सार्थपिड्गलछन्द:सूत्र -अध्याय दुसरा

सार्थपिड्गलछन्द:सूत्र


‘छन्द:’ ॥१॥
हें अधिकारसूत्र असून सर्व शास्त्र संपेपर्यंत ह्याचा अधिकार आहे; म्हणून पुढच्या सूत्रांतून ‘छन्द:’ ही संज्ञा अनुवृत्त होते. येथें छन्द: - पदानें ठराविक अक्षरसंख्येनें युक्त असलेल्या छन्दाचें ग्रहण विवक्षित आहे. संस्कृत भाषेंत छन्द:शब्द नपुंसकलिंगी आहे. तथापि तो श्लोकाचा प्रतिशब्द म्हणून आम्हीअ बोधसौलभ्याकरितां पुढच्या भाषान्तरांत पुल्लिंगी बनवून, जागोजाग प्रयोग केला आहे, हें ध्यानांत ठेवावें.

गायत्री ॥२॥
हें देखील अधिकारसूत्र असून ह्याची अनुवृत्ति ‘जह्यादासुरी’ हें (सू.१३) सूत्र संपेपर्यंत जाते.

दैव्येकम्‍ ॥३॥
एकाक्षरस्वरुपी जें छन्द, त्याचें नांव दैवी गायत्री होय. जसें ‘ॐ’ हें दैवी गायत्रीचें उदाहरण आहे. आम्ही ह्यापुढें विस्तारभयास्तव, सर्वच सूत्रांचीं उदाहरणें देणार नसून विशेषस्थलीं मात्र नमुन्याकरितां देणार्स आहों. छंदांच्या लक्षणांचे अर्थ सविस्तर देऊं. त्यांचीं लक्ष्यें म्हणजे उदाहरणें, छंदांच्या लक्षणांचे अर्थ सविस्तर देऊं. त्यांची लक्ष्यें म्हणजे उदाहरणें, सर्वानुक्रमणी व काव्येंपुराणें ह्यामध्यें सांपडतील. ह्या सूत्राचा व पुढील कांहीं सूत्रांचा अर्थ स्पष्ट कळण्याकरितां, येथें प्रथम कोष्टक देऊन छंदांच्या वर्णाची संख्याही लिहितों.

छन्दोनाम - आर्षी
गायत्री - २४
उष्णिक्‍ - २८
अनुष्टुप - ३२
बृहती - ३६
पक्तिं - ४०
त्रिष्टुप्‍ - ४४
जगती - ४८

छन्दोनाम - दैवी
गायत्री - १
उष्णिक्‍ - २
अनुष्टुप - ३
बृहती - ४
पक्तिं - ५
त्रिष्टुप्‍ - ६
जगती - ७


छन्दोनाम - आसुरी
गायत्री - १५
उष्णिक्‍ - १४
अनुष्टुप - १३
बृहती - १२
पक्तिं - ११
त्रिष्टुप्‍ - १०
जगती - ९


छन्दोनाम - प्राजापत्या
गायत्री - ८
उष्णिक्‍ - १२
अनुष्टुप - १६
बृहती - २०
पक्तिं - २४
त्रिष्टुप्‍ - २८
जगती - ३२


छन्दोनाम - याजुषी
गायत्री - ६
उष्णिक्‍ - ७
अनुष्टुप - ८
बृहती - ९
पक्तिं - १०
त्रिष्टुप्‍ - ११
जगती - १२


छन्दोनाम - साम्नी
गायत्री - १२
उष्णिक्‍ - १४
अनुष्टुप - १६
बृहती - १८
पक्तिं - २०
त्रिष्टुप्‍ - २२
जगती - २४


छन्दोनाम - आर्ची
गायत्री - १८
उष्णिक्‍ - २१
अनुष्टुप - २४
बृहती - २७
पक्तिं - ३०
त्रिष्टुप्‍ - ३३
जगती - ३६


छन्दोनाम - ब्राह्मी
गायत्री - ३६
उष्णिक्‍ - ४२
अनुष्टुप - ४८
बृहती - ५४
पक्तिं - ६०
त्रिष्टुप्‍ - ६६
जगती - ७२

स्पष्टीकरण : -
बुद्धिबळांच्या पटाप्रमाणें चौसष्ट घरांचे एक कोष्टक व दिल्याप्रमाणें मांडून त्याच्या पहिल्या ओळीच्या डाव्या बाजूच्या पहिल्या घरांत आर्षी असें नांव लिहावें व त्याखालच्या सात घरांत क्रमानें दैवी, आसुरी वगैरे इतर गायत्रींचीं नांवें वर दिल्याप्रमाणें लिहावीं. आर्षी ह्या शब्दाच्या वर छन्दोनाम असें लिहून त्याच्यापुढें क्रमानें, गायत्री, उष्णिक्‍ वगैरे साती आर्ष (वैदिक) छन्दांचीं नांवें लिहावीं. ह्यानंतर ‘दैव्येकम्‍’ वगैरे सूत्रांनीं सांगितलेले आंकडे, त्या त्या नांवापुढच्या घरांतून भरावे, म्हणजे वर दिल्याप्रमाणे कोष्टक तयार होईल. दैवी ह्या नांवापुढील कोष्टकांत एक हा आंकडा प्रथम लिहावा. कारण तेंच (दैव्येकम्‍) ह्या गणनेचें पहिलें सूत्र आहे. ह्यापुढें “आसुरी पञ्चदश" वगैरे सूत्रांतील आंकडे त्या त्या नांवापुढील घरांतून मांडावे. असो, आतां पुढील सूत्रांचा अर्थ, अनुक्रमानें लिहितों.

आसुरी पञ्चदश ॥४॥
एकंदर लघुगुरु मिळून पंधरा अक्षरांनीं आसुरीं गायत्री नांवाचें छन्द तयार होतें. ‘ग्लौ’ (१/१४) असा पूर्वीच दिलेला सामान्य अधिकार आहे म्हणून येथें लघुगुरु मिळून असा अर्थ करतां आला; असेंच पुढील सूत्रांतूनही अनुवृत्तीनें येणार्‍या शब्दामुळें, इष्टार्थ केले आहेत असें जाणावें.

प्राजापत्याष्टौ ॥५॥
आठ अक्षरें म्हणजे प्राजापत्या नामक गायत्री होते.

यजुषां षट्‍ ॥६॥
याजुष गायत्री (यजुर्वेदसंबंधीं) सहा अक्षरांनीं होते.

साम्नां द्वि: ॥७॥
ह्या सूत्रांत षट्‍ हें पद अनुवृत्तीनें येतें, म्हणून द्विगुणित सहा म्हणजे बारा अक्षरें मिळून सामवेदाची गायत्री होते, हा सूत्रार्थ होतो.

ऋचां त्रि: ॥८॥
ह्या सूत्रांमध्येंही षट्‍ हें पद अनुवृत्त आहे, ह्यामुळें तीनदां सहा अक्षरें अर्थात्‍ अठरा अक्षरें आर्ची गायत्रीसंज्ञक असतात असा सूत्रार्थ होतो.

द्वौ द्वौ साम्नां वर्धेत ॥९॥
कोष्टकांतील इतर घरें भरतांनां पूर्वोक्तसाम्नीगायत्रीची अक्षरसंख्या उत्तरोत्तर दोन दोन अक्षरें वाढते, म्हणून बारा हा अंक लिहिला; त्याच्या पुढील घरांतून क्रमानें १४,१६,१८,२०,२२, व २४ असे आंकडे लिहिले. सप्तच्छन्दांचें मागें दिलेलें कोष्टक पहा.

त्रींस्त्रीनृचाम्‍ ॥१०॥
आर्ची गायत्रीचा अंक, पुढच्या कोष्टकांतून पूर्वपूर्वापेक्षां तीनतीन अक्षरांनीं वाढवावा. म्हणजे १८ पासून ३६ पर्यंत २१,२४,२७,३०,३३,३६, असे अंक वाढतात.

चतुरश्चतुर: प्राजापत्याया: ॥११॥
प्राजापत्या नामक गायत्रीच्या कोष्टकांतील ओळींत उत्तरोत्तर चार चार अंक वाढवावे म्हणजे ८ पासून ३२ पर्यंत वाढ होते.

एकैकं शेषे ॥१२॥
शेष म्हणजे शिल्लक राहिलेल्या दैवी व याजुषी गायत्री ह्यांच्या कोष्टकांत उत्तरोत्तर एकेक अंकाची वृद्धि करावी. ह्यामुळें दैवीच्या कोष्टकांत एकपासून सातपर्यंत व याजुषीच्या कोष्टकांत सहापासून बारापर्यंन्त, क्रमानें वाढ झाली. स्पष्टज्ञानाकरितां कोष्टक पहा. ह्या सूत्रांत शेषे ह्या पदानें आसुरीचें ग्रहण होत नाहीं. कारण तिच्याविषयीं पुढील सूत्रांत विशेष विधान आहे; व अपवादविषय सोडूनच उत्सर्गसूत्र (सामान्य नियम) प्रवृत्त होत असतें.

जह्यादासुरी ॥१३॥
ह्या सूत्रांत वरुन एकैकम्‍ ह्या पदाची अनुवृत्ति आणून आसुरी गायत्री, ओळीच्या पुढच्या कोष्टकांमधून उत्तरोत्तर एकेक अक्षर टाकते, म्हणजे १५ पासून ९ पर्यंत एकेक अंक कमी होत जातो, असा अर्थ होतो. आतां सूत्रकार डाव्या हाताकडील उभ्या दुसर्‍या ओळींत गायत्रीचे अक्षराड्क भरले आहेत त्यांच्या पुढच्या सहा कोष्टकांत भरलेल्या अक्षराड्कांच्या संज्ञा पुढच्या १४ व्या सूत्रानें सांगतात.

तान्युष्णिगनुष्टुब्‍ बृहती पड्क्तित्रिष्टुब्जगत्य: ॥१४॥
सुत्रार्थ :-
गायत्र्यड्काच्या पुढीलसंख्येइतक्या अक्षरांनीं अनुक्रमानें उष्णिक्‍, अनुष्टुप्‍, बृहती, पड्क्ति, त्रिष्टुप्‍ व जगती ह्या नांवांचे छन्द तयार होतात. हे छन्द, अर्थात्‍ दैवी, आसुरी वगैरे पहिल्या उभ्या ओळींत नांवें दिलेल्या जातींचेच असतात.

तिस्त्रस्तिस्त्र: सनाम्न्य एकैका ब्राहृय: ॥१५॥
कोष्टकांतील सर्वात खालची घरें भरण्याकरितां हें सूत्र आहे. गायत्री उष्णिक्‍ वगैरे सातही वैदिक छन्द इतर लौकिक जातीप्रमाणेंच (वृत्त) स्त्रीलिंगी असल्यामुळें सूत्रांतून स्त्रीलिंगी प्रयोग आहेत. आतां सूत्रार्थ लिहितों. खालच्या तीन पड्क्तींत लिहिलेल्या याजुषी, साम्नी, व आर्ची जाति ह्यांच्या भेदांपैकीं तिन्ही एकजातीय छन्द (सनाम्न्य: = समाननामक छन्द) मिळून म्हणजे त्यांचीं अक्षरें मिळवून तेवढ्या अक्षरांचा तो तो ब्राह्मी संज्ञकछन्द होतो. जसें याजुषी, साम्नी व आर्ची गायत्रीचीं सहा, बारा व अठरा अक्षरें मिळून होणार्‍या छत्तीस अक्षरांनीं ब्राह्मी गायत्री बनते. असेंच पूर्वोक्त तीन जातींच्या बेरजेनें येणार्‍या संख्येनें, ब्राह्मीच्या उष्णिगादि इतर छन्दांविषयीही समजावें. ते ब्राह्मीचे भेद कोष्टकांत अगदीं खालच्या ओळींत दिले आहेत. पुढच्या सूत्रांत ‘प्राग्यजुषाम्‍’ अशीं पदें असल्यामुळें येथें याजुषी वगैरे खालच्या तिहींचीच बेरीज घेतली.

प्राग्यजुषामार्ष इति ॥१६॥
वरच्या सूत्रांपैकीं ‘तिस्त्रस्तिस्त्र: सस्नाम्य: एकैका:’ एवढा भाग येथें अनुवृत्तीनें आणून सूत्रार्थ लिहितों. याजुषीगायत्री वगैरेच्या आठव्या कोष्टकावरील प्राजापत्या, आसुरी व दैवी भेदांपैकीं, समाननामाच्या तीन तीन गायत्र्यादि जाति मिळून (अर्थात्‍ अक्षरसंख्या) एकेक आर्षीचा जातिभेद होतो. जसें प्राजापत्या, आसुरी, व दैवी उष्णिकचे १२,१४, व २ हे अंक मिळवून आलेल्या अठ्ठावीस अक्षरांची आर्षी उष्णिक्‍ होते. आर्षी गायत्री २४ अक्षरांची होते. असेच अनुष्टुप्‍, बृहती, पड्क्ति, त्रिष्टुप्‍, व जगती ह्या उरलेल्या छन्दांविषयीं समजावें. हे आधीं नांवाचे छन्दोभेद कोष्टकाच्या अगदीं वरच्या आडव्या ओळींत गायत्र्यादि अनुक्रमानें दिले आहेत. ह्या सूत्रांच्या अर्थानीं बनविलेलें मागें दिलेलें कोष्टक दैवीगायत्री वगैरे छन्दांचें थोडक्यांत ज्ञान होण्यास फार उपयोगी आहे. ह्या सूत्राच्या शेवटीं असलेल्या इतिपदानें येथें ह्या अध्यायाची समाप्ति सूचित केली. येथें आमच्या छन्द:सूत्रव्याख्यानाचा दुसरा अध्याय संपला. ह्यामध्यें एकंदर सूत्रें सोळा आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP