श्रीमद्गोविंदात्मने नमः ।
( मुंगीप्रतींत अध्यायाची सुरुवात पुढीलप्रमाणें केली आहे. श्रीगणेशाय नमः । श्रीमन्मंगलानि भवंतु । निर्विघ्नमस्तु ॥ )
कल्पनाकलुषकलुषात्मकां । आणूनि गोमतीशुद्धतटाका । नमो निर्मळ प्रक्षाळका । निष्कलंका गोविंदा ॥१॥
वास्तव निजात्मक विस्मृति । ते बोलिजे आवरणशक्ति । प्रणवरूपें स्फुरणोत्पत्ति । विक्षेपशक्तिकल्पना ॥२॥
जैसें विशुद्ध निर्मळ भिंग । गगनगर्भासारिखें आंग । त्यासि मागें बैसतां रंग । पुढें सवेग प्रतिबिंबे ॥३॥
तेंवि अभेदनिजात्मविसरें । प्रपंचोन्मुख स्मरण पसरे । तो विक्षेप विश्वाकारें । प्रसवे विकारें बहु भेदां ॥४॥
तया भेदांचिये कुशी । सृष्टिपरंपरा जैशी तैसी । धाता यथापूर्व ऐसी । उत्तरोत्तर वेदोक्ति ॥५॥
पूर्वदिवशीं निद्रित जाला । अपर दिवशीं तो चेइला । जेंवि तो विश्वाभास पहिला । करी गलबला मानूनी ॥६॥
जरी तो यथापूर्वचि असता । तरी काळव्यत्यय कैसेनि होता । बाल्य तारुण्य वृद्धता । क्षय पावता कैसेनी ॥७॥
कल्पना मात्र पहिली असे । येर क्षणभंगुर आभासे । नेणोनि अविद्याभ्रमें पिसे । जैसें तैसें भाविती ॥८॥
सुषुप्तिगर्भीं देखिजे स्वप्न । करणसमुचया कल्पी मन । यथापूर्व कीं भिन्न भिन्न । कां नुमजून न विचारा ॥९॥
वर्षासारिखें गमे वर्ष । दिवसाऐसा वाटे दिवस । तोष रोष वृद्धि ह्रास । हा विशेष कां नुमजे ॥१०॥
एवं मृगजलाचे डोहीं । गाधागाधा कोणे ठायीं । पारावार ना प्रवाहीं । ओघीं नाहीं मर्यादा ॥११॥
जितुका फेरा अधिक भंवे । तितुकी भवंडी आंगीं रेवे । तेणें चराचर आघवें वाटे लाघवें भ्रमशील ॥१२॥
तैसें अनादि अवसान । अनेककल्प कल्पनाभ्रमण । करितां भ्रमाक्त जीवचैतन्य । झालें मलिन तत्कुलुषें ॥१३॥
तिया कल्पनाकलुषात्मकां । देखूनि कारुण्यें देशिका । कळवळूनि सद्विवेका । प्रबोध निका वोपिसी ॥१४॥
विषयोन्मुख गोमतीतीर । मलिन मृदांशकर्दमाकार । लंघूनि नेसी त्यां परपार । विशुद्ध उत्तरतीरातें ॥१५॥
तेथ क्षाळूनि कल्पनामळ । प्रत्यगात्मत्वें निर्मळ । दवडूनि वाच्यांशविटाळ । लक्ष्यांश अमळ निवडिसी ॥१६॥
यथापूर्व जैसी तैसी । पूर्वशुद्धता समरसीं । असिपदीं ऐक्य करिसी । पुन्हा लेपासि न पवती ॥१७॥
ऐसा नादि मळक्षाळक । निर्विकारी निष्कलंक । तो तूं पूर्णत्वें देशिक । गोज्ञापक गोविंद ॥१८॥
तुझा येसणा कृतोपकार । उमजूं न शकती विधिहरशक्र । तेथ मानवी किमात्र । तव गुणस्तोत्र वदों शके ॥१९॥
परंतु चंद्राच्या संमुखपणें । चंद्रकांताचें पाझरणें । तेंवि हें स्तुतीचें बोलणें । तव प्रेरणे पासाव ॥२०॥
येर्‍हवीं गगना कायसी शिडी । सिंधुलंघना बाहुप्रौढी । काळ जिंकूनि पैलथडी । उभवी गुढी कैं कोण ॥२१॥
यास्तव लागह्वें गौरवें । तुझें रहस्य तुजचि ठावें । सप्रेमभजनें गौरवावें । येसणे हाम्वे वळणे जों ॥२२॥
ऐसा जाणोनि अभिप्राव । दैविकी कृपादायपसाव । होतां प्रज्ञेचे अवयव । सर्व स्वयमेव टवटविले ॥२३॥
आतां श्रीमद्भागवतीं । दशमस्कंधीं सव्विसाव्यांतीं । पशुपीं नंदमुखें गर्गोक्ति । ऐकोनि श्रीपति जो स्तविला ॥२४॥
त्या कृष्णाचा विजयप्रभव । देखूनि सुरस्रभिवासव । येऊनि अभिषेचिती स्वयमेव । तो महोत्सव अवधारा ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP