अध्याय ८७ वा - श्लोक ३७ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न यदिदमग्र आसन भविष्यदतो निधनादनुमितमन्तरा त्वयि विभाति मृषैकरसे ।
अत उपमीयते द्रविणजातिविकल्पपथैर्वितथमनोविलासमृतमित्यवयन्त्यबुधाः ॥३७॥

ज्या कारणास्तव हें विश्व । सृष्टीहूनि पूर्वीं सर्व । नव्हतें हा अभिप्राव । तथ्य स्वयमेव सुविचारें ॥३१॥
तैं हें सदचि केवळ । आत्मा अद्वितीय निर्मळ । असतें झालें अचंचळ । सौम्या प्राञ्जळ श्रुति वदती ॥३२॥
आणि हें प्रळयानंतर । होणार नाहीं हा निर्धार । ब्रह्म सदोदित अधिकार । तैं सदसत्पर सन्मात्र ॥३३॥
असत् म्हणिजे कारणमाया । कार्य जाणिजे भूतमया । त्यांच्या अभावें अद्वया । सहज आत्मया अजस्रता ॥३४॥
एवं सृष्टि पूर्वीं नव्हतें । न होय निश्चयें प्रळयापरतें । या कारणास्तव मृषा भासतें । स्थितिकाळीं ही तव रूपीं ॥१०३५॥
तूं जो आत्मा परत्पर । केवळ चिद्रास अविकार । मध्यें तुजमाजि विश्वाकार । मिथ्या गोचर होत असे ॥३६॥
पूर्वीं नव्हतें शेवटीं नाहीं । मह्द्यें ही तें मिथ्याचि पाहीं । ऐसें अवगमिलें कृतनिश्चयीं । सुज्ञां हृदयीं विचारितां ॥३७॥
म्हणोनि या प्रकारें मिथ्याभूत । विश्व जाणिजे सुनिश्चित । जे द्रविणजाति विकल्पपथ । उपमिजेत तिहींसीं ॥३८॥
घटमठशरावपिण्डाकारें । अवघी मृत्तिकाचि अवतरे । कीं मणिकुण्डलकटकप्रकारें । कार्तस्वरें अनुकरिजे ॥१०४०॥
पास फारोळे शूळ परिघ । आयस तद्रूपें अव्यंग । बुद्बुद कल्लोळ तरंग । उदक साङ्ग अवघें तें ॥४१॥
नानाभिधानें अंबरजाती । सुज्ञ तंतु चि जाणती । एवं कारणत्वस्थिती । कार्यें भासती अनेकधा ॥४२॥
तेथ विकारां नाममात्रता । जरी त्य अबहुधा साकारता । कारण मृतिकादि तत्वता । सत्य सर्वदा अभेदें ॥४३॥
तेंवि आकाशादि महाभूतें । कीं भौतिकें मनुजादि समस्तें । यांसी नाममात्रता पृथक वर्ते । ब्रह्मचि सत्य वास्तव ॥४४॥
श्रुतिप्रतिपाद्य हेंचि सधर । कीं नामधेय जो विकार । तें वाचारंभणमात्र । कारण स्वतंत्र सत्यत्वें ॥१०४५॥
जैसा एक मृत्पिण्ड ओळखिला । मृत्तिकामयचि अवगमिला । तैसा जो जो मृद्विकार देखिला । तो जाणिजेला तद्रूप ॥४६॥
कीं एक सुवर्णाचा मणि । बोधे सुवर्णचि म्हणोनी । तरी सर्वही अलंकारभरणीं । तन्मय मनीं जाणों ये ॥४७॥
जें एक नखनिकृंतन । लोखंड ऐसें कळलें पूर्ण । तें शस्त्रादिविकारभरण । आयस कारण वोळखिजे ॥४८॥
नामरूपातीत ज्ञाने । आपणा ब्रह्मरूप मानी । तरी आत्मवत्सर्वभूतानि । अंतःकरणीं जाणतसे ॥४९॥
एवं अनेक उदाहरणीं । सत्यत्व निश्चयें कारणीं । नामधेय कार्यालागूनी । पृथक् सत्तत्व असेना ॥१०५०॥
तैसें विश्व हें नाममात्र । वाचारंभण भ्रमाचें पात्र । एक ब्रह्मचि सत् स्वतंत्र । निरंतर अविनाश ॥५१॥
तस्मात् विश्वासत्त्वीं प्रमाणाभाव । आणि मिथ्यात्वीं प्रमाणसंभव । वितथमनोविलासभव । सत्यत्वगौरव या नाहीं ॥५२॥
वितथ म्हणिजे लटिका फोस । मनःकल्पित जगदाभास । येथ जे धरिती सत्तत्वास । ते मूर्ख भ्रमास वरपडती ॥५३॥
वंध्यापुत्राचिया घरा । इच्छूनि अंतरीं स्नेहादरा । बागुल पाहुणा आला खरा । गंधर्वनगराहूनियां ॥५४॥
येरें आदर केला थोर । बैसों घातलें अंबर । कांहींबाहीं बोलूनि सत्वर । श्रमपरिहार मांडिला ॥१०५५॥
वाळुकास्नेहें अभ्यंगिला । उष्णमृगजळें न्हाणिला । दिग्दुकूळें परिवेष्टिला । बैसविला शून्यासनीं ॥५६॥
वायु उगाळूनि पुष्कळ । गंधें चर्चिला निर्मळ । खपुष्पांची गळा माळ । घालूनि केवळ तोषविला ॥५७॥
बोडंबरींचे अलंकार । आंगीं लेवविले सुंदर । यावरी भोजनाचा प्रकार । पंक्तिकारसमवेत ॥५८॥
छायापुरुषादि आपुले सखे । बैसवूनि अत्यंत हरिखें । धूमद्रुमपत्रें सुरेखें । विस्तीर्ण पृथकें मांडिलीं ॥५९॥
नेत्रींची बाहुली सुवेषा । जे चतुर देखणी पुरुषां । ते वाढी पदार्थविशेषा । चमर्कारें अतिशीघ्र ॥१०६०॥
जाई जुई शेवंतिका । यांच्या फळांच्या पृथक शाका । स्वप्नींच्या पक्कान्नां साजुकां । परिवेषी कां औदार्यें ॥६१॥
त्यावरी कांसवीघृत सद्यस्तप्त । पुष्कळ वाढिलें यावत्तृप्त । तंव तेथें अतिथि अकस्मात । दैवें निश्चित मी गेलों ॥६२॥
तये पंक्तीसि जेविलों । जेऊनियां अत्यंत धालों । सांगावयासि तुम्हांसि आलों । म्हणे इतरां अन्नार्थियां ॥६३॥
ऐसिया अनृतभाषणा । मूर्खावांचूनि विश्वासेना । तद्वत्प्रपंचविकत्थना । वाचारंभणा जाणिजे ॥६४॥
ऐसा वितथ मनःकल्पित । वाचारंभणमात्र विवर्त । प्रपंच सत्य म्हणती संतत । ते अज्ञान अत्यंत तमग्रस्त ॥१०६५॥
एथ ऐसा असे प्रयोग । विवादाध्यासित असन्मोघ । आदिअंत न दिसे साङ्ग । विश्वबोध म्हणोनियां ॥६६॥
विवादाध्यासित म्हणिजे काय । तरी याचा ऐसा अभिप्राय । दों प्रकारींचा अन्वय । समासें होय तो ऐका ॥६७॥
प्राङ्गणीं चोर देखिला । द्रष्टे म्हणती कैसा आला । तेथ बहुतीं वितर्क केला । बहुता परीचा बहुतेक ॥६८॥
माळवदाची जे कां वाट । तिकडून आला म्हणती स्पष्ट । एक म्हणती भिन्तचि नीट । चढूनि चोखट उतरिला ॥६९॥
द्वारपिधाना आधीं च आला । ऐसा च एकीं तर्क केला । शेखीं पाषाणें ताडिला । तंव प्रत्यय बाणला छाया हे ॥१०७०॥
तेंवि विवाद म्हणिजे विशेषवाद । ज्यास्तव करिती शास्त्रविद । एक म्हणती अनादिसिद्ध । उत्पन्न होत एक म्हणती ॥७१॥
एक म्हणती संकल्पकर्ता । एक म्हणती ईश्वरसत्ता । एक जीवचि समस्ता । कर्में तत्वता हेतु वदती ॥७२॥
एक प्रकृतिचि कर्ती म्हणती । एक काळचि सहसा मानिती । ऐसे बहुप्रकारें वदती । विवादती परस्परें ॥७३॥
षड्दर्शनांचे विशेष वाद । ज्यावरी तें हें विश्व विशद । अध्यस्त मिथ्या प्रसिद्ध । द्वितीयार्थ तो ऐका ॥७४॥
विपरीतवादें अनुसंधित । तेंचि विवादाध्यासित । हेंचि स्पष्ट अभीष्ट अभिप्रेत । परिसूनि दृष्टान्त विचारा ॥१०७५॥
रज्जु असूनि म्हणिजे सर्प । कीं स्थाणु असूनि पुरुषकल्प । कीं शिंपीवरी रौप्यारोप । अवघा जल्प विपरीत ॥७६॥
विपरीतबोधें अवगमिलें । तें विपरीतवादा पात्र झालें । जेव्हां वास्तव प्रत्यया आलें । तेव्हांचि कळलें मिथ्यासें ॥७७॥
भ्रमाहूनि पूर्वीं आरोप । नामरूपात्मक हा अल्प । नव्हता चि कीं सविक्षेप । न दिसे स्वयंभ भ्रमान्तीं ॥७८॥
आदिअंतीं अविद्यमान । चित्स्वरूपीं विश्व जाण । आकाशादि नामें भिन्न । तें विपरीतभाषण भ्रमास्तव ॥७९॥
ऐसें विवादें अध्यस्त । देवतिर्यग्मनुजवत । तें निश्चयें नव्हे सत । हा सिद्धान्त श्रुतिगदित ॥१०८०॥
अविद्यमान आदिअंतीं । दृश्ययविकारीं निश्चिती । शुक्तिरजतादिकांची स्थिति । मिथ्या ते रीती प्रपंच हा ॥८१॥
आणि मिथ्या जें जें नाहीं । तें दृश्य विकारीं नव्हे कहीं । जैसा आत्मा निरंतर पाहीं । कालत्रयीं सद्रूप ॥८२॥
आत्मा सर्वदा विद्यमान । सन्मात्रत्वें विकारहीन । निर्गुणत्व अदृश्य पूर्ण । विश्वलक्षण तेंवि नसे ॥८३॥
विश्व मिथ्या अविद्यमान । दृश्य विकारी म्हणोन । केवळ अज्ञानकारण । द्विलक्षण अनुमानें ॥८४॥
जेथ ज्या सत्यत्वबुद्धि । तें अज्ञान चि त्रिशुद्धि । ते वारा मोटें बांधिती । गगन प्राशिती तृड्हरणा ॥१०८५॥
ते खपुष्प माथां तुरंबिती । मृगजळीं नौके बैसती । बाऊ देखोनि कांपती । भिऊनि चढती स्वस्कंधीं ॥८६॥
असो त्या मूर्खांची कथा । प्रपंच नाहींच सर्वथा । आत्मा अद्वितीय तत्वता । सनंदन वक्ता बोलतसे ॥८७॥
हें ऐकूनि प्राश्निक मुनि । आशंकोनि आपुले मनीं । म्हणती प्रपंच निपटूनी । नाहींच निर्गुणींपरबह्मीं ॥८८॥
जरी प्रपंचसंबंधाचा गंध । चैतन्यीं अस्पृष्ट प्रसिद्ध । तरी जीवें काय केला अपराध । संसृतिबंध तो पावे ॥८९॥
किंवा असे कांहीं अगण्य । ईश्वरासी बहुतेक पुण्य । ज्यास्तव संसारवैगुण्य । न पवोनि दैन्य नित्यमुक्त ॥१०९०॥
केवळ संसार मिथ्या वदतां । कैंची पापपुण्याची वार्ता । तेव्हां मृषा बंधमुक्तता । साध्यसाधकता कायसी ॥९१॥
तरी कर्मकाण्ड हा विषय । किन्निमित्तक कैसा काय । ज्याचा वेदीं बहु अन्वय । साधनमय प्रशंसिला ॥९२॥
ये उत्प्रेक्षेच्या ठायीं । जीवेश्वरविशेष कायी । तो विदित होय श्रुत्यन्वयीं । रूपकें कांहीं जो ग्रथिला ॥९३॥
दोनी पक्षी जीव ईश्वर । परम जिवलग अत्यंत मित्र । निकटवर्ती जे एकत्र । एक देहतरुवर आश्रयिती ॥९४॥
प्रवृत्तिनिवृत्त्यात्मक जया । पक्ष असती पक्षिद्वया । पावे क्षणक्षणा वृद्धिक्षया । म्हणोनि देहा वृक्षत्व ॥१०९५॥
विषयसुखात्मकफळीं । जो पिकला असे सर्वकाळीं । तया देहवृतिस्नेहशाळी । पक्षियुगलीं वसिजेत ॥९६॥
एका वांचूनियां एक । क्षणभरी नसती हें कौतुक । ऐसे अनादि हे जिवलग । परि वृत्तिविवेक भिन्न यां ॥९७॥
आसक्त होऊनि जिवपक्षी । विषयसुखात्मक फळ ये वृक्षीं । परम रुचिकर मानूनि भक्षी । शिव अनुलक्षी साक्षित्वें ॥९८॥
तया फळाचिया उन्मादें । रमे गुणवतीसीं विनोदें । मग ते लोहित शुक्ल कृष्ण तच्छंदें । बहुतां प्रजातें प्रसवली ॥९९॥
असो इत्यादि अनेक श्रुति । जीवेश्वरविशेष वदती । तेचि सनंदभारती । वदे ते श्रोतीं परिसिजे ॥११००॥

स यदजया त्वजामनुशयीत गुणांश्च जुषन्भजति सरूपतां तदनु मृत्युमपेतभगः ।
त्वमुत जहासि तामहिरिव त्वचमात्तभगो महसि महीयसेऽष्टगुणितेऽपरिमेयभगः ॥३८॥

सनंदन म्हणे श्रोतयां प्रति । ईश्वर नित्य मुक्त कवणे रीती । जीवासि संसाराची प्राप्ति । केंवि ते श्रुत्युक्ति अवधारा ॥१॥
तरी तो जीव मायेंकरून । ज्या कारणास्तव भ्रमोन । अविद्येसी अनुशयी पूर्ण । झाला विसरून आत्मत्वा ॥२॥
म्हणाल माया कैसी कोण । अविद्येचें काय लक्षण । तें ऐकावें निरूपण । यथाज्ञानें कथिजेल ॥३॥
केवळ पूर्णपणें चैतन्य । असतां स्फुरलें अहंपण । तेचि माया जाणिजे सगुण । बीज संपूर्ण भवाचें ॥४॥
हेचि पुधें विश्वरूप । विस्तारली सविक्षेण । जीस्तव जीव पावे अविद्यालेप । ते ऐका संक्षेप क्रमरीति ॥११०५॥
जैसी समुद्रीं उठिली ऊर्मी । ते अनेक बुद्बुदां लागीं निर्मी । ते असोनि ही जळत्वधर्मीं । बुद्बुदनामीं अभिव्यक्ता ॥६॥
जितुकें बुद्बुदाकारें उंचावलें । तितुकेंचि बुद्बुदनामाथिलें । समानत्वें जें राहिलें । उदक बोलिलें जया परी ॥७॥
तेंवि अहंपणें वेढले । तेचि मायोपाधिक बोलिले । तेथें ही मायेसी अनुसरिले । तितुकेचि पातले जीवत्वा ॥८॥
मायाध्यासें घनावला । विसर तोचि अविद्या बोलिला । अविद्यायोगें संसार स्फुरला । विपरीतज्ञानें जीवासी ॥९॥
महत्तेजावलोकनें आपैसी । दृक्तेजीं झांपडी पडे जैसी । मग तमोगर्भीं रंगविशेषीं । तये दृष्टीसी अवगमिजे ॥१११०॥
तेंवि स्वस्वरूपाठवें विरमली । निजवृत्ति जडत्वा पातली । तमत्वें अविद्या बोलिली । पुढें विपेक्षली सत्वरजें ॥११॥
ते अज्ञानरूप अविद्या । तीमाजी सुलीन जीव सद्या । विसरला स्वरूपा अनादि आद्या । अभेद अच्छेद्या भ्रमस्तव ॥१२॥
म्हणोनि ये रीती मायेंकरून । जीव अविद्या आलिंगी आपण । तेव्हां तज्जनित देह कवळून । आत्मत्वें पूर्ण अध्यासी ॥१३॥
अंतःकरणादि वृत्यंकुर । हे भोक्तृज्ञात्संज्ञावर । सत्त्वगुणात्मक अविद्याप्रसर । कर्तृकरण या म्हणिजे ॥१४॥   
ज्ञानेन्द्रियें कर्मेन्द्रियें । पंचप्राणादि निश्चयें । राजस सर्ग हा अविद्यामय । तमें होय विषयादि ॥१११५॥
एवं एतदात्मक लिंगदेह । याचें आयतन निःसंदेह । स्थूळ शरीर भूतमय । आपणा तन्मय मानीतसे ॥१६॥
माग त्या देहाचे जे धर्म । सुखदुःखादि विकार परम । तन्निमित्तें भोग अधम । भोगी उत्तम होत्साता ॥१७॥
देह जन्मला जये याति । तेचि मानी आपणा प्रति । देह असतां अस्तित्वप्रतीति । धरूनि चित्तीं भ्रम वाहे ॥१८॥
मी बाळ मी आहें तरुण । मी वृद्ध मी पुष्ट रुग्ण । मी पवित्र मी पापी पूर्ण । मूर्ख सज्ञान मी म्हणे ॥१९॥
प्रियसंवादें अथवा गानें । संतोष मानी आपुल्या मनें । निंदा किंवा भीकरवर्णें । सुख दुःख श्रवणें अनुभवी ॥११२०॥
एवं शब्द स्पर्श रूप रस । गंधादि विषय हें तामस । अनुकूळप्रतिकूळत्वें त्रास । मानी तोष श्रवणादिकीं ॥२१॥
तया विषयसेवनासाठीं । गृहधनदारादि आटाटी । करी विशेषें न मनूनि खोटी । मग होय कष्टी फळपाकीं ॥२२॥
एवं देहात्मनें विषयसेवन । करूनि विसरला पूर्णपण । म्हणोनि हतभाग्य झाला आपण । जन्ममरण पावतसे ॥२३॥
सत् असोनि झाला । चिन्मय असतां जडत्वा आला । आनंदरूप दुःखें श्रमला । वैगुण्य पावला परोपरी ॥२४॥
ऐसा जीव अपेतभंग । म्हणिजे आनंदादि गुण अव्यंग । लोपले ज्याचे नैसर्गिक । अविद्यायोग झालिया ॥११२५॥
जैसा ब्राह्मण कामें भुलला । अंत्यजीसंगें भ्रष्ट झाला । षड्डिवध कर्मांपासूनि च्यवला । पातित्य पावला तत्काळ ॥२६॥
किंवा राजा दुष्टाष्टप्रकृती । संगें पावे ऐश्वर्यच्युति । तैसी जीवांची हे स्थिति । झाली निश्चिती उपहत ॥२७॥
ऐसा पिहितानंदादिगुण । होत्साता संसारवैगुण्य । पावे दुःखद जन्ममरण । वास्तव मीपण विसरूनि ॥२८॥
तया जीवाचाचि विषय । कर्मकाण्ड हा निश्चय । प्रवॄत्तिनिवृत्तिकार होय । सम्यक उपाय क्रियात्मक ॥२९॥
श्रति म्हणती जगदीश्वरा । अनंता अपारा अक्षरा । जीव भोगी संसारा । अविद्यापुरा अधिष्ठूनि ॥११३०॥
तूं तये मायेचा त्याग । करूनि राहसी निःसंग । केवळ सन्मात्रत्वें अभंग । निष्कलंक अद्वितीय ॥३१॥
म्हणसी तें माझ्याचि ठायीं आहे । मजवीण क्षण ही भिन्न न राहे । ममाश्रयचि सहसा जिये । केंवि मज होय तत्त्याग ॥३२॥
तरी सर्पा आंगीं त्वचा जैसी । न टकूनि टोकी आपैसी । आभासरूपा माया तैशी । तूं त्यागिसी तद्वत पैं ॥३३॥
ये दृष्टान्तीं ऐसा भाव । स्वगत ही कंचुक सावेव । असतां न मनी गुणवैभव । अहि स्वयमेव निश्चयें ॥३४॥
त्वचा असतां अतिभूषण । अथवा न मनीच दूषण । गेलिया न स्मरे उदासीन । जाणीजे म्हणोनि त्यक्तवत् ॥११३५॥
गुणवती जे माया अजा । तूं सांडिसी तैसिया वोजा । हें आश्चर्य काय संवित्पुज्जा । तुज केवळ निजानंदमया ॥३६॥
निरंतराल्हादरूपिणी । संवित्कामधेनुवृंदधनी । त्या तुज कोण कार्य अजे करूनी । तूं पूर्णपणीं ते उपेक्षिसी ॥३७॥
अजा म्हणिजे शेळिये प्रति । जे अल्पदुग्धा क्षुद्र सेविती । कामधेनुखिल्लारपति । न इच्छी निश्चिती तयेसी ॥३८॥
अजाजनित विषयसुख । जें क्षणिक आणि अल्पक । जीव कामिती अज्ञानमूर्ख । हीनविवेक मतिमंद ॥३९॥
तूं नित्यानंदसुखकल्लोळ । स्वसंवित्स्फुरणरोळ । तद्गताल्हादें पूर्ण केवळ । उपेक्षाशीळ मायेतें ॥११४०॥
म्हणसी मज कोठून हें सामर्थ्य । तरी ऐकावें करूनि स्वास्थ्य । जें निरोपितसों यथातथ्य । ऋतनिर्मथ्यविशेषणें ॥४१॥
तूं परमात्मा आत्तभग । म्हणिजे निरंतर अव्यंग । तुज संप्राप्त ऐश्वर्य अमोघ । जें अजस्र साङ्ग तव धामीं ॥४२॥
उत्कृष्ट ऐश्वर्य अवगुणित । अणिमादिमहत्सिद्धिमंत । येथ शोभसी इत्थंभूत । अपरिमित सभाग्य तूं ॥४३॥
अणिमा गरिमा लघिमा महिमा । प्राप्ति साहवी प्राकाम्या । ईशित्व वशित्व ऐशा परमा । सहज सुगमा तुजलागीं ॥४४॥
अणिमा म्हणिजे अजूहून्नि सान । होऊनि वर्तणें आपण । गरिमा म्हणिजे स्थूळ होऊन । राहणें जाण लघु असतां ॥११४५॥
तरी तूं सहज अणूहूनि अणीयान । महताहूनिही महीयान । गगनासही तूं सांठवण । निश्चयेंकरून श्रुति बोलें ॥४६॥
लघिमा म्हणिजे अतिलाघवें । सर्वही करणें चापल्यभावें । तरी सर्वीं सर्वपणें स्वभावें । न करूनि आघवें तूं करिसी ॥४७॥
महिमा म्हणिजे सर्वत्र पूज्य । होणें जें कां कीर्तिपुञ्ज । तरी ईड्य निगमीं सहज । ब्रह्मादि तुज भजताती ॥४८॥
प्राप्ति म्हणिजे संकल्पमात्र । करितां दुर्लभ ही विचित्र । पदार्थ प्राप्त व्हावे स्वतंत्र । असतां स्थिर स्वस्थानीं ॥४९॥
तूं पूर्णपणें सर्वत्र सर्वीं । संप्राप्त अससी पदार्था पूर्वीं । अधिष्ठानत्वें व्यापक विभवीं । हे प्राप्ति गुर्वी तव रूपीं ॥११५०॥
प्राकाम्या जे कामिल्या ठायां । काभिल्या सारिख्या रूपा जया । धरूनि जाणें पालटूनियां । आपुली काया बहुरूप ॥५१॥
ईशित्व म्हणिजे सर्वत्र सत्ता । आज्ञा मानिजे सर्वीं तत्त्वता । तरी कार्णत्वें तूंचि शास्ता । तुझेनि भूतां वर्तणूक ॥५२॥
तरी व्यापकत्वें सर्वां ठायीं । सर्वरूपें तूंचि पाहीं । तुजवीण पदार्थमात्र नाहीं । जाणती हृदयीं विपश्चित ॥५३॥
वशित्व म्हणिजे वश होऊन । इतरीं व्हावें पैं स्वाधीन । तरी भूतां तव तंत्रवर्तन । चेष्टक संपूर्ण तूं त्यांसी ॥५४॥
एवं स्वतःसिद्ध अष्टविभूति । तुझ्या ठायीं संविन्मूर्ति । तेथ शोभती अजस्रस्थिति । अमोघकीर्ति परमात्मा ॥११५५॥
इतरां सारिखें परिच्छिन्न । देशकाळादिनियमेंकरून । नव्हे तव ऐश्वर्यमान । अमोघ परिपूर्ण निरंतर ॥५६॥
आकाश तेथवरी अवकाश । तेंवि परिपूर्णरूप तूं परेश । तत्संबंधें ऐश्वर्य अशेष । अपरिमित निर्दोष सहजेंचि ॥५७॥
यास्तव अपरिमेयभग । हें आसमंतात् जाणावया योग्य । तुझें ऐश्वर्य नाहीं साङ्ग । तो तूं अव्यंग मायातीत ॥५८॥
सनंदन म्हणे श्रोतयांस । ऐसा नित्यमुक्त ऋषीकेश । जीव अविद्याबंधनीं सक्लेश । कर्मकाण्डास आधिकारी ॥५९॥
म्हणोनि पूर्वोक्तप्रकारें । सत्प्राप्तिसाधननिकरें । स्वहिताकारणें अति आदरें । जे भगवंतातें भजताती ॥११६०॥
यथोक्त वर्णाश्रमाचरण । करूनि प्रपंचीं विरक्त पूर्ण । होऊनि सत्समागमें निगुण । होइजे विचक्षण विवेकें ॥६१॥
मग अनन्यभावें सद्गुरुचरण । सेवितां उपजे उपनिषज्ज्ञान । भगवत्तत्व अनुभवे पूर्ण । तैं भजिजे भगवान अभेदें ॥६२॥
साधनसंपन्न विवेकी ऐसे । भगवंतातें भक्तिविशेषें । भजती ते हा भव आपैसे । तत्कृपावशें तरताती ॥६३॥
इतर जे कां भजनविमुख । विषयसेवनपर निःशंक । ते भवीं बुडती हीनविवेक । पावती दुःख जननादि ॥६४॥
आणि जे देखोवेखीं घेती जोग । भोगीं पावूनियां उपसर्ग । किंचित् आश्रयिती भगवन्मार्ग । विवेकवैराग्य न होतां ॥११६५॥
जैशा नारी प्रसूतिकाळीं । कीं श्मशानीं माणसें भोळीं । विराग पावती भोगफळीं । पुन्हा विषयशाळी पूर्ववत् ॥६६॥
तेंवि रजस्तमात्मक अषढ्ढाळें ।  कर्में करितां गात्रें विकळें । होतां किंचित् त्रास उजळे । तैं टाकिती सळें बहिःसंग ॥६७॥
प्रतिकूळव्यवसायें होती दुःखी । म्हणती निःसंग असती सुखी । त्याग करिती देखोदेखीं । भ्रष्टती शेखीं उभयत्र ॥६८॥
कीं त्यागिले जे जे भोग । पुन्हा इच्छिती त्यांचा योग । म्हणोनि वान्तभक्षक ते अव्यंग । कामानुराग धरिताती ॥६९॥
त्यांसि न होय भगवत्प्राप्ति । ना इहलोकीं सुखावाप्ति । अंतीं कुयोनि पावती । क्लेशी होती एनसें ॥११७०॥
जे जे काम कामी अंतरीं । त्यांतें शोची परोपरी । भोग्य मानूनि वासना धरी । कर्में जन्मे तेथ तेथ ॥७१॥
इत्यादि श्रुत्यर्थविवरणें । सनंदन श्रोत्यांकारणें । बोले जें विशद बोलणें । सम्यगवधानें तें ऐका ॥७२॥

यदि न समुद्धरन्ति यतयो हृदि कामजटा दुरधिगमोऽसतां हृदि गतोऽस्मृतकण्ठमणि ।
असुतृपयोगिनामुभयतोऽप्यसुखं भगवन्ननपगतान्तकादनधिरूपपदाद्भवतः ॥३९॥

श्रुति म्हणती भो भगवंता । जे कां यति हृदिस्थिता । कामसटा भोगान्विता । बळिष्ठभूता नोत्पाटिती ॥७३॥
यति म्हणिजे यत्नशीळ । तव प्राप्त्यर्थ जे अळुमाळ । परि अंतरीं काममूळें सबळ । विषयजळ प्राशूनी ॥७४॥
तीं वासनारूप काममूळें । पूर्वाध्यास ज्यां विशाळ आळें । देहाहंकारभोगजळें । सिंची केवळें निरंतर ॥११७५॥
ऐसीं काममूळें बलिष्ठ । जरी नोत्पाटिती अंतर्निष्ठ । आण इवरि वरी लुञ्चिती शेवट । काम उद्भट तरूचे ॥७६॥
स्त्रीपुत्रादि स्वजन देखा । किम्वा गृहादिवृत्तिप्रमुखा । या बहिःसंगकामशाखा । तोडिती अशेखा बहिर्मुख ॥७७॥
परि मूळाचेनि सुरवाडें । अनेक उठती जुंबाडें । ऐसा नित्य नूतन वाढे । हें मूर्खा निवाडें उपजेना ॥७८॥
तरी त्या असतां दुष्टा लागीं । तूं हृदयस्थ गूढलिंगी । अप्राप्त होसी निस्संगसंगी । कीं केवळ विरागी नव्हती ते ॥७९॥
हृदयीं असोनि अप्राप्त म्हणणें । हें कैसें घडेल बोलणें । तरी उमजेल उदाहरणें । कृतव्याख्यानें यथास्थित ॥११८०॥
जैसा विसरें कंठस्थमणी । नाहींच वाटे केवळ मनीं । प्राप्त असोनि अप्राप्तपणीं । असतां लागूनि तद्वत तूं ॥८१॥
एवं अप्राप्त आत्मा तूं ययांसी । ते प्राण प्रोषिती अहर्निशीं । असुतृपयोगी निश्चयेंसीं । म्हणिजे तयांसी यास्तव ॥८२॥
असुतृप आणि म्हणणें योगी । हे आख्या नव्हे तयां जोगी । तरी विपरीत नामें वावुगीं । काय नसती जगीं इतरांसीं ॥८३॥
झाडासि आदित्य म्हणती । पाहतां न सांपडे रातीं । वचनागासि अमृतें ख्याती । सेवितां मरती भक्षक ॥८४॥
शिल्पिकशास्त्रा नाम ब्रह्मा । कीं त्या अहर्ता सृजनकर्मा । अज बोलती बोकडवर्ष्मा । कीं तो अजन्मा म्हणावा ॥११८५॥
राक्षसा संकेत पुण्यजन । देखतां मानावा सज्जन । वज्री करी पदघर्षण । संक्रंदन ते होय ॥८६॥
पाषाणासी नाम चिरा । मस्तकीं ठेवितां दिसे बरा । अयथार्थ ऐशा तया नरां । नामनिर्धारा जाणिजे ॥८७॥
योगियांचा घेती वेष । धरिती जनीं तदावेश । दंभ दावूनि भाविकांस । ठकिती विषेष कापट्यें ॥८८॥
विध्युक्त सांडिला परिग्रह । - मग मनासि झाले गळग्रह । वाढविती आपुला आग्रह । दुर्बुद्धिसंग्रह करूनी ॥८९॥
भगवीं करूनि मिरविती । शरीर आपुलें जगविती । गोष्टी सांगूनी झगविती । ज्ञान शिकविती अबळांसी ॥११९०॥
घर सांडूनियां हठें । मठ करूनि राहती मोठे । मेळवूनि शिष्य लोठे । दाविती मोठें प्रस्थान ॥९१॥
स्वस्त्री उपेक्षूनि आवडी । शिष्यिणी मेळविती धांगडी । धनप्राप्ति पाहोनि सवडी । साधनपरवडी दाखविती ॥९२॥
लटिकेचि बैसती ध्यानस्थ । नेणूनि आत्मा हृदयस्थ । मानस चंचळ भोगासक्त । अर्चनीं रत म्हणविती ॥९३॥
वरिवरी दाविती विराग । गुप्त सेविती अनेक भोग । कृत्रिम नेणोनियां तें सोंग । धरूनि अनुराग जन भजती ॥९४॥
वरदळ देखोनि खटाटोप । भाव धरिती मूर्खकळप । पूजिती मानूनि योगाधिप । उपचार अमूप अर्पिती ॥११९५॥
अन्नें वसनें उत्तमोत्तम । स्रक्चंदन वनितावर्ष्म । तत्सेवनें मानिती शर्म । परि नेणती धर्म आपुला ॥९६॥
जेथ आपणा नाहीं अधिकार । ते प्रकटिती बहु प्रकार । करिती कीर्तन उत्साहगजर । परि लक्ष समग्र विषयांत ॥९७॥
ऐसे विषयी वृथापुष्ट । भोग सेविती यथेष्ट । पिण्डपोषक क्रियाभ्रष्ट । ते आत्मघ्न नष्ट जाणावे ॥९८॥
म्हणाल भगवद्भक्तांचें आचरण । सोपाधिक क्रियावान । तद्वत आचरतां यां दूषण । काय म्हणोन देतसां ॥९९॥
तरी पतिव्रतेचे शृंगार । कुङ्कुमकजलादि प्रकार । पुंश्चळी दाविते अनुकार । परि भिन्न अधिकार उभयांचा ॥१२००॥
साध्वी स्वतनु सालंकृत । करूनि भर्तारा रंजवीत । म्हणोनि इहलोकीं कीर्तिमंत । अपवर्ग निश्चित ते पावे ॥१॥
अनियमें पुंश्चळी नारी । बहुधा स्वतनूसी शृंगारी । काम वांछी नानानरीं । सौख्य शरीरीं लक्षूनी ॥२॥
म्हणोनि उपचार तेचि विपचार । दिसती तयेचे दोषाकार । निंद्य इहलोकीं ते नार । नरक अघोर मग भोगी ॥३॥
तेंवि भजनोपाधि करून । साधु तोषविती भगवान । अपवर्गेच्छा मनीं धरून । विरक्त होऊनि वैषयिकीं ॥४॥
दाम्भिक जनोपाधि दाविती । जनासि विविधा रंजविती । पूजा तयांची वाञ्छिती । सुख भोगिती ऐन्द्रिय ॥१२०५॥
असो श्रुति म्हणती श्रीभगवन्ता । त्यांसि दुर्गम तूं हृदयीं असतां । तरी काय इतुकी चि हानि त्या मता । मग विपत्ति होय ते ऐका ॥६॥
इन्द्रियपोषक कपटयोगी । उभय लोकीं दुःख त्यां लागीं । ते जरी म्हणाल कवणे भंगीं । होय तरी श्रुतिगी अवधारा ॥७॥
मृत्यु म्हणिजे अज्ञान प्रचुर । अंतकनामें हा संसार । अहंताममतात्मक सविकार । त्रिगुणाकार जो भासे ॥८॥
तो आत्मबोधेंवीण अनिवृत्त । कीं निरसिला नाहींच निश्चित । यास्तव देहात्मभावें आसक्त । विषयसुखार्थ होताती ॥९॥
तें विषयसुख साधे धनें । म्हणोनि करिती लोकाराधनें । धनवन्ताचीं मनोधारणें । द्रव्याकारण करिताती ॥१२१०॥
मठासि आलिया धनवन्त । त्यांचा आदर करिताती बहुत । आपण उच्चासनीं महंत । ज्ञान वैराग्य बोलती ॥११॥
शिष्य भोंवते परिचारक । व्यजनचामरच्छत्रधारक । मोरकुंचे ढाळिती एक । ऐसे अनेक परिचरती ॥१२॥
यावा देखोनि हा स्वतंत्र । भजों लागती तावन्मात्र । पूजा करूनि इच्छिती मंत्र । धनिक तत्पर होत्साते ॥१३॥
तंव कांहीं एक करूनि मिस । तीर्थोद्यापन उत्साहदिवस । धन याचिती श्रीमंतांस । साहित्य अशेष करा म्हणती ॥१४॥
मग ते लोक रजोगुणी । ऐकोनि साभिलाश वाणी । फिरोनि दर्शन न घेती कोण्ही । जानोनि मनीं दाम्भिकसे ॥१२१५॥
ज्ञान ध्यान आणि चतुरता । बहुदिवसांची स्नेहवार्ता । हे तेव्हांचि गेली तत्वता । कांहीं दे म्हणतां अभिलाषें ॥१६॥
जे जे करीत होते स्तुति । ते चि निन्दा मुखें वदती । ऐकोनि अंतरीं जळपती । खेद करिती अतिशयें ॥१७॥
मग म्हणती हा गांवचि नष्ट । लोक अभक्त येथील शठ । येथ कां भोगावे वृथा कष्ट । जावें स्पष्ट देशावरा ॥१८॥
बाहेर मेळवूनियां धन । यांच्या उरावरीच आपण । घमंड वृथा कष्ट । जावें स्पष्ट देशावरा ॥१९॥
मग शिष्यां सहित देशान्तर । सेवूनि फिरती दारोदार । म्हणविती दंभें योगेश्वर । नारीनर झकविती ॥१२२०॥
सकाम साधनांच्या कोटी । अनेक परमार्थाच्या मोठी । सांगूनि वेधिती जनांच्या थाटी । भजनपरिपाटी प्रकटूनि ॥२१॥
आधीं दावूनि निःपृहता । मस्तकीं हात ठेविती पुरता । मग मागती धन तत्वता । करूनि सत्ता त्यांवरी ॥२२॥
म्हणती शिष्यांसी आपण । तुम्ही काया वाचा मन । अर्पूनि झालेति पूर्ण शरण । तरी धनवंचन करूं नये ॥२३॥
तंव येर करुणा बहु भाकिती । स्वामी द्ररिद्री आम्ही म्हणती । यथाशक्त्या जें अर्पिती । देखूनि कोपती तयां वरी ॥२४॥
मग ते शिष्य ही निर्भिडपणें । बोलती भंडविभंड बोलणें । परस्परें कळवंडतां त्राणें । छीथू होय बहु लोकीं ॥१२२५॥
ग्रामाधिपति देशाधिपति । जाऊनि भेटती तयांप्रति । आशा देखूनि ते बोलती । योगस्थिति हे काय ॥२६॥
तथापि मुखदाक्षिण्यें देती । रुष्ट होऊन तेचि घेती । ऐसें बहु क्लेशें धन अर्जिती । फिरूनि येती मठासी ॥२७॥
तंव तें दुर्दशेचें धन । महत्क्लेशें संपादून । भोग भोगूं न शकती पूर्ण । उजगरपणें लोकांत ॥२८॥
मग एकान्तीं करूनि स्थळ । निकट शिष्यणीशिष्यमेळ । तिहींशीं करिती चकंदळ । भयें विकळ होत्साते ॥२९॥
जैसे जार जारिणी नारी । गुप्त भोगिती परस्परीं । परि दुःख वाहती जिव्हारीं । अहोरात्रीं जनभयें ॥१२३०॥
विषयसेवन त्यां क्षणमात्र । परी काळजी अंतरीं अहोरात्र । तद्वत हेही अपवित्र । चिन्तातुर अखंडित ॥३१॥
भोगवैभव हें यथेष्ट । झणें होईल लोकान्त प्रकट । विपरीत मानूनि देतील कष्ट । मग जाईल स्पष्ट प्रतिष्ठा ॥३२॥
म्हणोनि इहलोकीं दुःखस्थिती । पावती कुमति ऐसिये रीती । आतां अमुत्र दुःखावाप्ति । तेही निगुती परिसावी ॥३३॥
पावले नाहेंत ज्याचें पद । ऐसा जो तूं स्वयंबोध । ईश्वर कृतकर्माचा फलद । हृदयस्थ प्रसिद्ध परमात्मा ॥३४॥
त्या तुज पासूनि ही दुःख । पावती निश्चयें बहिर्मुख । तें कां म्हणसी तरी विवेक । तो नवेक कथिजेल ॥१२३५॥
ज्यासी निजप्रपतीचा अभाव । ते अविद्यावंत जीव । तिहीं आश्रमधर्म सावयव । अवश्यमेव आचरिजे ॥३६॥
अंतरीं अप्रपत तूं पुरुषोत्तम । आणि अज्ञान विषयत्वें जें परम । प्राप्तवर्णाश्रमीं निजधर्म । त्याचा अतिक्रम करूनियां ॥३७॥
योगी म्हणवूनि यथेष्टाचरण । कैसें केलें तत्कर्मनिबंधन । ते पावती तव दंड पूर्ण । नरकलक्षण आकल्प ॥३८॥
ऐसें परलोकींही असुख । भोगिती ते हीनविवेक । एवं कामिक यति उभयत्र दुःख । लाहती निष्टंक श्रुति म्हणती ॥३९॥
तंव एक वितर्कें वदती । हे येथ कैसी वदंती । यतीसी कांहींही कृत्य निश्चिती । नाहींच जाणती विपश्चित ॥१२४०॥
सुखदुःखोपभोगें करून । प्रारब्धक्षय होय पूर्ण । कीं प्रारब्धभोगेंकरून । नोहेच क्षीण सर्वथा ॥४१॥
या कारणास्तव त्यां वृथा । निन्दितां पुरे नणतां । उभयत्र असुख हें लावितां । दूषण तत्वता किमर्थ ॥४२॥
आश्रमधर्माचा परित्याग । हें लक्षिता त्यांचें व्यंग । तरी ऐका श्रुत्यर्थ साङ्ग । संशयभंगकारक हा ॥४३॥
ब्रह्म जाणे तो ब्राह्मण । तो चिदात्मबोधें परिपूर्ण । स्वसुखानुभवें आनंदघन । निरंतर संविन्मय शान्त ॥४४॥
हा नित्य महिमा ब्राह्मणाचा । कर्में न वाढे साचा । ना न लगे बाध उणीवेचा । येणें करूनि कदापिही ॥१२४५॥
प्रावृट्काळीं जयापरी । नद्या मिसळती पूर्णनीरीं । ग्रीष्मीं आटती परि समुद्रीं । न्यूनाधिक्य दिसेना ॥४६॥
कीं अमृतीं शर्करा मेळविली । तरी त्या अधिक गोडी आली । नातरी कांहीं न्यून जाहली । हे तेथ बोली न शोभे ॥४७॥
हाचि श्रुतिवचनें विशदार्थ । सनंदन वक्ता समर्थ । बोले विशुद्ध परमार्थ । तें परिसोत श्रवणार्थी ॥४८॥

त्वदवगमी न वेति भवदुत्थशुभायोर्गुणविगुणान्वयांस्तर्हि देहभृतां च गिरः ।
अनुयुगमन्वहं सगुनगीतपरम्परया श्रवणभृतो यतस्त्वमपवर्गगतिर्मनुजैः ॥४०॥

श्रुति म्हणती अगा ये सगुणा । षड्गुणैश्वर्यसंपन्ना । श्रीभगवंता नारायणा । सचिद्घना जगदीशा ॥४९॥
तूं जो सर्वभूतीं अनुस्यूत । उपादानत्वें संतत । त्या तुझें ज्ञान ज्या निश्चित । तो बोलिजे त्वदवगमी ॥१२५०॥
ऐसा स्वानुभवें तव ज्ञानवान । अभेद आत्मावबोधें पूर्ण । त्या प्रवृत्तिबोध होय शून्य । तेंचि लक्षण परिसावें ॥५१॥
तूं कर्मफळाचा दाता । भूतमात्रांचा नियंता । तुज ईश्वरापासूनि तत्वता । आविर्भूत कर्मफळें ॥५२॥
पूर्वजन्मीं जीं अर्पिलीं । कर्में पुण्यपापाथिलीं । तत्फळभूतें जीं बोलिलीं । सुखदुःखें भलीं अनेकधा ॥५३॥
तया सुखदुःखांचे संबंध । जरी होताती अगाध । तथापि ज्ञानी केवळ शुद्ध । नेणेचि प्रसिद्ध तयांतें ॥५४॥
तव स्वरूपानुभवीं निमग्न । देहभावीं उदासीन । म्हणोनि न करीच अनुसंधान । सुखदुःखाख्यसंबंधीं ॥१२५५॥
सुखदुःखसंबंध जडती कैसे । तरी इन्द्रियविषयसंयोगवशें । प्रारब्धवशात् देहाध्यासें । तें संक्षिप्तसें कथिजेल ॥५६॥
मानापमान निन्दा स्तुस्ती । शीतोष्णमृद्वादि स्पर्शोत्पत्ति । सुन्दरभीकररूपप्रतीति । होतां उमटती सुखदुःखें ॥५७॥
सुरस विरस अन्नें पानें । कीं सुगंध दुर्गंध अवघ्राणें । हें कांहींही ज्ञानी नेणें । पूर्णज्ञानें आथिला ॥५८॥
देहप्रारब्धें अनायासीं । सुखदुःखसंब्म्ध निश्चयेंसीं । इत्यादि होती परी तयासी । न कळे विशेषीं स्वानुभवीं ॥५९॥
अंतःकरणादि वृत्ति परम । अधिष्ठिती इन्द्रियग्राम । तैम देहाध्यासें विषयभ्रम । होय निस्सीम प्रत्यक्ष ॥१२६०॥
त्या वृत्ति झालिया स्वरूपीं लीन । कोण सांभाळी इंद्रियगण । तेव्हा बाह्य विपरीत ज्ञान । सहज संपूर्ण मावळलें ॥६१॥
यास्तव ज्ञानी द्वंद्वरहित । न होय सुखदुःखें मोहित । आत्मानुचिन्तनें संतत । अक्षय आनंद भोगीतसे ॥६२॥
जरी अदृष्टें भद्रासनीं । महत्वें बैसविला ज्ञानी । तरी तेथींचेनि श्लाघा न मनी । कीं रंकपणीं नाभिभवे ॥६३॥
अथवा ईश्वर मानूनि स्तविला । किंवा निंद्यत्वें निखंदिला । तोषरोशा न पवे भला । कीं अभेद बाणला प्रत्यय ॥६४॥
प्रारब्धे नानाविलास । सहज प्राप्त झाले विशेष । कीं वरपडला त्रितापास । तरी सुखदुःखास नाठवी ॥१२६५॥
देहतादात्म्य गेलियावरी । द्वंद्वभावना निरसली पुरी । चित्सुख पावला अंतरीं । अक्षय निर्धारीं पूर्णत्वें ॥६६॥
जेंवि अमृत प्राशूनि धाला । तो षड्रसां न स्मरे वहिला । तत्प्राप्ती स्तव तोषला । कीं न होतां दुखावला हें न घडे ॥६७॥
कामधेनु जयासि प्राप्त । तो कैं अजेसि आठवीत । मा लाभालाभीं तयेच्या होत । खेदमोदमय हृदयीं ॥६८॥
असो श्रुति म्हणती भगवंता । ऐसा तव रूपाभिज्ञ तत्वता । निःशेष नेणे प्रारब्धजनिता । सहज प्राप्ता सुखदुःखां ॥६९॥
तरी देहाभिमानी जे नर । नेणती आत्मा परात्पर । तयंच्या वाणी ज्या सधर । संसारपर साकांक्ष ॥१२७०॥
त्याप्रवृत्तिनिवृत्तिकारका । केवळ निधिनिषेधात्मका । विगतदेहाभिमानें नेटका । नेणे अशेखा कदापि तो ॥७१॥
अमुकें बोलावें न बोलावें । अमुकें करावें न करावें । अमुके स्पर्शावें न स्पर्शावें । की न देखावें देखावें ॥७२॥
अमुकें भक्षावें न भक्षावें । अमुके त्यागावें अवश्य घ्यावें । ऐसे विधिनिषेध बरवे । वदती सत्यत्वें देहभृत ॥७३॥
या सुकृतदुष्कृतजनका वाणी । सुखदुःखें फलती निदानीं । ज्ञानी नेणं चि निपटूनी । देहाभिभान गेलिया ॥७४॥
जेव्हां देहाभिमानाचा विलय । शुद्ध बाणला आत्मप्रत्यय । सबाह्य कोंदलें चिन्मय । नाठवे कार्य कांहीं ही ॥१२७५॥
जेंवि पेटिके वरी खंडेराय । जवळी म्हाळसा सारमेय । पूजकातें स्पर्शसंशय । कळतां स्वर्णमय न होय कीं ॥७६॥
व्याघ्रसिंहादि वाताशक । कामधेनु अश्व अनेक । चित्रींव भिंती वरी सम्यक । देखतां भय तोख न उपजे ॥७७॥
करणत्वें आघवी भिंती । भासते मृषा भासती । तेंवि ज्ञातया जगत्प्रतीती । नाहीं च निश्चिती ब्रह्मत्वें ॥७८॥
वस्तु अद्वितीयकारण । मिथ्या विवर्तप्रपंचबान । तें वास्तवबोधें उडालें पूर्ण । विधिनिषेध म्हणोन अनोळख ॥७९॥
एवं हाचि इत्यर्थ येथ । विधिनिषेधी सज्ज न होत । जगद्बोधाभाव निश्चित । त्या जाला संतत तव बोधें ॥१२८०॥
ऐसें ज्ञात्यांचें लक्षण । जे सबाह्य विकारहीन । हें त्यांसी युक्त चि पूर्ण । येथ विलक्षण कोण म्हणे ॥८१॥
ज्या कारणा स्तव जिंहीं मनुजीं । तव प्राप्तिसाधक विवेकपुज्जीं । अनुदिनीं श्रवणें करूनि सहजीं । चित्ता माजि तूं धरिलासी ॥८२॥
तयासी मोक्षरूपा गति । तूं निश्चयें होसी जगत्पति । जरी म्हणसी ते कवणे रीति श्रवणें चित्तीं मज धरिती ॥८३॥
तरी युगानुयुगीं जे परंपरा । ब्रह्मनिष्ठाची ज्ञानपरा । उपदेशसंतति ते निरंतरा । शिष्योपशिष्यीं विस्तृत ॥८४॥
तो संतांचा संप्रदाय । जेणें सम्यक ज्ञान होय । तदनुसार साधनोपाय । करूनि पत्यय अवगमिती ॥१२८५॥
अनन्यभावें सद्गुरु शरण । होऊनि इच्छिती तत्वज्ञान । तैं परंपरागत उपलभ्यमान । देशिक आपण उपदेशी ॥८६॥
तें देशिकोपदेशें निजसार । तव रूप केवळ परात्पर । श्रवण करूनि अति तत्पर । चित्तीं सादर धरिताती ॥८७॥
तत्वमस्यादि महा वाक्यां वरून । आपण अभेद तुजसीं पूर्ण । जाणोनि टाकिती देहाभिमान । तव चिन्तन दृढ करिती ॥८८॥
एवं सत्संप्रदायें श्रवणभृत । अपवर्गगति तूं इत्थंभूत । त्यांसी होसी हें निश्चित । असे युक्त यथार्थ पैं ॥८९॥
इतुक्या कथनाचा इत्यर्थ । हाचि येथ यथातथ्य । कीं तत्वज्ञानी जे यथार्थ । त्यां नाहीं किंचित दैहिक हें ॥१२९०॥
दैहिक जो हा कर्माधिकार । याची शंका ही किंचिन्मात्र । न वर्ते त्यांसि कीं प्रबोध प्रचुर । सबाह्य अंतर जयांचें ॥९१॥
हें आश्चर्य नव्हे कीं फार । जे सगुण तव भक्तितत्पर । तव कथाश्रवणादि निष्ठासार । धरिती निरंतर मानसीं ॥९२॥
तव पदाची ज्यां जवळिक । सप्रमयोगें जे नीःशंक । त्यांसी ही विधिनिशेध बाधक । न होती निष्टंक कदापि हे ॥९३॥
मा वास्तव बोधें संकल्परहित । त्यां कें विधिनिषेध बाधित । जेंवि स्वप्नींचें विविधा आचरित । झालिया जागृत मृषा गमे ॥९४॥
श्रोते शंका करिती येथ । संत विशेषें स्वधर्मपथ । आचरत असतां येथ हें उक्त । हा निश्चितार्थ केंवि असे ॥१२९५॥
तरी ऐका जी सुनिश्चित । संतांच्या दोनी कोटी येथ । संप्रज्ञात असंप्रज्ञात । हे उभयता मुक्त सम जाणा ॥९६॥
त्यां माजी केवळ कल्पनातीत । परमहंसदीक्षामंत । ते जाणावे असंप्रज्ञात । विधिनिषेधबोध त्यां नाहीं ॥९७॥
आणि संप्रज्ञात समाधिस्थ । केवळ लोकसंग्रहार्थ । कामनाशून्य अभिमानरहित । आचरती संतत सहजस्थिति ॥९८॥
जना कारणें तदनुकार । करूनि दाविती बाह्याकार । अंतरीं निःशंक आत्माकार । वृत्ति निरंतर जयांच्या ॥९९॥
हे त्यांहूनि महंत अधिक । जगदुद्धारी जे सम्यक । सदाचरणें शिक्षिती लोक । प्रबोधें तारक जडजीवां ॥१३००॥
यद्यदाचरति श्रेष्ठः । तदनुसार इतर स्पष्ट । परि अंतरीं विधिनिषेध पोचट । जाणती चोखट आत्मज्ञान ॥१॥
आणि इतर जे कपटयोगी । केवळ अज्ञान भोगानुरागी । ते इहामुत्रीं दुःखभोगी । होती सोंगी उभयभ्रष्ट ॥२॥
ऐसा येथींचा इत्यर्थ । वदूनि वक्ता समर्थ । आशंकोनि पुन्हा बोलत । तें सुनिश्चित परिसिजे ॥३॥
म्हणे त्वदवगमी न जाणे । सुखदुःखाख्य लक्षणें । आणि विधिनिषेधा कारणें । हें बोलणें विस्तरिलें ॥४॥
तरी वितर्कें पाहतां तेथ । तत्व जाणावया इत्थंभूत । केंवि शक्य न कळे मात । दुरवगमत्व कथिलेंसे ॥१३०५॥
यास्तव हें सत्यचि विचारितां । जें अनवगाह्यमहिम्न तत्वता । जयाची वाड्मना अगोचरता । अविषयें पाहतां तज्ज्ञान ॥६॥
म्हणिजे साक्षित्वें परिच्छिन्न । जाणिजे तें विषयत्वें ज्ञान । तैसें नोहे हें अभेद पूर्ण । जाणणें ग्रासून सन्मात्र ॥७॥
ऐसें दर्शवीत होत्साता । श्रुतिसंमत जाला बोलत । जें याज्ञवाल्क्य तत्वता । प्रबोधी वनिता ब्रह्मिष्ठा ॥८॥
अवो ये गार्गि तत्व तें जाण । जें ऊध्व असे स्वर्गाहून । पृथ्वीहून खालें सधन । हे द्यावाभूमी ज्या माजी ॥९॥
जे होवोनि गेले होत । होणार ते ज्या माजी निश्चित । इत्यादि श्रुतिप्रतिपादित । अपरिमित महिमान प्रतिपादी ॥१३१०॥
तें सनंदनोक्त भाषण । विशद श्रुतीचें स्तवन । प्रबोधी नारदा नारायण । शुकभगवान म्हणे नृपा ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP