ईश्वराच्या कृपेमुळे आणि महाभयापासून, वेदवेत्या ब्राम्हणांचे रक्षण केल्यामुळे ( या दोन कारणांनीच) पुरूषाचे ठिकाणी अद्वैताची भावना उत्पन्न होते. ॥१॥
ब्रम्हतत्व हे मंगल, अव्यय, भेदरहित आणि निराकार असे आहे. आत्मयोगाने स्वयंभूपणे ते आत्मा आणि सर्व विश्व व्यापून आहे. (मी त्याहून वेगळा नाही) तेव्हा त्या निराकार ब्रम्हाला मी नमस्कार कसा करणार ? ॥२॥
पंचमहाभूतापासून निर्माण झालेले हे विश्च मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. मायामलरहित असा मी एकच एक आहे. (सत्यस्वरूप दुसरे काहीही नाहीच तर) मी नमस्कार तो कुणाला करणार हो ? ॥३॥
केवळ आत्मतत्वच सर्व कांही आहे. भेदाभेदाचा प्रकार तेथे नाहीच. तेव्हा हे आहे. ते नाही अशी चर्चा आहे, नाही ही शब्दात्मक भाषा कशी बोलणार ? ( तशा प्रकारे बोलण्याचे) मला मोठे आश्वर्य
वाटते. ॥४॥
वास्तविक सर्वव्यापक निराकार मत्स्वरूप आत्मा वेदान्ताचे सारसर्वस्व असून ज्ञान आणि विज्ञान तोच आहे. ॥५॥
आकाशाप्रमाणे अवयवरहित सर्वव्यापी स्वभावत:च निर्लेप शुद्धस्वरुप असा जो प्रकाशमान आहे तो मीच आहे. याविषयी कोणताही संशय नाही. ॥६॥
मी व्ययरहित आहे. मला अंत नाही. मूर्तिमंन्त शुद्धविज्ञान मीच आहे. कुणाला सुख कुणाला दु:ख असतेच कसे, ते मी जाणत नाही. (मी ज्ञानस्वरूप असल्यामुळे मला सुखदु:खे अनुभवाला येत नाहीत. ) ॥७॥
(शुद्धाशुद्ध संकल्पात्मक) शुभाशुभ मानसिक कर्म मला नाही. (हिंसा रक्षणात्मक) शुभाशुभ कायिक कर्म मला नाही. (निंदास्तुतिपर) शुभाशुभ वाचिक कर्म मला नाही. कारण मी ज्ञानस्वरूप, शाश्वत,शुद्ध आणि अतीन्द्रिय असा आहे. ॥८॥
मन गगनासारखे आहे. ते सर्वगामी आहे. त्याच्याविषयी काहीच कल्पना करता येत नाही. परंतु भासणारे सर्व मनोरुपच आहे. तरी मन वस्तु:त: सत्य नाही. ॥९॥
मी एक आहे, दृश्यजात मीच आहे. आकाशालाही व्यापणारा व निरंतर असा मी आहे. यास्तव मी स्वत:ला प्रत्यक्ष किंवा कसा पाहू शकेन ? ॥१०॥
हे जीवा तूच एक व सत्स्वरूप परमात्मा आहेस, हे कसे जाणीत नाहीस ? तू अव्यय आहेस. तू सर्वांच्या ठिकाणी उपलब्ध आहेस, तू सर्वदा प्रकाशरूप व अखंडित आहेस असे असताना हे प्रभो जीवा, दिवस आणि रात्र कशी मानतोस ? ॥११॥
तू स्वत: अखंड व सर्वत्र एक रूप (म्हणजे देशकाल-वस्तुपरिच्छेदरहित) आहेस असे जाण. कारण (स्वत:च्याच अज्ञानाने मी) ध्यान करणारा आणि इतर कोणी ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय, असा अखंड वस्तूचा भेद कसा बरे होणार ? ॥१२॥
तू उत्पन्न होत नाहीस व मृतही होत नाहीस तुला कधीच देह नाही. व हे सर्व ब्रम्हच असल्याने प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारांनी श्रुति हेच प्रतिपादन करत आहे. ॥१३॥
सर्वकाली आणि सर्व ठिकाणी आत बाहेर असणारा तू कल्याणरुप आहेस. असे असताना भ्रमिष्ट होऊन पिशाचाप्रमाणे इकडे तिकडे कां धावत आहेस ? ॥१४॥
तुझा व माझा संयोग किंवा वियोग होत नाही. कारण तू, मी आणि हे जग हे भेद सत्य नसून हे सर्वकाही केवल आत्माच आहे. ॥१५॥
शब्द, स्पर्श,रुप, रस व गंध हे इंद्रिय विषय-पंचक तुझे नव्हे, व तू त्याचा नव्हेस. कारण परमतत्व ते तूच आहेस. असे असून तू व्यर्थ खेद का करितोस ? ॥१६॥
तुला जन्म व मृत्यु नाहीत. शुभ अशुभ बंध आणि मोक्ष हे ही तुला संभवत नाहीत. असे असताना हे वत्सा ! उगाच का शोक करतोस ? कारण नाम, रुप इत्यादि विकार तुला नाहीत व मलाही नाहीत. ॥१७॥
हे (वत्सा), चित्त मोहित होऊन पिशाप्राप्रमाणे का धावत आहेस ? आत्मा हा भेदरहित आहे. अशी भावना कर आणि सर्व विषयवासना सोडून सुखी हो.॥१८॥
निश्चल, एक, मोक्षस्वरूप व सर्व विकाररहित असे परमार्थ तत्व तूच आहेस. तुझ्या ठिकाणी प्रीति अथवा वैराग्य यातून काहीच नाही असे असताना विषयांच्या इच्छेने व्यर्थ का संताप करून घेत आहेस ? ॥१९॥
सर्वही श्रुति निर्गुण, शुद्ध व्ययरहित, निराकार व सर्वत्र सम अशा तत्वाचे प्रतिपादन करतात. ते तत्व मीच आहे असे नि:संशय समज. ॥२०॥
आकारयुक्त ते असत्य आणि निराकार ते नित्य असे जाण या तत्वोपदेशाने पुन्हा जन्म होणार नाही. ॥२१॥
आत्मज्ञानी पंडित सर्वत्र सम असणारे तत्व एकच आहे असे सांगतात. कामना त्याग केल्यानंतर संकल्पविकल्पात्मक चित्तच राहत नाही. ॥२२॥
सर्व मोक्षस्वरूप जर एक आहे तर अनात्मरूप ध्येयाच्या समाधीने फल कोणते ? किंवा आत्मस्वरूप समाधींचे ध्येय कसे होणार किंवा समसदात्मक विरोध ध्येय कसे होऊ शकेल ? ॥२३॥
तू अव्यय, जन्मरहित, देहरहित,अत्त्यंत निर्मल व सर्वत्र स्म असा आहेत. त्याअर्थी मी आत्म्याला जाणतो किंवा जाणत नाही असे कसे मानितोस ? ॥२४॥
‘तो तू आहेस’ इत्यादि महा वाक्यांनी श्रुतीमध्ये आत्मप्रतिपादन केलेले आहे आणि तसेच ‘हे नव्हे, हे नव्हे’ इत्यादी सर्व द्वैताचा निषेध करणारी श्रुति, सर्व पंचभूतात्मक सृष्टी मिथ्या आहे. ॥२५॥
हे शिष्या तू आत्मस्वरूपाने स्वत:च्या ठिकाणी हे सर्व निरंतर, भरून टाकले आहेस. ध्यान करणारा अहंकार तुझा नव्हे, व ध्यान क्रिया ही तुझी नव्हे व ध्यान साधन चित्तही तुझे नव्हे असे असताना ध्येयावाचून ध्यान कसे करणार ? ॥२६॥
त्या कल्याणस्वरूपाला मी जाणत नाही किंवा मी जाणतो असे तरी कसे म्हणू ? ज्ञातृज्ञेयादि द्वंद्वावाचून असे करणे अशक्य आहे. कारण आकाशाप्रमाणे सर्वत्र समस्वरूप असलेले मंगल परमतत्व मीच आहे. ॥२७॥
अहंकारबोधक ‘मी’ ते तत्व नव्हे. कारण तत्व हे सम असते. ते कल्पनाकारक नसते. ज्ञाताज्ञेय भावरहित केवळ स्वानुभवगम्य असे तत्व तो ‘अहंकार’ कसा होईल ? ॥२८॥
कोणताही व्यावहारीक तो तत्वरूपही नसतो. आत्मा हीच एक वस्तु नित्य सत्य आहे. आत्मा हिंसा करणारा नाही आणि त्याची हिंसाही (कोणाकडून) होत नाही. ॥२९॥
तू अत्यंत शुद्ध, सर्वत्र एकरस देहरहित, जन्मरह्ति, व्ययरहित असा आहेस. असे असतां आत्मप्राप्तीसाठी इतका श्रम कशाला ? मी परत भ्रमिष्ट कसा झालो ? ॥३०॥
घट फुटला असता, घटाकाश महाकाशात जसे लीन होत, त्या प्रमाणे शुद्ध झालेल्या माझ्या मनामुळे जीवशिवामध्ये मला भेद मुळीच भासत नाही. ॥३१॥
ज्याप्रमाणे वस्तुत: घट नाही, व घटाकाशही नाही ( केवल परमाकाश सत्य असते) त्याप्रमाणे जीव व देह ही वस्तुत: नसून ज्ञाता व ज्ञेय संबंध नसलेले, शुद्ध ब्रम्हच आहे असे जाण. ॥३२॥
सर्व ठिकाणी व सर्वकाली बासणारे सर्व व्यापक स्वरूप आत्मा स्वत: सिद्ध, कूटस्थ सर्व दृश्य वस्तु संसर्गरहित, परम सत्यं असे जे तत्व ते मीच आहे, असे नि:संशय जाण. ॥३३॥
ऋग्वेदादि वेद, भूर इ. लोक, इंद्रादि देव,अग्रिमोष्टादी यज्ञ, ब्राम्हणादी वर्ण, ब्रम्हचर्यादी आश्रम, कुल, जाती, कृष्णमार्ग व शुक्लमार्ग यांपैकी काही एक सत्य नाही. तर परमार्थ तत्व व एकरुप जे ब्रम्ह तेच केवल सत्य आहे. ॥३४॥
हे सर्व तूच जर एक आहेस आणि व्याप्यव्यापकभाव तुझ्यापाशी नाही तर आत्मा इंद्रिय-प्रत्यक्ष व अपरोक्ष आहे हे कसे मानतोस ? (ही भाषा द्वैतवाद्याची आहे.) ॥३५॥
काही अधिकारी अद्वैताची इच्छा मात्र करितात आणि काही द्वैताची करतात. परंतु द्वैत आणि अद्वैत यांचा जेथे स्पर्श नाही, व जे सर्वत्र एकरस आहे, त्याला ते दोघेही जाणत नाहीत. ॥३६॥
पांढरा, काळा इत्यादि वर्णानीरहित, शब्द स्पर्श इत्यादि गुणांनी रह्ति, व मन आणि वाणी यांना गोचर न होणारे तत्व, मी कसे वर्णावे ? ॥३७॥
हे सर्व देहादि द्वैतजात, घटाकाशाप्रमाणे मिथ्या आहे, असा जेव्हा दृढ निश्चय होईल, त्या वेळीच तुला ब्रम्ह्ज्ञान होईल. आणि ही तुझी द्वैतपरंपरा नष्ट होईल. ॥३८॥
आणि असे की, वाझा आत्मा परब्रम्हाहून निराळा नाही हे मी जाणतो तेव्हा आकाशाप्रमाणे भेद कसा होईल ? ॥३९॥
जे काही मी करतो, जे काही मी खातो, ज्याचे मी हवन करतो, किंवा जे मी देतो, त्यातील काहीही माझे नव्हे, कारण मी अत्यंत शुद्ध जन्मरह्ति व क्षयरहित आहे. ॥४०॥
वस्तुत: हे सर्वही जग निराकार, निर्विकार आणि विशुद्धात्मक व कल्याणरुप ब्रम्ह आहे असे जाण. ॥४१॥
परब्रम्ह तूंच आहेस ह्यात काही संशय नाही तर मग आत्मा ज्ञानगम्य नाही हे कसे जाणतोस किंवा त्या आत्म्याला अनुभवगम्य तरी कसे मानितोस ? ॥४२॥
बाबारे माया किंवा अमाया (कौटिल्य आणि अकौटिल्य ही कशी असणार ? कारण छाया आणि अछाया किंवा तम आणि प्रकाश हा आत्म्याच्या ठिकाणी भेदच नाही तर, हे सर्व दृश्य जात, निराकार निर्मल व एक प्रकारे व एक असे जे आत्मतत्व तेच आहे. ॥४३॥
जन्म स्थिती व मृत्यू हे मला नाहीत. मी कधीही ब्रद्ध होत नाही, मी स्वभावत:च निर्मल व शुद्ध आहे. अशी माझी निश्चित बुद्धि आहे. ॥४४॥
अगदी मूळ प्रकृतीपासून तो ह्या स्थूल पदार्थांपर्यंत मला काही भासत नाही. हे सर्वही केवळ ब्रम्ह आहे. मग तेथे वर्णाश्रमव्यवस्था कोठून येणार ? ॥४५॥
मी पूर्णपणे सर्वगत एक, निरंतर, कोणाच्याही आश्रयाने न राहणारा व सत्स्वरूप आहे, व आकाशादि भूतपंचक शून्यरुप (मिथ्या, सत्तारहित) आहे, हे मी जाणतो. ॥४६॥
ते आत्मतत्व षण्ढ नाही, पुरुष नाही, स्त्री नाही, वैषयिक ज्ञानरूप नाही किंवा कल्पना नाही, तर ते आनंदी किंवा आनंदरहित असे असता आहे हे तरी कसे मानतोस ? ॥४७॥
हे परम तत्व यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार व ध्यान ह्या सहा योगांगांनी ज्ञात होत नाही. मनोविज्ञानाने ज्ञान्त होत नाही व गुरुपदेशाने ज्ञात होत नाही. कारण ते स्वत: सत्स्वरूप व ज्ञानस्वरूप आहे. ॥४८॥
पंचभूतात्मक देह नाही व तद्विपरीत विदेहही नाही. सर्वच जर केवल आत्मा आहे तर तुरीयावस्था आणि जाग्रणादि तीन अवस्था तरी कशा सिद्ध होणार. ॥४९॥
मी बद्ध नाही, मुक्त नाही, मी ब्रम्हातून पृथक्‍ नाही, कर्ता नाही व भोक्ताही नाही तर व्याप्यव्यापक धर्मांनी रहित ब्रम्हच आहे. ॥५०॥
जसे उदकांत उदक टाकले असता ते सर्व उदकच होऊन जाते, भेद कोणताही रहात नाही, तसेच प्रकृति व पुरुष या उभयतांचेही माझ्या दृष्टीन ऐक्य झाल्यामुळे मला हे सर्व भेदरहित भासत आहे. ॥५१॥
जर तू मुक्त नव्हेस तर बद्धही कदापि नव्हेस. आत्मा साकार किंवा निराकार आहे असे तरी तू कसे समजणार ? ॥५२॥
तुझे परस्वरूप स्वसंवेद्य व गगनासारखे आहे तसेच दुसरे जे अपर (निकृष्ट) रुप ते मृगजळाप्रमाणे खोटे आहे. ॥५३॥
मी बुद्धिस्थ परमात्मा स्वभावित: अति निर्मल देहरहित आकाशाकारखा सर्वव्यापी आहे. मी कोणतीच क्रिया करीत नाही मला उपाधी नाही. मला गुरु किंवा गुरुपदेशाचीही अपेक्षा नाही. ॥५४॥
तू अतिशुद्ध आहेस, अशरीरी आहेस. उत्कृष्टाहून उत्कृष्ट जे परब्रम्ह ते तुझे चित्त नव्हे, असे असताना अहंबुद्धि आत्मा परमतत्व नव्हे, असे म्हणण्यास तुला लाज कशी वाटत नाही ? ॥५५॥
बा चित्ता ! उगाच का रडतोस ? तू स्वस्वरूपाने आत्मा हो, आणि बाळा ! कलारहित असे जे श्रेष्ठ अद्वैतामृत त्याचे प्राशन कर. ॥५६॥
ज्ञान नाही, अज्ञान नाही, व ज्ञानाज्ञानही नाही अशा प्रकारचा ज्याला सर्वदा बोध झालेला आहे तो स्वत: बोधरुपच आहे, त्याखेरीज दुसर्‍या काही नाही. ॥५७॥
इंद्रियजन्य ज्ञान नाही, तर्क नाही समाधियोग नाही, देशकाल नाही व गुरुपदेश नाही, तर मी केवल ज्ञानरूप परमार्थ सत्य, आकाशासारखे सर्वव्यापी व स्वभावसिद्ध नित्य असे तत्व आहे. ॥५८॥
मी कधी उत्पन्न होत नाही; मी कधी मरत नाही व मी शुभाशुभ कर्मही करीत नाही; तर मी उत्पन्न शुद्ध गुणरहित ब्रम्ह आहे. त्या मला बंध व मोक्ष कसा होणार ? ॥५९॥
जर प्रकाशस्वरुप आत्मा हा सर्व ठिकाणी आहे, स्थिर आहे, पूर्ण आहे, छिद्ररहित आहे व मी त्याच्यामध्ये अंतर पहात नाही, तर त्याला सबाह्याभंतर हे भेदसापेक्ष विशेषण कसे लावावे. ॥६०॥
(असे काही तरी) हे सर्व जग सर्वत्र व सर्वदा अनुभवास येतच आहे. कायहो हा मायेचा प्रभाव ! ही सर्व द्वैता-द्वैत कल्पना हाच महामोह होय. ॥६१॥
श्रुतीने मूर्त व अमूर्त अशा सर्वही सृष्ट पदार्थांचा ‘हे नव्हे हे नव्हे’. अशा रीतीने निषेध केल्यानंतर सर्वकाळी भेदाभेदरहित व केवल कल्याणरुप असा परमात्मा अवशिष्ट राहतो. ॥६२॥
माता तुझी नव्हे, पिता तुझा नव्हे, तसेच बंधु, पत्नी, पुत्र, मित्र हे कोणीही तुझे नव्हेत. असे असताना तुझ्या अंत:करणात उगाच का शोक ताप आहे. ॥६३॥
हे चित्ता, दिवस किंवा रात्र ही तुझी नव्हेत आणि उदय अथवा अस्तही तुझे नव्हेत. परंतु शहाणे लोक विदेहीला शरीर आहे अशी कशी कल्पना करिता ? ॥६४॥
ब्रम्हाव्यतिरिक्त दुसरे काही नसल्यामुळे मी सर्वांभूती विभक्तही नाही व अविभक्तही नाही, वैषयिक सुखदु:खादी नाहीत व्याप्थ-व्याप्पक नाही, तर मी क्षयरहित आत्मा आहे, असे जाण. ॥६५॥
मी कर्ता नव्हे, मी भोक्ता नव्हे, मी पूर्वी काही कर्म केले नाही, व आता करीतही नाही. मला देह नाही, व मी देहारितही नाही. असे असताना ‘हे माझे नव्हे’ व ‘हे माझे’ असे कसे म्हणता येईल ? ॥६६॥
विषयवासनादि दोष मला नाहीत, देहादिक दु:खे मला नाहीत. तर मी गगनासारखा विशाल आत्मा आहे असे जाण. ॥६७॥
मित्रा मना ! इतकी व्यर्थ बडबड कशाला ? कारण सख्या, हे सर्व असत्य आहे आणि सारभूत म्हणून जे काही ते मी तुला सांगितले की ते गगनासारखे तत्व तूच आहेस. ॥६८॥
बर्‍या वाईट कोणत्याही स्थितिमध्ये व बर्‍या वाईट कोणत्याही स्थली योगी पुरुष मृत झाले, तरी घटाकाश महाकाशामध्ये जसे लीन होते तसे ते आत्म्यामध्येच लीन होतात. ॥६९॥
काशीसारख्या क्षेत्रामध्ये किंवा चांडाळाच्या घरी नष्टस्मृति होऊन जरी योग्याचे प्राणोत्क्रमण झाले, तरी ज्ञानप्राप्तिक्षणिच मुक्त झालेला मरणोत्तर ब्रम्हस्वरूप प्राप्त होतो. ॥७०॥
धर्म, अर्थ, काम, आणी मोक्ष हे पुरुषार्थ स्थावर जंगम आकाशादि सृष्टि ही सर्व योग्याला मृगजलाप्रमाणे भासतात. ॥७१॥
मागे होऊन गेलेले, आता होत असलेले व पुढे होणारे कर्म मी करीत नाही, व मी त्यांच्या फलांचाही उपभोग घेत नाही असा माझा निश्चय झालेला आहे. ॥७२॥
शून्य (निर्जन) गृहामध्ये समत्व रसाने पवित्र होऊन ब्रम्हानंदात एकटाच राहणारा, सर्व संगत्यागी व देहाभिमाने सोडुन दिगंबर वृत्तीने रहातो, आणि त्याला केवळ ब्रम्हस्वरूपामध्ये त्यांच्या सर्व काम सर्व इच्छा पूर्ण होतात. ॥७३॥
ज्याठिकाणी जागृत तीन अवस्था नाहीत तसेच तृतीयावस्थाही नाही, त्या आत्मस्वरूपात कैवल्य प्राप्ति होते. ज्या पुरुषाच्या ठिकाणी धर्म आणि अधर्म हा भेद नाही त्या बद्ध किंवा मुक्त असे कसे म्हणता येणार ? ॥७४॥
अन्त:करणाने पवित्र असणारा तो अवधूत कोणताही मंत्र प्राप्त करुन घेण्याची इच्छा करीत नाही किंवा कोणताही छंदरूपी तंत्र अवगत करून घेत नाही. तथापि तो आत्मानंद रसात नित्य मग्न असतो. ॥७५॥
हे सर्व शून्य नाही व अशून्यही नाही सत्य नाही व असत्यही नाही. परंतु शास्त्र ज्ञानपूर्वक लोकव्यवहाराला अनुसरून त्याचे हे वर्णन केले आहे. ॥७६॥
ह्याप्रमाणे श्रीदतोत्रेयविरचित अवधूमत गीतेतील आत्मसंवित्युपदेश (आत्मज्ञानोपदेश) नावाचा पहिला अध्याय संपूर्ण झाला.

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP