मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६२ वा| श्लोक २२ ते २५ अध्याय ६२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २१ श्लोक २२ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ अध्याय ६२ वा - श्लोक २२ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २२ ते २५ Translation - भाषांतर चित्रलेखा तमाज्ञाय पौत्रं कृष्णस्य योगिनी । ययौ विहायसा राजन्द्वारकां कृष्णपालिताम् ॥२२॥परमयोगिनी चित्रलेखा । समस्त कृत्य आणूनि लेखा । पुढें धरिला जो आवांका । तोही ठाउका करीतसे ॥९१॥श्रीकृष्णाचें पौत्ररत्न । अंतःकरणीं निर्धारून । त्यासी आणावयालागून । तत्काळ गमन आदरिलें ॥९२॥हृदयीं चिंतूनि शिवभवानी । सिद्धपादुका लेइली चरणीं । गमनमार्गा अवलंबूनी । द्वारकाभुवनीं प्रवेशली ॥९३॥कृष्ण पाळी जियेप्रति । सुरनरेंद्रां दुर्गम द्वारावती । रक्षकांचीं गुल्में भोंवती । दुर्गम भिंती दुर्गाच्या ॥९४॥निमेषामाजी कोटि फेरे । सुदर्शनाची घरटी फिरे । रिघों न शके पारिकें वारें । केंवि संचरे ते ठायीं ॥१९५॥योगिनी ऐशिया पदेंकरूनी । रहस्य वदला बादरायणि । हृदयीं चिंतूनि चक्रपाणि । चक्रा नमूनि प्रवेशली ॥९६॥करावया दैत्यसंहार । द्वारके अवतरला श्रीकृष्णवीर । तत्कार्यार्थ उद्योगपर । जाणोनि चक्र न निवारी ॥९७॥हरिवंशीं चित्रलेखेसी । नारद भेदला पुरप्रवेशीं । तेणें उपदेशिली तामसी । कार्यसिद्धीसी साधावया ॥९८॥गगनमार्गें द्वारकेआंत । उतरती झाली खगेन्द्रवत । जिये सदनीं रोचनाकान्त । स्वानंदभरित नांदतसे ॥९९॥त्रिदिनव्रताचा जागर । तेणें उजगरा होता फार । तथापि कीर्तनीं प्रेमादर । बैसला सादर सत्सदसीं ॥२००॥चित्रलेखा विवरी मनीं । भेटतां नये ऐशिये क्षणीं । गोष्टी पडतां इतरां कर्णीं । कार्यहानि हों पाहें ॥१॥मग खेचरी योगसिद्धि । जपूनि राहिली गुप्तविधि । कीर्तनाची पुरे अवधि । तंववरी बुद्धि दृढ केली ॥२॥संपलिया कथाप्रसंग । सदना गेला वैष्णववर्ग । अनिरुद्धासी निद्रायोग । मंचकीं सवेग पहुडला ॥३॥दासदासींतें दिधली आज्ञा । निद्राभर जाकळी नयनां । मंचकीं निहूल करितां शयना । भेटली ललना ते समयीं ॥४॥जोहारूनि चरणाम्बुजा । सर्व वृत्तान्त कथिला वोजा । उषानाम्नी बाणात्मजा । श्रीपदकंजा अनुसरली ॥२०५॥काली द्वादशीचिये रजनीं । तुम्ही संचार करूनि स्वप्नीं । अनूढा गूढ कन्यासदनीं । सुखशयनीं अनुभविली ॥६॥तिणें हृदयीं निर्धार केला । स्वप्नीं मजसीं नरवर रमला । त्यावीण न वरीं आणिकाला । त्यजीन प्राणांला तद्विरह ॥७॥ ऐसा जाणोनि दृढ निर्धार । म्यां ठाकिलें द्वारकापुर । स्वामींस कथिला समाचार । आतां सत्वर चलावें ॥८॥तुम्हांवांचून एकली सदना । मज गेलिया टाकील प्राणां । तिचिया लावण्यनवयौवना । साफल्य जाणा तुमचेंनि ॥९॥ऐसें ऐकोनि रोचनापति । द्वादशीची स्मरूनि राती । स्वप्नीं अनुभविली जे युवति । पाहे प्रतीतिमाजिवडी ॥२१०॥तथापि म्हणे हे राक्षसी माया । येथ पातली कवण कार्या । कुत्सित मार्गें कामचर्या । सहसा आर्या योग्य नोहे ॥११॥मग म्हणे वो चातुर्यखाणी । बळ प्रद्युम्न चक्रपाणि । वृत्तान्त घालूनि त्यांचे कर्णीं । करूं हे करणी त्याउपरी ॥१२॥अनिरुद्धवचन ऐकूनि ऐसें । चित्रलेखा निजमानसें । म्हणे विलंबें कार्य नासे । पुढती नुमसे प्रतिवचन ॥१३॥मग जपूनि तामसी विद्या । तत्काळ मोहिलें अनिरुद्धा । तेथूनि निघती झाली सद्या । नरवरवंद्या तें ऐक ॥१४॥तत्र सुप्तं समर्यंके प्राद्युम्निं योगमास्थिता । गृहीत्वा शोणितपुरं सख्यै प्रियमदर्शयत् ॥२३॥तामसी योगमाया मोहिनी । तत्काळ मोहिला तो प्राद्युम्नि । मुकुलितमुद्रा पडिली नयनीं । निवात शयनीं पहुडला ॥२१५॥लेप्यलेखें विगतचेष्टा । तैसी निश्चळ लागली काष्ठा । नमूनि पार्वतीनीलकंठां । मग मंचक मुकुटीं वाहियला ॥१६॥अनिरुद्धेंसी मंचक शिरीं । घेऊनि निघाली खेचरी । सवेग नेऊनि शोणतपुरीं । उषामंदिरीं उतरिला ॥१७॥प्राणसखये उषेकारणें । म्हणे स्वकान्त ओळखीं नयनें । येरी आनंदभरित मनें । सस्मितवदनें उठिली ॥१८॥मुखावरील काढूनि पदर । सादर पाहे नरसुन्दर । नवयौवन ठाणठकार । केला निर्धार रमणाचा ॥१९॥चित्रलेखेतें म्हणे साजणी । तूं निजांची मायबहिणी । प्रत्यक्ष तव रूपें भवानी । मज निर्वाणीं पावली ॥१२०॥तुझिया उपकारा उत्तीर्ण । व्हावया पदार्थ न दिसे आन । तनुमनप्राणें होऊनि शरण । धरिले चरण सद्भावें ॥२१॥येरी उचलोनि दोहीं करीं । आलिङ्गिली बाणकुमरी । म्हणे जैसी शंकरगौरी । तेंवि शेजारीं वर भोगीं ॥२२॥आतां होईल या जागर । साधीं परिचर्या सादर । सलज्ज होऊनि न राहें दूर । होईं तत्पर सेवेसी ॥२३॥प्रमदाशरीर प्रमादकर । मदिरेहूनि मादक फार । मदिरा मोही अष्ट प्रहर । शत संवत्सर प्रमदा पैं ॥२४॥मादकपणाची हेचि गरिमा । विनयभावें धरिजे प्रेमा । रंगता परिचर्येच्या कामा । कान्त संगमा अभिलाषी ॥२२५॥सस्मित सलज्ज मितभाषण । व्यंकटकटाक्षनिरीक्षण । सस्निग्ध करितां शुश्रूषण । पुरुष द्रवोन वश होय ॥२६॥सहसा न कीजे उतावळी । असंलग्न रहावें जवळी । सकाम पुरुष प्रेमें कवळी । अल्प करतळीं वारिजे त्या ॥२७॥निकरें न झाडावा कर । हास्यें वाढविजे आदर । तेणें पुरुष स्मरातुर । होय तत्पर क्रीडेसी ॥२८॥नवसंगमीं तनुइंगितें । सलज्ज संकोच अवयवांतें । करितां पुरुष आसक्तचित्तें । होय वनितेतें वशवर्ती ॥२९॥इत्यादि ललनालाघवयुक्ति । चित्रलेखेनें उषेप्रति । बोधूनि सदना झाली जाती । तामसी शक्ति निवारूनी ॥२३०॥वारूनि मोहिनी तामसी विद्या । चित्रलेखा निघाली सद्या । कपाट देऊनियां अनिरुद्धा । सेवी प्रमदा सप्रेमें ॥३१॥सा च त्म सुन्दरवरं विलोक्य मुदितानता । दुष्प्रेक्ष्ये स्वगृहे पुंभी रेमे प्राद्युम्निना समम् ॥२४॥चित्रलेखा गेलियावरी । उषा निःशंक अभ्यंतरीं । प्रावरण सारूनि पाहे नेत्रीं । लोण उतरीं दृग्दोषा ॥३२॥पाहोनि नवयौवन लावण्य । आनंदभरित अंतःकरण । सरळ गौरीचें वरदान । त्रिजगीं धन्य मी आतां ॥३३॥तंव झाला प्रातःकाळ । जेंगटगजरें सूचिली वेळ । भैरव बीभास भूपाळ । गाती कुशळ गान्धर्वीं ॥३४॥वैदिक करिती अध्ययनें । छात्र तन्मुखें करिती पठनें । साग्निकीं करूनि संध्यास्नानें । प्रादुषीकरणें आदरिलीं ॥२३५॥ऐसा होतां प्रभातगजर । झाला अनिरुद्धा जागर । मुखावरील सारूनि पदर । पाहे सादर चहूंकडे ॥३६॥तंव ते समीप देखिली उषा । जिचिया लावण्यशृंगाररसा । प्राशितां तृप्ति नेत्रसारसां । नोहे सहसा औत्सुक्यें ॥३७॥म्हणे स्वप्नीं जे देखिली । ते हे वाटे मन्मथपुतळी । निद्राकाळीं वार्ता कथिली । तेही वेल्हाळी येथ नसे ॥३८॥नोहे आपुलें निद्रागार । भासे विचित्र रत्नमंदिर । स्वप्न किंवा हा जागर । करी विचार हृत्कमळीं ॥३९॥मुखें करूनि नामस्मरण । पुढती घेऊनियां प्रावरण । मंचकीं निवान्त केलें शयन । येरी उद्विग्न हृत्कमळीं ॥२४०॥शिकवूनि गेली चित्रलेखा । ते शिकवण स्मरूनि उषा । सवेग वळघूनिया मंचका । करी शुश्रूषा चरणांची ॥४१॥म्हणे सरली सर्व शर्वरी । प्राची रंगली भास्करकरीं । निद्रा कायसी ये अवसरीं । आह्निकाचारीं प्रवर्तिजे ॥४२॥कनककलशीं उष्ण पाणी । गंडूषपात्र ठेविलें धरणी । उठोनि बैसा मंचकासनीं । चरण क्षाळीन नावेक ॥४३॥क्रमुकाङ्गार वज्रज्योती । शिवा स्फटिका मरीचि निगुती । चूर्ण घर्षण करूनि दंतीं । मुख क्षाळीजे स्वामिया ॥४४॥इत्यादिवचनीं प्रबोधी उषा । तंव ते पातली चित्रलेखा । म्हणे स्वामिया उघडूनि मुखा । सादर विलोका भुवनातें ॥२४५॥ऐकूनि चित्रलेखेचें वचन । अनिरुद्ध पाहे उघडूनि नयन । म्हणे रात्रीं केलें शयन । तें मम सदन हें नोहे ॥४६॥शयनकाळीं त्वां वार्ता कथिली । त्यावरी निद्रा मज लागली । जागृत होतां इये काळीं । अपर वेल्हाळी हे कोण ॥४७॥येरी म्हणे जे कथिली उषा । स्वप्नामाजी नराधीशा । तुम्हीं अनुभविली डोळसा । ते हे राजसा बाणसुता ॥४८॥तुम्हांवेगळा न वरीं कोण । ऐसा उषेचा दृढ निर्धार । तुमच्या विरहें निज शरीर । झाली तत्पर त्यजावया ॥४९॥जन्मापासूनि हे मम सखी । म्हणूनि करुणा आली निकी । ईचिया दुःकें होवोनि दुःखी । मग म्यां लिहिलें द्वारकाभुवन ॥२५०॥लिहूनि दाविलें म्यां त्रिभुवन । त्यामाजी नसे पुरुषरत्न । मग म्यां लिहिलें द्वारकाभुवन । तेथ तुम्हांलागोन ओळखिलें ॥५१॥तेव्हां निघालें गगनमार्गें । द्वारकापुर ठाकिलें वेगें । वृत्तान्त तुमचें मानस नेघे । निद्राप्रसंगें जाकळितां ॥५२॥तुम्हांसी मंचकीं लागली निद्रा । मग म्यां आणिलें शोणितपुरा । स्वप्नीं अनुभविली सुन्दरा । ते गृहिणी करा करग्रहणें ॥५३॥येरु म्हणे हें स्त्रीचरित्र । कायसा विवाह कोणतें सूत्र । येरी म्हणे यथाशास्त्र । गंधर्वतंत्र ये लोकीं ॥५४॥येरें स्मरूनि श्रीकृष्णचरण । हृदयीं चिंतिला संकर्षण । पिता प्रद्युम्न आठवून । म्हणे हे गहन विधिरेखा ॥२५५॥गंधर्वांचा तुंबराचार्य । चित्रलेखा तो आणूनि आर्य । त्याच्या हस्तें विवाहकार्य । गान्धर्वविधीनें संपविलें ॥५६॥अभ्यंग हरिद्रा उद्वर्तनें । दिव्याभरणें दिव्य वसनें । अन्नपानें विधिविधानें । न लगे सांगणें याउपरी ॥५७॥ऐसी अनिरुद्धें पर्णिली उषा । गौरीवरें येरी पुरुषा । वरूनि पावली संतोषा । कुरुनरेशा शुक वदला ॥५८॥म्हणाल मूळीं हा विस्तार नाहीं । तरी पुराणें देती गाही । धर्मस्थापक शेषशायी । अविधि गेहीं वर्तेना ॥५९॥अनिरुद्ध तों तयाचा पौत्र । अविधि नाचरे अणुमात्र । जारधर्माचें कलत्र । सदनीं अशास्त्र न ठेवी ॥२६०॥पातिव्रत्याचरणें उषा । स्वप्नीं लाधली जया पुरुषा । त्यावीण आन न वरी सहसा । हा भरंवसा जाणोनी ॥६१॥अनिरुद्धें ते निज नोवरी । पर्णिली गान्धर्वविधानसूत्रीं । सहसा खोडीं न काढिजे चतुरीं । शास्त्रद्रष्टारीं सर्वज्ञीं ॥६२॥विहित विधान करूनि पूर्ण । ओहरां देऊनि आशीर्वचन । तुम्बुरु चित्रलेखा पुसून । जातीं झालीं निज भुवना ॥६३॥कोण्हा नकळत हा वृत्तान्त । चित्रलेखेनें साधिलें कृत्य । गौरीवरें लाहोनि कांत । स्वानंदभरित रमे उषा ॥६४॥सप्तखणाच्या दामोदरीं । उषा कान्तेंसी क्रीडा करी । राखणाइतांची भंवरी । अष्टौ प्रहरीं उदायुध ॥२६५॥रिघों न शके पारकें वारें । तेथें कैं पाहों शकेल दुसरें । ऐसिये सदनीं आनंदगजरें । उषा निजवरेंसह क्रीडे ॥६६॥जैसीं क्रीडती शङ्करगौरी । तैसीच उषा सुखसेजारी । स्मरपुत्रेंसी क्रीडा करी । सप्रेमगजरीं भयरहित ॥६७॥तये क्रीडेचें व्याख्यान । समासें कीजेल निरूपण । तें तूं राया करी श्रवण । सावधान होऊनियां ॥६८॥परार्ध्यवासः स्रग्गंधधूपदीपासनादिभिः । पानभोजनभक्ष्यैश्च वाक्यैः शुश्रूषयार्चितः ॥२५॥चित्रलेखेनें कथिली शिक्षा । तेचि उषेनें घेऊनि दीक्षा । सेवाविषयीं परम दक्षां । आणूनि लक्षा परिचर्या ॥६९॥नित्य नूतनें वसनाभरणें । अर्पी अनिरुद्धाकारणें । अभ्यंगपूर्वक देऊनि स्नानें । दिव्य लेपनें समर्पी ॥२७०॥सुमनहार घाली कंठीं । मलयजगंधें देऊनि उटी । दिव्य अवतंस खोवूनि मुकुटीं । दावी गोरटी मुकुरातें ॥७१॥त्यावरी उधळी परिमळरोळा । ऊर्ध्व कस्तुरी रेखूनि भाळा । वैष्णवदशाङ्गधूपपरिमळा । दीपसोज्वळा चंद्रमय ॥७२॥चंद्र नाम कर्पूराप्रती । त्या उजळूनि कर्पूरज्योति । ओंवाळूनि सप्रेमभक्ति । अर्पी निगुतीं दिव्यान्नें ॥७३॥षड्रसपक्कान्नांच्या परी । संधितें व्यंजनें कोशिंबिरी । कान्तशेषाचें भोजन करी । प्रीति भारी परस्परें ॥७४॥उष्णोदकें आंचवणें । परिमळद्रव्यें करोद्वर्तनें । मुख परिमार्जूनि सूक्ष्मवसनें । ताम्बूलविडिया देतसे ॥२७५॥आसन घालूनि भद्रपीठीं । उभी राहूनि कान्तनिकटीं । मृदुमंजुळ सांगे गोठी । सलज्ज गोरटी स्मितवक्त्रें ॥७६॥ताम्बूल घेऊनियां करतळीं । विडिया देतां मुख न्याहाळी । म्हणे क्रीडेची नव्हाळी । रुचे हृत्कमळीं कोणते ॥७७॥सारीपाट मांडूं पुढां । कीं झाडूं मंचकीं पासोडा । कीं सप्तस्वरीं गायनचाडा । आणूं रोकडा मृदंग ॥७८॥रुद्रवल्लकीं समानतंती । सप्तस्वरांची जेथ उत्पत्ति । कोणती क्रीडा रुचे चित्तीं । ते निश्चिती सांगावी ॥७९॥कामोद्दीपकें दिव्य पानें । क्षौद्रें भैरेयें वारुणें । अर्पूनि वल्लभाकारणें । तदुचित वर्तनें शुभ द्रव्यें ॥२८०॥द्राक्षें खर्जूरें अच्युत कदळें । शर्कराविकृतें दिव्यें बहळें । जायपत्री जातीफळें । त्रयोदशमेळें ताम्बूल ॥८१॥सुमनशेजे पहुडल्या कान्त । तनुशुश्रूषा करी निवान्त । कान्तें कंठीं घालितां हात । क्रीडे यथोचित सुखशयनीं ॥८२॥म्हणाल एकली कान्ता निकटीं । द्रव्यानयनादि पाकराहटी । केव्हां करी हा संशय पोटीं । तरी ऐका गोष्टी तद्विषयीं ॥८३॥कैलासाचिये परिसरीं । शिवें रक्षिजे शोणितपुरी । चिंतामनि घरोघरीं । सर्व सामग्रीं तज्जनिता ॥८४॥कल्पतरूंचिया वाटिका । कामधेनूंचीं दुभतीं देखा । महासिद्धि परिचारिका । त्र्यंबकाम्बिकाप्रसादें ॥२८५॥एवं इत्यादि सुखसुरवाडें । उषावालभसप्रेमचाडें । नवपंकजीं भ्रमर कोंडे । तेणें पाडें अनिरुद्ध ॥८६॥सप्रेम अवंचक अनन्यभाव । देखतां पाषाणीं प्रकटे देव । मां जो प्रत्यक्ष सजीव सावयव । न धरी द्रव कां हृत्कमळीं ॥८७॥अनुकूळ सर्वस्वसेवना । विशेष लावण्यललामललना । क्रीडाकौतुकें मोहकचिह्ना । वर्तना यूना वश न करी ॥८८॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP