निर्यात त्यजत त्रासं गोपाः सस्त्रीधनार्भकाः । उपारतं वातवर्षं व्युदप्रायाश्च निम्नगाः ॥२६॥

जो कां गोवर्धनाचा धर्ता । होऊनि निर्माण केली गर्ता । त्रिदशपतीचा गर्वहर्ता । कमलाभर्ता भगवान् ॥१२॥
तो श्रीकृष्ण म्हणे गोपां । शक्रें वारिलें दुर्वृष्टि आपा । दुष्कर समय झाला सोपा । आतां कां पां येथ वसिजे ॥१३॥
वातवृष्टीचा सांडूनि त्रास । घेऊनि गोधनें स्त्रियार्भकांस । येथूनि निघा सावकाश । पोटीं भयलेश न धरूनी ॥१४॥
ज्याचा तुम्हीं केला यज्ञ । तो तुमचे शिरीं गोवर्धन । असतां बापुडें इंद्र कोण । विघ्न दारुण करूं शके ॥२१५॥
सप्तरात्रें हे वाकुडी । वर्षोनि उघडली रोकडी । राहिली वायूची झडाडी । नभीं मेहुडीं वितुळलीं ॥१६॥
उत्पथ सरिता वाहती स्थिर । वोहटूनि गेले महापूर । तुम्ही सकुटुंब सपरिवार । निघा बाहीर निःशंक ॥१७॥
जाणोनि अरुणोदयाची वेळ । प्रबोध पावे पक्षिकुळ । तेंवि हें वदतां श्रीगोपाळ । सर्व गोकुळ चेइलें ॥१८॥
किंवा प्राज्ञआलिंगन । सोडूनि निवडतां विश्वाभिमान । निजव्यापारीं करण प्राण । लाहती चैतन्य ज्या परी ॥१९॥
तेंवि व्रजजनांच्या वृत्ति । गिरिधररूपी ऐक्यस्थिति । रमल्या होत्या त्या मागुती । शरीरस्मृति पावलिया ॥२२०॥
मग पहाती चहूंकडे । वाम दक्षिण मागें पुढें । म्हणती पहा हो केवढें । आश्चर्य गाढें वर्तलें ॥२१॥
तंव कृष्णोक्ति पडली श्रवणीं । निर्भय बाहेर निघा म्हणोनी । निरभ्र निर्वात गगन धरणि । देखोनि मनीं हरिखेले ॥२२॥

ततस्ते निर्ययुर्गोपाः स्वं स्वमादाय गोधनम् । शकटोढोपकरणं स्त्रीबालस्थविराः शनैः ॥२७॥

त्यानंतरें ते गोपाळ । गाडे जुंपूनि उतावेळ । वरी उपकरणें भरिलीं सकळ । आणि स्त्री बाल स्थविर ही ॥२३॥
गोधनें कळप घालूनि पुढें । मागें हळूहळू हाकिती गाडे । एक व्रजामाजि वेंगाडे । गेले धडफुडे वीक्षणा ॥२४॥
लहान थोर नारी नर । गाई वांसुरें जीवमात्र । स्वसामग्री सोपस्कर । सांडूनि गिरिवर निघाले ॥२२५॥
जितुका वस्तूंचा सांटोपा । तितुका काढिती करूनि खेपा । मग प्रार्थिती सुरपादपा । कंदर्पबापा कृष्णातें ॥२६॥
गिरितळवट सांडूनि सकळ । बाहीर निघालें गोकुळ । ऐसें जाणूनि तमाळनीळ । ठेवी शैल स्वस्थानीं ॥२७॥

भगवानपि तं शैलं स्वस्थाने पूर्ववत्प्रभुः । पश्यतां सर्वभूतानां स्थापयामास लीलया ॥२८॥

षड्गुणैश्वर्यसंपन्न । लीलाविग्रही श्रीभगवान । तोही स्थापी गोवर्धन । व्रज संपूर्ण निघालिया ॥२८॥
गोपसमूह व्रजा गेला । कृष्णें पर्वतही उतरिला । पूर्वी होता जेंवि संचला । तेंवि स्थापिला स्वस्थानीं ॥२९॥
रेखा सांधा न दिसे चीर । चळों नेदितां अणुमात्र । लीलेंकरूनि ठेवी गिरिवर । सर्व चराचर देखतां ॥२३०॥
गगन स्वयंभ निरावलंब । जेणें निर्मिलें नसतां स्तंभ । आवर्णोदकी हा ब्रह्मांडकुंभ । त्रिजगद्गर्भ संरक्षी ॥३१॥
निश्चळापोटीं भ्रमणशीळ । नक्षत्रादि ग्रहमंडळ । यथानियमें चाळी अनिळ । नोहे बरळ अणुमात्र ॥३२॥
पूर्वे उगवोनि नक्षत्रमाळ । पश्चिमे उजु चाले सकळ । तेथेंचि नवग्रहांचा मेळ । चाले हळूहळू पूर्वेसी ॥३३॥
तेथ भौमादि भास्करि जीवां । पूर्व पश्चिम दोहींसवा । गगन मोकळें घ्यावया धांवा । आज्ञा गौरवा अनुरूप ॥३४॥
जळापासूनि होती तरु । त्यामाजि वाढे वैश्वानरु । ऐशी ज्याची आज्ञा सधरु । तो गिरिधर प्रभुवर्या ॥२३५॥

तं प्रेमवेगान्निभृता व्रजौकसो यथा समीयुः परिरंभणादिभिः ।
गोप्यश्च सस्नेहमपूजयन् मुदा दध्यक्षताद्भिर्युयुजुः सदाशिषः ॥२९॥

संस्थापूनि गोवर्धन । येतां देखोनि मधुसूदन । प्रेमवेगें उचंबळून । धावे व्रजगण सामोरा ॥३६॥
आपुलालिया स्नेहभरीं । संबोधिती नानापरी । नाना बाबा दादा हरि । म्हणती मुरारि मुकुंदा ॥३७॥
एक कडकडां भेटती । एक स्नेहें आलिंगिती । एक पोटेंशीं कवळिती । हृदयीं धरिती पैं एक ॥३८॥
एक मस्तकावघ्राण । करूनि उतरिती निंबलोण । एक पाहती चक्षुष्मान । सुंदर वदन कृष्णाचें ॥३९॥
एक हनुवटी धरिती करीं । एक चुंबन देती हरी । एक स्नेहाळ पद्मकरीं । गिरिवरधारी स्पर्शती ॥२४०॥
एक देवडे उभे करीं । लोण उतरूनि कृष्णावरी । मुष्टि निजश्रवणा शेजारीं । लाऊनि श्रीहरि वोवाळिती ॥४१॥
एक मिथा देती टाळी । हास्यविनोद गदारोळीं । एक परस्परें करिती रळी । श्रीवनमालितुष्ट्यर्थ ॥४२॥
जैसा जैसा ज्यांचा प्रेमा । तैसा तैसा मेघश्यामा । पुढें जाऊनि देती क्षेमा । सुखसंभ्रमा भोगिती ॥४३॥
तैशाचि गोपी बाळा मुग्धा । प्रौढा प्रगल्भा आणि वृद्धा । सप्रेमभरें परमानंदा । श्रीमुकुंदा कवळिती ॥४४॥
नयन मेळवूनियां नयना । एक सलज्ज व्रजाङ्गना । एक कवळिती मनें मना । सव्रीड जनामाजिवड्या ॥२४५॥
एक कृष्णावरूनि वारा । लागो आपुलिया शरीरा । म्हणवूनि सेविती शेजारा । बाह्य व्यापारा विसरोनी ॥४६॥
एकी कृष्णाचें मधुर वचन । श्रवणें करावया प्राशन । क्षुधित तृषित अंतःकरण । जगज्जीवन प्राशिती ॥४७॥
कृष्णलावण्य सविलास । पहावया सावकाश । वाढविती सप्रेम रस । भवहव्यास विसरूनी ॥४८॥
एक स्नेहें कवळूनि पोटीं । करिती श्रीकृष्णाशीं गोठी । एक स्नेहाळ अंगयष्टि । पहाती दृष्टिक्षतभयें ॥४९॥
एक झाडिती कृष्णकुरळां । एकी पुसिती वदनकमळा । एकी कवळूनि बाहुयुगळा । सवें घननीळा चालती ॥२५०॥
एकी परिमार्जिती पाठी । एकी मिठी घालिती कंठीं । एकी कृष्णमूर्ति धाकुटी । मानूनि हनुवटी चुंबिती ॥५१॥
एकी बल्लवी सुकुमारा । कृष्णाचिया श्रमपरिहारा । निजपालवें घालिती वारा । गाती सुस्वरा तच्छंदें ॥५२॥
एकी धाकुट्या व्रजकुमारी । कृष्णापुढें आनंदगजरीं । नृत्य करिती नानापरी । सबाह्य श्रीहरि लक्षूनी ॥५३॥
एकी कृष्णासि जिताणें । करिती सुस्निग्ध अंतःकरणें । दध्यक्षता शुद्ध सुमनें । निर्मळ जीवनें आणूनी ॥५४॥
हर्षोत्कर्षें पूजिती हरि । प्रेम न समाये अंतरीं । आशीर्वाद सहस्रवरी । सुभगा नारी वोपिती ॥२५५॥
वोवाळूनि सांडिती धनें । एकी कुरवंडिती तनुमनें । एकी करिती नीरांजनें । आशीर्वचनें वोपुनी ॥५६॥
ऐसिया बल्लव बल्लवी सकळा । कृष्णीं अद्भुत स्नेहाळा । प्रेमें कवळिती घनसांवळा । तंव आला मेळा पितरांचा ॥५७॥

यशोदा रोहिणी नंदो रामश्च बलिनां वरः । कृष्णमालिंग्य युयुजुराशिषः स्नेहकातराः ॥३०॥

नंद यशोदा रोहिणी । मातृतुल्य वृद्ध गौळणी । प्रेमपान्हा दाटोनि स्तनीं । आलीं धांवोनि हरीपाशीं ॥५८॥
एक मांदी सारिती करीं । एक दाविती पैल हरि । पुत्रवात्सल्यें घाबिरीं । हृदयीं श्रीहरि कवळिती ॥५९॥
मौळ कुरवाळिती हातें । स्नेहें हुंगिती मस्तकातें । पर्वत धरिला कोण्या हातें । म्हणोनि गात्रातें स्पर्शिती ॥२६०॥
झणें कृष्णासि होईल दृष्टि । म्हणोनि लोण उतरिती मुष्टि । वदन पुसोनि झाडिती पृष्ठीं । धरूनि हनुवटी चुंबिती ॥६१॥
गगनीं भ्रमती शशिभास्कर । जंववरी औत्तानपादि स्थिर । तंववरी चिरायु गिरिधर । असो आधार व्रजजना ॥६२॥
श्रीकंठाचा जटाजूट । वसवी जान्हवीजलाचा पाट । तोंवरी चिरायु कंबुकंठ । हो शितिकंठप्रसादें ॥६३॥
श्वेतवराह दाढेवरी । जंववरी ब्रह्मकटाह धरी । तंववरी चिरायु श्रीमुरारि । करो ईश्वरी जगदंबा ॥६४॥
जंववरी भ्रमे नक्षत्रमाळ । पंचभूतेंशीं दिग्मंडळ । तोंवरी माझा श्रीगोपाळ । असो निश्चळ चिरायु ॥२६५॥
कृष्णा तुझे शत्रुवर्ग । महाविघ्नीं पावती भंग । अक्षत आयुष्मान् अभंग । तुज श्रीरंग संरक्षो ॥६६॥
ऐसे अनेक आशीर्वाद । देऊनि कवळिती मुकुंद । तंव परम बळिष्ठ बंधु स्निग्ध । आला सन्निध बलराम ॥६७॥
श्रीकृष्णासि आलिंगन । देऊनि म्हणे संकर्षण । ब्रह्मांडगर्भींचें कल्याण । त्याचें स्थान तूं होईं ॥६८॥
माता पिता बंधु आप्त । कृष्णालिंगनें झाले तृप्त । अमरपतीचा गर्व लुप्त । तेणें तो संक्षिप्त सलज्ज ॥६९॥

दिवि देवगणाः साध्याः सिद्धगन्धर्वचारणाः । तुष्टुबुर्मुमुचुस्तुष्टाः पुष्पवर्षाणि पार्थिव ॥३१॥

मग अमरेंद्र सलज्जचित्तें । सुरग्ण प्रेरिले होत्साते । स्वर्गीं करिती उत्साहातें । तें नृपातें शुक सांगे ॥२७०॥
ऐकें मत्स्येंद्रतनयातनया । पार्थिवाग्रणी कौरवराया । इंद्रें जाणूनि निजअनार्या । हरिपरिचर्या आदरिली ॥७१॥
शक्रें आज्ञापिले सुरगण । साध्य गंधर्व चारण । देवयानीं भरलें गगन । आले संपूर्ण सुरसिद्ध ॥७२॥
गुह्यक किंपुरुष किन्नर । यक्ष किन्नर विद्याधर । नासत्य विश्वेदेव पितर । दिव्य फणिवर ओजस्वी ॥७३॥
रुद्र आदित्य मरुद्गण । लोकपाळ सवैश्रवण । दिव्य महर्षि तपोधन । सुप्रसन्न हृत्कमळीं ॥७४॥
इंद्रमदगर्वाचा भंग । देखोनि कृष्णमहिमा अभंग । गगनीं पातले सवेग । स्तविती श्रीरंग जयशब्दीं ॥२७५॥
जय जय ब्रह्माण्डभाण्डोदरा । जय जगज्जनका जगदीश्वरा । जयजय आम्नायाभ्यंतरा । जगदाधारा जगन्मया ॥७६॥
जयजय व्रजजनमनोरंजना । जयजय निर्जरवरगंजना । जयजय भवगजमदभंजना । जय जनजननावनाप्यया ॥७७॥
क्ष्वेडपमानसकुवलयभृंगा । कुवलयदुकूलतनयारंगा । केवळयदुकुलनिदाघभंगा । निःसंगसंगा चिन्मात्रा ॥७८॥
कमलाकुंकुमप्रकाशका । कंबुग्रीवा कलुषान्तका । कलिमलमथना कामजनका । कुटिलालका कमनीया ॥७९॥
पद्माप्रियतमकलत्रवंता । परममंगला पूर्णभरिता । पदजलपावनप्रकटीकृता । पुण्यचरिता परमात्मा ॥२८०॥
सुख्तमसदया सुरवरपाळा । सुंदर सुकुमार सप्रेमळा । सामसुललितसुमंगळा । सुजन सुशीळा सुसेव्या ॥८१॥
कौणपपूज्या कौणपमथना । गीर्वाणसेव्या गीर्वाणकथना । निर्वाणदानीनिर्वाणसदना । निजरतरमणा रमणीया ॥८२॥
मंगळजननीमंगलसूत्रा । मधुसूदना मधुचरित्रा । गोगोपक गोपीपुत्रा । गिरिवरधरा गोविंदा ॥८३॥
ऐसीं स्तोत्रें सुललितवाणी । करूनि स्तविला सुरवरगणीं । परमानंदें वर्षती सुमनीं । दिव्यविमानीं नरवर्या ॥८४॥

शंखदुंदुभयो नेदुर्दिवि देवप्रणोदिताः । जगुर्गंधर्वपतयस्तुंबुरुप्रमुखा नृप ॥३२॥

मृदंगपणवानकगोमुख । मुरु मर्दल मुरज शंख । कृष्णविजयश्रीचा घोक । दुंदुभि निःशंक त्राहटिती ॥२८५॥
तंत्री वल्लकी ब्रह्मवीणा । विपंच्यादि प्रभेद नाना । झल्लरी कांसोल तालमूर्च्छना । जीं तानमाना तपांगें ॥८६॥
हाहा हूहू चित्ररथ । गंधर्वपति जे विख्यात । नारदतुंबुरुप्रमुख तेथ । गाती ऊर्जित कृष्णयश ॥८७॥
मधुसामादि चित्र सामें । एक आळविती बृहत्सामें । माजि सुमंगल प्रभूचीं नामें । गाती सुखतमें आनंदें ॥८८॥
एक वैष्णव बागडे । कृष्णप्रेमें सबाह्य वेडे । गाती कृष्णाचे पवाडे । चंद्रचूडें समवेत ॥८९॥
गाजे आनंदें रोदसी । म्हणती इंद्रा कां रोदिसी । तुळना करितां क्षीरोदेंशीं । नाडराशीं कैं समता ॥९०॥
ऐसा सुरवरांचा मोद । व्यासनंदन निरूपी विशद । ऐकोनि पावला परमानंद । कुरुकुलकुमुदचंद्रमा ॥९१॥

ततोऽनुरक्तैः पशुपैः परिश्रितो राजन् सगोष्ठं सबलोऽव्रजद्धरिः ।
तथाविधान्यस्य कृतानि गोपिका गायंत्य ईयुर्मुदिता हृदिस्पृशः ॥३३॥

तंव येरीकडे सप्रेमळ । राया गौळिणी गोपाळ । भंवता वेष्टूनि घननीळ । सहित प्रबळ बळराम ॥९२॥
अवघे चालती आनंदगजरीं । वेणु विषाणें वंश मोहरी । वाद्यें वाजती जयजयकारीं । सुमनें सुरवरीं वर्षतां ॥९३॥
चामरें अंशुकें कंबल । ऊर्ध्व ढाळिती बल्लववाळ । गीतनृत्यवाद्यकुशळ । रंगीं सुताळ नाचती ॥९४॥
ऐसा अनेक उत्साहगजरीं । स्वजनसाग्रजें सहित श्रीहरि । राया प्रवेशला व्रजपुरीं । गाती सुंदरीं हरिचरितें ॥२९५॥
अद्भुत श्रीकृष्णाची लीला । कृष्णें गोवर्धन उचलिला । कृष्णें अघ बक संहारिला । कृष्णें नाथिला कालिया ॥९६॥
कृष्ण प्याला दावानळ । कृष्ण उन्मळी अर्जुन यमळ । कृष्णें शोषूनि स्तनींचें गरळ । मारिली विशाळ पूतना ॥९७॥
कृष्णें शकट भंगिला चरणें । तृणावर्त घेतला प्राणें । ऐशीं अनंतगुणकीर्तनें । गाती वदनें व्रजललना ॥९८॥
ज्याचे हृदयीं श्रीकृष्णगुण । सप्रेमभरें स्पर्शले पूर्ण । कीं तो परम प्रियतम कृष्ण । हृदयीं स्पर्शोन ठसावया ॥९९॥
म्हणोनि जागृतिस्वप्नसुषुप्ती । माजि कोंदला कमलापति । कायावाचामनोवृत्ति । अन्य प्रवृत्ति विसरलीं ॥३००॥
ऐशी अद्भुत कृष्णलीला । तुज परिसविली कुरुभूपाळा । पुढें नंदादि गोपां सकळां । मनीं अवगमला हरिमहिमा ॥१॥
विस्मयें गोप परस्परें वदती । बाळकाआंगीं हे अद्भुत शक्ति । तरी हा केवळ ईश्वरमूर्ति । व्रजीं उत्पत्ति अयोग्य ॥२॥
तयांसि नंदें गर्गवचनें । विवरूनि कथिलीं भविष्यमानें । तें ऐकोनि गौळी मनें । समाधानें निवाले ॥३॥
तये कथेच्या श्रवणाप्रति । विशुद्धमानस सत्सुकृती । परीक्षितीचे मागिलिये पंक्ती । बैसतां तृप्ति समसाम्य ॥४॥
सप्तवासरीं अवधि थोडी । म्हणऊनि चोजवूं न लाहे गोडी । अहोरात्र जैसा बराडी । तैसें तांतडी नृप सेवी ॥३०५॥
तें परमामृत तया पाठीं । शौनकाचार्याचिये मटीं । बैसवूनि समस्त ऋषींचिया थाटी । सूत त्यां वाढी व्यासाज्ञा ॥६॥
भाषाभाजनीं तेचि सुधा । भरूनि श्रोतयां मानसशुद्धां । समर्पणाचा वरदें धंदा । मज गोविंदें निरूपिला ॥७॥
विबुध प्रबुद्ध बुधाबुध । श्रवणपात्रीं जे सावध । त्यांसि निर्वाणसुधाबोध । लाभे प्रसिद्ध हरिवरें ॥८॥
एकनाथसाम्राज्यभुवनीं । चिदानंदें कळवळोनी । स्वानंदसुखाचीं पारणीं । गोविंदसद्गुणीं श्रोतयां ॥९॥
ते पाकशाळेचीं शुद्ध अन्नें । पक्कें दयार्णवजीवनें । श्रोतीं पाहोनि मनाच्या नयनें । कृष्णस्मरणें सेवावीं ॥३१०॥
जाणिवेचि मक्षिका पडे । तरी जेविलेंही होय उबडें । सर्व पंक्तीसी वैरस्य घडे । भोजन पुढें न रुचें तें ॥११॥
मक्षिका जाणिवेची वारणें । संशयहरळां निवारणें । निंदाविटाळासि न शिवणें । विकल्पशुनें नातळिजे ॥१२॥
अभिमानाची गरळ पडतां । तैं अमृतचि प्रवर्तें घाता । यालागिं सावधपणें श्रोतां । परमामृता सेविजे ॥१३॥
प्रपंचचिंतेचा ऋणकरी । आण घालूनि अभ्यंतरीं । बैसो नेदी पात्रावरी । वोढी बाहेरी हृद्रोग ॥१४॥
तयासि संतांचिया वचनें । प्रारब्धमर्यादानियमनें । मग निश्चित अंतःकरणें । श्रोतीं सेवणें चित्सुख हें ॥३१५॥
येणें निःशेष भवरोग झडे । स्वानंदबोधें दृष्टि उघडे । कृष्णात्मकत्वें समरस घडे । मानस बुडे दयार्णवीं ॥१६॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरासहस्र मुनिप्रणीत । परमहंसाचा निजएकांत । स्कंध त्यांत दशम हा ॥१७॥
शुकपरीक्षितिसंवाद । महाराष्ट्रटीका भगवद्वरद । कृष्णदयार्णव निरूपी विशद । सद्गुरुगोविंदप्रसादें ॥१८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचर्विरचितायां ( इंद्रक्षोभो ) गोवर्धनोद्धरणं नाम पंचविंशतितमोऽध्यायः ॥२५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३३॥ टीका ओव्या ॥३१८॥ एवंसंख्या ॥३५१॥ ( पंचविसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १२८९७ )

पंचविसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP