अनंतचतुर्दशी सार्थकथा

अनंतचतुर्दशी सार्थकथा

श्रीगणेशाय नमः ॥
नैमिषारण्याचेठायी सूत शौनकादिका ऋषीला ह्मणतात, हे ऋषी हो ! पूर्वी धर्मपारायण पंडूपुत्र धर्मराजानें
जरासंधाचा वध करून सर्व पृथ्वीवर आपले वर्चस्व स्थापन करावें अशा हेतूने भागीरथी नदीच्या कांठी राजसूय यज्ञ
करण्याचा विचार केला ॥१॥
प्रथमत: त्यानें श्रीकृष्ण आणि आपले बंधु भीमार्जुन यांच्या संमतीने त्या यज्ञाकरितां मोठा
विस्तीर्ण आणि नानाप्रकारच्या रत्नांनी सुशोभित असून ज्यांत सर्वत्र मुक्ताफ़ळें जडलीं आहेत असा इंद्राच्या प्रासादाप्रमाणें
अत्यंत रमणीय असा मंडप तयार केला, आणि त्या यज्ञासमारंभाकरितां आपलें आप्त, संबंधी, स्नेही वगैरे जितके राजे होते त्या सर्वाला आमंत्रणें पाठवून बोलावून आणिलें ॥२॥३॥
त्या वेळी गांधारीचा पुत्र राजा दुर्योधनही तेथें आला होता ॥४॥
तो त्या मंडपातून पहांत हिंडत असतां पाण्यासारखी स्वच्छ स्फ़टिकांची भूमि तयार केली होती, ती पाहून हें पाणी आहे  असा त्याला भास होऊन त्यानें आपली वस्त्रें भिजतील असें समजून वर सांवरून धरिलीं आणि तेथून तो हळू हळू चांचपटत चालूं लागला ॥५॥
अशा प्रकारें चालत असलेल्या त्या दुर्योधनाला पाहून तेथें असलेल्या द्रौपदी आदि मुख्य मुख्य स्त्रिया किंचित हसल्या, ते जाणून दुर्योधन मनांत फ़ार खट्टू झाला आणि लौकर लौकर चालूं लागला, तों पुढें दुसरी एक खरोखर पाण्यानें भरलेली अशी तळी असून पहाणाराला ती स्फ़टिकाच्या फरसबंदीसारखी दिसत असे, ती त्याच्या दृष्टीस पडली, तेव्हा पहिल्याप्रमाणेच ही देखील स्फ़टिकांचीच भूमि असेल असें समजून तो नि:शंकपणें चालूं लागला, आणि एकदम त्या तळींत पडला ॥६॥
तें पाहून तर पुन: त्या द्रौपदीआदि स्त्रिया, सर्व राजे, आणि महातपस्वी ऋषि वगैरे सर्व लोक मोठयानेंमहसूं लागले ॥७॥
तेव्हां तो महाराजाधिराज दुर्योधन आपल्या अंत:करणात अतिशय कोपाविष्ट होऊन शकुनीमामासहवर्तमान हस्तिनापुरास जाण्यास निघाला ॥८॥
तेव्हां तो कपटी शकुनी मधुरवाणीनें त्यास ह्मणाला, हे राजा ! तुला या वेळी मोठा
राग आला आहे हें खरें; परंतु पुढें आपणाला आपलें कार्य साधून घेणें आहे, ह्मणून तूर्त तूं या आपल्या रागाला सोडून दे ॥९॥
यांच्या या यज्ञाची समाप्ति झाल्यावर द्यूताच्या योगानें यांचे सर्व राज्य तुला मिळेल, याकरिता हें राजा ! तूं लौकर ऊठ
आणि त्या यज्ञमंडपांत चल ॥१०॥
असें शकुनीचे बोलणें ऐकून, फ़ार चांगलें आहे असें ह्मणून दुर्योधन पुन: यज्ञमंडपांत गेला. पुढें यथाविधि यज्ञ संपूर्ण झाल्यावर सर्व राजे पांडवांचा निरोप घेऊन आपापल्या नगरांस गेले ॥११॥
नंतर दुर्योधन राजाही त्यांचा निरोप घेऊन हस्तिनापुरास गेला. कांही दिवस गेल्यानंतर दुर्योधनानें पंडुपुत्र धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांस हस्तिनापुरास बोलावून नेऊन ॥१२॥
आज तुह्मी आह्मी द्यूत खेंळूंया असें त्यांस सांगितलें. त्यावरुन धर्मराज दुर्योधनाबरोबर द्यूत खेळूं लागला, त्यांत पांडवांचे सर्वस्व जाऊन दुर्योधनास मिळालें. याप्रमाणें त्या निष्पाप पांडवांचा द्यूतांनें पराभव झाला आणि दुर्योधनानें त्यांचे सर्वस्व घेऊन त्यांना अरण्यांत घालविलें ॥१३॥
तेव्हां ते पांडव मोठे राजे असूनही जंगली लोकांप्रमाणें नानाप्रकारची दु:खे भोगीत अरण्यांत राहूं लागले. हें दु:खकारक वर्तमान कृष्णानें ऐकिलें. तेव्हां तो जगदीश्वर भीमार्जुनादि बंधूंसहित वनवास भोगणा-या धर्मराजाला भेटण्याकरितां त्या अरण्यांत गेला ॥१४॥
सून शौनकादिकांस ह्मणतात, याप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हां अरण्यांत गेला तेव्हां वनवास भोगीत असल्यामुळे दु:खानें कृश
झालेल्या पांडवांनी त्या महात्म्या श्रीकृष्णाला पाहतांच साष्टांग नमस्कार घालून ते त्यास विचारूं लागले ॥१५॥
धर्मराज ह्मणतो, हे कृष्णा ! मी सांप्रत आपल्या भावांसहवर्तमान फ़ार दु:खी झालों आहें, तेव्हां ह्या अनंत दु:खसागरापासून
आमची कशी मुक्ति होईल तें सांग ॥१६॥
कोणत्या देवाची पूजा केल्य़ानें किंवा कोणतें व्रत केल्यानें आमचें अत्युत्तम राज्य आह्मांस पुन:प्राप्त होईल आणि तुझ्या प्रसादानें आमचें सर्व प्रकारें हित होईल ते मला सांग ॥१७॥
याप्रमाणें धर्मराजाचें भाषण ऐकून श्रीकृष्ण ह्मणाले, हे राजा ! सर्व पापाचा नाश करून सकल स्त्रिया आणि पुरूष यांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारें आणि सर्वप्रकारें कल्याणकारक असें एक अनंतव्रत आहे ॥१८॥
तें भाद्रपद शुक्ल चतुर्दशीचे दिवशी करावें त्याच्या अनुष्ठानमात्रेंकरुन सर्व पापांचा नाश होतो ॥१९॥
याप्रमाणें श्रीकृष्णाचें वाक्य ऐकून धर्मराज ह्मणाला हे श्रीकृष्णा ! तूं ज्या अनंताचें व्रत ह्मणतोस तो अनंत कोणता ! नागांमध्यें श्रेष्ठ जो शेष त्याला अनंत असें ह्मणतात, तेव्हां तो ॥२०॥
किंवा परमात्म्यालाही अनंत असें ह्मणतात तो. अनंत याशब्देकरुन ब्रह्माचेंही ग्रहण करितात, याप्रमाणे अनंत हें नांव पुष्कळांला आहे, ह्मणून ज्याचें व्रत करावयाचें तो अनंत कोणता तें हे केशवा ! मला सांग ॥२१॥
हे ऐकून श्रीकृष्ण ह्मणतो हे राजा धर्मा ! अनंत हें माझेंच नांव आहे, आणि मीच त्या रूपानें प्रगट झालों आहें असं समज. सूर्यादि नवग्रहांचा आत्मा, ज्याला काल असें ह्मणतात ॥२२॥
आणि ज्याचें कला, काष्ठा, मुहूर्त, दिवस आणि रात्र हें शरीर असून पंधरवडा, महिना, ऋतु, नक्षत्रें आणि युगें ह्या नांवांनीं जी कालाची व्यवस्था आहे तिच्या योगेंकरून ॥२३॥
जो हा काल ह्मणून प्रसिध्द आहे, त्यालाच मीं अनंत असें ह्मणतों व तो जो अनंत तोच मी कृष्ण या नांवानें पृथ्वीचा भार, दूर करण्याकरितां सांप्रत या पृथ्वीवर अवतर्लों आहें ॥२४॥
हे धर्मा ! मी दानवांच्या वधाकरितां वसुदेवाच्या पोटी जन्मलो आहें असें समज आणि नेहमी साधूंचें संरक्षण करण्याकरितां मी अवतार धारण करितों असें जाण ॥२५॥
मला आदिमध्य आणि मरण ही नाहींत: कृष्ण, विष्णु, शिव, हरि, वैकुंठ, भास्कर आणि सोम-अशीं सर्व जगांत व्यापून राहणा-या मला ईश्वराला नांवे आहेत ॥२६॥
मी महाकालरुप असून सर्व जगाची उत्पत्ति, स्थिति आणि लय ही करणारा आहें असें समज. हे महाबाहो, धर्मा ! मी
विश्वरूप आहें याचा अनुभव येण्याकरितां जें योगीजनांनी ध्यान करण्याला योग्य असून अत्युत्तम आणि अनंत असें माझें विश्वरूप मीं पूर्वी अर्जुनाला दाखविलें आहे, की, ज्या माझ्या विश्वरूपांत चौदा इंद्र, ॥२७॥२८॥
आठ वसु, बाराआदित्य, अकरा रुद्र, सप्तर्षि, सात समुद्र, पर्वत, नद्या, वृक्ष ॥२९॥
सत्तावीस नक्षत्रें, दहा दिशा, भूमि, पाताळ आणि पाताळ आणि भूर्भुव:स्वर इत्यादि वरचे लोक हे सर्व माझ्यामध्यें समावेश पावले आहेत. हे धर्मा ! याविषयीं संदेह बाळ्गूं नको. जो साक्षात विश्वरुपी तोच मी आहें यांत संशय नाहीं ॥३०॥
अशा प्रकारचें कृष्णाचें भाषण ऐकून धर्म ह्मणाला, हे कृष्णा ! तूं सर्व ज्ञात्यांमध्यें फ़ार श्रेष्ठ आहेस ह्मणून अनंतव्रताचे माहात्म्य आणि त्याचा विधि मला सांग, व तें व्रत केले असतां कोणते पुण्य व कोणतें फ़ळ प्राप्त होतें ते सांग. तसेंच या व्रताच्या संबंधानें कोणतें दान आणि कोणाची पूजा करावयाची तें सांग ॥३१॥
आणि पूर्वी हे व्रत कोणी केलें होतें व त्याला काय फ़ळ प्राप्त झालें तेंही सांग. तसेंच मनुष्यलोकी हें व्रत प्रथम कोणी केलें तो सर्व प्रकार विस्तारपूर्वक मला सांग ॥३२॥
हें ऐकून भगवान श्रीकृष्ण ह्मणतो, हे राजा ! पूर्वी कृतयुगांत सुमंतु नांवाचा एक ब्राह्मण होता, त्यानें वसिष्ठगोत्रात उत्पन्न झालेल्या भृगुनामक ब्राह्मणाची जी अत्यंत रुपवती दीक्षा नांवाची कन्या होती तिच्याशीं वेदोक्त विधीनें लग्न केलें ॥३३॥
पुढें कांही काळानें त्या सुमंतूला दीक्षेच्या पोटीं अनंत लक्षणांनी युक्त अशी एक उत्तम कन्या झाली, तिचे त्यानें
शीला असें नांव ठेविलें. ती सुशील असून बापाच्या घरी शुक्लपक्षींच्या चंद्रकलेप्रमाणें वाढत चालली होती ॥३४॥
पुढें कांही दिवस गेल्यानंतर त्या मुलीची आई दीक्षा हिला ताप येऊन त्या तापाच्या दाहानें फ़ार पीडित होऊन नदीतीरीं मरण पावली. ती पतिव्रता असल्यामुळे स्वर्गास गेली ॥३५॥
पुढें त्या सुमंतूने दुसरी एका धर्मनिष्ठ पुरुषाची उपवर कन्या पाहून तिच्याशी यथाविधि लग्न केलें. त्या त्याच्या स्त्रीचें नांव कर्कशा असें होतें ॥३६॥
तसेंच तिचें शीलही तिच्या त्या नांवाप्रमाणेंच वाईट होतें. दीक्षेची कन्या आपल्या नांवाप्रमाणे सुशीला असल्यामुळे आपल्या बापाच्या येथेच राहून गृहकृत्यांत निमग्न असें ॥३७॥
तिनें भिंतीवर, खांबांवर, दरवाज्यांवर आणि देवडीवर नानाप्रकारच्या रंगांनी अनेक प्रकारची चित्रे काढून ॥३८॥
आणि तसेंच शंख, पद्य व स्वस्तिकें इत्यादि काढून घर सुशोभित करावें ॥३९॥
याप्रमाणें ती मंगलरुपिणी मुलगी शीला आपल्या पित्याच्या घरांत वाढत असतां कांही दिवसांनी यौवनावस्था प्राप्त झाली असें तिच्या बापानें पाहिलें तेव्हां ॥४०॥
ती विवाहाला योग्य झाली आहे असें जाणून सांप्रत पृथ्वीवर हिला अनुरुप असे वर कोणकोणतें आहेत याविषयी मनांत विचार करूं लागला; परंतु तसा कोणी आढळेना. तेव्हां आतां ही कोणाला द्यावी अशा विचारांत पडून फ़ार दु:खित झाला ॥४१॥
इतक्यांत वेदवेत्त्यांत परम श्रेष्ठ व श्रीमान असा कौंडिण्य ऋषि आपणांकरितां योग्य कन्या पहात पहात चोहोंकडे फ़िरत फ़िरत त्या सुमंतूच्या घरी आला ॥४२॥
तेव्हां ही सुमंतूची मुलगी शीला रुपानें व गुणानें अति उत्तम आहे असें पाहून कौंडिण्य सुमंतूला ह्मणाला, ह्या तुझ्या सुरुप कन्येला वरानें अशी माझी इच्छा आहे. सुमंतूला तें त्याचें ह्मणणें मान्य झालें आणि त्याप्रमाणें त्यानें लग्नाची तयारी करुन शुभ मुहूर्तावर त्या द्विजश्रेष्ठ कौंडिण्याला आपली कन्या दिली ॥४३॥
त्यानें तो विवाह आपल्या शाखेला योग्य अशा गृह्यसूत्रांत सांगितलेल्या विधीनें केला. हे धर्मराजा ! तो सोहळा फ़ारच आनंदकारक असा झाला. आसपासच्या ऋषींच्या स्त्रियांनी येऊन मंगलकारक गीतें गाऊन विवाहसंबंधी शिष्टाचार केला ॥४४॥
ब्राह्मणकारक मंत्र ह्मणत होते, बंदिजन जयघोष करीत होते. याप्रमाणें सर्व पार पडल्यावर वधूवराला आपल्या घरी पाठविण्याचा समय आला तेव्हां सुमंतू आपल्या कर्कशानामक स्त्रीला ह्मणाला ॥४५॥
आपलें जांवई आज स्वगृही जाणार, तेव्हां त्यांच्या संतोषाकरितां त्याना कांही देणगी दिली पाहिजे. सुमंतूचे हें बोलणें ऐकून ती कर्कषा फ़ार संतापली, आणि लग्नाकरितां जीं गुड्या तोरणें वगैरे उभारिली होतीं ती सर्व तिनें चोहींकडें उडवून दिलीं ॥४६॥
दागदागिने वगैरे जें काहीं होतें ते पेटीत घालून कुलूप लावून बंदोबस्त केला, आणि जांवयाला तुह्मी आपल्या घरी लौकर निघून जा ह्मणून सांगून, फ़राळाचे सामानाचा चाराचुरा वाटेत खाण्याकरितां फ़राळाला ह्मणून दिला ॥४७॥
आणि सुमंतूस ह्मणाली कीं आतां घरांत कांही द्रव्य उरलें नाही, खोटें वाटत असल्यास शोधून पहा.  कर्कशेचे असे भाषण ऐकून सुमंतु फ़ार रंजीस झाला, आणि कांही उपाय नाही असें पाहून उगाच राहिला ॥४८॥
इकडे कौंडिण्यही विवाह यथासांग झाला तेव्हां मोठया संतोषानें आपल्या सास-याचा निरोप घेऊन त्या नवोढा सुशील पत्नीला घेऊन उत्तम बैल जुंपिलेल्या गाडीत बसून सावकाश सावकाश मार्गक्रमण करूं लागला ॥४९॥
पुढें वाटेंत त्याला यमुना नदी लागली, ती ओलांडून तो पलीलडच्या तीरीं गेला आणि तेथें गाडी सोडून बैलांस चारापाणी घालण्यास व गाडीचे संरक्षण करण्यास शिष्यांस सांगून आपण आपलें आवश्यक नित्यकर्म आटोपण्याकरितां स्नान करण्यास गेला ॥५०॥
त्या वेळी दोनप्रहराच्या भोजनाचा समय झाला होता ह्मणून ती कौंडिण्याची स्त्री शीलाही गाडीखाली उतरली, तों त्या यमुनेच्या तीरी रक्तवस्त्रे नेसलेल्या अशा पुष्कळ स्त्रिया तिनें पाहिल्या ॥५१॥
त्या दिवशी भाद्रपदशुक्ल चतुर्दशी होती ह्मणून त्या स्त्रिया भगवान अनंताचे पूजन करीत होत्या. त्यांची ती पूजा पाहून ती शीला हळू हळू त्या स्त्रियांकडे जाऊन त्यांस विचारूं लागली ॥५२॥
बायांनो ! हें तुह्मी काय करीत आहां ? अशा प्रकारच्या ह्या व्रताचें नांव काय तें मला सांगा. हें ऐकून सुस्वभाव हेंच जिचें भूषण आहे अशा त्या शीलेला त्या सर्व स्त्रिया ह्मणाल्या, याचे नांव अनंतव्रत आहें. ह्या व्रतांत भगवान अनंताची पूजा करावयाची असते ॥५३॥
हें ऐकून शीला त्यांना ह्मणाली, असें हे अत्युत्तम व्रत आहे तर मीही तें करीन ॥५४॥
परंतु याचा विधि कसा, यांत कोणतें दान द्यावयाचें आणि ह्यांत कोणाची पूजा करावयाची ते सर्व तुह्मी मला सांगा.
ते ऐकून त्या स्त्रिया ह्मणाल्या, हे शीले ! उत्तम धान्याचें एक प्रस्थभर पीठ घेऊन त्याचें पुरूषसंज्ञक ह्मणजे अनरसे,
घारगे इत्यादि पक्वान करावें ॥५५॥
त्यातलें अर्धे ब्राह्मणाला दान करावें आणि अर्धे उरेल तें आपण भक्षण करावें. आपल्या शक्तीप्रमाणें ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. शठपणा करूं नय ॥५६॥
वर सांगितलेल्या दानासहित अनंताची पूजा नदीच्या कांठी करावी, ती अशी :- दर्भाचा शेषनाग करून तो वेळूच्या परडीत ठेवावा ॥५७॥
नंतर स्नान करुन मंडलावर त्याची स्थापना करुन धूप, दीप आणि चंदन इत्यादि उपचारांनी आणि सुवासिक पुष्पांनी अनंताची पूजा करुन, नाना-प्रकारच्या उत्तम पक्वान्नांचा नैवेद्य समर्पण करावा ॥५८॥
याप्रमाणे केल्यानंतर देवाच्या संनिध चांगला घटट असा कुंकुमानें रंगविलेला आणि चौदा गांठींचा दोरक ( अनंत ) ठेवून गंधादि उपचारांनी त्याची पूजा करावी. नंतर तो दोरक पूजा करणारा पुरूष असल्यास त्यानें आपल्या उजव्या
हातांत आणि स्त्री असल्यास तिने आपल्या डाव्या हातांत पुढील मंत्राने मंत्रून बांधावा ॥५९॥
" हे वासुदेवा ! अनंत संसाररूपी महासमुद्रांत बुडत अ़सलेल्या मला वर काढ, आणि तुझ्या अनंतरुपाकडे माझे अंत:करण जडेल असें कर. हे अनंतरुपी अनंतसूत्रा ! तुला माझा वारंवार नमस्कार असो " ॥६०॥
या मंत्रानें तो दोरक आपल्या हातां बांधून भगवान अनंताची ही कथा श्रवण करावी, नंतर भगवान नारायण विश्वरुपी
आणि मोठा प्रकाशवान अशा अनंताचे ध्यान करून ॥६१॥
नंतर भोजन करून आपल्या घरीं जावें . स्त्रिया ह्मणतात, हे भद्रे शीले ! तूं विचारिल्याप्रमाणें आह्मी तुला हे व्रत सांगितलें. श्रीकृष्ण ह्मणतात, हे धर्मा ! याप्रमाणे त्या स्त्रियांपासून अनंतव्रत श्रवण करून शीलेने आनंदित होऊन ॥६२॥
त्या दिवशी तेथेच तें व्रत केले, आणि वर सांगितल्याप्रमाणें तो चांगला दोरक आपल्या डाव्या हातांत बांधून नंतर माहेराहून जें कांही फ़राळाचें आणिलें होते त्यांतील अर्धे ब्राह्मणाला दान करून राहिलेले अर्धे पति नित्यकर्म करुन आल्यावर त्यासहवर्तमान तिने भक्षण केलें ॥६३॥
आणि आनंदित होऊन पुन: पतिसह वर्तमान बैलाच्या गाडींत बसून हळू हळू आपल्या घरीं जाऊन पोहोंचली. त्या अनंतव्रताचा तिला तात्काळ प्रत्यय आला ॥६४॥
त्या अनंतव्रताच्या प्रभावानें कौंडिण्याच्या घरांत गाई-बैलाची समृध्दि होऊन गृहाश्रम फार शोभूं लागला. तशीच धनधान्यांचीही समृध्दि झाली ॥६५॥
सर्व वस्तूंनी त्याचें घर भरून गेले. त्याच्या येथे नेहमी अतीतअभ्यागताची पूजा होत असे यामुळे त्याचें घर फ़ारच रम्य दिसूं लागलें. ती कौंडिण्याची स्त्री शीलाही हिरे, माणकें इत्यादिरत्नांनी जडित अशा नानाप्रकारच्या अलंकारांनी आणि उत्तम वस्त्रांनी भूषित असल्यामुळें ॥६६॥
साक्षात सावित्रीप्रमाणे शोभूं लागली. याप्रमाणें ती आपल्या भर्त्याच्या घरी सुखानें नांदत असतां, एके दिवशी ती आपल्या पतिसन्निध बसली असतां, तिच्या डाव्या हातांत बांधलेला तो अनंताचा दोरक त्याच्या दृष्टीस पडला ॥६७॥६८॥
तेव्हां तो कौंडिण्य ह्मणाला हे शीले ! हें काय आहे ? मी तुल वश असावें ह्मणून हा दोरा बांधिला आहेस काय ?
खरें सांग, हा दोरा त्वां कशाकरितां बांधिला आहेस तो ? ॥६९॥
पतीचें असें बोलणें ऐकून ती ह्मणाली, ज्याच्या प्रसादानें मनुष्याला धनधान्यादि सर्व संपत्ति प्राप्त होताच असा हा अनंत
मी आपल्या हातांत बांधिला आहे ॥७०॥
श्रीकृष्ण ह्मणतात, हे धर्मा ! तें शीलेचे बोलणें ऐकून कौंडिण्यानें लक्ष्मीच्या मदानें अंध होऊन त्या अनंताचा तिरस्कार करुन तो दोरक तत्काळ तिच्या दंडातून तोडिला ॥७१॥
आणि अरे अनंत हे आहे काय ? असे ह्मणून त्या पापकारी कौंडिण्यानें तो दोरक प्रदीप्त झालेल्या अग्नीत टाकिला. तेव्हां ती शीला हाय हाय करीत धांवत गेली. ॥७२॥
तिनें तो दोरक जळतां जळतां अग्नींतून बाहेर काढून दुधाच्या भांड्यांत टाकिला. याप्रमाणें तिनें केलें तथापि तिच्या
पतीनें परमेश्वराचें अवज्ञारुप जें वाईट कर्म केलें तेणें करून तत्काळ त्याच्या सर्व संपत्तीचा नाश झाला ॥७३॥
गोधन चोरांनी नेलें, घर जळून गेलें आणि द्रव्य लुटलें गेलें. जें जें जसजसें त्याच्या येथें आलें तें तें तसतसें नाहीसें
झालें ॥७४॥
स्वजनांशी त्याचा नेगमी कलह होऊं लागला, बंधुजनांकडून मार मिळूं लागला. अनंताचा तिरस्कार केल्यामुळें
त्याच्या घरांत मोठें दारिद्र आलें. हे धर्मा ! फ़ार काय सांगूं ! त्याच्याशी कोणी भाषण देखील करीनासें झालें ॥७५॥
त्याच्या शरीराला अत्यंत दु:ख झालें असून मनही दु:खानें भाजून गेलें, तेव्हा तो कौंडिण्य अगदी वैतागून गेला आणि
सर्वत्र उदास होऊन आपली स्त्री शीला हिला ह्मणूं लागला ॥७६॥
हे शीले ! मला हे एकाएकी दु:ख झालें याचें कारण काय तें मला कळत नाहीं, की जेणेंकरून माझ्या सर्व धनाचा क्षय झाला, आणि आपणास हें दु:ख भोगावे लागत आहे ॥७७॥
स्वजनांशी घरांत नेहमी कलह चालला आहे. माझ्याशीं कोणी बोलत देखील नाही. शरीराला नेहमी संताप आणि मनांत
नेहमी खेद होत आहें ॥७८॥
तेव्हां असें आपल्या हातून काय वाईट झालें तें तुझ्या कांही लक्षांत येतें काय ? आणि आतां आपण काय करावें कीं, जेणेंकरुन आपली स्थिति सुधरेल ? श्रीकृष्ण ह्मणतात, हे युधिष्ठिरा ! पतीचें असें बोलणें ऐकून ती सदाचारसंपन्न साध्वी शीला पतीला ह्मणाली ॥७९॥
बहुतकरुन त्या भगवान अनंताचा आपल्या हातून अपराध झाला त्या पापाचें हें फ़ळ असावें असें मला वाटतें, याजकरितां आपण त्या अनंतालाच प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा ॥८०॥
असें शीलेनें सांगतांच तो कौंडिण्यऋषि मनांत अनंताचें चिंतन करून अति पश्चात्ताप पावून अरण्यांत निघून गेला ॥८१॥ त्यानें भगवान प्रसन्न होईपर्यंत वायु भक्षण करुन तप करण्याचा निश्चय केला आणि मनांत विचार केला की, तो भगवान अनंत मला कोठें दृष्टीस पडेल ॥८२॥ ज्याच्या प्रसादानें सुख आणि दु:ख देणारें धनधान्यादिक मला एका क्षणांत प्राप्त झालें आणि ज्याच्या अवकृपेमुळें तत्काळ तें नाहींसें झाले, असा जो अनंत त्याला मी कोठें पाहूं ॥८३॥ याप्रमाणे विचार करीत तो कौंडिण्य मोठया अरण्यांत भ्रमण करूं लागला. फ़िरतां फ़िरतां एके जागीं फ़लपुष्पांनी सुशोभित असा एक मोठा आंब्याचा वृक्ष त्यानें पाहिला ॥८४॥
त्यावर त्याला एक देखील पक्षी दृष्टीस पडला नाहीं. मात्र तो वृक्ष कोटयावधि किड्यांनी बुंधापासून शेंडयापर्यंत
भरलेला होता. कौंडिंण्यानें त्याला विचारिलें, हे महावृक्षा ! तूं कोठें अनंत पाहिला आहेस काय ? ॥८५॥
हे सौम्या ! जर तूं पाहिला असशील तर मला सांग. त्याच्या दर्शनाकरितां माझें मन फ़ार दु:खित झालें आहे, तेव्हां तो वृक्ष त्याला ह्मणाला हे ब्राह्मणा ! मीं त्याला कोठें ही पाहिलें नाहीं ॥८६॥
याप्रमाणें त्या वृक्षानें नाहीं ह्मणून सांगतांच कौडिण्य फ़ार दु:खित होऊन आतां मला अनंत कोठें भेटेल असा विचार करीत चालला, तों एक सवत्स गाय त्याच्या दृष्टीस पडली ॥८७॥
हे धर्मा ! ती गाय रानांत जिकडेतिकडे धांवत होती. तिला पाहून कौंडिण्य ह्मणाला, हे गाई ! अनंताला तूं कोठें
पाहिलें असलें तर मला सांग ॥८८॥
तें ऐकून ती गाय ह्मणाली, अनंताला मी मुळीं जाणतही नाहीं. ते ऐकून कौंडिण्य पुढें चालला, तों एक बैल हिरब्या गवतांत उभा आहे असें त्यानें पाहिलें ॥८९॥
त्याला पाहून कौंडिण्य ह्मणाला, हे गोपते ! अनंताला तूं कोठें पाहिलें आहेस काय ? तें ऐकून तो बैल ह्मणाला, मी अनंताला कोठेंही पाहिलें नाही ॥९०॥
ते ऐकून कौंडिण्य पुढें चालला तों अत्यंत रम्य अशा दोन तळया त्यानें पाहिल्या. त्यांच्या उदकाच्या लाटा एकमेकीच्या
उद्कांत शिरून जणूं काय परस्परास भेटतच आहेत असें दिसत होतें. ॥९१॥
त्या कमलें, शतपत्रें, आणि कुमुदें इत्यादिकांनी व्याप्त व सुशोभित होत्या. गुंजारव करणारे असे भ्रमर आणि चक्रवाक, हंस, कारंडव, बगळे इत्यादि अनेक पक्षी त्यांच्या आसपास संचार करीत होते ॥९२॥
अशा त्या दोन सुंदर तळया पाहून त्यांस कौंडिण्यानें विचारिलें, अहो ! तुह्मी कोठें अनंताला पाहिलें आहे काय ? तें ऐकून त्या तळया ह्मणतात, हे ब्राह्मणा ! आह्मी त्याला कोठेंही पाहिलें नाहीं ॥९३॥
असें त्यांचे उत्तर ऐकून कौंडिण्य पुढें चालला तों त्यानें एक गाढव आणि एक मोठा हत्ती असे पाहिले. तेव्हां त्यांनाही अनंताला कोठें पाहिलें काय ह्मणून विचारिले. तें ज्यांला विचारिलें त्यांनी आह्मी पाहिला नाहीं ह्मणून सांगितलें, तेव्हां तो अगदीं निराश होऊन तेथेच बसला. त्या वेळी तो खाण्यावांचून फ़िरण्याच्या योगानें फ़ार व्याकुळ होऊन आपल्या प्राणाविषयीं देखील निराश झाला होता ॥९५॥
हे धर्मा ! तो अत्यंत उष्ण असा मोठा सुस्कारा टाकून भूमीवर निश्चेष्ट पडला. कांहीं वेळानंतर तो कौंडिण्य ब्राह्मण शुध्दीवर येऊन अनंत ! अनंत !! असें ह्मणत उठून बसला ॥९६॥
हे धर्मा ! आपणाला अनंताचें दर्शन होत नाहीं असें जाणून आता आपण प्राणत्याग करावा असा विचार करून तो तेथून उठला आणि प्राणत्याग करण्याकरितां एका झाडाला दोर बांधून त्याचा फ़ांस आपल्या गळयाला लाविला ॥९७॥
तों भगवान अनंत कृपाळु होऊन त्याच्यावर अनुग्रह करण्याकरितां वृध्द ब्राह्मणाचें रुप धरुन तेथे प्रत्यक्ष प्राप्त झाला, आणि त्या कौंडिण्यास ह्मणाला, हे ब्राह्मणा ! इकडे ये ॥९८॥
असें ह्मणून त्याचा उजवा हात धरुन त्याला आपल्याबरोबर एका गुहेंत घेऊन गेला. तेथें गेल्यावर त्या गुहेंत त्यानें सुंदर स्त्रीपुरूषांनी भरलेली अशी आपली नगरी दाखविली ॥९९॥
त्या नगरीत एका दिव्य सिंहासनावर आपण बसलों आहें आणि पार्श्वभागी शंख, चक्र, गदा व पद्य हीं प्रत्यक्ष मूर्तिमंत आपली सेवा करीत आहेत आणि गरूड हात जोडून आहें ॥१००॥
असें त्या कौंडिण्यास दाखविलें. तेव्हां तें भगवंताचें विश्वरुप, अनंत विभूतींनीं विराजमान असून अमित तेजवान ॥१०१॥
आणि कौस्तुभमण्यानें विराजित असून वनमालेनें विभूषित असें पाहून त्याने परमानंदेकरून अपराजित अशा त्या देवदेवेशाला ॥१०२॥
जय देव. जय भगवन, जय अनंत असें मोठयानें ह्मणून नमस्कार घातला, आणि हात जोडून तो त्या अनंताला ह्मणाला, मी पापी आहें, पापकर्मा आहें, मी पापात्मा आहें, आणि माझा जन्मही पापापासूनच आहें ॥१०३॥
ह्मणून हे भगवान पुंडरीकाक्षा ! माझे रक्षण कर आणि माझ्या पापांचा नाश कर. हे भगवन ! तुझ्या चरणकमलांवर मीं आपलें मस्तक ठेविलें त्यामुळें आज माझ्या जन्माचे साफ़ल्य झालें आणि आजपर्यंत वांचल्याचेंही सार्थक झालें. कौंडिण्यानें ह्याप्रमाणें केलेली प्रार्थना ऐकून प्रभु स्निग्ध अशा वाणीनें ह्मणतात ॥१०४॥॥१०५॥
हे ब्राह्मणश्रेष्ठा ? भिऊं नको. तुझ्या मनांत जें काय असेल तें सांग. तें ऐकून कौंडिण्य ह्मणाला, हे प्रभो ! मी
ऐश्वर्यमदानें मत्त होऊन माझ्या स्त्रीनें आपलें दंडांत बांधिलेला अनंताचा दोरक तोडिला ॥१०६॥
त्या पापानें माझे सर्व ऐश्वर्य नष्ट झालें. घरांतल्या मनुष्यांशी नेहमी भांडणें होऊं लागलीं. कोणीही माझ्याशी भाषण करीनासें झालें ॥१०७॥
हे भगवन ! त्यामुळे वैताग पावून तुझ्या दर्शनाच्य इच्छेनें अरण्यांत हिंडत होतों; परंतु: हे देवदेवेश ! तूं कृपा करून
आपलें दर्शन दिलेंस आणि आपलें दिव्यरूपही दाखविलेंस ॥१०८॥
करितां आतां माझे दुसरें कांहीएक मागणें नाहीं. माझ्या हातून जें मोठें पाप झालें आहें तें कशानें दूर होईल हें कृपा करुन सांग. श्रीकृष्ण ह्मणतो, हे राजा धर्मा ! तें त्या ब्राह्मणाचे वचन ऐकून देवदेवेश भगवान अनंत त्या कौंडिण्यावर अनुग्रह करिता झाला ॥१०९॥
हे राजा ! भक्तीनें संतुष्ट केलेला देव काय देणार नाहीं ? भगवान अनंत त्या कौंडिण्याला ह्मणाला, हे कौंडिण्या ! आतां उशीर लावूं नकोस, लवकर आपल्या घरीं जा ॥११०॥
आणि भक्तिपूर्वक चौदा वर्षेपर्यंत अनंतव्रत कर, ह्मणजे तूं सर्व पापांपासून मुक्त होऊन उत्तम सिध्दीप्रत पावशील ॥१११॥
आणि पुत्रपौत्रादियुक्त होऊन ऐहिक सर्व सुखांचा यथेच्छ उपयोग घेऊन अंती माझे स्मरण होऊन नि:संशय माझ्या पदाला पावशील ॥११२॥
याशिवाय जेणेंकरून सर्व लोकांवर उपकार होतील असा एक तुला दुसरा वर देतों; तो हा कीं, हें उत्तम आख्यान ज्यांत शीलेने अनंतव्रत केल्याची आणि तूं अनंताचा अपमान केला इत्यादि कथा आहे ॥११३॥
असें हें जो मनुष्य श्रवण करील आणि त्याप्रमाणें अनंताचें शुभ व्रत करीत तो तत्काल पापांपासून मुक्त होऊन उत्तम गतीप्रत पावेल ॥११४॥
हे ब्राह्मणा ! आतां तूं ज्या वाटेनें तेथे आलास त्याच वाटेनें लौकर परत घरीं जा. या प्रकारचें अनंताचें वचन श्रवन करून कौंडिण्य त्यास ह्मणतो, हे स्वामी ! मी कांही विचारितों तेवढें मला सांगा. मीं या अरण्यांत फ़िरतां फ़िरतां कांही कौतुक पाहिलें तें काय आहें तें मला सांगा. तें कौतुक हें कीं, तो जो मीं आम्रवृक्ष पाहिला तो कोण ? गाय ती कोण ? बैल तो कोण ? ॥११५॥११६॥
सुंदर कमलांनी सुशोभित दोन तळया त्या कोण ? ॥११७॥
गाढव तो कोण ? हत्ती तो कोण ? आणि तो ब्राह्मण पाहिला तो कोण ? कौंडिण्यानें असें विचारलेलें ऐकून भगवान अनंत
त्यास ह्मणतात, जो तूं आम्रवृक्ष पाहिलास तो एक वेदविद्याविशारद ब्राह्मण होता ॥११८॥
त्यानें आपणाजवळची विद्या सशिष्यांना दिली नाहीं यामुळें तो आम्रवृक्ष झाला. जी गाय पाहिलीस ती पृथ्वी होय. तिनें पूर्वी सर्व औषधींची बीजें
अंगांत जिरवून टाकिल्यामुळें तिला तें रूप मिळालें ॥११९॥
जो तूं बैल पाहिलास तो धर्म होय. तो बैलाचें रुप धरून हिरव्या गवतांत उभा होता. ज्या दोन तळया तूं पाहिल्यास त्या धर्म आणि अधर्म यांच्या व्यवस्था होत ॥१२०॥
त्या पूर्वजन्मीं ब्राह्मणकुळांत उत्पन्न झालेल्या दोन सख्या बहिणी होत्या. त्या दोघींचे एकमेकींवर फ़ार प्रेम असे.
धर्माधर्मादि जें कांही करणें तें त्या दोघी एकमेकीतच करीत ॥१२१॥
त्यांनी ब्राह्मणाला किंवा अतिथि, दरिद्री इत्यादिकांला कांही दिलें नाही. भिका-याला भिक्षाही कधी घातली नाही, त्या पापकर्मानें ॥१२२॥
त्या मोठमोठया लाटांच्या मळांनीं एकमेकींत प्रवेश करीत आहेत. त्यांचे उदक कधीं बाहेर जात नाहीं. जो तूं गाढव पाहिलास तो क्रोध गाढवाच्या रूपानें हिंडत होता. जो हत्ती तूं पाहिलास तो मद होय ॥१२३॥
जो तूं ह्मतारा ब्राह्मण पाहिलास तो मीच अनंत . जी गुहा पाहिलीस ती संसाररूप गुहा होय. हे ब्राह्मणा ! याप्रमाणें तूं विचारिलेंस त्या प्रश्नाचें उत्तर दिलें. इतकें बोलून देवदेवेश भगवान तेथेच अंतर्धान पावले ॥१२४॥
तेव्हां तें सर्व स्वप्नाप्राय झालेले पाहून कौंडिण्य आपल्या घरी आला. नंतर चौदा वर्षे त्यानें यथाविधि अनंतव्रत केलें ॥१२५॥
श्रीकृष्ण ह्मणतात, हे पंडुपुत्रा धर्मा ! अनंतानें सांगितलें होतें त्याप्रमाणे पुत्रपौत्रादिकांसहवर्तमान मोठें ऐश्वर्य भोगून अंती अनंताचे स्मरण प्राप्त होऊन तो कौंडिण्य अनंताच्या नगराला प्राप्त झाला ॥१२६॥
हे राजा धर्मा ! तसें तूं ही कथा श्रवणपूर्वक अनंताचें व्रत कर; ह्मणजे अनंताच्या वचनाप्रमाणे तुझें सर्व चिंतित कार्य सिध्द होईल ॥१२७॥
कौंडिण्याने चौदा वर्षे व्रत करुन जें फ़ल त्याला प्राप्त झालें ते एकच वर्ष कथाश्रवण-पूर्वक अनंताचें व्रत केल्यानेंही प्राप्त होतें ॥१२८॥
हे धर्मराजा ! सर्व व्रतांत जे उत्तम व्रत तें तुला सांगितलें; हे केल्यानें मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो यांत संशय नाहीं ॥१२९॥
अधिक तर काय ? ही कथा जे कोणी वाचलेली सतत श्रवन करितील अथवा जे कोणी पठण करितील तेही पापापासून मुक्त होऊन वैकुंठास जातील ॥१३०॥
हे कुरुकुलोभ्दवा धर्मा ! ह्या संसाररुपी गुहेमध्यें सुखानें विहार करण्यास जे इच्छितात, आणि ज्यांची अंत:करणें शुध्द आहेत व जे त्रिभुवनेश्वर जो भगवान अनंत त्याची पूजा करून त्याचा दोरक जे आपल्या उजव्या दंडामध्ये बांधतात ते इहलोकी सर्व सुखें भोगून अंती मोक्षपदाला प्राप्त होतील ॥१३१॥

इति श्रीभविष्योत्तरपुराणोक्तश्रीमदनंतव्रतकथा संपूर्णा ॥

==
संस्कृत अनुवाद
अथकथा॥
॥सूतउवाच॥ पुरातुजाह्नवीतीरेधर्मोपरायण:॥ जरासंधवधार्थाराजसूयमुपाक्रमत्‍ ॥१॥
कृष्णेनसहधर्मोऽसौभीमार्जुनसमान्वित: ॥ यज्ञशालांप्रकुर्वीतनानारत्नोपशोभिताम्‍ ॥२॥
मुक्ताफलसमाकीर्णामिंद्रालयसमप्रभाम्‍ ॥ यज्ञार्थंभूपतीन्सर्वान्समानीयप्रयत्नत: ॥३॥
गांधारीतन योगजातदानींनृपनंदन:॥ दुर्योधनैतिख्यात:समागच्छन्मखालयम्‍ ॥४॥
दृष्ट्वादुर्योधनेनात्रप्रांगणंजलसन्निभम्‍ ॥ ऊर्ध्वंकृत्वातुवस्त्राणितत्रागच्छाच्छनै:शनै: ॥५॥
स्मितवक्राश्चतंदृष्ट्वाद्रौपद्यादिवरांगना: ॥ दुर्योधनस्ततोगच्छन जलमध्येपातह ॥६॥
पुन:सर्वेनृपाश्चैवऋषयश्वतपोधना: ॥ उपहासंचचक्रुस्ताद्रौपद्यादिसुलोचना: ॥७॥
महाराजाधिराजोऽसौमहान्‍ क्रोधपरायण: ॥ विनिर्गत:स्वकंराष्ट्रंमातुलेनावृत्तोनृप: ॥८॥
तस्मिन्कालेतुशकुनि:प्रोवाचमधुरंवच: ॥ मुंचराजन्‍ महारोषतंपुरत: कार्यगौरवात्‍ ॥९॥
द्यूतोपक्रमणेनैवसर्वंराज्यमवाप्स्यसि ॥ गंतुमुत्तिष्ठराजेंद्रसत्रस्यसदनंप्रति ॥१०॥
तथेत्युक्त्वामहाराज:समागच्छन्मखालयम्‍ ॥ विनिर्वृत्यमखंजग्मुर्नृपा:सर्वेस्वकंपुरम्‍ ॥११॥
ततोदुर्योधनोराजासमागत्यगजाह्वयम्‍ ॥ आनीयपांडुपुत्रांश्चधर्मभीमार्जुनान्वरान्‍ ॥१२॥
द्यूतारंभंचाकुरुतस्वंराज्यंप्राप्तवांस्तत: ॥ द्यूतेनैवजिता:सर्वेपांडवावीतकल्मषा:॥१३॥
ततोरण्यांतरेगत्वावर्तंतेवनचारिण: ॥ ततोवृत्तांतमाकर्ण्यभ्रातृभि:सहपांडवम्‍ ॥
युधिष्ठिरंद्रष्टुमना:कृष्णोगाज्जगदीश्वर: ॥१४॥
॥सूतउवाच॥अरण्येवर्तमानास्तेपांडवादु:खकर्शिता: ॥ कृष्णंदृष्ट्वामहात्मानंप्रणिपत्यमब्रुवन्‍ ॥१५॥
युधिष्ठिरउवाच॥ अहंदु:खीहसंजातोभ्रातृभि:परिवारित: ॥ कथंमुक्तिर्वदास्माकमनंताद्दु:खसागरात्‍ ॥१६॥
कंदेवंपूजयिष्यामिराज्यंप्राप्त्स्याम्यनुत्तमम्‍ ॥ अथवाकिंव्रतंकुर्यांत्वत्प्रसादाद्भवेद्धितम्‍ ॥१७॥
॥श्रीकृष्णउवाच॥ अनंतव्रतमत्स्येकंसर्वपापहरंशुभम्‍ ॥ सर्वकामप्रदंनृणांस्त्रीणांचैवयुधिष्ठिर ॥१८॥
शुक्लपक्षेचतुर्दश्यांमासिभाद्रपदेभवेत्‍ ॥ तस्यानुष्ठानमात्रेणसर्वपापंव्यपोहति ॥१९॥
॥युधिष्ठिरउवाच॥ कृष्णकोऽयमनंतेतिप्रोच्यतेयस्त्वयाविभो ॥ किंशेषनागआहोस्विदनंतस्तक्षक:स्मृत: ॥२०॥
परमात्माऽथवानंतउताहोब्रह्मगीयते ॥ कएषोऽनंतसंज्ञोवैतथ्यंमेब्रूहिकेशव ॥२१॥
॥कृष्णउवाच॥ अनंतैत्यहंपार्थममरुपंनिबोधतत्‍ ॥ आदित्यादिग्रहात्मासौय:कालैतिपठयते ॥२२॥
कलाकाष्ठामुहूर्तादिदिनरात्रिशरीरवान्‍ ॥ पक्षमासर्तुवर्षादियुगकालव्यवस्थया ॥२३॥
योऽयंकालो मयाख्यात:सोऽनंतइतिकीर्त्यते ॥ सोऽहंकृष्णोवतीर्णोऽत्रभूभारोत्तारणायच ॥२४॥
दानवानांवधार्थायवसुदेवकुलोद्भवम्‍ ॥ मांविद्धिसततंपार्थसाधूनांपालनायच ॥२५॥
अनादिमध्यनिधनंकृष्णंविष्णुंहरिंशिवम्‍ ॥ वैकुंठंभास्करंसोमंसर्वव्यापिनमीश्वरम्‍ ॥२६॥
विश्वरुपंमहाकालंसृष्टिसंहारकारकम्‍ ॥ प्रत्ययार्थंमयारुपंफाल्गुनायप्रदर्शितम्‍ ॥२७॥
पूर्वमेवमहाबाहोयोगिध्येयमनुत्तमम्‍ ॥ विश्वरुपमनंतंचयस्मिन्निंद्राश्चतुर्दश ॥२८॥
वसवोद्वादशादित्यारुद्राएकादशस्मृता: ॥ सप्तर्षय:समुद्राश्चपर्वता:सरितोद्रुमा: ॥२९॥  
नक्षत्राणिदिशोभूमि:पातालंभूर्भुवादिकम्‍ ॥ माकुरुष्वात्रसंदेहंसोहंपार्थनसंशय: ॥३०॥
॥युधिष्ठिरउवाच॥ अनंतव्रतमाहात्म्यंविधिंवदविदांवर ॥ किंपुण्यंकिंफलंचास्याकिंदानंकस्यपूजनम्‍ ॥
अनंतव्रतमाहात्म्यंविधिंवदविदांवर ॥ किंपुण्यंकिंफलंचास्यकिंदानंकस्यपूजनम्‍ ॥३१॥
केनचादौपुराचीर्णंमर्त्येकेनप्रकाशितम्‍ ॥ एवंसविस्तरंसर्वंब्रूह्यनंतव्रतंमम ॥३२॥
॥श्रीकृष्णउवाच॥ आसीत्पुराकृतयुगेसुमंतुर्नामवैद्विज: ॥ वसिष्ठगोत्रसंभूते:सुरुपांचभृगो:सुताम्‍ ॥३३॥
तस्या:कालेनसंजातादुहितानंतलक्षणा ॥ शीलानाम्नीसुशीलावर्ततेपितृवेश्मनि ॥३४॥
माताचतस्या:कालेनज्वरदाहेनपीडिता ॥ विनष्टासानदीतीरेययौस्वर्गंपतिव्रता ॥३५॥
सुमंतुस्तुततोन्यांवैधर्मपुंस:सुतांपुन: ॥ उपयेमेविधानेनकर्कशांनामनामत: ॥३६॥
दु:शीलांकर्कशांचंडींनित्यंकलहकारिणीम्‍ ॥ सापिशीला पितुर्गेहेगृहार्चनपराबभौ ॥३७॥
कुडयस्तंभबहिर्द्वारदेहलीतोरणादिषु ॥ वर्णकैश्चित्रमकरोन्नीलपीतसितासितै: ॥३८॥
स्वस्तिकै:शंखपद्मैश्चअर्चयंतीपुन:पुन: ॥ तत:कालेबहुगतेकौमारवशवर्तिनी ॥३९॥
एवंसावर्धते शीलापितृवेश्मनिमंगला ॥ पित्रादृष्टातदातेनस्त्रीचिह्नायौवनेस्थिता ॥४०॥
तांदृष्ट्वाचिंतयामासवरानननुगुणान्भुवि ॥ कस्मैदेयामयाकन्याविचार्येतिसुदु:खित: ॥४१॥
एतस्मिन्नेवकालेतुमुनिर्वेदविदांवर: ॥ कन्यार्थीचागत:श्रीमान्‍ कौंडिण्योमुनिसत्तम: ॥४२॥
उवाचरुपसंपन्नांत्वदीयांतनयावृणे ॥ पिताददौद्विजेंद्रायकौंडिण्यायशुभेदिने ॥४३॥
गृह्योक्तविधिनापार्थविवाहमकरोत्तदा ॥ मंगलाचारनिर्घोषंतत्रकुर्वंतियोषित: ॥४४॥
ब्राह्मणा:स्वस्तिवचनंजयघोषंपचबंदिन: ॥ निर्वर्त्योद्वाहिकंसर्वंप्रोक्तवान्‍कर्कशांद्विज: ॥४५॥
॥सुमंतुरुवाच ॥ किंचिद्दायादिकंदेयंजामातु:पारितोषिकम्‍ ॥ तच्छुत्वाकर्कशाक्रुद्धाप्रोत्सार्यगृहमंडनम्‍ ॥४६॥
पेटकेसुस्थिरंबद्द्वास्वगृहंगम्यतामिति ॥ भोज्यावशिष्टचूर्णेनपाथेयंचचकारसा ॥४७॥
उवाचवित्तंनैवास्तिगृहेपश्ययदिस्थितम्‍ ॥ तच्छुत्वाविमना;पार्थसंयतात्मामुनिस्तदा ॥४८॥
कौंडिण्योपिविवाह्यैनांपथिगच्छन्‍ शनै:शनै: ॥ शीलांसुशीलामादायवनवोढांगोरथेनहि ॥४९॥
ददर्शयमुनांपुण्यांतामुत्तीर्यतटेरथम्‍ ॥ संस्थाप्यावश्यकंकर्तुंगत:शिष्यान्नियुज्यवै ॥५०॥
मध्याह्नेभोज्यवेलायांसमुत्तीर्यसरित्तटे ॥ ददर्शशीलासास्त्रीणांसमूहंरक्तवाससाम्‍ ॥५१॥
चतुर्दश्यामचर्यंतंभक्त्यादेवंजनार्दनम्‍ ॥ उपगम्यशनै:शीलापप्रच्छस्त्रीकदंबकम्‍ ॥५२॥
आर्या:किमेतन्मेब्रूतकिंनामव्रतमीदृशम्‍ ॥ ताऊचुर्योषितस्तांतुशीलांविभूषणाम्‍ ॥५३॥
अनंतव्रतमेतद्धिव्रतेऽनंतस्तुपूज्यते ॥ साब्रवीदहमप्येतत्करिष्येव्रतमुत्तमम्‍ ॥५४॥
विधानंकीदृशंतत्रकिंदानंकोत्रपूज्यते ॥ स्त्रिय:ऊचु: ॥ शीलेसदन्नप्रस्थस्यपुन्नाम्नासंस्कृतस्यच ॥५५॥
अर्धंविप्रायदातव्यमर्धुंभुंजीततत्स्वयम्‍ ॥ शक्त्याचदक्षिणांदद्याद्वित्तशाठयविवर्जित: ॥५६॥
कर्तव्यंच सरित्तीरेसदानंतस्यपूजनम्‍ ॥ शेषांकुशमयंकृत्वावंशपात्रेनिधायच ॥५७॥
स्नात्वानंर्तंसमभ्यर्च्यमंडलेगंधदीपकै: ॥ पुष्पैर्धूपैश्चनैवेद्यैर्नानापक्वान्नसंयुतै: ॥५८॥
तस्याग्रतोदृढंन्यस्यकुंकुमाक्तंसुदोरकम्‍ ॥ चतुर्दशग्रंथियुतंगंधाद्यैरर्चयेच्छुभै: ॥
ततस्तुदक्षिणेपुंसांस्त्रीणांवामेकरेन्यसेत्‍ ॥५९॥
अनंतसंसारमहासमुद्रमग्नंसमभ्युद्धरवासुदेव ॥ अनंतरुपेविनियोजयस्वह्यनंतसूत्रायनमोनमस्ते ॥६०॥
अनेनदोरकंबद्धवाकथांश्रुत्वाहरेरिमाम्‍ ॥ ध्यात्वानारयणंदेवमनंतंविश्वरुपिणम्‍ ॥६१॥
भुक्त्वाचांतेव्रजेद्वेश्मभद्रेप्रोक्तंव्रतंतव ॥ श्रीकृष्णउवाच ॥ एवमाकर्ण्यराजेंद्रप्रह्यष्टेनांतरात्मना ॥६२॥
सापिचक्रेव्रतंशीलाकरेबद्धवासुदोरकम्‍ ॥ पाथेयमर्धंविप्रायदत्वाभुक्त्वास्वयंतत: ॥६३॥
पुनर्जगामसंहृष्टागोरथेनस्वकंगृहम्‍ ॥ भर्त्रासहेंवशनकै:प्रत्ययस्तत्क्षणादभृत्‍ ॥६४॥
तेनानंतव्रतेनास्यबभौगोधनसंकुलम्‍ ॥ गृहाश्रमंश्रियाजुष्टंधनधान्यसमन्वितम्‍ ॥६५॥
आकुलंव्याकुलंरम्यंसर्वदातिथिपूजनै: ॥ सापिमाणिक्यकांचीभिर्मुक्ताहारैर्विभूषिता ॥६६॥
दिव्यवस्त्रसमायुक्तासावित्रीप्रतिमाभवत्‍ ॥ विचचारगृहेभर्तु:समीपेसुखरुपिणी ॥६७॥
कदाचिदुपविष्टायादृष्टोबद्ध: सुदोरक: ॥ शीलायाहस्तमूलेतुभर्त्रातस्याद्विजन्मना ॥६८॥
किमिदंदोरकंशीलेममवश्यायकल्पितम्‍ ॥ धृतंसुदोरकंत्वेतत्किमर्थंब्रूहि तत्त्वत: ॥६९॥
॥शीलोवाच॥ यस्यप्रसादात्सकलाधनधान्यादिसंपद: ॥ लभ्यंतेमानवैश्चापिसोनंतोयंमयाधृत: ॥७०॥
शीलायास्तद्वच:श्रुत्वाभर्त्रातेनद्विजन्मना ॥ श्रीमदांधेनकौरव्यसाक्षेपंत्रोटितस्तदा ॥७१॥
कोऽनंतइतिमूढेनजल्पतापापकारिणा ॥ क्षिप्तोज्वालाकुलेवह्नौहाहाकृत्वाप्रधावती ॥७२॥
शीलागृहीत्वातत्सूत्रंक्षीरमध्येसमाक्षिपत्‍ ॥ तेनकर्मविपाकेनसाश्रीस्तस्यक्षयंगता ॥७३॥
गोधनंतस्करैर्नीतंगृहंदग्धंधनंगतम्‍ ॥ यद्यथैवागतंगेहेतत्तथैवपुनर्गतम्‍ ॥७४॥
स्वजनै:कलहोनित्यंबंधुभिस्ताडनंतथा ॥ अनंताक्षेपदोषेणदारिद्र्यंपतितंगृहे ॥
नकश्चिद्वदतेलोकेतेनसार्धंयुधिष्ठिर ॥७५॥
शरीरेणातिसंतप्तोमनसाप्यतिदु:खित: ॥ निर्वेदंपरमंप्राप्त:कौंडिण्य:प्राहतांप्रियाम्‍ ॥७६॥
कौंडिण्यउवाच ॥ शीलेममेदमुत्पन्नंसहसाशोककारणम्‍ ॥ येनातिदु:खमस्माकंजात:सर्वधनक्षय: ॥७७॥
स्वजनै:कलहोगेहेनश्चिन्मांप्रभाषते ॥ शरीरेनित्यसंताप:खेदश्चेतसिदारुण: ॥७८॥
जानासिदुर्नय:क्रोत्रकिंकृत्वासुकृतंभवेत्‍ ॥ कृष्णउवाच ॥ प्रत्यवाचाथसाशीलासुशीलाशीलमंडना ॥७९॥
प्रायोनंतकृताक्षेपपासंभवजंफलम्‍ ॥ भविष्यतिमहाभागतदर्थंयत्नमाचर ॥८०॥
एवमुक्त:सविप्रर्षिर्जगाममनसाहरिम्‍ ॥ निर्वेदान्निर्जगामाथकौंडिण्य:प्रयतोवनम्‍ ॥८१॥
तपसेकृतसंकल्पोवायुभक्षोद्धिजोत्तम: ॥ मनसाध्यायचानंतंक्कद्रक्ष्म्यामिचतंविभुम्‍ ॥८२॥
यस्यप्रसादात्संजातमाक्षेपान्निधनंगतम्‍ ॥ धनादिकंमातीवसुखदु:स्वप्रदायकम्‍ ॥८३॥
एवंसंचितयन्सोथबभ्रामगहनेवने ॥ तत्रापश्यन्महाचूतंपुष्पितंफलितंद्रुमम्‍ ॥८४॥
वर्जितंपक्षिसंघातै:कीटकोटिसमावृतम्‍ ॥ तमपृच्छद्विजोऽनंत:क्कचिदृष्टोमहातरो ॥८५॥
ब्रूहिसौम्यममातेवदु:खंचेतसिवर्तते ॥ सोब्रवीद्भद्रनानंत:क्वचिद्दृष्टोमयाद्विज ॥८६॥
एवंनिराकृतस्तेनसंजगामाथ दु:खित: ॥ क्वद्रक्ष्यामीतिगच्छन्सगामपश्यत्सवत्सकाम्‍ ॥८७॥
वनमध्येप्रधावंतीमितश्वेतपांडव ॥ सोऽब्रवीद्धेनुकेब्रूहियद्यनंतस्त्वयेक्षित: ॥८८॥
गौरुवाचाथकौंडिण्यनंतंवेइयहंद्विज ॥ ततोव्रजन्‍ ददर्शाग्रेवृषभंशाव्देलेस्थितम्‍ ॥८९॥
दृष्ट्वापप्रच्छगोस्वामिनिन्ननंतोवीक्षितस्त्वया ॥ वृषभस्तमुवाचेदंनानंतोवीक्षितोमया ॥९०॥
ततोव्रजन्ददर्शाग्रेरम्यंपुष्करिणीद्वयम्‍ ॥ अन्योन्यजलकल्लोलैर्वीचीपर्यंतसंगतम्‍ ॥९१॥
छन्नंकमलकह्लारै:कुमुदोत्पलमंडितम्‍ ॥ सेवितंभ्रमरैर्हंसैश्चक्रकाररंडवैर्बकै: ॥९२॥
तेअपृच्छद्विजोऽनंतोयुवाभ्यामुपलक्षित: ॥ ऊचतुस्तेपुष्करिण्यौ नानंतोवीक्षितोद्विज ॥९३॥
ततोव्रजन्ददर्शाग्रेगर्दभंकुंजरंतथा ॥ तावप्युक्तौद्विजेनेत्थंतिताभ्यांनिवेदितम्‍ ॥९४॥
एवंसपृच्छन्नष्टाशस्तत्रैवनिषसादह ॥ कौंडिण्योविह्वलीभूतोनिराशोजीवितेनृप ॥९५॥
दीर्घमुष्णंचनि:श्वस्यपपातभुविभारत ॥ प्राप्यसंज्ञामनंतेतिजल्पन्नुत्थाय सद्विज: ॥९६॥
नून्यंतक्ष्याम्यहंप्राणानितिसंकल्प्यचेतसि ॥ यावदुब्दंधनंवृक्षेचक्रेतावद्युधिष्ठिर ॥९७॥
कृपयानंतदेवोऽस्यप्रत्यक्षंसमजायत ॥ वृद्धब्राह्मणरुपेणइतएहीत्युवाचतम्‍ ॥९८॥
प्रगृह्यदक्षिणेपाणौगुहायांप्रविवेशतम्‍ ॥ स्वांपुरींदर्शयामासदिव्यनारीनरैर्युताम्‍ ॥९९॥
तस्यांनिविष्टमात्मानंदिव्यसिंहासनेशुभे ॥ पार्श्वस्थशंखचक्राब्जगदागरुडशोभितम्‍ ॥१००॥
दर्शयामासविप्रायविश्वरुपमनंतकम्‍ ॥ विभूतिभेदैश्वानंतैराजंतममितौजसम्‍ ॥१०१॥
कौस्तुभेनवि राजंतंवनमालाविभूषितम्‍ ॥ तंदृष्ट्वादेवदेवेशमनंतमपराजितम्‍ ॥१०२॥
वंदमानोजगादोच्चैर्जयशब्दपुर:सरम्‍ ॥ पापाऽहंपापकर्माहंपापात्मापापसंभव: ॥१०३॥
त्राहिमांपुडरीकाक्षसर्वपापहरोभव ॥ अद्यमेसफलंजन्मजीवितं ॥१०४॥
यत्तवांघ्र्यज्जयुगलेमन्मूर्धाभ्रमरायते ॥ तच्छुत्वानंतदेवेश:प्राहसुस्निग्धयागिरा ॥१०५॥
माभैस्त्वंब्रूहिविप्रेंद्रयत्तेमनसिवर्तते ॥ कौंडिण्यउवाच ॥ मयाभूत्यवलिप्तेन त्रोटिटोनंतदोरक: ॥१०६॥
तेनपापविपाकेनभूतिर्मेप्रलयंगता ॥ स्वजनै:कलहोगेहहेनकश्चिन्मांप्रभाषते ॥१०७॥
निर्वेदाद्गमितोऽरण्येतवदर्शनकांक्षया ॥ कृपयादेवदेवेशत्वयात्मासंप्रदर्शित: ॥१०८॥
तस्यपापस्यमेशांतिंकारुण्याद्वक्तुमर्हसि ॥ श्रीकृष्णउवाच ॥ तच्छुत्वानंतदेवेशउवाचद्विजसत्तमम्‍ ॥१०९॥
भक्त्यासंतोषितोदेव:किंनदद्याद्युष्ठिर ॥ अनंतउवाच ॥ स्वगृहेगच्छकौंडिण्यमाविलंबंकुरुद्विज ॥११०॥
चरानंतव्रतंभक्त्यानवर्षाणिपंचच ॥ सर्वपापविशुद्धात्माप्राप्स्यसेसिद्धिमुत्तमाम्‍ ॥१११॥
पुत्रपौत्रान्समुत्पाद्यभुक्त्वाभोगान्‍यथेप्सितम्‍ ॥ अंतेमत्स्मरणंप्राप्यमामुपैष्यस्यसंशयम्‍ ॥११२॥
अन्यंचतेवरंदद्मिसर्वलोकोपकारकम्‍ ॥ इदमाख्यानकवरंशीलानंतव्रतादिकम्‍ ॥११३॥
करिष्यतिनरोयस्तुकुर्वन्‍ व्रतमिदंशुभम्‍ ॥ सोचिरात्पापनिर्मुक्त:प्राप्नोतिपरमांगतिम्‍ ॥११४॥
गच्छविप्रगृहंशीघ्रंयथायेनागतोह्यसि ॥ कौंडिण्यउवाच ॥ स्वामिन्पृच्छामितेब्रूहिकिंचित्कौतूहलंमया ॥११५॥
अरण्येभ्रमतादृष्टंतद्वद्वस्वजगद्गुरो ॥ यश्चूतवृक्ष:कस्तत्रकागौ:कोवृषभस्तथा ॥११६॥
कमलोत्पलकह्लारै:शोभितंसुमनोहरम्‍ ॥ मयादृष्टंमहारण्येकिंतत्पुष्करिणीद्वयम्‍ ॥११७॥
कख:रकुंजर:कोऽसौकोऽसौवृद्धोद्विजोत्तम: ॥ अनंत उवाच ॥ सचूतवृक्षोविप्रोऽसौवेदविद्याविशारद: ॥११८॥
विद्यानदत्ताशिष्येभ्यस्तेनासौतरुतांगत: ॥ यागौर्वसुंधरादृष्टासापूर्वंबीजहारिणी ॥११९॥
वृषोधर्मस्त्वयादृष्ट:शाब्दलेय:समाधिस्त: ॥ धर्माधर्मव्यवस्थानंतच्चपुष्करिणीवयम्‍ ॥१२०॥
ब्राह्मण्यौकेचिदप्यास्तांभगिन्यौतेपरस्परम्‍ ॥ धर्मा धर्मादियत्किंचित्तन्निवेदयतोमिथ: ॥१२१॥
विप्रायनक्कचिद्दत्तमतिथौदुर्बलेऽपिवा ॥ भिक्षानदत्ताचार्थिभ्यस्तेनपापेनकर्मणा ॥१२२॥
वीचीकल्लोलमालाभिर्गच्छतस्तेपरस्परम्‍ ॥ खर:क्रोधस्तुयोदृष्ट:कुंजरोमदउच्यते ॥१२३॥
ब्राह्मणोऽसावनंतोऽहंगुहासंसारगह्वरम्‍ ॥ इत्युक्त्वादेवदेवेशस्तत्रैवांतरधीयत ॥१२४॥
स्वप्नप्रायंततोदृष्ट्वातत:स्वगृहमागत: ॥ कृत्वानंतव्रतंसम्यड्नववर्षाणिपंचच ॥१२५॥
भुक्त्वासर्वमनंतेनयथोक्तंपांडुनंदन ॥ अंतेचस्मरणंप्राप्यगतोऽनंतपुरेद्विज: ॥१२६॥
तथात्वमपिराजर्षेकथांश्रृण्वन्‍ व्रतंकुरु ॥ प्राप्स्यसेचिंतितंसर्वमनं तस्यवचोयथा ॥१२७॥
यद्वैचतुर्दशेवर्षेफलंप्राप्तंद्विजन्मना ॥ वर्षैकेनतदाप्रोतिकृत्वासाख्यानकव्रतम्‍ ॥१२८॥
एतत्तेकथितंभूपव्रतानामुत्तमंव्रतम्‍ ॥ यच्छुत्वासर्वपापेभ्योमुच्यतेनात्रसंशय: ॥१२९॥
येपिश्रृण्वंतिसततंपठयमानंपठंतिये ॥ तेपिपापविनिर्मुक्ता:प्राप्स्यंतिचहरे:पदम्‍ ॥१३०॥
संसारह्गह्वरगुहासुसुखंविहर्तुंवांछंतियेकुरुकुलोद्भवशुद्धसत्त्वा: ॥
संपूज्यचत्रिभुवनेशमनंतदेवंबध्नंतिदक्षिणकरेवरदोरकंते ॥१३१॥
इति श्रीभविष्योत्तरपुराणोक्तश्रीमदनंतव्रकथा संपूर्णा ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP