उतथ्य म्हणाला ,
योग्य वेळी वृष्टी करणारा मेघ आणि धर्माचरण करणारा राजा असा योग जुळून आला म्हणजे त्या योगाने प्रजेचे सुखाने पोषण होते. ॥१॥
जो रजक वस्त्रांचा मल कसा घालवावा व रंगविलेल्या वस्त्रांचा रंग न घालविता मल तेवढा कसा नष्ट करावा हे जाणत नाही, तो असून नसल्यासारखाच होय. ॥२॥
ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या वर्णांपैकी कोणीही मनुष्य अथवा शूद्र स्वत:चे कर्म सोडून देऊन अनेक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन राहिला, तर तोही त्या रजकाप्रमाणे असून नसल्यासारखा होय. ॥३॥
सेवाकर्म, शूद्राच्या ठिकाणी, कृषी, वैश्याच्या ठिकाणी, दंडनीती, राजाच्या ठिकाणी व ब्रह्मचर्य, तप  ,मंत्र आणि सत्य ही ब्राह्मणाच्या ठिकाणी वास्तव्य करितात. ॥४॥
त्या वर्णापैकी, रजकाला जशी वस्त्रशुध्दी करण्याची माहिती असते तसे प्रजेच्या आचरणांतील दोष काढून टाकण्याचे ज्ञान ज्या क्षत्रियाला असेल, तोच प्रजेचा अधिपती व पिता होय. ॥५॥
हे भरकुलश्रेष्ठा, कृत , त्रेता, व्दापर आणि कलि ही सर्व युगे राजाच्या आचरणावर अवलंबून आहेत; ह्यास्तव, राजालाच युग असे म्हणता. ॥६॥
राजाकडून प्रमाद घडू लागला म्हणजे चातुर्वर्ण्य, वेद आणि चार आश्रम ही सर्व अज्ञानाच्या तावडीत सापडतात. ॥७॥
राजा हाच सर्व प्राण्यांचा सृष्टिकर्ता व विनाशकर्ता आहे. जव्हा,त्याचे अंत:करण धर्मावर असल्यास तो सृष्टिकर्ता व ते अधर्मावर असल्यास विनाश करणारा होतो. ॥८॥
राजा जर प्रमादशील बनला , तर त्याच्या भार्या, पुत्र, बांधव आणि मित्र हे सर्व शोकाकुल होऊन जातात. ॥९॥
राजा अधर्ममय बनून गेला म्हणजे गज, अश्व, धेनू, उष्ट्र, अश्वतर (खेचर), गर्दभ इत्यादि सर्व प्राणी हे राजन्‍ दु:खी होतात. ॥१०॥
हे मांधात्या, दुर्बल प्राण्यांकरिताच ईश्वराने बलाची उत्पत्ती केली आहे. दुर्बल प्राणी हे फार मोठे होत. कारण, राजाचे सुख, दु:ख इत्यादी सर्व काही त्याजवरच अवलंबून आहे. ॥११॥
हे पृथ्वीपते, राजा अधर्माने वागू लागला म्हणजे , जे दुर्बल प्राणी त्याचे सेवन करीत असतात व जे इतर कोणी त्याच्या अनुरोधाने वागत असतात, त्या सर्वांनाही शोचनीय स्थिती प्राप्त होते. ॥१२॥
दुर्बल प्राणी, मुनी आणि विषारी सर्प ह्यांची दृष्टी अत्यंत दु:सह होय, अशी माझी समजूत आहे. ह्यास्तव, तू दुर्बलाच्या तावडीत केव्हाही सापडू नकोस. ॥१३॥
बा मांधात्या, दुर्बलांच्या दृष्टिपाताने बांधवासह तू दग्ध होऊ नयेस; ह्यास्तव, दुर्बल प्राण्यांचा तू केव्हाही अपमान होऊ देऊ नकोस. ॥१४॥
कारण, दुर्बलांनी (शापादिकांच्या योगाने) दग्ध केलेल्या वंशामध्ये कोणत्याही प्रकारे अंकुर फुटत नाही. कारण, ते त्या वंशाला मुळापासून दग्ध करुन टाकतात. ॥१५॥
निर्बलता हीच बलिष्ठतेहून अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण ती अत्यंत जोरदार असे बल आहे. कारण, निर्बल मनुष्याने दग्ध करुन टाकलेल्या बलाचा अवशेष मुळीच रहात नाही. ॥१६॥
दुर्बल मनुष्याचा कोणी अपमान केला, त्याला मरणप्राय पीडा दिली, अथवा कोणी शिव्याशाप दिले, तर त्या वेळी त्याचे संरक्षण न केल्यास देवकृत दंडाच्याच योगाने राजाचा वध होतो. ॥१७॥
बा मांधात्या, तू संग्रामनिष्ठ बनून दुर्बल मनुष्यांचा उपभोग घेऊ नकोस. ज्याप्रमाणे अग्री हा आधारभूत वस्तू दग्ध करितो. त्याप्रमाणे दुर्बलाची दुष्टी तुला दग्ध न करो. ॥१८॥
ज्यांच्यावर खोटयाच दोषांचा आरोप केला असेल ते रोदन करु लागले असता त्यांच्या नेत्रांतून गळणारे अश्रू राजाच्या पुत्रांच्या व पशूंचा वध करीतात. कारण त्यांजवर केलेला तो दोषारोप मिथ्या असतो. ॥१९॥
जर केलेल्या पापकर्माचे फल स्वत:ला मिळाले नाही, तर ते पुत्राला मिळते व पुत्रालाही न मिळाल्यास नातवांना मिळते, कारण भूमीमध्ये धान्य पेरले की ते लागलीच जसे पिकत नाही, तसेच केलेल्या पापकर्माचे फल तत्काल मिळू शकत नाही. ॥२०॥
ज्या राष्ट्रांमध्ये दुर्बलाचा वध होऊ लागला असता त्यांना कोणी त्राता मिळत नाही, त्या राष्ट्रावर दैवकृत असा मोठा भयंकर दंड येऊन पडतो. ॥२१॥
राष्ट्रांतील प्रजा उद्योगशील असूनही जर उद्योगाच्या अभावामुळे भिक्षुरुपी बनून ब्राह्मणाप्रमाणे वारंवार भिक्षा मागू लागली, तर तिच्या योगाने राजाचा वध होतो. ॥२२॥
राजाच्या राष्ट्रामध्ये राजनीतियुक्त अनेक अधिकारी अन्यायाने वागले तर राजाला मोठें पातक लागते. ॥२३॥
अर्थलोभामुळे म्हणा अथवा काही कारणामुळे म्हणा, हीनपणे याचना करणार्‍या लोकांकडून युक्तीने द्रव्याचा अपहार करणे हे राजाचे मोठे क्रौर्य होय. ॥२४॥
एखादा मोठा वृक्ष उपन्न होतो, तो वाढतो आणि नंतर अनेक प्राणी त्याचा आश्रय करुन रहातात. पण जेव्हा त्या वृक्षाचे छेदन केले जाते अथवा तो दग्ध केला जातो, तेव्हां  त्याचा आश्रय करुन राहणारे प्राणी निराश्रित होऊन जातात. ॥२५॥
राजाचे गुणानुवाद गाणारे राष्ट्रांतील लोक उत्कृष्ट प्रकारच्या धर्माचे अथवा शुध्दतादायक अशा दुसर्‍या कोणत्याही कर्माचे आचरण करितात तेव्हा राजाचा उत्कर्ष होतो. पण धर्माच्या भ्रमाने त्यांच्याकडून अधर्म घडल्यास तो पुण्याचा नाश करुन पाप उत्पन्न करितो. ॥२६॥
ज्या राष्ट्रामध्ये दुष्ट लोक उघडपणे सज्जनांमध्ये प्रविष्ट होत असतात त्या राष्ट्रांतील राजाकडे कलीचे आगमन होते. पण राजा जेव्हा असभ्य लोकांना शासन करितो, तेव्हा त्याच्या राज्याची अभिवृध्दी होते. ॥२७॥
जो राजा योग्य प्रकारे समन करुन मंत्र आणि युध्द ह्याजवर अमात्यांची योजना करितो, त्यांच्या राष्ट्राची अभिवृध्दी होऊन तो चिरकाल संपूर्ण पृथ्वीचा उपभोग घेतो. ॥२८॥
उत्कृष्ट प्रकारे केलेले काम व योग्य प्रकारे केलेले भाषण ही पाहून त्याजबद्दल कर्त्याचा बहुमान करणार्‍या राजाला अत्युत्कृष्ट अशा धर्माची प्राप्ती होते. ॥२९॥
इतरांना विभाग देऊन ऐश्वर्याचा उपभोग घेणे, अमात्यांचा अपमान न करणे आणि मदांध झालेल्या बलिष्ठांचा नाश करणें हा राजाचा धर्म आहे. ॥३०॥
वाणी, देह आणि कर्म यांच्या योगे सर्व प्राण्याचे संरक्षण करणे, व पुत्रालाही अपराधाबद्दल क्षमा न करणे हा राजाचा धर्म होय. ॥३१॥
शरणागताचे पुत्राप्रमाणे पालन करणे व मर्यादेचा भंग न करणे हा राजाचा धर्म होय. ॥३२॥
काम आणि व्देष ह्यांना आश्रय न देता भाविकपणे विपुलदक्षिणासंपन्न असे यज्ञ करणे हा राजाचा धर्म होय. ॥३३॥
दीन, अनाथ आणि वृध्द अशा पुरुषांना आनंदित ठेवून त्यांच्या अश्रूंचे परिमार्जन करणे हा राजाचा धर्म होय. ॥३४॥
मित्रांचा उत्कर्ष करणे, शत्रूंचा नाश करणे, सज्जनांचा बहुमान करणे, हा राजाचा धर्म होय. ॥३५॥
सत्याचा पाठपुरावा करणे, प्रत्यही प्रीतिपूर्वक भूमिदान करणे आणि अतिथी व पोष्यवर्ग ह्यांचा बहुमान करणे हा राजाचा धर्म होय असे सांगितलेले आहे. ॥३६॥
इहलोक आणि परलोक ह्यातील निग्रह व अनुग्रह हे उभयता ज्याच्यावर अवलंबून आहेत, त्या राजाला फलप्राप्ती होते. ॥३७॥
हे मांधात्या , राजा हा नियंता असून धर्मनिष्ठ पुरुषांचा तो केवल परमेश्वर अर्थात्‍ अनुग्रहकर्ता आहे. त्याने इंद्रियांचे नियमन केले तरच त्याचा उत्कर्ष होतो व नियमन न केल्यास त्याचा नि:पात होतो. ॥३८॥
ऋत्विज, पुरोहित आणि आचार्य ह्यांचा अवमान न करिता बहुमान करुन त्यांना उत्कृष्ट प्रकारे साहाय्य करणे हा राजाचा धर्म होय. ॥३९॥
ज्याप्रमाणे यम हा भेद न ठेवता सर्व प्राण्यांचे सारख्याच रीतीने नियमन करितो, ज्याप्रमाणे वागून राजानेही यथाविधि प्रजेचे नियमन करावे. ॥४०॥
हे नरश्रेष्ठा, राजाला सर्वथैव इंद्राची उपमा देतात. त्याला जो धर्म असे वाटेल तोच धर्म होय.॥४१॥
मांधात्या, तू क्षमा, ज्ञान, इंद्रियनिग्रह, मनन, प्राण्यांचे विचार आणि सत्कर्म व दुष्कर्म ह्यांविषयीचे शिक्षण सदैव लक्षपूर्वक संपादन कर. ॥४२॥
सर्व प्राण्यांना आश्रय देणे, दान करणे, मधुर भाषण करणे व सुख होईल अशी रीतीने नागरिकांचे व राष्ट्रांतील इतर प्रजेचे संरक्षण करणे हे तुझे कर्तव्य आहे. ॥४३॥
राजाच्या अंगी दक्षता नसली तर तो प्रजेचे संरक्षण करण्याविषयी समर्थ होत नाही; कारण, वा मांधात्या, राज्य हा एक मोठा भार असून ते अत्यंत दुष्कर आहे; ॥४४॥
दंडनीतीचे ज्ञान असलेला, शूर व ज्ञानसंपन्न राजाच त्याचे संरक्षण करु शकतो. निर्बुध्द, धैर्यशून्य आणि दंडनीतीचे ज्ञान नसलेल्या राजाला त्याचे संरक्षण करिता येणे शक्य नाही. ॥४५॥
विव्दान, कुलीन, कार्यदक्ष, प्रेमळ आणि बहुश्रुत अशा अमात्याच्या साहाय्याने आपल्या प्रजेच्या व तपस्वी आणि आश्रमनिष्ठ लोकांच्या सर्व प्रकारच्या व्रतांचे परीक्षण करीत जा. ॥४६॥
स्वदेशामध्ये असो अथवा परदेशामध्ये असो, तुझ्या हातून धर्माचा नाश होऊ नये. ह्यास्तव, तू सर्व प्राण्यांच्या श्रेष्ठ अशा धर्माचे ज्ञान संपादन कर. ॥४७॥
अर्थ आणि काम ह्यांहून धर्मच श्रेष्ठ आहे. कारण, धर्म जाणणार्‍या पुरुषाचा इहलोकी व परलोकी सुखाने अभ्युदय होतो. ॥४८॥
मनुष्यांचा बहुमान केला म्हणजे ते आपल्या स्त्रीपुत्रांचाही त्याग करुन समान करणार्‍याला साहाय्य करितात. लोकांना आश्रय देणे, दान करणे, मधुर भाषण करणे, ॥४९॥
मांधात्या, बेसावधपणे न राहणे आणि शुचिर्भूत असणे ही राजाच्या ऐश्वर्याची मोठी कारणे होत. ह्यास्तव, हे मांधात्या, तू ह्याजकडे दुर्लक्ष करु नको. ॥५०॥
राजाने प्रमादशील बनू नये. त्याला आपली व शत्रूंची छिद्रे अवतत असावी; त्याने आपली छिद्रे शत्रूंच्या दृष्टीस पडू देऊ नयेत; व शत्रूंची छिद्रे दृष्टिगोचर होताच त्याजवर चालून जावे. ॥५१॥
इंद्र, यम, वरुण आणि सर्व राजर्षी ह्यांचे आचरण अशाच प्रकारचे आहे; म्हणून तूही त्याचा प्रतिपाळ कर. ॥५२॥
सारांश, हे महाराजा, राजर्षींनी अवलंबन केलेल्या आचरणाचे तूही अवलंबन कर; आणि, हे भरतकुलश्रेष्ठा, तू शीघ्र स्वर्गसाधक अशा मार्गाचा आश्रय कर. ॥५३॥
हे भारता, महातेजस्वी देव, ऋषी, पितर आणि गंधर्व हे धर्माचरण करणार्‍या राजाचे इहलोकी व परलोकीही गुण गात असतात. ॥५४॥
भीष्म सांगतात,
हे भरतकुलोत्पन्ना युधिष्ठिरा, ह्याप्रमाणें त्या उतथ्याने सांगितल्यानंतर मांधात्याने  नि:शंकपणे तसे आचरण ठेविले, व त्यामुळे त्याला सर्व पृथ्वीच्या एकछत्री राज्याची प्राप्ती झाली. ॥५५॥
ह्यास्तव, हे पृथ्वीपते तूही मांधात्याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारे धर्माचरण करुन पृथ्वीचे पालन कर, म्हणजे तुला स्वर्गपदाची प्राप्ती होईल.
दुसरा अध्याय समाप्त.
॥ उतथ्यगीता समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP