मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४२ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ४२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३८ अध्याय ४२ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - अथ व्रजन्राजपथेन माधवः स्त्रियं ग्रहीतांगविलेपभाजनाम् । विलोक्य कुब्जां युवतिं वराननां प्रपच्छ यान्तीं प्रहसन्रसप्रदः ॥१॥ज्याचिये कृपालेशास्तव । योगसिद्धि लाधे सर्व । तो वशिष्ठान्वयसंभव । योगिराव शुक म्हणे ॥१७॥कौरवान्वयसौभाग्यतिलका । ऐकें परीक्षिति कलिभंजका । माळाकारा तंतुवायका । वरविवेकानंतरें ॥१८॥जो कां मधुवंशसंभव । यालागीं नामें तो माधव । जातां राजपथें सवल्लव । स्त्री अपूर्व देखिली ॥१९॥जिची त्रिवक्र अंगयष्टि । पूर्णतारुण्याची पुष्टि । फुल्लारपंकजवदना सृष्टि । अति गोमटी वरानना ॥२०॥केशरकस्तूरीश्रीगन्ध । दिव्यसुमनामोद विविध । अंगविलेपनें नानाविध । पात्रें विशुद्ध करतळीं ॥२१॥येतां देखोनि तियेप्रति । हांसत होत्साता श्रीपति । रसप्रद म्हणिजे सुखोत्पत्ति । भोगी त्रिजगती ज्याचेनि ॥२२॥पुसता झाला तो श्रीहरि । तें व्याख्यान परिसिजे चतुरीं । कैसी कृष्णोक्ति साजिरी । शुकवैखरी वाखाणी ॥२३॥श्रीभगवानुवाच - का त्वं वरोर्वेतदुहानुलेपनं कस्यांगने वा कथयस्व साधु नः ।देहावयोरंगविलेपमुत्तमं श्रेयस्ततस्ते नचिराद्भविष्यति ॥२॥उपहासपूर्वक श्रीरंगें । तये संबोधिलें प्रसंगें । अवो अंगने सुजंघे । कोण तूं गे कोणाची ॥२४॥म्हणसी उपहासपूर्वक कैसें । तेंही कथिजेल राया परिसें । अंधे स्त्रियेलागीं जैसें । सुलोचना संबोधन ॥२५॥अमंगळासि मंगळ नाम । तेंवि त्रिवक्रेसि पूर्णकाम । अंगने सुजंघे ऐसीं नर्म - । वाक्यें सप्रेम संबोधी ॥२६॥उपहासगर्भित संबोधन । तयेसि पुसे जनार्दन । तूं कोणाचें वनितारत्न । हें अनुलेपन कोणासी ॥२७॥उह ऐसिया निपातें । वितर्क करूनि भ्रूसंकेतें । प्रश्न केला कमलाकान्ते । कीं साधुवाक्यातें कथी आम्हां ॥२८॥आम्ही रामकृष्ण बंधु । आमुचे ठायीं भावना शुद्ध । धरूनि विलेपना जेंवि विविध । उत्तम सुगंध विलेपीं ॥२९॥कांति सुगौर सांवळिया । जाणोनि सुंदर देई उटिया । सद्यचि सफळ होती क्रिया । भावें केलिया सत्सेवा ॥३०॥आम्हां देसी तनुलेपनें । तेणें कल्याण तुजकारणें । सद्य होईल ऐसें जाणें । इयें ऐकोनि वचनें येरी वदे ॥३१॥सैरंध्र्युवाच - दास्यस्म्यहं सुन्दरवर्य संमता त्रिवक्रनामा ह्यनुलेपकर्मणि । मद्भावितं भोजपतेरतिप्रियं विना युवां कोऽन्यतमस्तदर्हति ॥३॥सुन्दरवर्य हें संबोधन । येणें कृष्णाचें सम्मुखीकरण । आनन्दभरित अंतःकरण । हरिकृत प्रश्न निरोपी ॥३२॥वक्षःस्थळग्रीवाकटी । ऐसी त्रिवक्र अंगयष्टि । यथार्थनाम मी कंसचेटी । म्हणती वाक्पुटीं त्रिवक्रा ॥३३॥अनुलेपसाधनक्रियेच्या ठायीं । माझें कौशल्य कंसाहृदयीं । मानलें तेणें मज यें कार्यीं । आज्ञापिलें सप्रेमें ॥३४॥अंगविलेप विविधा रीती । अर्पीं कंसाच्या वनितांप्रति । कंस सम्मानी मजप्रति । मी आवडती वर सर्वां ॥३५॥माझे झातींचें विलेपन । कंसासि अत्यन्त प्रियतम मान्य । तें द्यावया आणिक कोण । तुम्हां वांचोन योग्य असे ॥३६॥तुम्ही त्रैलोक्यसुंदर । तुम्हांचि योग्य हे उपचार । किंकरींमाजी ममाधिकार । प्रीतिपात्र स्वामीचें ॥३७॥ऐसी त्रिवक्रा मृदुभाषिणी । कृष्णाप्रति वशवर्तिनी । किमर्थ झाली हे शंका मनीं । तरी सज्जनीं परिसावें ॥३८॥रूपपेशलमाधुर्यहसितालापवीक्षितैः । धर्षितात्मा ददौ सांद्रमुभयोरनुलेपनम् ॥४॥भगवंताचें सुन्दरपण । सर्वावयवीं सुष्ठु लावण्य । जें कां लक्ष्मीसी भुलवण । तेथ त्रिवक्रानयन गुंतले ॥३९॥नेत्रीं पाहतां अक्षरपंक्ति । विवरणें बुद्धि विगुंते । अर्थीं । तेंवि लक्षितां अंगकांति । रुचली चित्तीं कोमलता ॥४०॥पेशल म्हणिजे सुकुमारता । श्रीकृष्णाची सादर पाहतां । तेणें मूर्च्छना आली चित्ता । देहअहंता विरमली ॥४१॥नेत्रकटाक्ष वदनीं हास्य । वाङ्माधुर्य रसविशेष । आलाप म्हणिजे स्वरसारस्य । इहीं मानस हिरतलें ॥४२॥इत्यादि भगवल्लक्षणें पाहतां । त्रिवक्रा झाली मोहितचित्ता । सघनविलेपन चर्चितां । बंधु उभयतां तोषविले ॥४३॥मलयज चंदन घन चर्चून । कैसे शोभवी दोघे जन । तें तूं राया करीं श्रवण । सभाग्यपण कुब्जेचें ॥४४॥ततस्तावङ्गरागेण स्ववर्णेतरशोभिना । संप्राप्तपरभागेन शुशुभातेऽनुरंजितौ ॥५॥यानंतरें रामकृष्ण । श्वेत श्याम ज्यांचे वर्ण । त्यांहूनि केशरादि रंग भिन्न । तिहीं करून चर्चिले ॥४५॥नाभीपासूनि उपरिभाग । केशरादिकीं चर्चितां सांग । शोभते झाले लावण्यसुभम । रंगें सुरंग उभयतां ॥४६॥स्वमुखें बोलिला भगवान । आम्हांस देईं विलेपन । तेणें शीघ्र तव कल्याण । हें वाक्य ऐकोन अनुसरली ॥४७॥उभयतांसि अंगराग । तिनें चर्चिले यथासांग । तेणें तुष्टला श्रीरंग । वरप्रसंग अवधारा ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : May 07, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP