सार्थपिड्गलछन्द:सूत्र -अध्याय चौथा

सार्थपिड्गलछन्द:सूत्र


षडक्षरपदाच्या गायत्रीछन्दापासून द्वादशाक्षरपादाच्या जगतीचन्दापर्यत असलेले छन्द पूर्वीच सांगितले. आतां त्रयोदशाक्षरीपासून सव्वीस अक्षरें पादांत असलेल्या छन्दापर्यंतचीं वृत्तें सामान्यरुपानें सांगण्याकरितां, प्रथम त्यांच्या संज्ञा सांगण्यास प्रारंभ करतात.

चतु:शतमुत्कृति: ॥१॥
ज्या छन्दांत चार आणि शंभर म्हणजे एकशें चार अक्षरें चारी पादांत मिळून असतात, तें उत्कृतिनामक छन्द होय. अर्थात्‍ त्याच्या एका पादांत सव्वीस अक्षरें असतात.

चतुरश्चतुरस्त्यजेदुत्कृते: ॥२॥
उत्कृतिपासून चार चार अक्षरे कमी करुन येतील ते अक्षरांक क्रमानें (५२ पर्यंत) मांडावे. आतां त्याचीं नांवें अनुक्रमानें सांगतात.

तान्यभिसंव्याप्रेभ्य: कृति: ॥३॥
तीं उत्कृतीच्या मागचीं छन्दें, अनुक्रमानें अभि, सम्‍, वि, आ, प्र ह्या उपसर्गापुढें कृति हें अक्षर ठेवलें असतां बनतात. म्हणजे चारी पाद मिळून शंभर अक्षरांची अभिकृति, शहाण्णव अक्षरांची संकृति, ब्याण्णव अक्षरांची विकृति, अठयांयशी अक्षरांची आकृति व चौर्‍यांशी अक्षरांची प्रकृति होते.

प्रकृत्या च ॥४॥
तसेंच उपसर्गावांचून केवळ प्रकृतीनें म्हणजे मूळरुपानें राहिलेली कृति ही त्यांच्या मागचा म्हणजे अक्षरांचा कृतिसंज्ञक छंद होतो. पुढें आणखी त्याच्या मागच्या छन्दांचीं नांवें, तीन सूत्रांनी सांगतात.

धृत्यष्टि शर्करी जगत्य: ॥५॥
कृतीच्या पुढें, धृति, अष्टि, शर्करी व जगती हीं चार नांवें क्रमानें लिहावीं.

पृथक्‍ पृथक्‍कपूर्वत एतान्येवैषाम्‍ ॥६॥
ह्या चार नांवांपैकीं प्रत्येकाच्या पूर्वी तींच तींच नांवें आणखी पुन्हा निराळीं लिहावीं, म्हणजे चार जोडया मिळून आठ नांवें होतील.

द्वितीयद्वितीयमतित: ॥७॥
ह्या जोडयांपैकीं दुसरें दुसरें नांव अतिपूर्वक लिहावें. अर्थात्‍ तीं नांवें अतिधृति, अत्यष्टि, अतिशर्करी व अतिजगती अशीं होतील. म्हणजे कृतीच्या पूर्वी हीं आणखी आठ छन्दांचीं नांवे झालीं. ह्यामुळें पूर्वक्रमानुसार अतिधृति ७६ अक्षरांची, धृति ७२ अक्षरांची, अत्यष्टि ६८ अक्षरांची, अष्टि ६४ अक्षरांची, अतिशर्करी ६० अक्षरांची, शर्करी ५६ अक्षरांची, व अतिजगती ५२ अक्षरांची होते. ह्यांच्या मागचे ४८ अक्षरांच्या जगतीपासून २४ अक्षरांच्या गायत्रीपर्यंतचे छन्द तिसर्‍या अध्यायांत आलेच आहेत. जगती अठ्ठेचाळीस अक्षरांनीं होते, हें मागेंच आलें आहे. ह्या प्रमाणें सप्तच्छन्दांशिवाय इतर चौदा छन्दांच्या सामान्यसंज्ञा सांगितल्या. त्यांचे पोटभेद पुढें पांचव्या अध्यायापासून येतील.

अत्र लौकिकम्‍ ॥८॥
हें अधिकार सूत्र असून ह्यापुढें हें छन्दशास्त्र संपेपर्यंत ह्याचा अधिकार आहे. ह्यावरुन ह्यापूर्वी सविस्तर कथन केलेले गायत्री वगैरे छन्द वैदिक होत, असें ज्ञापित होतें. असो, ह्यापुढील आर्येपासून चूलिकेपर्यंत सर्व छन्द वैदिक व लौकिक असे दोन्ही प्रकारचे जाणावे. वैदिक छन्दांचें प्रकरण चालू असतां मध्येंच लौकिक छन्द सांगण्याचें कारण; स्मृति, पुराण, इतिहास वगैरेंतून आलेलीं तीं लौकिक छन्देंही ऋषींच्याच अनादिपरंपरेनें प्राप्त झालेलीं असून ह्यापुढें रचिल्या जाणार्‍या काव्यरचनेसही त्यांचें ज्ञान अवश्य व मूलभूत आहे हें सूचित होतें. आणि काव्यें हीं तर धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या पुरुषार्थास साक्षात्‍ व परंपरेनें साधक आहेत हें अलंकारशास्त्रांत सिद्ध केलें आहे. काव्यप्रकारांत श्रीमम्टाचार्य म्हणतात, काव्यं यशसेऽर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये । सद्य: परनिर्वृतये कान्तासंमिततयोपदेशयुजे ॥ म्हणजे काव्यनिर्माण हें कीर्तिलाभ, द्रव्यप्राप्ति, व्यवहाराचें उत्तमज्ञान, अकल्याण व पाप ह्यांची निवृत्ति, लागलीच रसादिज्ञानाचा अपूर्व व अखण्ड आनन्द आणि प्रियस्त्रीप्रमाणें रुचि उत्पन्न करुन उपदेश देणें ह्या प्रयोजनांकरितां अत्यंत सफल व आवश्यक आहे. अशाप्रकारें कलांमध्यें श्रेष्ठ असणार्‍या काव्यांनां छन्दोज्ञान पायाच आहे. अशाप्रकारें कलांमध्यें श्रेष्ठ असणार्‍या काव्यांनां छन्दोज्ञान पायाच आहे, व त्यामध्यें त्याची महतीही फार आहे; कारण ‘अपि माषं मषं कुर्याच्छन्दोभड्गं न कारयेत्‍’ म्हणजे, वेळ पडली तर ‘माष’ शब्दाच्या जागीं ‘मष’ शब्द लिहावा. परंतु छन्दोभड्ग होऊं देऊं नये. ह्याचें कारण तो दोष अगदीं सहज लक्षांत येणारा आहे; तो प्रथम टाळला पाहिजे. इत्यादि अनेक कारणांस्तव सूत्रकार येथें परमदयाळूपणानें लौकिकछन्दांचें कथनही करीत आहे, शिवाय लौकिकवृत्तांच्या कथनाशिवाय शास्त्रास पूर्णताही आली नसती.

आत्रैष्टुभाच्च यदार्षम्‍ ॥९॥
गायत्री पासून त्रिष्टुप्‍ संपेपर्यंत पूर्वी छन्दांच्या ज्या सहा आर्ष जाति सांगितल्या त्याही लोकव्यवहारांत तशाच आहेत असें समजावें. महाभारतादि पुराणग्रन्थांतून वैदिकछन्दांचे प्रयोग सुप्रसिद्ध असून ‘अमी वेदि परित: क्लृप्तधिण्या:’ ह्या शाकुंतलनाटकांतला त्रिष्टुप्‍ छन्दाचा श्लोकही विद्वज्जनांस माहीत आहे. दुसर्‍या अध्यायाच्या प्रारंभीं दिलेल्या कोष्टकांपैकीं पहिल्या ओळींत ते, आर्षी गायत्र्यादि सातही छन्द दिले आहेत. त्यावरुन चोवीस अक्षरांची गायत्री, अठ्ठावीस अक्षरांची उष्णिक्‍, बत्तीस अक्षरांची अनुष्टुप्‍, छत्तीस अक्षरांची बृहती, चाळीस अक्षरांची पड्क्ति आणि चव्वेचाळीस अक्षरांची त्रिष्टुप्‍ असें समजून येईल. चोवीस अक्षरांच्या मागचें लौकिक छन्द येथें प्रत्यक्ष सांगितले नसून पुढें आठव्या प्रत्ययाध्यायांत ते सुचविले आहेत.

पादश्चतुर्भाग: ॥१०॥
प्रत्येक छन्दचा चवथा भाग म्हणजे पाद होय. जसें गायत्री चोवीस अक्षरांची असल्यानें तिचा पाद सहा अक्षरांचा आहे. हा नियम समवृत्तांविषयींच जाणावा.

यथावृत्तसमाप्तिर्वा ॥११॥
किंवा जशा जशा सांगितलेल्या कमीजास्त अक्षरांच्या पादांनीं वृत्तें संपतील तसे त्यांचे पाद धरावे. हा विकल्प व्यवस्थित (नियमबद्ध) असून विषम व अर्धसमवृत्तांविषयींच समजावा. चतुष्पाद समवृत्तांविषयीं नाहीं. त्यांचा पाद दहाव्या सूत्राप्रमाणें समजावा. लौकिक छन्दें तीन प्रकारची आहेत. आर्येपासून उद्गीतिपर्यंत गणच्छन्दें आहेत, त्यापुढें वैतालीयापासून चूलिकेपर्यंत मात्राछन्दें आहेत व त्यापुढें समानीपासून उत्कृति संपेपर्यंत अक्षरच्छन्दें आहेत. त्यांमध्येंही मयरस वगैरे गण आहेत. तथापि त्यांत ठराविक अक्षरें असल्यानें ते अक्षरच्छन्द समजावे. असो आतां सूत्रकार आर्यादिकांच्या ज्ञानाकरितां प्रथम गण म्हणजे काय हें येथें सांगतात.

ल: समुद्रा, गण: ॥१२॥
ल हें पद एकमात्रिकाचें उपलक्षण आहे असें समजावें; तसेंच समुद्र चार हें प्रसिद्धच आहे. सूत्रार्थ - र्‍हस्व, दीर्घ मिळून अथवा कशातरी चार मात्रा म्हणजे एक गण होतो. हृस्वाची मात्रा एक व दीर्घाच्या (गुरु) दोन जाणाव्या. ह्या शास्त्रांत स्वरशास्त्राप्रमाणेंच प्लुतस्वरानें व व्यवहार नाहीं म्हणून लुतस्वराचेंही ग्रहण दीर्घपदानेंच होतें असें जाणावें. मात्रा म्हणजे वस्तुत: एक क्षण. लघुच्चारास एक क्षण काल लागतो म्हणून तो एकमात्रिक असा व्यवहार आहे.

गौ गन्तमध्यादिर्लश्च ॥१३॥
ह्या सूत्रानें त्या चार मंत्रांनीं होणार्‍या गणांचे अवांतरभेद सांगतात. सूत्रार्थ - दोन ग (गुरु), गन्त, गमध्य, गकारादि व केवळ ल असे पांच चतुर्मात्रिक गण होतात. ह्या छन्द:शास्त्रांत लघूची खूण । अशी एक उभी रेघ व गुरुची खूण ऽ अशी अवग्रहासारखी वांकडी रेघ मानण्याची परंपरा आहे. त्यांनीं वरच्या पांचहि गणांचे प्रस्तार अनुक्रमानें; ऽऽ, ॥ ऽ, । ऽ । ऽ॥, ॥ ॥, असे होतात. ह्या सर्वात चार चार मात्रा स्पष्टच आहेत. ह्यांपेक्षां अधिक चतुर्मात्रिक प्रकार संभवतच नसल्यामुळे हें सूत्र केवळ स्पष्ट समजण्याकरितां रचिलें आहे, विशेष कांहीं नाहीं. आतां ह्यापुढें आर्याधिकार सुरु झाला.

स्वरा अर्घं चार्यार्घम्‍ ॥१४॥
षड्‍ज, ऋषभ, गांधार वगैरे स्वर सात लोकप्रसिद्ध आहेत, म्हणून ह्या सूत्रांत स्वर हें पद सात ह्या संख्येचें उपलक्षक धरुन असा सूत्रार्थ होतो कीं, वर सांगितल्याप्रमाणें चतुर्मात्रिक सात गण व एक अर्धा गण म्हणजे दोन मात्रा मिळून एकंदर तीस मात्रांनी आर्येचे एक अर्ध तयार होते. उत्तरार्धासंबंधी विशेष अपवाद पुढें येतील. ॥१४॥

अत्रायुड्‍ न ज्‍ ॥१५॥
ह्या आर्याछन्दांत साडेसात गण एका अर्धात असावे असें वरच्या सूत्रानें सांगितलें परंतु त्यापैकीं अयुक्‍ विषमस्थानाचा गण अर्थात्‍ पहिला तिसरा, पांचवा व सातवा गण ज्‍ (।ऽ।) मध्यगुरु नसावा, इतर स्वेच्छेप्रमाणें घालावे ॥१५॥

षष्ठो ज्‍ ॥१६॥
आर्येत सहावा गण मात्र ज्‍ हाच असावा.

न्लौ वा ॥१७॥
किंवा न्ल म्हणजे चतुर्लघु (॥॥) गण सहावा असावा ॥१७॥

न्लौ चेत्पदं द्वितीयादि ॥१८॥
येथें षष्ठ: हें पद अनुवृत्तीनें येतें. सूत्रार्थ - आर्यार्धात सहावा गण जर न्ल योजिला तर त्यांपैकीं दुसर्‍या मात्रेपासून पदास आरंभ झाला असला पाहिजे, व पहिली मात्रा मागील पदांत पाहिजे. जसें,

श्रीरामचंद्र, विभुच्या पादसरोजास, नमन उभय करीं ।
करितां हरि तापातें निवटी अघनग हि अभय करी ॥१॥
(स्वकृत १) ॥१८॥

सप्तम: प्रथमादि ॥१९॥
येथें ‘न्लौ चेत्पदं’ ह्या पदांची अनुवृत्ति आणून सूत्रार्थ देतों. आर्येचा सातवा गण जर सर्वलघु (न्ल) असला तर त्याच्या पहिल्या मात्रेपासूनच पदास आरंभ केला पाहिजे नाहींतर यतिभंग होईल. यति म्हणजे पद्यपठनांत किंचित्‍ थांबण्याची जागा. हें यतिप्रकरण पुढें येईलच. असो. ह्या सूत्राचेंही उदाहरण, वरील १८ व्या सूत्रावर दिलेल्या आर्येतच आहे. तीमध्यें उभय ह्या पदाला सातव्या गणाच्या पहिल्या मात्रेपासून सुरुवात झाली आहे. ॥१९॥

अन्त्ये पञ्चम: ॥२०॥
येथें ‘न्लौ चेत्पदं’ व ‘प्रभमादि’ येवढया पदांची अनुवृत्ति करुन सूत्रार्थ देतों. अन्त्ये म्हणजे उत्तरार्धामध्यें पांचवा गण जर चतुर्लघु (न्ल) घातला तर, त्यांतही पदास प्रारंभ पहिल्या मात्रेपासून केला पाहिजे. वरच्या आर्येत पहा, अघ नग ह्या पदास पांचव्या गणाच्या पहिल्या मात्रेपासून प्रारंभ केला आहे ॥२०॥

षष्ठश्च ल्‍ ॥२१॥
ह्या सूत्रांत अन्त्ये हें पद अनुवृत्तेनें येतें. अन्त्ये म्हणजे उत्तरार्धात सहावा गण केवळ एकलकाररुपच (।) घालावा. अर्थात्‍ उत्तरार्धात एकंदर पंधराच मात्रा संभवतात.

‘षष्ठो ज्‍ न्लौ वा’
ह्या दोन सूत्रांनीं पूर्वार्धाप्रमाणेंच उत्तरार्धातही सहावा गण मध्यगुरु (।ऽ।) किंवा सर्व लघु (॥ ॥) येत असतां त्याचें हें सूत्र अपवादक आहे; म्हणून उत्तरार्धामध्यें सहावा गण केवळ एकमात्रिक म्हणजे एकच लघु अक्षर घालावें. वरच्या आर्येत उत्तरार्धात सहावा गण केवळ ‘हि’ असाच एकलकार घातला आहे पहा, ॥२१॥

त्रिषु गणेषु पाद: पथ्याद्ये च ॥२२॥
ह्यांत चकारानें ‘अन्त्ये’ हें पद अनुवृत्त आहे. ज्या आर्येत दोन्ही अर्धात पहिल्या तीन गणांच्या शेवटी पादसमाप्ति अर्थात्‍ पदसमाप्ति होत असते, ती आर्या पथ्यासंज्ञक होय. उदाहरण वरचेंच पहा. त्यांत विभुच्या व तापातें असें तिसर्‍या गणाच्या शेवटीं पादच्छेद (पदच्छेद) पाडतां येत आहेत. ॥२२॥

विपुलान्या ॥२३॥
जिच्या पहिल्या किंवा दुसर्‍या अथवा दोन्ही अर्धात तिसर्‍या गणाच्या शेवटीं पादच्छेद (पदान्त) होत नसेल ती आर्या विपुलासंज्ञक होय. जसें “सोडुनि सर्वहि संसा - रभया हरिभक्तिलाचि लागावें । सांगावें काय जना - र्दन नुरवी क्लेश, झणि धावे" ॥ (स्वकृत २) ह्या पद्यांत संसारभया व जनार्दन हीं एकपदें असून तृतीय गणाच्या शेवटीं पाद (पदान्त) पडत नाहीं म्हणूण ही आर्या विपुला होय ॥२३॥

चपला द्वितीय चतुर्थौ ग्मध्ये जौ ॥२४॥
ज्या आर्येत दुसरा व चवथा गण ज म्हणजे मध्यगुरु असून त्याच्या मागें व पुढें गुरु अक्षरें असतील ती आर्या चपला संज्ञक होय. असें व्हावयास अर्थात्‍ पहिला गण अन्त्यगुरु, तिसरा द्विगुरु (ऽऽ) व पांचवा प्रारंभी गुरुनें युक्त पाहिजे. उदाहरण, कमलापतीस चित्तीं धराल भावें तरी तराल भवा । असला सपाप कोणी तथापि तोही वरील विभवा ॥ (स्वकृत ३) ॥२४॥

पूर्वे मुखपूर्वा ॥२५॥
वरच्या सूत्रांत सांगितलेला गमध्यस्थ जगण फक्त पूर्वार्धात असून उत्तरार्धात नसेल तरे ती आर्या मुखपूर्व चपला म्हणजे मुखचपला होय. वरील तिसर्‍या आर्येच्या उत्तरार्धातील सपाप हें पद काढून तेथें अघनिधि हें पद घातलें तर तेंच मुखचपलेचें उदाहरण होईल. ॥२५॥

जघनपूर्वेतरत्र ॥२६॥
इतरत्र म्हणजे उत्तरार्धातच (पूर्वभिन्न) वर सांगितल्याप्रमाणें गमध्यस्थ जगण असेल तरे ती जघनचपला नांवाची आर्या होय. वर दिलेल्या तिसर्‍या आर्येच्या पूर्वार्धात, चित्ती हें पद काढून तेथें हृदयीं असा शब्द घातला असतां तेंच जघनचपलेंचे उदाहरण होईल. ॥२६॥

उभयोर्महाचपला ॥२७॥
दोन्ही अर्धात चपलेंचे लक्षण जुळलें तर ती आर्या महाचपला समजावी. उदाहरण वर दिलेली तिसरी आर्याच होय. ॥२७॥

आद्यर्धसमा गीति: ॥२८॥
येथें वरुन ‘उभयो:’ हें पद अनुवृत्तीनें येतें. दोन्ही अर्धामध्यें, आर्यापूर्वार्धासारखीच अर्थात्‍ एकंदर साठ मात्रांनीं युक्त असतें ती गीति होय. हीमध्यें तीस तीस मात्रांचे एकेक अर्ध होतें, आर्येच्या उत्तरार्धात सत्तावीसच मात्रा असतात. मागें दिलेल्या स्वकृत पहिल्या आर्येत अघनगहि ह्याच्यापुढें शीघ्र असा शब्द घातला असतां तीन मात्रा वाढून तेंच गीतीचें उदाहरण होईल. मोरोपंत कवीच्या बहुतेक आर्या ह्या गीतिजातीच्या आहेत ॥२८॥

अत्न्येनोपगीति: ॥२९॥
ह्या सूत्रांतही ‘उभयो:’ ह्या पदाची अनुवृत्ति आहे. दोन्ही अर्धात आर्येच्या उत्तरार्धाप्रमाणेंच सत्तावीस मात्रा असतील तर, ती उपगीति होते. पहिल्या आर्येत उभयकरीं ह्या शब्दांतील उभय हें पद काढलें असतां तीच कविता उपगीतीचें उदाहरण होईल. ॥२९॥

उत्क्रमेणोद्गीति: ॥३०॥
आर्येच्या अर्धाची उलटापालट (उत्क्रम) केली असतां म्हणजे पहिलें अर्ध सत्तावीस मात्रांचे व दुसरें तीस मात्रांचे रचिलें असेल तर ती उद्गीति होते. पहिल्या स्वकृत आर्येची अर्धे बदलून मांडा, म्हणजे अर्थात थोडा दूरान्वय होत असला तरी तें उद्गीतिचें उदाहरण होईल. ॥३०॥

अर्धे वसुगण आर्यागीति: ॥३१॥
प्रत्येक अर्धात पूर्ण आठ गण (वसु-आठ) अर्थात्‍ बत्तीस मात्रा असल्यास तें छन्द आर्यागीतिनामक होतें. ह्याचें उत्तरार्धही असेंच अष्टगणी असून दोन्ही अर्धात सहावा गण आर्येप्रमाणेंच ‘ज’ किंवा ‘न्ल’ असतो. उदाहरण “शिन्त्रेवंशसमुद्भव वाग्देवीचरणदास शिवराम कवी । विवरुन देशभाषे-मधिं छन्द:सूत्र पण्डितांप्रति सुखवी" ॥ (स्वकृत ४) पथ्या, चपला वगैरे अवांतर भेदांनीं ह्या सर्व जातींचेही अनेक प्रकार होतात. ह्या आर्याप्रकरणांत सर्वत्र अर्धाच्या शेवटीं गुरु असतो हें लक्षांत ठेवावें. ह्या असंख्य प्रकारांची व पुढें येणार्‍या सर्व वृत्तांचींही उदाहरणें नवीन रचून किंवा ग्रन्थांतरांतून उद्भृत करुन आम्ही येथें प्राय: देणार नाहीं; कारण वृत्ताच्या गणांचा प्रस्तार मांडून जिज्ञासूला नवीन कविता रचितां येईल किंवा छन्दाचें नांव सहज ओळखतां येईल. येथें आर्याधिकार संपून पुढें वैतालीयाधिकार सुरु होतो ॥३१॥

वैतालीयं द्वि: स्वरा अयुक्पादे युग्वसवोऽन्तेर्लगा: ॥३२॥
येथें ल: ह्या पदाची अनुवृत्ति फार फार दूर प्रदेशाहून मण्डूकप्लुतीनें (बेडकासारखी गती) येते. जेथें विषम म्हणजे पहिल्या व तिसर्‍या पादांत प्रथम सहा (द्वि: स्वरा: येथें १३ व्या सूत्राप्रमाणें सात स्वर न मानतां स्वर म्हणजे तीन, असा अर्थ घेतला आहे; कारण ‘उदात्तश्चानुदात्तश्च स्वरितश्च स्वरास्त्रय: वेदाड्ग शिक्षा,’ पहा) ल म्हणजे मात्रा व समपादांत प्रथम आठ ल असून र, ल, ग असे गण क्रमानें येतात. तेथें वैतालीय नांवाचें वृत्त (छन्द) होतें. र, ल, ग ह्यांचा मात्रा विन्यास ऽ।ऽ,।,ऽ असा आहे. वैतालीयाचें उदाहरण : - ‘वन्दन हें भारतीपदां मम संतत, हरि जें निजापदां । कविवृन्द यदीयचिन्तनें मतिजाड्यादि लयास शीघ्र ने ( स्वकृत ५) ॥३२॥

गौपच्छन्दसिकम्‍ ॥३३॥
येथें वरच्या सूत्रांतील ‘द्वि: स्वरा:’ वगैरे भागाची अनुवृत्ति आहे. सूत्रार्थ - त्या वैतालीय छन्दाच्याच प्रत्येक पादाच्या शेवटीं जर एकेक गुरु अधिक असला तर, तें वृत्त औपच्छन्दसिक नांवाचें होतें. तात्पर्य विषम पादांत प्रथम वर सांगितल्याप्रमाणें सहा मात्रा व समपादांत आठ मात्रा रचून त्यांच्यापुढें र, ल, ग, ह्यांच्याऐवजीं र, य (ऽ।‍ऽ, ।ऽऽ) हे त्र्यक्षरी दोन गण रचावे म्हणजे औपच्छन्दसिक वृत्त होतें; हा फलितार्थ निघतो. ॥३३॥

आपातलिका भ्यौ ग्‍ ॥३४॥
येथें ‘द्वि: स्वरा: ल: अयुक्तपादे युग्वसवोऽन्ते’ एवढीं पदें अनुवृत्तीनें आणून सूत्रार्थ लिहितों. वैतालीप्रमाणेंच प्रथम विषम पादांत सहा मात्रांचा व सम पादांत आठ मात्रांचा विन्यास असून त्यापुढें र ल ग ऐवजीं भ ग ग (ऽ॥, ऽ,ऽ) हे गण प्रत्येक पादांत असल्यास तें वृत्त आपातलिका नांवाचें होतें. ॥३४॥

शेषे परेण युड्‍ न साकम्‍ ॥३५॥
या वैतालीयाधिकारांत असलेला गणांचा नियम सांगितला. आतां शिल्लक राहिलेला मात्रांचा नियम ह्या सूत्रानें सांगतात. ह्या पूर्वोक्त सहा किंवा आठ मात्रांमध्यें सम मात्रा (युक्‍ २,४,६,) पुढच्या मात्रेशीं युक्त करु नये म्हणजे दुसरी व तिसरी, चवथी व पांचवी, सहावी व सातवी ह्या जोड मात्रांना एका गुरु अक्षरांत एकत्र घालूं नये, बाकीच्या मात्रा स्वेच्छेनें रचाव्या ॥३५॥

षट्‍ चामिश्रा युजि ॥३६॥
येथें न ह्या पदाची अनुवृत्ति होते. शिवाय ह्या वैतालीयाधिकारांत पहिल्या सहा मात्रा समपादांत (युजि, दुसरा व चवथा) मोकळ्या ओळीनें घालूं नये. म्हणजे त्यांचा ‘ ॥ ॥ ।’ असा विन्यास होऊं नये. ३२ व्या सूत्रावरील उदाहरणांत, द्वितीयपादांत ‘मम संतत’ ह्याच्या जागीं ‘मम अविरत’ अशी पदें घालूं नये, असें तात्पर्य. विषमपादांत अशा मात्रा वेगवेगळ्या सहा रचिल्या तरी चालतात. वरच्याच उदाहरणामध्यें प्रथम पादांत ‘वन्दन हें’ ह्याच्या जागीं सविनयनति असें पद घातल्यास चालेल. इतकें गणमात्रांचें नियमन केलें तरीही पुष्कळ वृत्तांचे, कोटयवधीहि पोटप्रकार प्रस्तारभेदानें होतात. एकटया गीतिचेच १६ कोटीहून अधिक प्रकार होतात, हें संस्कृत वृत्तरत्नाकर ग्रन्थावरच्या नारायणभट्टकृत टीकेवरुन स्पष्ट कळेल. सारांश इतर शास्त्रांप्रमाणेंच ह्या छन्द:शास्त्राचा विस्तारही व्यक्तिगणनेच्या दृष्टीनें अनंत आहे ह्यांत तिळमात्रहि संशय नाहीं. ॥३६॥

पञ्चमेन पूर्व: साकं प्राच्यवृत्ति: ॥३७॥
वरच्या सूत्रानें सममात्रेचें पुढच्या विषम मात्रेशीं एकीकरण करुं नये असें सांगितलें. त्याला थोडीशी मोकळीक देऊन एक निराळे वृत्तनाम सांगतात. येथें मागून युजि हें पद आणून सूत्रार्थ करतों. समपादांत चवथी मात्रा पंचवीशीं मिश्र रचल्यास तें प्राच्यवृत्ति नांवाचें वैतालीय होतें. जसें ३२ व्या सूत्रावरील उदाहरणांत ‘मम संतत’ ह्याच्या जागीं ‘मम सदैव’ अशी पदें रचिलीं तर तो प्राच्यवृत्तीचा पाद होईल.

अयुक्तृतीयेनोदीच्यवृत्ति:ळ ॥३८॥
येथें ‘पूर्व: साकम्‍’ ह्या पदाची अनुवृत्ति करुन सूत्रार्थ. विषमपादांत, दुसरी व तिसरी मात्रा (तृतीयेन पूर्व: साकम्‍) एकत्र म्हणजे एका गुर्वक्षरांत रचली असतां तें, उदीच्यवृत्ति नांवाचें वैतालीय होतें. जसें बत्तिसाव्या सूत्रावरील उदाहरणांत ‘वन्दन हे’ ह्या पदांच्या जागीं ‘नमोऽस्तु हें’ अशीं पदें घातलीं तर तो उदीच्यवृत्तीचा चरण होईल.

आभ्यां युगपत्प्रवृत्तकम्‍ ॥३९॥
प्राच्यवृत्ति व उदीच्यवृत्ति ह्यांची लक्षणें एकाच पादांत जुळत असल्यास त्या वैतालीयाचें नांव प्रवृत्तक होय. ॥३९॥

अयुक्‍ चारुहासिनी ॥४०॥
ह्यांपैकीं विषमपादाच्या (प्राच्यवृत्तीच्या) लक्षणानेंच चारी पाद युक्त असले तर तें चारुहासिनी नांवाचें वैतालीय वृत्त होतें. अर्थात्‍ चारही पादांत प्रथम सहा मात्रा व त्यांपुढें र ल ग (ऽ।ऽ, ।,ऽ) हे गण असून दुसरी व तिसरी मात्रा एकत्र पाहिजे ॥४०॥

युगपरान्तिका ॥४१॥
ह्यांपैकी समपादांच्या (युक्‍) किंवा उदीच्यवृत्तीच्याच लक्षणानें युक्त असे चारी पाद असल्यास तो अपरान्तिकानामक वैतालीयाचा प्रकार होतो. अर्थात्‍ चारी पादांत प्रथम आठ मात्रा व त्यांपुढें र ल ग हे गण असून चौथी व पांचवी मात्रा एकत्र पाहिजे. येथें वैतालीयाधिकार संपून मात्रासमाधिकार सुरु होतो ॥४१॥

गन्ता द्विर्वसवो मात्रासमकं नवम: ॥४२॥
मागच्या सूत्रांतून पादे व ल: हीं पदें अनुवृत्तीनें येतात. जेथें एका पादांत द्विर्वसु म्हणजे सोळा मात्रा एकंदर असून त्यांपैकीं शेवटीं पंधरावी व सोळावी मात्रा मिळून एकगुरु (गन्ता) व नववी मात्रा एकलघुरुपीच ठराविक असते तेथें मात्रासमक वृत्त जाणावें, जसें,
ईशपदाला सतत नमावें
तद्गुणानीं रतरत मुख व्हावें ।
मन तच्चिन्तन - निमग्न होई
तरि मनुजाला भव भय नाहीं ॥ (स्वकृत) ६

हें मात्रासमकाचें उदाहरण आहे. येथें सर्वत्र पादान्तीं गुरु असून नवव्या मात्रा एकलघुरुप मोकळ्या आहेत. ॥४२॥

द्वादशश्च वानवासिका ॥४३॥
येथें सूत्रांतील चकारानें नवम: याची अनुवृत्ति आहे. ज्या मात्रासमकाच्या पादांत बारावी व नववी मात्रा मोकळी एकलघुरुपच असते; त्याचें नांव वानवासिका होय. ॥४३॥

विश्लोक: पञ्चमाष्टमौ ॥४४॥
ज्या मात्रासमकाच्या पादांत पांचवी व आठवी मात्रा एकलघुरुपच असते त्याचें नांव विश्लोक होय. येथें द्वादश व नवम ह्या पदांची अनुवृत्ति होत नाहीं हें प्राचीन व्याख्यानांवरुन दिसून येतें. ॥४४॥

चित्रा नवमश्च ॥४५॥
येथें सूत्रस्थ चकारानें पञ्चमाष्टमौ ह्या पदाची अनुवृत्ति होते. ज्याच्या पादांत नववी, पांचवी व आठवी मात्रा एकलघुरुपच असते तें चित्रानामाचें मात्रासमक जाणावें. प्रसिद्ध चर्पटपञ्जरी स्त्रोत्राचें किंवा कटावाचें वृत्त मात्रासमकच आहे. ॥४५॥

परयुक्तेनोपचित्रा ॥४६॥
येथें नवम: हें पद आणून सूत्रार्थ, नववी मात्रा दहावीशीं एकत्र झाली असल्यास तें उपचित्रा नांवाचें मात्रासमक होय. ह्यांत पांचव्या व आठव्या लघूचा विशेष नियम नाहीं. तथापि शेवटीं गुरु पाहिजेच. ॥४६॥

एभि: पादाकुलम्‍ ॥४७॥
मात्रासमक, वानवासिका, विश्लोक, चित्रा व उपचित्रा ह्या वृत्तांपैकीं अनेक वृत्ताच्या पादांच्या युक्त चार पाद असल्यास, त्याचें नांव पादाकुलक वृत्त होय. येथें मात्रासमाधिकार संपला. ॥४७॥

गीत्यार्या ल: ॥४८॥
ह्या सूत्रांत ‘पादे व द्विर्यसव:’ हीं पदें अनुवृत्त आहेत. ज्याच्या पादांत सोळाही मात्रा केवळ लघुरुपच असतात, त्या वृत्ताचें नांव गीत्यार्त्या होय. ह्या सूत्रांत लची अनुवृत्ति सिद्ध असतां पुन्हां ल: हें पद सूत्रांत घातलें आहे. त्यानें गुर्वक्षराची सर्वथा निवृत्ति सूचित केली म्हणून पादांत एकही गुरु उपयोगी नाहीं असें ठरतें. जसें, ‘चरण भजन तव भवभय निवटिल’ हा गीत्यार्यावृत्ताचा एक पाद आहे. ॥४८॥

शिखा विपर्यस्तार्धा ॥४९॥
वरच्या उलट म्हणजे सर्व गुरुवर्णाचेंच एक अर्ध असल्यास तिचें नांव शिखा होय. म्हणजे दोन पादांत मिळून केवळ बत्तीस लघु व दुसर्‍या दोन पादांत मिळून केवळ सोळा गुरु होय. कारण प्रत्येक चरणांत सोळा मात्रा असतात. ॥४९॥

ल: पूर्वश्चेज्ज्योति: ॥५०॥
पहिलें अर्ध (दोन पाद) केवळ लघूंचें असल्यास व दुसरें अर्ध केवळ गुरुंचें असल्यास ती ज्योति:संज्ञक शिखा होय. ॥५०॥

गश्चेत्सौम्या ॥५१॥
येथें पूर्व: हें पद अनुवृत्तीनें येतें. सुत्रार्थ. पूर्वार्ध जर केवळ गुर्वक्षरांचें व उत्तरार्ध केवळ म्हणजे बत्तीस लघूंचे असेल तर ती सौम्या नांवाची शिखा होय. ॥५१॥

चूलिकैकोनत्रिंशदेकत्रिंशदन्ते ग्‍ ॥५२॥
येथें अर्धपदाची अनुवृत्ति होते. प्रथमार्धात एकोणतीस मात्रा व उत्तरार्धात एकतीस मात्रा असून त्यांपैकी शेवटच्याच दोन दोन फक्त एकगुर्वात्मक असतात व बाकीचे, क्रमाक्रमानें सत्तावीस व एकोणतीस केवळ लघुच असतात, त्या वृत्ताचें नांव चूलिका होय. हीं दिग्दर्शन केलेलीं मात्रावृत्तें, साकी, दिण्डी, दोहा, पदें वगैरे सर्व प्राकृत प्रसिद्ध वृत्तांचीं उपलक्षकच होत. म्हणून गण व मात्रा ह्यांच्या नियमांनीं, दिंडी, साकी, अभंग व इतर प्राकृत पदें ह्यांचींही लक्षणें पठनाच्या सोयीप्रमाणें कल्पना करुन बांधावीं. ह्या शास्त्रांत फक्त दिशा दाखविल्यामुळें व सर्वोपयोगी गण व मात्रा सांगितल्याच असल्यामुळें, शास्त्रांत साकी वगैरे वृत्तांचीं नांवें व लक्षणें न दिल्यानें ह्यामध्यें न्यूनता आहे असें समजूं नये. पुढें येणारा प्रस्ताराध्यायहि असाच सामान्यत: सर्ववृत्तांचा संग्राहक आहे. वृत्तांचीं, नांवें व प्रकार पुढेंही रुचिवैचित्र्यामुळें अनंत वाढतील. परंतु त्या सर्वाचा समुद्रांत जलांचा होतो त्याप्रमाणें ‘मयरसतजभनलग’ ह्या दशगणीच्या प्रस्तारांत अंतर्भाव झाल्याशिवाय राहाणार नांहीं. ॥५२॥

सा ग्येन न समा लां ग्ल इति ॥५३॥
सूत्रकार आतां ह्या सूत्रानें, गणच्छन्द व मात्राच्छन्द ह्यांमधील गुरुंची व लघूंची संख्या ओळखण्याचा उपाय सांगतो. ग्ल म्हणजे एकंदर श्लोकांतील गुरु-लघु मिळून होणारीं अक्षरें, लाम्‍ म्हणजे मात्रांच्या समा: म्हणजे बरोबर (तुल्य), येन म्हणजे जेवढया अक्षरसंख्येनें, असे प्रकृत सूत्रांतील शब्दांचे अर्थ आहेत. ह्यांत ल चे लघु व मात्रा असे दोन अर्थ केले आहेत. आतां स्पष्ट सूत्रार्थ लिहितों. पद्यांतील एकंदर अक्षरांची संख्या, जेवढया संख्येनें एकंदर मात्रासंख्येच्या समान होत नाहीं, तेवढी त्या पद्यांतील गुरुंची संख्या होय. म्हणजे मात्रासंख्येंत एकंदर अक्षरसंख्या वजा केली असतां बाकी राहील ती गुरुंची संख्या जाणावी, असा फलितार्थ होतो. हीच गुरुसंख्या अक्षरसंख्येंत वजा केली असतां बाकी राहील ती लघूंची संख्या हें सहज समजतें; म्हणून त्याकरितां वेगळें सूत्र रचिलें नाहीं. हें सूत्र उदाहरणानें स्पष्ट करतों. “श्रीरामचंद्रविभुच्या पादसरोजास नमन उभय करी । करितां हरि तापातें, निवटी अघनगहि अभय करी ॥ (१८ वें सूत्र पाहा.) ह्या पूर्वी दिलेल्या स्वकृत आर्येत एकंदर त्रेचाळीस अक्षरें आहेत. आर्येत दोन्ही अर्धे मिळून एकंदर ५७ मात्रा असतात, त्यांतून ४३ वजा केले असतां १४ राहतात. तितकेच ह्या आर्येतील गुरु असून बाकीचे एकोणतीस लघुवर्ण जाणावे. मात्रासमकादि इतर वृत्तांतील लघुगुरुसंख्याही अशाच ओळखाव्या. ह्या सूत्राच्या शेवटीं ‘इति’ शब्द लावून येथें हा चवथा अध्याय संपला हें ज्ञापित केलें आहे. ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP