पौष शुद्ध १२

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) लंकेवरील स्वारीची तयारी !

पौष शु. १२ रोजी रामचंद्रांच्या नेतृत्वाखालीं वानरसैन्याकरवीं लंकेवर स्वारी करण्यासाठीं समुद्रावर सेतु बांधून पूर्ण झाला. बिभीषण रामाच्या पक्षास येऊन मिळाला होता. त्याच्या सल्ल्यावरुन सामोपचारानें समुद्रास अनुकूल करुन घेण्याचा अध्यात्मिक सामर्थ्यानें प्रयत्न रामानें केला, पण तो सफल झाला नाहीं. तेव्हां रामचंद्र क्रोधयुक्त होऊन म्हणाले, "लक्ष्मणा, पाहिलास समुद्राचा गर्विष्ठपणा ! अरे या जगांत कीर्ति वा यश सामोपचारानें मिळणें शक्य नाहीं. सर्वत्र हातीं दंडा उगारुन असलेल्या माणसालाच लोक मान देतात. (सर्वत्रोत्सृष्ट दण्डं च लोक: सत्कुरुते नरम्‍ ।) आण धनुष्य, पाहतों कसा वश होत नाहीं तें." असें म्हणून रामानें बाणांचा वर्षाव केला. तेव्हां समुद्रानें सेतुबंधनास योग्य असा मार्ग दाखविला आणि अवघ्या पांच दिवसांत मानवी प्रयत्नांच्या बळावर सेतुबंधनाचें काम पूर्ण झालें. त्याचें वर्णन महर्षि वाल्मीकि देतात:-
"हस्तिप्रायान्‍ महाकाया: पाषाणश्च महाबला: ।
पर्वताश्च समुपत्पाट्य यंत्रै: परिवहन्ति च ।" (युद्ध. २२/५६)

"म्हणजे मोठमोठ्या हत्तींच्या अंगाएवढें दगड व पर्वतांचे कडे मुळांतून उखडून काढून, मोठे धिप्पाड वानर वीर यंत्रांच्या साह्यानें वाहून आणत होते ... कांही वानर वीर सूत्र हातीं धरुन लांबी मोजण्याचें काम करीत होते, तर कांही वीर दण्ड उभे धरुन उंची पाहत होते व बाकीचे दगड, माती, झाडेझुडपें आणून भर घालीत होते." वानर ही एक मानवी जमात पुढारलेली होती, हें ध्यानीं घेतल्यावर वरील वर्णनांत विस्मयकारक कांही न वाटतां शुद्ध मानवी प्रयत्नांचें स्वरुपच दिसून येतें. पौष शु. १२ स शंभर योजनें लांब व दहा योजनें रुंद असा सेतु तयार झाल्यावर तो आकाशांत गंगा दिसते त्याप्रमाणें शोभूं लागला ! आणि वानरसेना त्या सेतूवरुन पार होऊं लागली. स्वत: बिभीषण पुढें होऊन शत्रूसमोर उभा राहिला. आणि त्याच्यामागून राम, लक्ष्मण, सुग्रीव आदि लोक जाऊं लागले.
--------------

(२) शेवटचे बाजीराव पेशवे यांचें निधन !

शके १७७३ च्या पौष शु. १२ रोजीं मराठ्यांचे शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ हे ब्रह्मावर्त येथें निधन पावले. पेशवाई समाप्त झाल्यावर बाजीराव ब्रह्मावर्त येथें राहूं लागला. यांच्या नाकर्तेपणामुळें व धरसोडीच्या धोरणामुळें पेशवाईचा अंत सुलभ रीतीनें झाला. माल्कमच्या हातावर राज्याचें दान देऊन यानें पुणें कायमचेंच सोडिलें. ब्रह्मावर्तास याचा काळ शांततेनें जाऊं लागला. "बाजीराव ब्रह्मावर्तास राजैश्वर्यानें राहत, स्नान-संध्या, जेवणखाण, व्रतें-उद्यापनें, मंत्रघोष व जुजबी ऐषआराम अशा सुखवस्तु स्थितींत बाजीरावानें ब्रह्मावर्तास तेहतीस वर्षे काढलीं. तो शरीरानें धष्टपुष्ट, काठीनें उंच व चेहर्‍यानें उमदा दिसे .... एकंदरींत पुरुष निष्काळजी व बालिश खरा, स्व
शरीरसंरक्षण एवढीच या गृहस्थाची काळजी. यापलीकडे दुसरी जबाबदारी त्यानें ओळखिली नाहीं. व ओळखण्याचें सामर्थ्यहि त्याच्या अंगांत नव्हतें. साम्राज्य, तत्संबंधीं राष्ट्राच्या पुढार्‍यांवरील जबाबदारी, प्रजेचे ऋण, वगैरेची जाणीव या पुरुषाला भासलीच नाही." हा अभिप्राय बाजीरावाचें नाकर्तेपण स्पष्ट करण्यास पुरेसा आहे. अशाच अर्थाचे उल्लेख सर्वत्र आढळतात. "बाजीराव पेशवा रुपानें फार सुंदर आणि प्रौढ आहे, अक्कडबाज नाहीं. तो सुरेख, प्रौढ आणि साधा मनुष्य आहे. बाजीरावाच्या मनाचा मुख्य धर्म भित्रेपणा हा आहे ... आपल्या मनांतील गोष्टी लोकांना कळूं न देण्यांत ते फार पटाईत आहेत ... ते बुद्धिमान नाहींत असें मात्र नांहीं. पैशाच्या देवघेवींत ते फार सचोटीनें वागतात. .. ते अतिशय देवभोळेपणाचे बंदे गुलाम आहेत. त्यांचे अर्धे आयुष्य उपासतापास, जपध्यान, पाठप्रार्थना, आणि यात्रा यांत व स्नानसंध्या, पूजाअर्चा, होमहवन यांत जातें. उत्पन्नापैकी बराचसा भाग मंत्रतंत्र प्रकरणांत खर्च होतो आणि हे कांहीं करुं लागले तरी मुहूर्त, शकुन, अपशकुन पाहत असतात." कन्याविक्रयाविरुद्ध हुकूम काढणें ही एकच गोष्ट बाजीरावांच्या जीवितांत चांगली दिसते.

- १४ जानेवारी १८५१

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP