अध्याय ८८ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


देवं स वxxxx पापीयान्वर भूतभयावहम् । यस्य यस्य करं शीष्णिं धास्ये स म्रियतामिति ॥२१॥

स्वप्रकाशें देदीप्यमान । मूर्तिमंत विभु ईशान । तया देवातें पापसंपन्न । शकुनिनंदन दुरात्मा ॥५१॥
भूतां कारणें भयावह । ऐसिया वरातें निःसंदेह । वरिता झाला तो अनर्ह । जेंएं घडे द्रोह ईशाचा ॥५२॥
म्हणे जया जयाच्या शिरावरी । मी हस्त ठेवीन निर्धारीं । तो मृत्यु पावो गा त्रिपुरारी । स्पर्शमात्रीं तत्काळ ॥५३॥
या प्रकारें दुष्ट पापिष्ट । भूतद्रोहात्मक वर स्पष्ट । याचितां ऐकूनि नीळकंठ । क्रोधाविष्ट जाहला ॥५४॥

तच्छ्रुत्वा भगवान्रुद्रो दुर्मना इव भारत । ओमिति प्रहसंस्तस्मै ददेऽहेरमृतं यथा ॥२२॥

असो प्रसन्न झालिया कामधेनूस । काय मागिजे उल्बण विष । कीं सम्मुख देखूनि कल्पवृक्ष । अर्कफळास इच्छिजे ॥४५५॥
तेंवि षड्गुणैश्वर्यसंपन्न । समर्थ वरदानी उमारमण । ऐसियातें दुर्भग पूर्ण । याचितां हीन हें झाला ॥५६॥
चिन्तामणिसमान दाता । त्यासी याचकें विष याचितां । दुर्मना होय तो तत्वता । कोडें चित्ता माजी जसा ॥५७॥
कीं सर्वज्ञ साधु सद्गुणनिधि । सेवूनि तोषविला यथाविधि । प्रार्थितां मारणप्रयोगसिद्धि । रुष्ट मनस्वी होय तो ॥५८॥
तया दुर्मनाचिये परि । राया भगवान त्रिपुरारी । क्रुद्ध झाला अभ्यंतरीं । परी निराकारी न तयातें ॥५९॥
कीं स्वेच्छा माग तें देईन तुजला । ऐसिया स्ववचनें गुंतला । म्हणोनि न वचे निरासिला । ईश्वरत्वाला ये उणे ॥४६०॥
मग रसरसूनियां मनीं । मूर्खत्व दैत्याचें आठवूनी । हांसत होत्साता शूळपाणी । तथास्तु म्हणोनि दे वर ॥६१॥
जैसें भुजंगासी दुग्ध । देणें अनुचित प्रसिद्ध । तैसा अयोग्य तो अबुध । द्यावया वर निश्चयें ॥६२॥
तथापि तया कारणें वर । वरद झाला उपरोधपर । न करूनि दीर्घविचार । अनाधिकार कळतांही ॥६३॥
ऐसा वरद झालिया शूळपाणी । पुढें वर्तली अपूर्व काहणी । परीक्षिति प्रबुद्धचूडामणी । ते कृतघ्नकरणि अवधारीं ॥६४॥

इत्युक्तः सोऽसुरो नूनं गौरीहरणलालसः । स तद्वरपरीक्षार्थ शंभोर्मूर्ध्नि किलासुरः ।
स्वहस्तं धातुमारेभे सोऽबिभ्यत्स्वकृताच्छिवः ॥२३॥

सर्पासी पाजिलिया क्षीर । करावया धांवें दंशप्रतिकार । तेंवि वरदवचनें तो असुर । पूर्वोक्त प्रकारें गौरविला ॥४६५॥
त्यावरी कृतकार्य सिद्ध मनोरथ । अवलोकी वरद भूतनाथ । तंव गौरी देखिली तदंकस्थ । लावण्यवंत चिच्छक्ति ॥६६॥
सकळ सौन्दर्याची खाणी । पुंडरीकाक्षी गोजिरवाणी । सादर देखूनियां नयनीं । झाला तद्धरणीं आसक्त ॥६७॥
परि शंभूचिया अंकीं स्थित । ते कैसेनि होईल प्राप्त । यास्तव मनीं दुर्विचारकृत । करावया अनर्थ प्रवर्तला ॥६८॥
जरी शंभूनें दिधला वर । सत्य असेल प्रतिज्ञापर । तरी तन्मौळीं म्यां ठेवितां कर । मृत्यु पावेल निश्चयें ॥६९॥
मग चार्वंगी गौरी प्राप्त । सहजचि होईल मज निश्चित । ऐसें चिन्तूनियां दुर्वृत्त । प्रमादवंत दुर्बुद्धि ॥४७०॥
तेव्हां गौरीहरणलालस । कृतघ्न दुरात्मा देवद्विष । तो तयाचा वर अशेष । साभिलाष परीक्षार्थ ॥७१॥
शंभूचियाचि मस्तकावरी । स्वकर ठेवावया निर्जरारी । न्युब्जपाणि निकट निर्धारीं । येऊनि सत्वरी आरंभी ॥७२॥
ऐसें आचरण विपरीत । कृतघ्नाचें देखोनि त्वरित । स्वकृतास्तव शिव भयभीत । विस्मृतकृत बहु झाला ॥७३॥
आपणचि दिधला वर । दैत्या कारणें भयंकर । तो आपणासीच दुर्द्धर । झाला फळतंत्र विपरीत ॥७४॥

तेनोपसृष्टः सन्त्रस्तः पराधावत्स वेपथुः । यावदन्तं दिवो भूमेः काष्ठानामुदगादुदक् ॥२४॥

तेणें अनुपाय चंद्रमौळी । प्रतीप देखोनि दैत्य जळी । सरकला मागें तये काळीं । त्वराशाळी चपळत्वें ॥४७५॥
तंव वृकासुर ही उताविळा । तैसाच पातला जवळा । देखोनि त्रासला शंभु भोळा । विमुख पळाला त्वरान्वित ॥७६॥
पळतां परतूनि धाकें पाहे । तों छायेपरी मागें आहे । म्हणोनि धांवतां लाहें लाहें । सकंप होय भयभीरू ॥७७॥
राया ऐसा घाबरा शर्व । कोठवरी पळाला धरूनि भेव । पुससी तरी ब्रह्माण्डप्रभव । अवकाश सर्व जेथवरी ॥७८॥
भूलोक भुवर्लोक स्वर्लोक । जनलोक तपोलोक महर्ल्लोक । शेवटीं अवघ्यांहून सत्यलोक । फिरला पंचमुख जवशीळ ॥७९॥
तंव तो ब्रह्मकपाटा सम । पृष्ठभागीं दैत्य अधम । देखोनि बोले राम राम । संकट विषम वोढवलें ॥५८०॥
सकळ स्वर्गाचा शेवट । ऊर्ध्वदिशेचा प्रान्त रक्षक इष्ट । न मिळे बलिष्ठ कोणीही ॥८१॥
त्या वरी भूपृष्ठीं सप्तद्वीपें । उत्तरे पासूनियां साक्षेपें । अष्ट दिशांचा प्रान्त वृषपें । महत्कल्पें टाकिला ॥८२॥
परि सुई मागें जैसा दोरा । तैसें निकट देखिलें असुरा । अंतरीं धरिला भेदरा । मृत्युदरारा घेऊनि ॥८३॥
अष्टदिक्पाळ इंद्रादिक । पाहोनि राहिले स्तब्ध मूक । परि कोण्ही नये परिहारक । न थके निष्टंक दैत्यही ॥८४॥
एवं चंद्रचूड श्रमाक्रान्त । व्यसनाकुळित संत्रस्त । जोंवरी स्वर्गभूदिशांचा अंत । फिरला त्वरित कुरुकुध्रा ॥४८५॥

अजानन्तः प्रतिविधं तूष्णीमासन्सुरेश्वराः । ततो वैकुण्ठमगमद्भास्वरं तमसः परम् ॥२५॥

प्रतिविधि म्हणिजे तत्परिहार । न जाणत होत्साता सुरेश्वर । उगाचि राहिला चिन्तातुर । त्म्व सुचलें दैवें निदानीं ॥८६॥
पूर्वीं विषप्राशनव्यसन । ऐसेंचि झालें होतें गहन । तें ज्याच्या स्मरणें पावलें शमन । टाकिजे स्थान तयाचें ॥८७॥
किम्बहुना हृदयस्थ आत्माराम । मज गमला तोचि पावननाम । अंतरा प्रवर्तक झाला सुगम । म्हणोनि उगम स्मृतीचा ॥८८॥
असो तदनंतर उमाकान्त । वैकुण्ठा प्रति त्वरान्वित । जाता झाला होवूनि श्रान्त । व्हावया मुक्त ते वेळीं ॥८९॥
म्हणाल कैसें तें वैकुण्ठ । तरी विशेषणद्वयें स्पष्ट । जैसें विशेषिलें शुकें प्रकट । तेंचि महाराष्ट्र अवधारा ॥४९०॥
भास्वर आणि तमसःपर । ऐसें वैकुण्ठ परात्पर । जेथ न स्पर्शे गुणविकार । ते व्युत्पत्ति साचार कथिजेल ॥९१॥
तम म्हणिजे अंधकार । अज्ञानरूप भ्रान्तिकर । जेथूनि अन्यथा विपरीत घोर । ज्ञानविकार प्रकटला ॥९२॥
तया तमाहूनि केवळ पर । तुरीय शुद्ध सत्वाकार । वास्तव संविन्मय निजसाचार । निर्विकार स्वप्रकाश ॥९३॥
तये वैकुण्ठीं निवासी । वृक्षादि नर पशुपक्षी । आत्माकार स्वरूप लक्षी । विज्ञानराशी समाधिस्थ ॥९४॥
स्वभावें पक्षी विराव । करिती उपनिषद्भाव । भोगिती ब्रह्मानंद वैभव । प्राणी सर्व जेथींचे ॥४९५॥
जेथ निःशेष तमाचा लेश । नाहीं म्हणोनि स्वप्रकाश । कालत्रयीं जें अविनाश । तें स्वतःसिद्ध निजधाम ॥९६॥
ऐसें उत्कृष्ट महिमान । वैकुण्ठाचें काय म्हणोन । तेंही कथिजेल संपूर्ण । परिसोत सुज्ञ शुकवाणी ॥९७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP