच हें यतिलक्षणाचें सूत्र रचलें आहे. असो. मागच्या अध्यायांत वक्त्र वगैरे प्रसिद्ध विषमवृत्तें सांगितलीं. तशींच ‘अर्धे’ ह्या अधिकारापासून सुप्रसिद्ध अर्धसमवृत्तेंही सांगितलीं. आतां सूत्रकार गायत्रीचन्दापासून प्रारंभ करुन, त्या त्या छन्दांचीं अन्तर्गत अशीं लोकप्रसिद्ध समवृत्तें सांगण्यास प्रारंभ करतात. पुढें आठव्या अध्यायांत येणार्‍या प्रस्तारगणनेच्या दृष्टीनें पहातां, वृत्तांचा अन्तच लागण्यासारखा नाहीं. तथापि पूर्वाचार्याच्या वेळीं प्रसिद्ध असलेलीं कांहीं थोडीं वृत्तें, दिग्दर्शक म्हणून पिड्गलाचार्य सांगतात. वृत्तरत्नाकर वगैरे छन्द:सूत्रानंतरच्या ग्रन्थांतून, ‘गु:श्री:’ ‘गौस्त्री’ ‘मो नारी’ वगैरे एकाक्षरपादापासून पञ्चाक्षरपादापर्यन्तचीं वृत्तें प्रचलित नसावीं, असें वाटतें. शिवाय वैदिक छन्दांचा प्रारंभ षडक्षर पादापासूनच होतो म्हणून त्यानें त्यांच्या अनुसारानें षडक्षरपादाच्या गायत्रीछन्दापासूनच, लौकिकवृत्तांसही सुरवात केली असावी. असो, आतां गायत्रींतील प्रसिद्ध समवृत्त देतों. ॥१॥

तनुमध्या त्यौ ॥२॥
येथें ‘पाद:’ हें पद सामान्याधिकारानें आणून - सूत्रार्थ - ज्या वृत्ताच्या प्रत्येक पादांत तय (ऽऽ।, ।ऽऽ) असे गण येतात तें तनुमध्यावृत्त होय. उदाहरण, ‘रामा रघुनाथा । पायी तव माथा । पावें मज देवा । देई पदसेवा ॥१॥
(स्वकृत) । ह्या पुढच्या वृत्तांच्या उदाहरणांची ह्याप्रमाणेंच कल्पना करीत जावी. ह्या वृत्ताप्रमाणेंच जेथें विशेष यतिनियम सांगितला नसेल तेथें सर्वत्र पादान्तीं मात्र अवश्य यति (विसावा) करावा असा सिद्धांत आहे. ॥२॥
आतां सूत्रकार, सप्ताक्षर पादाच्या उष्णिक्‍ छन्दांतील प्रसिद्ध वृत्त सांगतात.

कुमारललिता ज्सौ ग्‍ ॥३॥
जिच्या पादांत, ज स ग (।ऽ।, ॥ ऽ,ऽ) असे गण असतात तिचें नांव कुमारललिता होय. ॥३॥
ह्यापुढें अनुष्टुप्‍ छन्दांतील प्रसिद्ध वृत्तें सांगतात.

माणवकाक्रीडतकं भ्तौ ल्गौ ॥४॥
ज्याच्या एकेका पादांत भ त ल ग असे गण असतात, त्या वृत्ताचें नांव माणवकाक्रीडतक होय. अर्वाचीन ग्रंथांत ह्याचें नांव माणवक असेंच आहे. ॥४॥

चित्रपदा भौ गौ ॥५॥
प्रत्येक पादांत, भ भ ग ग (ऽ ॥, ऽ ॥,ऽ,ऽ) असे गण येतात तिचें नांव चित्रपदा होय. ॥५॥

विद्युन्माला पादांत म म ग ग असे गण असतात ती विद्युन्माला जाणावी. (ऽऽऽ,ऽऽऽऽऽ,) ॥६॥

हंसरुतं म्नौ गौ ॥७॥
ज्याच्या पादांत, म न ग ग (ऽऽऽ, ॥ ।, ऽ, ऽ) असे गण येतात तें हंसरुत नांवाचें वृत्त जाणावें ॥७॥
आतां पुढें, नवाक्षरपादी बृहती छन्दांतील प्रसिद्ध वृत्तें येतील.

भुजगशिशुसृता नौ म्‍ ॥८॥
जिच्या पादांत, न न म असे गण क्रमानें येतात, तिचें नांव भुजगशिशुसृता होय. सापाच्या शिशुप्रमाणें जिचें सृत म्हणजे चलन आहे हें लक्षण गणक्रमांत दिसतें, म्हणून हें अन्वर्थ नांव आहे. भुजगशिशु प्रथम नीट लक्षण गणक्रमांत दिसतें, म्हणून हें अन्वर्थ नांव आहे. भुजगशिशु प्रथम नीट सरळ कांहीं चालून नंतर वळवळत चालतो. (I I I, I I I, ऽऽऽ). अर्थात्‍ भुजगशिशुभृता हें अर्वाचीन ग्रंथांतील नांव अयोग्य दिसतें. ॥८॥

हलमुखी नौंस्‍ ॥९॥
जिचा एकेक पाद ‘र न स’ ह्या गणांनीं बनतो ती हलमुखी होय. जेथें जमेल तेथें नावांची अन्वर्थता शोधावी. ह्याच्या गणांचा लघुगुरुन्यास नांगर व जोखड यांसारखा भासतो. ॥९॥
आतां सूत्रकार, दशाक्षरपाद पड्क्तिच्छन्दांतील सुप्रसिद्ध वृत्तें सांगतात.

शुद्धविराण्‍ म्सौ ज्गौ ॥१०॥
म स ज ग हे गण, अनुक्रमानें पादांत असल्यास तें वृत्त शुद्धविराट्‍ ह्या नांवाचें होतें. ॥१०॥

पणवौ म्नौ य्गौ ॥११॥
प्रत्येक पादांत, म न य ग असे गण क्रमानें असल्यास त्या वृत्ताचें नांव पणव होय ॥११॥

रुक्मवती भ्मौ स्गौ ॥१२॥
जिच्या पादांमध्यें, भ म स ग असे गण क्रमानें असतात ती रुक्मवती होय. ॥१२॥

मयूरसारिणी र्जौ र्गौ ॥१३॥
जिच्या पादांत अनुक्रमानें रज रग हे गण येतात ती मयूरसारिणी समजावी. ॥१३॥

मत्ता म्भौ स्गौ ॥१४॥
पादामध्यें म भ स ग असे गण आल्यास त्या वृत्ताचें नांव मत्ता असें जाणावें. ॥१४॥

उपस्थिता त्जौ ज्गौ ॥१५॥
जिच्या पादांत त ज ज ग असा गणक्रम असतो तिचें नांव उपस्थिता होय. ॥१५॥
आतां ह्यापुढें, अकरा अक्षरें चरणांत असणार्‍या त्रिष्टुप्‍छन्दांतली प्रसिद्ध वृत्तें सांगण्यास प्रारंभ करतात.

इन्द्रवज्रा तौ ज्गौग्‍ ॥१६॥
प्रत्येक पादांत त त ज ग ग असा गणक्रम असल्यास तें इन्द्रवज्रा नामक वृत्त जाणावे. ॥१६॥

उपेन्द्रवज्रा ज्तौ ज्गौग्‍ ॥१७॥
प्रत्येक पादांत ज त ग ग असे गण असतात तें उपेन्द्रवज्रावृत्त जाणावें. ॥१७॥

आद्यन्तावुपजातय: ॥१८॥
इन्द्रवज्रा व उपेन्द्रवज्रा ह्यांच्या पादांचें मिश्रण करुन चारी पाद रचल्यास त्या वृत्तांचें नांव उपजाति होय. ह्या समवृत्ताच्या प्रकरणांत उपजाति हें विषमवृत्त द्यावयाचें कारण लाघव होय. येथें लाघव म्हणजे थोडक्या ग्रन्थांत सूत्रें लिहावयाची सोय जाणावी. असो, वरच्या मिश्रणाचे एकंदर प्रकार प्रस्तारांनीं चौदा संभवतात. विद्वानांना मौज वाटेल म्हणून ते प्रस्तारप्रकार येथें देतो. ‘इ इ इ इ, उ इ इ इ, इ उ इ इ, उ उ इ इ, इ इ उ इ,  उ इ उ इ, इ उ उ इ, उ उ उ इ, इ इ इ उ, उ इ इ उ, इ उ इ उ, उ उ इ उ, इ इ इ उ उ, उ इ उ उ, इ उ उ उ , उ उ उ उ’ हा इ चा प्रस्तार आहे. इ म्हणजे इन्द्रवज्रेचा पाद व उ म्हणजे उपेन्द्रवज्रेचा पाद होय. वरच्या प्रस्तारापैकीं पहिला व शेवटचा प्रकार, अनुक्रमानें इन्द्रवज्रा व उपेन्द्रवज्रा हीं पूर्वोक्त समवृत्तेंच असल्यानें ते दोन सोडून मधले उरलेले चौदा मिश्रप्रकार त्या उपजाति जाणाव्या. कोणी लोक हें सूत्र उपलक्षण म्हणजे दिग्दर्शक मानून, किंचित्‍ भेद असलेल्या कोणत्याहि दोन वृत्तांच्या मिश्रणालाही उपजाति म्हणतात. त्यांच्या मतानें वंशस्थ व इन्द्रवंशा ह्या वृत्तांच्या मिश्रणानें व वार्तोमी आणि शालिनी ह्यांच्या मिश्रनानेंही वरीलप्रमाणेंच चौदा चौदा उपजाति होतील. अशाच दुसर्‍याही कांहीं वृत्तांच्या उपजाति जमतील. त्यांचा शोध करावा. ॥१८॥

दोधकं भौ भ्गौग्‍ ॥१९॥
प्रत्येक चरणांत भ भ भ ग ग असे गण असतात, तें दोधकवृत्त होय. ॥१९॥

शालिनी मतौत्गौ ग्‍ समुद्र ऋषय: ॥२०॥
जिचा पाद म त त ग ग ह्या गणांनीं युक्त असून समुद्र म्हणजे चार व त्यापुढें ऋषि म्हणजे सात ह्या अक्षरांवर यति (विश्राम) असतो ती शालिनी होय. ॥२०॥

वातोर्मी म्भौ त्गौग्‍ ॥२१॥
येथें वरुन ‘समुद्रऋषय:’ ही पदें आणून सूत्रार्थ देतों. जिच्या पादांत म भ त ग त असा गणक्रम असून शालिनीप्रमाणेंच चार व नंतर सात अक्षरांनीं यति असतो तें वृत्त वातोर्मीसंज्ञक होय. ॥२१॥

भ्रमरविलसिता म्भौ न्लौग्‍ ॥२२॥
येथेंही ‘समुद्रऋषय:’ ह्यांची अनुवृत्ति आहे. जिच्या पादांत म भ न ल ग असा गणक्रम असून चार व त्यापुढें सात अक्षरांनीं यति असतो ती भ्रमरविलसिता होय. ॥२२॥

रथोद्धता र्नौ र्लौग्‍ ॥२३॥
एकेका पादांत, क्रमानें र न र ल ग असा गणक्रम असल्यास तिचें नांव रथोद्धता होय. ॥२३॥

स्वागता र्नौ भ्गौग्‍ ॥२४॥
प्रत्येक चरणांत र न भ ग ग असे गण असल्यास ती स्वागता जाणावी. ॥२४॥

वृन्ता नौ स्गौग्‍ ॥२५॥
पादांत न न स ग ग असे गण असल्यास तें वृन्तानामक वृत्त जाणावें. वृन्त म्हणजे फुलाचा देठ. तसा अक्षरविन्यास भासतो. येथें मण्डूकप्लुतीनें (बेडकाच्या उडीची गति) ‘समुद्रऋषय:’ ह्यांची अनुवृत्ति आणून चार व सात अक्षरांनीं यति करण्याचा संप्रदाय आहे. म्हणजे ‘रघुपति-पदयुगला वंदा’ असें चरण रचावें. ॥२५॥

श्येनी र्जौ र्लौग्‍ ॥२६॥
जिच्या पादांत अनुक्रमानें, र ज र ल ग असे गण येतात ती श्येनी होय ॥२६॥

विलासिनी ज्रौ ज्गौग्‍ ॥२७॥
चरणांमध्यें ज र ज ग ग असा गणक्रम असल्यास तें विलासिनी नांवाचें वृत्त जाणावें. ॥२७॥

जगती ॥२८॥
हें अधिकारसूत्र असून ह्यापुढें हा सहावा अध्याय संपेपर्यंत ह्याचा अधिकार आहे. अर्थात्‍ ह्यापुढची वृत्तें जगतीछन्दांतील म्हणजे द्वादशाक्षरपादाची जाणावीं. ‘तोटकं स:’ वगैरे पुढें दिलेल्या कांही सूत्रांत एकच गणाचा निर्देश असल्यानें गणाक्षरें मोजून वृत्ताचा छन्द ठरवितां येणार नाहीं म्हणून येथें ह्या विशेषाधिकार सांगितला आहे. ॥२८॥

वंशस्था ज्तौ ज्रौ ॥२९॥
जिच्या पादांत ज त ज र असा गणक्रम असतो ती वंशस्था जाणावी. सूत्रानंतरच्या ग्रन्थांतून ह्याचेंच नांव वंशस्थविल किंवा वंशस्थ असें आढळतें. ॥२९॥

इन्द्रवंशा तौ ज्रौ ॥३०॥
प्रत्येक चरणांत त त ज र असे गण असतात तें इन्द्रवंशा वृत्त होय. ॥३०॥

द्रुतविलंबितं नभौ भ्रौ ॥३१॥
ज्याच्या पादांत न भ भ र असे गण क्रमानें येतात तें द्रुतविलंबितवृत्त जाणावे. पठनांत प्रथम द्रुति (घाई) व नंतर विलंब भासत असल्यानें हें नांव सार्थ आहे. ॥३१॥

तोटकं स: ॥३२॥
ह्या जगती छन्दाच्या पादांत सर्वच म्हणजे चारी सगणच असतात, तें तोटकवृत्त होय. ॥३२॥

पुटो नौ म्यौ वसुसमुद्रा: ॥३३॥
ज्याच्या पादांत न न म य असे गण क्रमानें असून वसु म्हणजे आठ व नंतर चार अक्षरांनीं यति असतो त्याचें नांव पुट होय. ॥३३॥

जलोद्धतगति र्ज्सौ ज्सौ रसर्तव: ॥३४॥
जिच्या पादांत जसजस असे गण असून सहा सहा अक्षरांनीं यति असतो तिचें नांव जलोद्धगति समजावें. ॥३४॥

ततं नौ म्रौ ॥३५॥
चरणामध्यें न न म र असा गणक्रम असल्यास त्या वृत्ताचें नांव तत होय. ॥३५॥

कुसुमविचित्रा न्यौ न्यौ ॥३६॥
जिच्या पादांत नय नय असे गण असतात ती कुसुमविचित्रा होय. ॥३६॥

चञ्चलाक्षिका नौ रौ ॥३७॥
पादांमध्यें न न र र असे गण असल्यास तिचें नांव चञ्चलाक्षिका होय. ॥३७॥

भुदड्गप्रयातं य: ॥३८॥
ज्या जगतीच्या पादांत सर्व म्हणजे चारी यगणच असतात तें भुजड्गप्रयात वृत्त होय. बहुतेक सुप्रसिद्ध रामदासी श्लोक ह्या वृत्ताचे आहेत. भुजड्गप्रयात म्हणजे सापाचें गमन; त्याप्रमाणें आकुंचन व प्रसरण अक्षरविन्यासांत भासतें म्हणून हें नांव अन्वर्थक आहे. ॥३८॥

स्त्रग्विणी र: ॥३९॥
जिच्या पादांत सर्व म्हणजे चारी रगणच असतात ती स्त्रविणी होय. ॥३९॥

प्रमिताक्षरा स्जौ सौ ॥४०॥
स ज स स असे गण चारी पादांत असल्यास तिचें नांव प्रमिताक्षरा होय. ॥४०॥

कान्तोत्पीडा भ्मौ स्मौ ॥४१॥
चरणांत भ म स म असे गण असल्यास ती कान्तोपीडा होय. ॥४१॥

वैश्वदेवी मौ याविन्द्रियऋषय: ॥४२॥
पदांत म म य य असे गण असून पांच व सात अक्षरांनी यति असल्यास त्या वृत्ताचें नांव वैश्वदेवी असतें. इंद्रियें पांच असून आदिऋषि सात हें सुप्रसिद्धच आहे. ॥४२॥

वाहिनी त्मौ म्यावृषि कामशरा: ॥४३॥
चरणांत त म म य असे गन असून सात व नंतर पांच (कामशर) अक्षरांनी यति असतो तिचें नांव वाहिनी होय. ‘अरविन्दमशोकं च चूतंच नवमल्लिका । नीलोत्पलं च पञ्चैते पञ्चबाणस्य सायका: ॥’ हे पांच कामशर पुराणप्रसिद्ध असल्यानें, कामशर, म्हणजे पांच असा अर्थ होतो. ॥४३॥

नवमालिनी न्जौ भ्याविति ॥४४॥
ज्याच्या चरणांत न ज भ य असे गण असतात त्या वृत्ताचें नांव नवमालिनी जाणावें. शेवटच्या इति शब्दानें येथें सहावा अध्याय संपला हें बोधित केलें. ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP