राम राम महाबाहो न जाने तव विक्रमम् । यस्यैकांशेन विधृता जगती जगतः पते ॥२६॥

राम राम आम्रेडितीं । म्हणे भो भो जगत्पति । महाबाहो तुझी ख्याति । नेणें निश्चिती मी कांहीं ॥८८॥
ज्याचिया एक्या अंशेंकरून । जगेंसहित जगती पूर्ण । धरिली तो तूं संकर्षण । पूर्णचैतन्य परमात्मा ॥८९॥
इत्यादि नम्रवचनेकरून । यमानुजेनें केलें स्तवन । प्रार्थिती झाली निजकल्याण । चरणा शरण होत्साती ॥१९०॥

परं भावं भगवतो भगवान्मामजानतीम् । मोक्तुमर्हसि विश्वात्मन्प्रपन्नां भक्तवत्सल ॥२७॥

पर म्हणिजे उत्कृष्ट भाव । जें भगवन्ता तव वैभव । मी निम्नगा नेणेंचि सर्व । यास्तव सगर्व तुज गमलें ॥९१॥
जात्या अधोगतीचें पात्र । जलवाहिनी सरितामात्र । मजवरी प्रतापें उचलणें शस्त्र । नव्हे हें चरित्र प्रभुयोग्य ॥९२॥
नेणोनि तुझी प्रतापगरिमा । शरण न झालें तव पादपद्मा । भक्तवत्सला भो बळरामा । तूं विश्वात्मा विश्वदृक् ॥९३॥
आतां तुझिया चरणकमला । शरण पातलें प्रपन्नपाळा । मम मोक्षणीं न लावीं वेळा । मोक्षणकुशळां प्रभुवर्या ॥९४॥
मम मोक्षणीं तूं समर्थ । ऐसी विनीत शरणागत । विनति ऐकूनि रेवतीकान्त । केली सनाथ तें ऐका ॥१९५॥

ततो व्यमुंचद्यमुनां याचितो भगवान्बलः । विजगाह जलं स्त्रीभिः करेणुभिरिवेभराट् ॥२८॥

यानंतरें तो यमुनेप्रति । सोडिता झाला प्रतापमूर्ति । ऐकोनि तियेची विनीत विनति । द्रवला चित्तीं बळ भगवान् ॥९६॥
तिनें प्रार्थिला बहुतां परि । तेणें द्रवला अभ्यंतरीं । यमुना सोडूनि व्रजसुंदरी । घेऊनि तीरीं प्रवेशला ॥९७॥
वस्त्ररहित बल्लवललना । यमुनेमाजी संकर्षणा - । सहित क्रीडती क्रीडा नाना । नवयौवना स्मरमूर्ति ॥९८॥
जैसे कुसुमाकरसंमव । कोमळ चलदलदुमपल्लव । भक्षितां प्रकटे मनोभव । भुलवी सर्व करिकरिणी ॥९९॥
मग ते रिघोनि अगाध ह्रदीं । क्रीडती यथेष्टाचरणविधी । तैसाचि बळराम बल्लवी मांदी । रमवी प्रभेदीं स्वैरसुखें ॥२००॥
तेहतिसाव्या अध्यायांत । रासक्रीडा कृष्णनाथ । करिता झाला तैं यमुनेंत । रमला समर्थ गोपींसीं ॥१॥
जलक्रीडा ते व्याख्यानीं । विस्तृत वदला श्रीशुकमुनि । ते येथ पुनरुक्ति जाणोनी । अल्प बोलोनि मुकुलिली ॥२॥
श्रोतीं येथ तयाचि परि । बळरामेंसी व्रजसुन्दरी । रमल्या ऐसें अभ्यंतरीं । जाणोनि पुढारीं परिसावें ॥३॥

कामं विहृत्य सलिलादुत्तीर्णायासितांबरे । भूषणानि महार्हाणि ददौ कांतिः शुभां स्रजम् ॥२९॥

जंववरी पुरे मनींचें आर्त । तंववरी यमुनासलिला आंत । रमला व्रजवनितां समवेत । रेवतीकान्त कौशल्यें ॥४॥
जळाबाहिर यमुनातीरीं । जेव्हां पातला प्रलंबारि । तये समयीं पाशधारी । वरुण प्रेरी सपर्या ॥२०५॥
कान्ति ऐसें लक्ष्मीस नांव । तिणें पूजिला तो बळराम । वरुणप्रेरित हेमललाम । वसनें उत्तमें समर्पिलीं ॥६॥
असित म्हणिजे नीळवर्णें । दिव्यपरिधानें प्रावरणें । महार्हें म्हणिजे दिव्याभरणें । दिव्य लेपनें विलेपिलीं ॥७॥
श्वेत अम्लान पंकजमयी । कंठीं माळ घातली पाहीं । श्रवणीं एक कुण्डल तेंही । पद्मरागाचें पद्माख्य ॥८॥
इये श्लोकीं कर्ता कान्ति । ऐसीच विष्णूपुराणसंमति । हरिवंशींही रामाप्रति । इन्दिरोक्ति ते ऐका ॥९॥

विष्णुपुराणोक्त - वरुणप्रहित चास्मै मालामम्लानपंकजाम् । समुद्राभे तथा वस्त्रे नीले लक्ष्मीरयच्छतेति ।
तथा च हरिवंशे बलं प्रति लक्ष्मीवाक्यम् - जातरूपमयं चैकं कुंडलं व्रजभूषणम् ।
आदिपद्मं च पद्माख्यं दिव्यं श्रवणभूशणम् । देवे मां प्रतिगृह्णीष्व पौराणीं भूषणक्रियाम् ॥ इत्यादि ।

एवमादि श्लोकसंमति । भूषणें वसनें अर्पी कान्ति । निर्दृष्ट व्याख्यान जाणोनि श्रोतीं । शङ्का चित्तीं न धरावी ॥२१०॥

वसित्वा वाससी नीले मालामामुच्य कांचनीम् । रेजे स्वलंकृतो लिप्तो माहेंद्र इव वारणः ॥३०॥

वसनें लक्ष्मीनें अर्पिलीं । तीं जलदाभें परिधान केलीं । हेमाब्जमाळा निवेदिली । कंठीं घातली बळरामें ॥११॥
केशर कस्तुरी हरिचंदन । केलें इत्यादि विलेपन । शोभता झाला तेणें करून । महेंद्रवारणपडिपाडें ॥१२॥
क्षीरोदमथनोद्भव कुञ्जर । श्वेत चौदंती बळिष्ठ थोर । मदोन्मत्त सालंकार । उपमा सधर मुनि वदला ॥१३॥
बळरामाचें ऐश्वर्य पूर्ण । यमुना न वदोनि करी कथन । कोणे परी तें व्याख्यान । कीजे श्रवण चतुरांहीं ॥१४॥

अद्यापि दृश्यते राजन्यमुनाकृष्टवर्त्मना । बलस्यानंतवीर्यस्य वीर्य सूचयतीव हि ॥३१॥

अद्यापि पाहिजे वृंदावनीं । व्रजवनितांसी सौनंदपाणि । जेथ क्रीडला तये स्थानीं । वक्रवाहिनी यमानुजा ॥२१५॥
लाङ्गलाग्रें आकर्षिली । तेणें मार्गें जळाची चाली । संकर्षणाची कीर्ति पहिली । प्रकट केली जातसे ॥१६॥
अद्यापि आकृष्टमार्ग यमुना । प्रकट दिसतसे सर्वां जनां । बळरामाची यशःशंसना । नदी न वदोनी करीतसे ॥१७॥
अनंतवीर्य जो बळभद्र । ज्याच्या बळाचा नकळे पार । यमुना अद्यापि राहोनि वक्र । सुचवी साचार तद्वीर्य ॥१८॥
वीर्य सूचिती याचि परि । वक्रप्रवाह अद्यापिवरी । इतुकी बोलूनि मुनिवैखरी । उपसंहरी इतिहास ॥१९॥

एवं सर्वा निशा याता एकेव रमतो व्रजे । रामस्याक्षिप्तचित्तस्य माधुर्यैर्व्रजयोषिताम् ॥३२॥

एवं म्हणिजे याचि परि । दो मासांच्या सर्व शर्वरी । एके रात्रीचिये परि । रतिरसभरीं क्रमल्या पैं ॥२२०॥
माधुर्य म्हणिजे परमरुचिर । चाटुचटुल मन्मथपर । व्रजवनितांचे विलास प्रचुर । क्षिप्तान्तर बळ तेणें ॥२१॥
व्रजवधूंच्या विलासयोगें । मोहित होत्साता अनुरागें । स्थळजळक्रीडेच्या प्रसंगें । रमता झाला बहुरजनी ॥२२॥
संकर्षणाच्या तिया निशा । गमल्या एकेचि रजणीऐशा । हें तुज कथिलें कुरुनरेशा । जेणें दोषा क्षय होय ॥२३॥
मथुरामाहात्म्यामाझारीं । गोवर्धनाचे यात्रान्तरीं । वर्णिलीं तीं परिसिजे चतुरीं । अघसंहारी श्रवणें जीं ॥२४॥
गोवर्धनाची प्रदक्षिणा । वर्णितां कथिलें तीर्थें नाना । तेथ संकर्षणाख्यतीर्थाख्याना । कीजे श्रवणा संक्षेपें ॥२२५॥
द्वारकेहूनि संकर्षण । नंदयशोदाप्रमुखजन । आला पहावयालागून । स्नेहाळ पूर्ण होत्साता ॥२६॥
तेथ गोपींच्या रतिरसवार्ता । परिसतां वश झाला मन्मथा । स्वैर क्रीडला ते हे कथा । कथिली तत्त्वता मुनिवर्यें ॥२७॥
कृष्णक्रीडा ऐकिली श्रोत्रें । स्वयें तैसींच स्मरचरित्रें । क्रीडतां श्वित्री झालीं गात्रें । एनससूत्रें आकळिला ॥२८॥
शरीर झालें गलितकुष्ठी । रामें देखोनि आपुले दृष्टी । खेद करूनियां होतसे कष्टी । म्हणे ये सृष्टीं न वसें मी ॥२९॥
पश्चात्तापें आपणा दूषी । म्हणे केवळ मी कल्मषराशि । ऐसिये अवस्थेमाजी त्यासी । स्वयें देवर्षि भेटला ॥२३०॥
तेणें जाणूनि त्याची स्थिति । प्रबोधिली अधनिवृत्ति । गोवर्धनाचे यात्रापथीं । केला तीर्थीं सुस्नात ॥३१॥
कथिलें कृष्णाचें वैभव । आमें कला कृष्णस्तव । स्नानमात्रें सर्व अवयव । झाले दिव्य रामाचे ॥३२॥
तेंचि संकर्षणाख्य तीर्थ । गोवर्धनपथीं विख्यात । स्नानें पानें दोषां अंत । करी समर्थ मुनिवरें ॥३३॥
मातृगमन सुरापान । सुवर्नस्तेय ब्रह्महनन । यांच्या संसर्गें महाएन । पांचवें जाण बोलिलें ॥३४॥
एवं पंचमहामुख्यें । या वेगळीं उपपातकें । सांसर्गिंकें आर्द्रें शुष्कें । हरती सकळिकें तत्तीर्थीं ॥२३५॥
मथुरामाहत्म्यींचा इतिहास । इतुका कथिला श्रोतयांस । काय कारण या कथनास । तेंही अशेष अवधारा ॥३६॥
पूर्णब्रह्म रामकृष्ण । म्हणतां रामें यथेष्टाचरण । केलें असतां दोषदर्शन । झालें श्रवण इतिहासीं ॥३७॥
ते हे श्रोतयां सूचना केली । जे संकर्षणा हे अवस्था झाली । तेथ मानवें भांबावलीं । केंवि तरलीं जातील ॥३८॥
भगवन्ताचें क्रियाचरण । करूं म्हणती जे जे जन । त्यांसी यातना होती कठिण । इतुकें कारण कथनाचें ॥३९॥
एवं श्रेष्ठीं आज्ञापिलें । तें लक्षूनि वर्तती भलें । वांचूनि त्यांचें अनुष्ठिलें । स्वयें केलें नवजाये ॥२४०॥
एवं श्रीमद्भागवता । अठरा सहस्र वाखाणितां । दशमस्कंधामाजी कथा । कौरवनाथा शुक वदला ॥४१॥
प्रतिष्ठानीं चिद्ब्रह्ममठीं । एकनाथ साम्राज्यपीठीं । चिदानंदें स्वानंदलुटी । गोविन्दगोष्ठीमय केली ॥४२॥
विरक्त दयार्णव तेथ क्षुधित । तद्रसपानें झाला तृप्त । पुढें श्रोतयां श्रवणपथ । दावी अनार्त व्हावया ॥४३॥
मातृगमनादि पातकें । श्रवणें निरसिती कौतुकें । अर्थ विवरितां कैवल्यसुखें । लाहती स्वमुखें जे पढती ॥४४॥
पांसष्ठावा संपला येथ । पुढिले कथेचा वृत्तान्त । कारुषें द्वारके धाडिला दूत । नृपातें मात मुनि सांगे ॥२४५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां बलदेवविजययमुनाकर्षणं नाम पंचषष्टितमोऽध्यायः ॥६५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३२॥ ओवी संख्या ॥२४५॥ एवं संख्या ॥२७७॥ ( पांसष्टावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३०७६४ )

पांसष्टावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP