पौष वद्य २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


वासुकाका जोशी यांचें निधन !

शके १८६५ च्या पौष व. २ रोजीं लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व महाराष्ट्राच्या धकाधकीच्या सार्वजनिक जीवनांत ठळकपणें दृष्टीस पडणारे थोर कार्यकर्ते वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचें निधन झालें. वासुकाकांचा जन्म वाईशेजारी कृष्णाकांठीं असलेलया धोम या क्षेत्रीं झाला. जोसपणा, सावकारी व शेती करुन यांचें घराणें रहात असे. वयाच्या चौदाव्या वर्षी हे पुण्यास आले व इंग्रजी पांच-सहा यत्ता शिक्षण झाल्यावर त्यांनी एक वर्ष इंजिनियरिंग कॉलेजांतील अँग्रिकल्चरल क्लासमध्यें काढलें. यांचें विस्तृत चरित्र श्री. देवगिरीकर यांनीं प्रसिद्ध केलें आहे. आयुष्याच्या सुरुवातीस विष्णुशास्त्री चिपळुणकरांची ओळख झाल्यानंतर वासुकाका निबंधमालेचे व्यवस्थापक बनले. त्यांनीं चित्रशाळाहि भरभराटीस आणली. विष्णुशास्त्र्यानंतर ते टिळकांचे सह्कारी बनले. सन १९०३ मध्यें ताईमहाराज प्रकरणांत टिळकांना शिक्षा झाली तेव्हां ते परक्या देशांत सर्कशीची आगाऊ व्यवस्था करण्याचें काम वासुकाका करीत. तिकडे सर्कशीला खूप पैसा मिळाला. चीनची डॉवेजर राणी झुशी हिनें प्रसन्न होऊन सर्कशीला तीस हजार रुपये बक्षीस दिले. तेव्हां त्यांनीं सर्कशींतील एक हत्ती माहूतासह राणीला नजर केला. जपानमध्यें यांची व स्वामी रामतीर्थांची भेट झाली. स्वामींना मोठा आनंद झाला. तेथून पुढें अमेरिकेंत गेल्यावर त्यांनीं रामतीर्थाचीं व्याख्यानें पुस्तकरुपाने प्रसिद्ध केलीं. तेथून परतल्यावर कृ.प्र. खाडीलकर आणि वासुकाका कांही दिवस नेपाळमध्यें ‘कौलांचा कारखाना’ काढण्यांत गुंतले होते. त्यांचा शेवटचा प्रवास म्हणजे लो. टिळकांबरोबर त्यांनी केलेली इंग्लंडची सफर. राष्ट्रसभेच्या निमित्तानें ते भारताच्या कानाकोपर्‍यांत हिंडले होते. अग्रेसर असणार्‍या जहाल राजकारणांत त्यांचा नेहमीच भाग असे. सार्वजनिक, राजकीय चळवळींत प्रत्यक्षपणें भाग घेण्यापेक्षां अंतस्थ हालचाली अचूकपणें करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धि होती.

- १२ जानेवारी १९४४

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP